लाडक्या मुलीच्या लग्नाची गोष्ट

कुटुंब (चित्र)कथा

विवेक मराठी    13-Aug-2025   
Total Views |
father of the bride
फादर ऑफ द ब्राईड ही बाबाच्या लाडक्या मुलीच्या लग्नाची गोष्ट आहे, ही मुलीच्या लाडक्या बाबाची सुद्धा गोष्ट आहे. जर तुम्ही एका मुलीचा बाबा असाल, तर हा सिनेमा तुमच्यासाठी बनलेला आहे. तुमची मुलगी काहीं महिन्याची आहे का वर्षाची, त्याने काही फार फरक पडेल असे वाटत नाही. ह्या सिनेमातील कितीतरी क्षण तुम्हाला तुमच्या स्मृतिकोषात घेऊन जातील हे निश्चित.
असे म्हणतात, जेव्हा मुल जन्माला येते तेव्हा त्याच्याबरोबरच जन्मदात्याचा जन्म होतो. आपल्याच रक्त मांसाचा तो छोटासा गोळा पाहून माणूस कुठेतरी हलतो. आपल्यावर अवलंबून असणारा तो जीव पाहून जबाबदारीची जाणीव होते. त्याचे हसणे ओठावर स्मित आणते, त्याच्या रडण्याने कळवळायला होते. निरपेक्ष प्रेमाची कल्पना, सत्यात येणे तो अनुभवतो.
 
 
मूल, मुलगा असो किंवा मुलगी, प्रेम असतेच पण मुलात तो स्वतःला पाहतो, भविष्यातील कणखर पुरुषाला पाहतो, त्याने तसे बनावे ह्यासाठी प्रयत्न करतो. मुलीसाठी मात्र बाबा जास्त हळवा असतो. त्याच्यातील पुरुषावर मात करणारी ती पहिली स्त्री असते म्हणूनही असेल मुलीचा आणि बाबाचा बंधच वेगळा असतो.
 
 
मुलीच्या आयुष्यातील पहिला पुरुष असतो तिचे वडील. प्रेम, आदर, विश्वास, सुरक्षितता आणि भक्कम आधार जेव्हा वडिलांकडून मिळतो, तेव्हा ती मुलगी स्वतःचा आदर करायला शिकतेच पण आयुष्यात आलेल्या पुरुषांचा सुद्धा आदर करते. पुरुष चांगला असतो हा विश्वास प्रथम वडील देतात. या विश्वासावर जगाशी भिडण्याचे बळही देतात.
 
 
वडील फक्त नाव देत नाहीत तर ते प्रदाता असतात, संरक्षक असतात, गुरू असतात, पथ दर्शक असतात. वडील मुलीचे रोल मॉडेल असतात. एक छोटीशी, गोड मुलगी आपल्या पिटुकल्या डोळ्यांनी भारावून बाबाकडे बघते आणि बाबाची छाती अभिमानाने भरून येते. तिच्या चिमुकल्या बोटांनी ती बाबाचा हात घट्ट पकडते, त्याच्या मांडीवर बसून भवतालचे जग न्याहाळते आणि दमून त्याच्याच छातीवर डोकं ठेवून झोपते. बाबा तिचा पहिला वाहिला हिरो असतो.
 
 
त्या नंतर एक दिवस येतो जेव्हा ती स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहायला लागते. तिच्या जगात तिच्या बाबा बरोबरच, तिची खास स्वतःची माणसे प्रवेश करतात. मग कधीतरी ती मेकअप करायला लागते, हाय हिल्स घालते, स्वतःला आवडेल अशी फॅशन करायला लागते आणि बाबा मधील पुरुष हादरतो. ती मोठी झाल्याची जाणीव घाबरवणारी असते.
 
तिचे मित्र कसे असतील, ते तिच्याकडे कोणत्या नजरेने पाहतील, तिच्याकडून काय अपेक्षा करतील हे प्रश्न बाबाला आता सतावतात. तरुण मुलाच्या मनात काय येऊ शकते याची कल्पना असतेच कारण कधीतरी तोही तरुण असतो.
 
 
त्या नंतर असा एक दिवस येतो की बाबाला ती चुकीच्या मुलाला भेटेल याची भीती वाटत नाही तर तिच्या आयुष्यात तिला शोभेल असा मुलगा भेटेल याची काळजी वाटते कारण तो भेटला की एक दिवस तुम्हाला सोडून ती त्याच्याबरोबर जाणार असते.
हाच तो क्षण आहे ज्याची भीती मला गेले सहा महिने, अहं, खरेतर गेले बावीस वर्ष होती.
 
 
‘फादर ऑफ द ब्राईड’ या सिनेमात जॉर्ज बँक्स, मुलीच्या लग्नावेळी जेव्हा ही कबुली देतो तेव्हा प्रेक्षकांत बसलेल्या बाबा लोकांचे डोळे भरून येतात.
 
father of the bride 
 
’फादर ऑफ द ब्राईड’ ही एका बाबाच्या लाडक्या मुलीच्या लग्नाची गोष्ट आहे.
 
जॉर्ज बँक (स्टीव्ह मार्टिन) हा एक सर्वसामान्य, मध्यमवर्गीय व्यावसायिक आहे. एक छानसे टुमदार घर, गोड बायको (डायना किटन्) दोन मुलं, एक कुत्रा आणि घराला असलेले पांढरे शुभ्र कुंपण. त्याच्यासाठी ही आनंदाची व्याख्या आहे. त्याच्या व्यवसायात तो खूश आहे पण त्याचे कुटुंब त्याचे सर्वस्व आहे. एका सेमीस्टरसाठी युरोपमध्ये शिकायला गेलेली त्याची मुलगी, अ‍ॅनी (किंबर्ली विलियम्स) घरी परत येते अणि आपण आपलं लग्न ठरवले आहे अशी आनंदाची बातमी देते, तेव्हा जॉर्जच्या छोट्याश्या जगात मोठी खळबळ माजते.
 
आता पर्यंत आपल्यावर अवलंबून असलेली आपली छोटीशी मुलगी, आयुष्याचा निर्णय घेण्याएवढी मोठी कधी झाली? हा पहिला धक्का. तिची निवड, तिला सुख देण्याएवढी लायक असेल का ही भीती, आपण आता तिच्यासाठी हिरो नाही, त्याची जागाच कुणीतरी दुसर्‍याने बळकावली आहे हा सुप्त मत्सर आणि शेवटी ती जाणार याचे दुःख.
 
 
डोळ्यासमोर टप्याटप्याने बाबा उलगडत जातो. जॉर्ज बँक्स आपल्या मुलांच्या बाबतीत हळवा आहे. सीट बेल्ट लावला आहे का, संध्याकाळी मुलं घरी आहेत ना, ती बाहेर गेली असतील तर जवळपास आली की फोन करतील ना, निष्काळजीपणामुळे त्रासात पडणार नाही ना असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात. त्याचा अती काळजी करण्याचा स्वभाव काही प्रसंगात नकोसा वाटला तरीही त्याचे कुटुंबावर फार प्रेम आहे. या सर्व प्रसंगाच्या आठवणी सुंदर असाव्यात यासाठी तो प्रयत्नशील आहे हे लक्षात येते.
 
 
एवढ्या हुशार मुलीच्या लायक कुणी असू शकेल हेच त्याच्या मनाला पटत नाही. त्यात एवढ्या थोड्या कालावधीत आपली जागा कुणी घेऊच कसा शकतो हा ही प्रश्न त्याला सतावतो. हा निश्चित लायक आहे का ही शंका त्याला त्रास देते.
 
 
तुझा भावी नवरा, संवाद सल्लागार (communications consultant) म्हणजे नक्की काय काम करतो?
 
तो मुलीलाच विचारतो. यात त्या मुलावर संशय नसतो पण मुलीची काळजी असते.
 
इथे मात्र मुलगी प्रेमात असते अणि प्रेमात शंकेला जागा नसते.
 
प्रेम म्हणजे प्रेम असते, कोणत्याही नात्यात सेम असतं. मुलीच्या प्रेमापुढे बाबा विरघळतो आणि लग्नाच्या तयारीला लागतो. स्वप्नातून वास्तवात आल्यावर प्रश्न असतो तो पैशाचा. मुलाचे कुटुंब श्रीमंत, त्यांच्या प्रतिष्ठेला साजेल असे लग्न.
 
ओह.. हे थोडे प्रतिगामी वाटतंय का!!
 
नाही बरं. बाप प्रतिगामी/पुरोगामी नसतो. मुलीपुढे तो बाप असतो.
 
अर्थात व्यवहार ही गोष्ट असतेच. लग्नाचा खर्च 250 डॉलर प्रत्येकी. कितीही सुखवस्तू असला तरी विचार करण्याएवढा असतोच. मुलीला कितीही हौस असेल तरी परिस्थिती समजून ती खर्च कमी कसा करावा याच्या गाईड लाईन्स वाचता वाचता झोपी जाते आणि बाबा आपली पर्स उघडी करतो. ह्याचा स्क्रीनप्ले फारच सरळसोट आहे. जे जे घडायचे आहे त्याची नोंद सिनेमात झाली आहे. ते कसे घडतंय हे पाहणे मात्र मनोरंजक आहे. काही मजेशीर घटना या सिनेमात आहेत.
 
 
* मुलाच्या शिक्षणावरून तो नक्की काय करतो याचा वडिलांना काही अंदाज येत नाही. हा आपल्या मुलीला फसवत तर नाही ना, म्हणून चक्क टीव्हीवर दाखवण्यात येणार्‍या गुन्हेगारांच्या फोटोत त्याचे नाव आहे का शोधणे किंवा मुलाच्या घरी गेल्यावर, त्याच्या वडिलांचे बँकबुक टेबलावर दिसल्यावर, ते उघडून त्यात किती पैसे आहेत ते पाहणे.
 
 
ह्यातही पैशाचा लोभ नसतो पण एकेवळ पैशाने हुरळून जाण्यापेक्षा मुलीचे भविष्य यांच्याकडे सुरक्षित असेल का ही जाणीव जास्त असते. लग्नाच्या खर्चावरून विषय आला तर आताच घडलेल्या काही दुःखद घटनांबरोबर तुलना होऊ शकते पण एक लक्षात घ्यायला हवे, हा खर्च ऐच्छिक आहे, मुलगी लाडकी आहे आणि लग्न थाटात करून देताना सुद्धा त्या मुलाची पूर्ण माहिती काढण्याएवढा शहाणपणा मुलीच्या बाबांकडे आहे.
 
 
*एका माणसाचा खर्च 250 डॉलर आहे आणि जवळजवळ सहाशे लोक अपेक्षित आहे हे समजल्यावर नावे कमी करण्यासाठी कारणे शोधणे. त्यात एक माणूस आता जगात नाही म्हंटल्यावर टाकलेला सुस्कारा सुद्धा आहे.
 
 
* मुलीचा आनंद पाहून, तिच्या डोळ्यात फुलणारी स्वप्ने पाहून बाबा आपल्या हृदयावर हात ठेवतो ..
 
 
जणू काही बाहेर येऊ पाहणार्‍या हृदयाला तो थांबवतो आहे. मुलगी आता लांब जाण्याचे दुःख आणि त्याच्या आनंदात सुख मानण्याची वृत्ती या दोन्ही भावनांचा अविष्कार स्टीव्ह मार्टिनने आपल्या अभिनयातून दाखवला आहे.
 
 
हा सिनेमा आवडीने बघणार्‍या प्रत्येक पुरुषाच्या मनात कुठेतरी जॉर्ज बँक्स दडलेला असतो. जो आपल्या मुलांना सायकल शिकवतो. त्यांच्याबरोबर बेस बॉल, बास्केट बॉल खेळतो. जो त्यांना चांगल्या कार्यक्रमांना घेऊन जातो. असा बाबा जो त्याच्या मुलांच्या नजरेत हिरो असतो.
 
 
फादर ऑफ द ब्राईड ही बाबाच्या लाडक्या मुलीच्या लग्नाची गोष्ट आहे, ही मुलीच्या लाडक्या बाबाची सुद्धा गोष्ट आहे. जर तुम्ही एका मुलीचा बाबा असाल, तर हा सिनेमा तुमच्यासाठी बनलेला आहे. तुमची मुलगी काहीं महिन्याची आहे का वर्षाची, त्याने काही फार फरक पडेल असे वाटत नाही. ह्या सिनेमातील कितीतरी क्षण तुम्हाला तुमच्या स्मृतिकोषात घेऊन जातील हे निश्चित.
 
(टीप : Disney Hotstar चित्रपट पाहता येईल.)

प्रिया प्रभुदेसाई

प्रिया  प्रभुदेसाई

अर्थशास्त्रात पदवीत्तर शिक्षण.... सा. विवेक आणि दिव्य मराठीत दोन वर्षे चित्रपट विषयक सदर. दिवाळी अंक, मासिके यात चित्रपटाविषयक लेखन. सेन्सॉर बोर्डवर ज्युरी म्हणून चार वर्षांसाठी निवड.