@सुरेश दत्तात्रेय साठे
9822823653
इंदुताई म्हणजे मांगल्याचे दुसरे तेजस्वी रूप होते. सुखवस्तू घरातील असतानाही त्यांच्या डोक्यात त्याचे वारे कधी शिरले नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुविध होते. पानशेतच्या पुरात घरोघर जाऊन मदतकार्य करणार्या इंदुताई, महिला सहकारी उद्योगालयात खाली बसून कामाला वाहून घेणार्या इंदुताई, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्यात घरोघर जाऊन प्रचार करणार्या इंदुताई आणि ’रविवार केसरी’चा तसेच ’सह्याद्री’ मासिकाचा बाल विभाग सांभाळणार्या आणि पुढे सह्याद्री मासिकाचे कार्यकारी संपादकपद सांभाळून पत्रकारितेशी एकरूप झालेल्या इंदुताई ही त्यांची अनेकरंगी रूपे. वात्सल्यसिंधूचे दुसरे रूप म्हणजे इंदुताई होत्या. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची अलीकडेच सांगता झाली, त्या निमित्ताने केलेले हे पुण्यस्मरण करणारा लेख..
इंदुताई मूळच्या कोकणातील. चिपळूणजवळील केतकी-बिवली हे त्यांचे मूळ गाव. 24 एप्रिल 1925 रोजी त्यांचा जन्म झाला. नुकतीच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली. त्यांचे माहेरचे आडनाव केतकर. त्यांचे वडील रामचंद्र हरि तथा दादा (नाना) हे गावी शेती, बागायती, गुरे, गोठा पाहात असत. इंदुताईंची आई जानकीबाई याही बागायती इ. कामांत मदत करीत. दादा चिपळूणला बुरुमतळी भागात राहत. आजही त्यांचे तेथे घर आहे. त्यांना 3 मुलगे आणि 2 मुली होत्या.
इंदुताई प्रथमपासून धीट होत्या. आईला शिक्षणाविषयी आस्था असल्याने इंदुताई वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून आजोळी चिपळूणला राहायला आल्या. पहिली 4 वर्षे त्या येथील कन्या शाळेत शिकल्या. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर इंग्रजी शाळेसाठी त्यांना आईने व आजीने पुण्याला हुजूरपागा शाळेत पाठवले. लहानपणापासून शिक्षणाच्या निमित्ताने घरापासून व आईवडिलांपासून दूर राहावे लागल्यामुळे इंदुताईना जबाबदारीची जाणीव फार लवकर झाली. शिस्त, संयम व व्यवस्थितपणा हे त्यांचे गुण होते.
इंदुताईंचे महाविद्यालयाचे पहिले वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच तळेगावचे दादा केतकरांचे स्नेह शि.ल.करंदीकर यांनी इंदुताईंसाठी जयंतराव टिळकांचे स्थळ सुचविले. मी विवाहानंतर राहिलेले शिक्षण पूर्ण करणार, असे इंदुताईंनी सांगितले व जयंतराव यांच्या आई शांताबाईंनी ते लगेच मान्य केले. इंदुताई व जयंतरावांचा विवाह गायकवाड वाड्यात (आताचा टिळकवाडा) झाला. संसार करताना फर्ग्युसन महाविद्यालयातील शिक्षण उत्तम प्रकारे सांभाळून इंदुताईंनी बी.एस्सी.ची पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. त्यानंतर शिवणकाम, भरतकाम, विणकाम, फुलशेती या कलाही आत्मसात केल्या.
या सर्वांचा उपयोग त्यांनी समाजकार्यासाठी केला. सासूबाईंच्या अनाथ हिंदू महिलाश्रमाचा आदर्श घेऊन त्यांनी ‘महिला सहकारी केंद्र’ ही संस्था सुरू केली. विविध पदार्थ तयार करण्यापासून त्यांच्या विक्रीपर्यंतची सर्व कामे प्रारंभी त्यांनी स्वतः केली. आज या संस्थेला 50 वर्षे पूर्ण झाली असून अनेक गरजू, अशिक्षित महिलांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
सार्वजनिक कामाच्या अनुभवामुळे हुजूरपागा शाळेचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. शाळेत अनेक आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. सेवासदन, युनिव्हर्सिटी वुमेन्स असोसिएशन, महिला सेवाग्राम अशा अनेक संस्थांशी पदाधिकारी म्हणून त्यांचा संबंध होता.
इंदुताईंनी आपल्या समाजकार्याबरोबरच झाडाफुलांची आवडही जोपासली. त्यांनी व जयंतरावांनी घरातल्या प्रशस्त गच्चीवर गुलाबाचे नंदनवन फुलवले. गुलाब प्रदर्शनातील अनेक बक्षिसे इंदुताईंनी मिळवली. तसेच कॅक्टसचेही अनेक प्रकार त्यांनी जमवले. पुण्यात कॅक्टस सोसायटी काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ’मातीविना शेती’, ’बोन्साय’ या पद्धतीनेही त्यांनी अनेक झाडे फुलवली.
आपल्याला नेमून दिलेली कार्ये व कर्तव्ये त्यांनी निष्ठेने व आनंदाने पार पाडली. दोन वेळा निवडणुकीची संधी मिळूनही राजकारण हा आपला विषय नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधून अन्य आवड जोपासली. समाजकार्याची जबाबदारी त्यांनी जयंतरावांबरोबर पार पाडली.
प्रसन्न, हसरे व्यक्तिमत्त्व, बोलके डोळे, मनस्वी साधेपणा आणि या सर्वांवार कडी करणारा सेवाभाव याचेच नांव इंदुताई टिळक. तोंडात खडीसाखरेबरोबरच लोकमान्य टिळक नावाचा भारुन टाकणारा मंत्र. विश्रांती हा शब्द त्यांच्या गावीही नव्हता. दुपारच्या वेळी कागदाचे कातरकाम करून कुणाला ’ओरिगामी’ च्या कलाकृती बनवून दाखवताना तरी त्या दिसायच्या किंवा गरजू आणि गरीब महिलांच्या संस्थेत त्या महिलांच्या बरोबरीने त्यांना खाद्यपदार्थ बनवायला मदत करताना आढळायच्या. त्यांनी कशातही कमीपणा मानला नाही. लोकमान्यांचा स्वदेशीचा मंत्र तो आपला मंत्र, तो या देशाचा मंत्र, देशाच्या प्रगतीचा मंत्र, असे त्या मानत.
एखादा विचार त्यांनी आत्मसात केला की झपाटल्याप्रमाणे त्या विचारांच्या आधारे काम करायच्या. समाजातले महिलांचे स्थान उंचावले पाहिजे, महिलांकडे पाहायची समाजाची दृष्टी बदलली पाहिजे, यासाठी चळवळीचा मार्ग न पत्करता समाजमन बदलण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत, ही त्यांची वृत्ती होती. राजकारण हा त्यांनी आपला विषय कधीच मानला नाही. त्यांचे यजमान ’केसरी’चे माजी संपादक आणि विश्वस्त जयंतराव टिळक विधानसभेवर निवडून गेले, राज्यसभेवर त्यांची 2 वेळा निवड झाली, पुढे राज्यात ऊर्जामंत्रीपद त्यांनी भूषवले आणि विधानपरिषदेचे ते सभापतीही झाले तरी इंदुताईंनी आपली दिशा बदलली नाही.
बेळगावच्या सीमा प्रश्नावरल्या लढ्यात आणि गोव्याच्या मुक्तिसंग्रामात महिलांची आघाडी सांभाळताना पडेल ती कामे करायला त्या डगमगल्या नाहीत. गोव्याच्या लढ्यात भाग घेणाच्या आंदोलकांसाठी पुण्यातून घरटी पोळ्या जमवायच्या कामी त्यांनी हिरिरीने पुढाकार घेतला. इतर महिलांना गोळा करून एकेका दिवसात सात-आठ हजारांवर पोळ्या त्यांनी जमा केल्या. गोवा मुक्तिसंग्रामाच्या महिला नेत्या सुधाताई जोशी, प्रमिला दंडवते इ. ना त्यांनी सर्व प्रकारची मदत केली. गोवा मुक्तिसंग्रामाचे केंद्र कार्यालय केसरीवाड्यात असल्याने संघाच्या कार्यकर्त्यांचे तेथे नियमित जाणेयेणे असायचे. संघचालक विनायकराव आपटे, नाना पालकर, बाळासाहेब साठ्ये, प्रचारक तात्या बापट, नगरसेवक अॅड.गो.प्र.भागवत, श्रीकृष्ण भिडे या सर्वांशी जयंतरावांचा जवळचा संबंध जोडला गेला. तो स्नेह अगदी अखेरपर्यंत त्यांनी जपला. त्या दिवसात ते हिंदुमहासभेत कार्यरत होते. गणपतराव नलावडे, वि.रा. पाटील, पं.बखले, वि.घ. देशपांडे, प्रभृतींसह जयंतराव सक्रीय असायचे. रामभाऊ म्हाळगींशी त्यांची मैत्री होती. मा. बाबाराव भिडे यांच्या घरी पूजनीय श्रीगुरुजी उतरायचे तेव्हा वेळात वेळ काढून जयंतराव त्यांच्या भेटीसाठी जात असत.
इंदुताईंचाही मालतीबाई परांजपे, सुशिलाताई आठवले, लीलाताई लिमये या जनसंघाच्या महिला व समितीच्या वंदनीय ताई आपटे यांचेशी संबंध होता. वंदनीय मावशींनाही त्या केसरीवाड्यात आपल्या घरी निमत्रित करीत असत. त्याही वेळ काढून तेथे जायच्या.
इंदुताईंच्या बोलण्यात सदैव मार्दव असायचे. मी हे केले, मी ते केले, असे त्यांच्या तोंडून कधीच कुणी ऐकले नाही. महिलांनी स्वावलंबी बनायला हवे असा त्यांचा आग्रह होता. परित्यक्ता, विधवा आणि इतर महिलांनी समाजात पाय रोवून उभे राहिले पाहिजे, ही त्यांची शिकवण होती. महिलांसाठी ग्रामीण भागात पिठाची गिरणी उघडायची किंवा कडबा कुट्टीचे केंद्र चालवायची कल्पनाही त्यांचीच.
इंदुताई म्हणजे मांगल्याचे दुसरे तेजस्वी रूप होते. अगदी सार्या सुखांनी पायी लोळण घ्यावी, अशी स्थिती असतानाही त्यांच्या डोक्यात त्याचे वारे कधी शिरले नाही. उत्तरायुष्यात त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पुरा केला. फ्रेंच भाषा त्या शिकल्या आणि समाजाविषयीचा मूलभूत विचार त्या ’केसरी’ आणि ’सह्याद्री’ मासिक यामधून मांडू लागल्या. केसरीतला प्रत्येक कर्मचारी हा आपल्या कुटुंबातलाच एक घटक आहे, असे त्यांनी मानले. कुणाला लागले, खुपले तर त्यांच्या हृदयात कालवाकालव व्हायची. एका अर्थाने त्या जगल्या ते जीवन कर्मयोग्याचे होते. लोकमान्यांचे चरित्र सोप्या भाषेत मुलांपर्यंत पोहोचवायचे असेल तर ते सुटसुटीतपणाने लिहून आठवणींच्या स्वरुपात लिहिले गेले पाहिजे, या विचारांनी त्यांनी ’लोकांचे लोकमान्य’ हे पुस्तक लिहून पूर्ण केले. लोकमान्यांनी ’गीतारहस्या’च्या रूपाने कर्मयोगाची शिकवण समाजात तेवत ठेवली, इंदुताईंनी ती आत्मसात करून समाजाला त्या दिशेने जायला उद्युक्त केले.
इंदुताईंचे व्यक्तिमत्त्व बहुविध होते. पानशेतच्या पुरात घरोघर जाऊन मदतकार्य करणार्या इंदुताई, महिला सहकारी उद्योगालयात खाली बसून कामाला वाहून घेणार्या इंदुताई, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्यात घरोघर जाऊन प्रचार करणार्या इंदुताई आणि ’रविवार केसरी’चा तसेच ’सह्याद्री’ मासिकाचा बाल विभाग सांभाळणार्या आणि पुढे सह्याद्री मासिकाचे कार्यकारी संपादकपद सांभाळून पत्रकारितेशी एकरूप झालेल्या इंदुताई ही त्यांची अनेकरंगी रूपे.
इंदुताईंचा जनसंपर्क अफाट होता. पुण्यातील अन्यही संस्थांशी त्यांचे संबंध होते. वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, मोहन धारियांची वनराई संस्था, भांडारकर इन्स्टिट्यूट, भारत इतिहास संशोधक मंडळ, रोझ सोसायटी, नगर वाचनालय या संस्थांमध्येही त्या काम करत. त्यांच्या कार्यक्रमांत सहभागी होत असत. कोकणातील गेली साठ वर्षे हजारो वाचकांचे जिव्हाळ्याचे दैनिक ‘सागर’ या वृत्तपत्राची प्रेरणा, प्राथमिक तयारी पुण्यातील गायकवाड वाड्यातील ’केसरी’ दैनिकाने करून दिली. इंदुताईंचे (मामे) बंधु नाना जोशी यांचा जयंतरावांशी जवळचा संबंध होता. या दोघांशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला. इंदुताईंनी आपल्या भावाला महिला सहकारीच्या छपाई विभागात कंपोझिंगपासून छपाईपर्यंत सर्व कामे शिकून घेण्याची संधी दिली. नानांनीही मनापासून कंपोझिंग, प्रूफ करेक्शन, छपाई इ.चे प्रशिक्षण घेतले. सकाळचे संपादक परुळेकर, लोकसत्ताचे ह.रा.महाजनी, म.टाईम्सचे तळवलकर इ. वरिष्ठ पत्रकारांशी चर्चा करून चिपळूणात प्रारंभी फडके यांच्या ट्रेडर मशिनवर सागर दैनिकाचा आरंभ केला. स्थानिकांचे सहकार्य लाभले. घरातून सर्व कुटुंबियांनीही साथ दिली. आज या सागरचे अथांग स्वरूप आपण पाहतो आहोत. त्याची मूळ प्रेरणा व सहाय्यक इंदुताई होत्या. माझा या टिळक कुटुंबियांशी जवळून संबंध आहे. मलाही कै. जयंतरावांनी मार्गदर्शन केले आहे. कै. मुक्ता, कै. दीपक यांचेकडेही माझे जाणे असे.
जयंतरावांच्या अनुपस्थितीत केसरीचे सर्व व्यवस्थापन सांभाळत अन्य सामाजिक कामांमध्ये व्यस्त असलेल्या इंदुताईंनी आपल्या कुटुंबाचीही तितक्याच जबाबदारीने काळजी घेतली. सासूबाई, दीर आणि त्यांचा वाढता संसार, स्वतःचा मुलगा (दीपक), यजमान आणि 2 निकटचे नातलग अशा 10-12 व्यक्तींनी गजबजलेले हे घर त्यांनी अत्यंत व्यवस्थित सांभाळले, सर्वांना सुखी ठेवले. दीपक यांना विविध प्रसंगी, विशेष कार्यक्रमांसाठी इंदुताई आपल्या बरोबर घेऊन जात. लोकप्रतिनिधी, राज्यात मंत्री, विधान परिषद सभापती या जबाबदार्या पार पाडणार्या जयंतरावांना त्यांची नेहमीच साथ असे. चुलत सून कै. मुक्ता हिलाही समाजकारणात कार्य करण्यास प्रवृत्त केले. त्या पुढे पुणे महानगरपालिकेच्या महापौर व नंतर आमदार झाल्या.
वयाच्या सत्तरीनंतरसुद्धा अशाच उत्साही आणि कार्यरत असताना अर्धांगवायूसारख्या असाध्य विकाराने त्यांना एकाएकी गाठले. तरीही बसल्या बसल्या जमेल ते काम करीत राहिल्या. तशातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दुर्देवाने वयाच्या 74 व्या वर्षी 15 जुलै 1999च्या पहाटे शांतपणे महायात्रेच्या प्रवासाला इंदुताई निघून गेल्या. अगदी अचानक त्यांचे दुःखद निधन झाले. श्रेष्ठ कवी माधव ज्युलियनांच्या प्रेमस्वरूप आईच्या वात्सल्यसिंधूचे दुसरे रूप म्हणजे इंदुताई होत्या. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची अलीकडेच सांगता झाली, त्या निमित्ताने केलेले हे पुण्यस्मरण.