मागच्या भागापासून आपण वद नाडू म्हणजेच दिव्य देसम्च्या उत्तर भारतातील मंदिरांबद्दल जाणून घेत आहोत. नेपाळच्या मुक्तिनाथानंतर आता आपण आंध्र प्रदेशच्या अहोबिळम या अलौकिक स्थानाची माहिती घेऊ. महाविष्णूच्या अवतारांमधल्या मत्स्य आणि कूर्म अवताराची फारच कमी मंदिरे आढळतात. परंतु अगदी मोजकी अशी तिसर्या वराह अवताराची मंदिरे सोडली तर नृसिंहाची मंदिरे खूप जागी आढळतात. विष्णूच्या दशावतारांपैकी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा अवतार.
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्मृत्युं नमाम्यहम् ॥
‘बोल कुठे आहे तुझा विष्णू? या खांबात आहे का?’, असे रागाने ओरडत हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ मारली, तेव्हा खांब दुभंगून गगनभेदी गर्जना करत महाविष्णू नृसिंह अवतारात प्रकट झाले. या नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला. नृसिंह महाविष्णूचा चौथा अवतार होता. तो अर्ध मानव व अर्ध सिंह अशा स्वरूपात प्रकट झाला होता. हा अवतार अत्यंत उग्र असून दुष्टाचा संहार करण्यासाठी झाला होता. वैशाख शुद्ध चतुर्दशी ही तिथी नृसिंह जयंती म्हणून साजरी होते. भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी धावून आलेल्या नृसिंहाने अत्यंत उच्छाद मांडलेल्या हिरण्यकश्यपूला स्वतःच्या मांडीवर घेत आणि त्याचा वध केला. हा अवतार संध्याकाळच्या वेळी प्रकट झाला होता. नृसिंहाने हिरण्यकश्यपूला दाराच्या उंबरठ्यात मारले त्यावेळी स्वतःची नखे, शस्त्र म्हणून वापरली. ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला जे वरदान दिले होते, त्या सर्व अटींची पूर्तता करूनच नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला. आपण सगळेच ही कथा जाणून आहोत. हो ना? पुराणांत लिहिले आहे की या उग्र नृसिंहरूपी महाविष्णूला शांत करण्याचे नाना उपाय झाले. भागवत पुराणानुसार भक्त प्रल्हादानेच नृसिंहाचा क्रोध शांत केला तर विष्णू पुराणानुसार त्यासाठी शिवाने ’शरभ’ अवतार घेतला होता. ह्या शरभ अवताराशी युद्ध करताना नृसिंहाने ’गंडभेरुंड’ हा अधिक भयावह अवतार घेतला होता. शेवटी शिवाने ’देवी प्रत्यंकारा’ या रूपात येऊन नृसिंहाचा क्रोध शांत केला.
कोणत्याही भितीपासून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच न्याय, रक्षण व धैर्य मिळण्यासाठी नृसिंहाची उपासना केली जाते. कित्येक घराण्यांचे कुलदैवत नृसिंह आहे. वैष्णव संप्रदायातील नृसिंहाची मंदिरे जरी भारतभर असली तरी दक्षिण भारतात नृसिंहाची जास्त मंदिरे आढळून येतात. हेच महाविष्णूच्या तिसर्या वराह अवताराविषयी सुद्धा बोलता येऊ शकते. वराहाची जास्त मंदिरे दक्षिण भारतातच आढळतात.
मागच्या भागापासून आपण वद नाडू म्हणजेच दिव्य देसम्च्या उत्तर भारतातील मंदिरांबद्दल जाणून घेत आहोत. नेपाळच्या मुक्तिनाथानंतर आता आपण आंध्र प्रदेशच्या अहोबिळम या अलौकिक स्थानाची माहिती घेऊ. आंध्रप्रदेशमध्ये दिव्य देसम्शी निगडित दोन मंदिरे आहेत. एक म्हणजे अत्यंत सुप्रसिद्ध, भाविकांची सर्वाधिक गर्दी खेचणारे अतिशय श्रीमंत असे तिरुमलाचे व्यंकटेशस्वामी देवस्थान आणि दुसरे म्हणजे अहोबिळम. आंध्रमधील हे स्थान अत्यंत अनोखे असे आहे. हे गाव नंदयाळ जिल्ह्यातल्या घनदाट अरण्यात लपलेले, पूर्वघाटातील नल्लामल्ला पर्वतरांगेत वसले आहे. या गावात नृसिंहाची नऊ मंदिरे आहेत. ’अहो’ म्हणजे आश्चर्य आणि ’बिलम’ म्हणजे गुहा. असं म्हणतात की, जेव्हा देवांनी नृसिंहाच्या शक्तीचा अनुभव घेतला तेव्हा हे उद्गार काढले आणि पुढे तेच नाव रूढ झाले. अहोबिळमचे नऊ नृसिंह मिळून एक दिव्य देसम् होते. ह्या नऊ मंदिरांची अत्यंत कठीण अशी यात्रा आहे.
मुक्तिनाथाला हिमालयाचे उंची, विरळ पर्वतीय हवामान तर इथे निबिड जंगलातून गेलेल्या पायवाटा. दोन्ही यात्रा फिटनेसचा कस लावणार्या आहेत. अहोबिळम यात्रा पूर्ण चालून (ट्रेक करत) किंवा डोलीतून करता येते. इथे अप्पर व लोअर अहोबिळम असे दोन भाग पडतात. या दोन भागांत ही नऊ मंदिरे वसली आहेत. वरच्या भागात सहा मंदिरे आहेत तर खालच्या भागात तीन मंदिरे आहेत. भारताचा पूर्व घाट हा पश्चिम घाटापेक्षा जास्त प्राचीन, खडतर आणि दुर्गम आहे. अहोबिळमच्या वरच्या भागातील मंदिरे डोंगरदर्यांतील गॉर्ज किंवा घळीत वसली आहेत. जंगलातील डोंगरांच्या कपारीतील गूढ व रहस्यमयी गुहांमध्ये ही मंदिरे आहेत. डोंगराच्या शिखरावर नृसिंहाचे सर्वात उग्र रूप म्हणजे ’ज्वालानृसिंह’ मंदिर आहे. ह्याच जागी नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला असे मानले जाते. इथवर पोहोचण्यासाठी आठ तासांची पायपीट करावी लागते. दुसरे मंदिर म्हणजे मुख्य मंदिर, अहोबिळ नृसिंह. याच मंदिरात नृसिंह खांबातून प्रकट झाला असं मानले जाते. त्या मंदिरात हा खांब कोरून ठेवलाय. याचबरोबर अप्पर भागात भार्गव नृसिंह, योगानंद नृसिंह, क्रोध किंवा वराह नृसिंह व चतुर्वर्ण नृसिंहाची मंदिरे आहेत. चतुर्वर्ण नृसिंह म्हणजे चारही बाजूंना मुख असणारा नृसिंह. लोअर अहोबिळममध्ये मालोला, पावन व कारंज ही नृसिंहाची मंदिरे आहेत. विजयनगर साम्राज्यात साळुव व तुलुव घराण्यातील राजांनी अहोबिळमकडे सर्वाधिक लक्ष पुरवले होते. अहोबिळमला जियर परंपरेचे पालन होणारा ’अहोबिळम मठ’ आहे.
पौराणिक काळातील भक्त प्रल्हादाची कथा ह्याच भागात घडली असे म्हटले जाते. हिरण्यकश्यपूचे राज्य व महाल येथेच होता. आताच्या पाकिस्तानातील मुलतान किंवा मूलस्थानसुद्धा नृसिंह अवताराशी निगडित मानले जाते. परंतु आळ्वारांनी अहोबिळम स्थानाला पसंती दिली होती. दक्षिणेकडे अहोबिळम स्थानच नृसिंहाचे अवतारस्थान म्हणून ओळखले जाते आणि याचे बरेच ठोस संदर्भ ’नालयिरा दिव्य प्रबंधम’ ग्रंथात आहेत. थिरूमंगाई आळ्वार यांनी त्यांच्या जीवनकाळात एकूण 88 मंदिरांना भेटी दिल्या. त्यांनी इथल्या नृसिंहावर पासुरामी रचल्या आहेत. दक्षिणेत लक्ष्मी नृसिंहाची अनेक मंदिरे आहेत. त्या संदर्भात एक कथा सांगितली जाते. नृसिंहाचा अवतार शांत करण्यासाठी सर्व देवांनी श्रीलक्ष्मीची प्रार्थना केल्यावर, श्रीलक्ष्मी ही आंध्रप्रदेशातील चेंचू समाजातल्या मुलीच्या रूपात प्रकट झाली. लक्ष्मीबरोबरचे नृसिंह हे अधिक शांत, सौम्य, करुणामयी व भक्ताभिमुख रूप मानले जाते.
दिव्य देसम् अंतर्गत अहोबिळमचे नृसिंह मंदिर, वेल्लोर जवळील शोळिंगुर येथील योग नृसिंह, सिरकाझी येथील लक्ष्मी नृसिंह तर जोतिर्मठ, उत्तराखंड येथील परमपुरुष पेरूमाळ (नृसिंह बद्री) अशी चार मंदिरे येतात. प्रत्येक मंदिराचे वैशिष्ट्य, महत्त्व, परंपरा वेगवेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नृसिंहाची बरीचशी स्थाने उंच डोंगरावर असतात. याशिवाय तामिळनाडूत, मदुराईच्या डोंगराळ भागात योग नृसिंहाचा विग्रह आहे. जोतिर्मठ येथील नृसिंह स्थान हे अत्यंत अभूतपूर्व असे आहे. हा विग्रह शाळिग्राम शिळेपासून बनवलेला असून केवळ दहा इंचाचा आहे.
दिव्य देसम् मंदिरांत न मोडणारे पण तरीही तेवढेच महत्त्वाचे असे ठिकाण म्हणजे कर्नाटकातील मंड्या येथील ’मेळूकोटे’. या स्थानाविषयी आपण मागच्या काही भागांत जाणून घेतले होते. इथे योग नृसिंहाची मूर्ती आहे. होयसळ सम्राटांनी अत्यंत देखणी मंदिरे अकराव्या ते तेराव्या शतकात कर्नाटकात उभारली. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्वितीय अशी नुग्गेहळ्ळी, हरणहळ्ळी, होळेनरसिंहपूर आणि जवागल येथील लक्ष्मी नृसिंह मंदिरे अत्यंत प्रसिद्ध आहेत. कर्नाटकात कोप्पल नृसिंह व बिदर येथील झरणी नृसिंह ही स्थाने आहेत. झरणी येथील नृसिंहाचे दर्शन घेण्यासाठी कंबरेइतक्या पाण्यातून जावे लागते.
आपल्या महाराष्ट्रातसुद्धा नृसिंह मंदिरे आहेत. निसर्गरम्य वाईच्या जवळील धोम धरणालगत बांधलेले एक पुरातन पण सुंदर असे नृसिंह मंदिर तर जरूर बघण्याजोगे आहे. कोल्हापूर येथील कोळे नृसिंह, यवतमाळ येथील अंजी नृसिंह... किती नावे घ्यावीत... विदर्भातील रामटेक येथे असणारे नृसिंह मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिर असल्याचे सांगितले जाते. पैनगंगा नदीजवळील मेहकर येथील नृसिंह स्थान हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, पण खूप कमी लोकांना याबद्दल माहीत आहे. निरा आणि भिमा नदीचा जिथे संगम होतो ते निरा नरसिंहपूर स्थान भक्त प्रल्हादाची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. पुण्याच्या सदाशिव पेठेत लक्ष्मी नृसिंहाचे मंदिर आहे. याशिवाय मध्यप्रदेशच्या हाटपिपलिया आणि नरसिंहपूर येथे तर वाराणसीलाही नरसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. मात्र मला आंध्र प्रदेशमधील स्थाने जास्त भावतात. एकतर ही मंदिरे अतिशय प्राचीन आहेत व घनदाट अरण्याने वेढली गेली आहेत. तेलंगणा आणि आंध्रची स्वतःची अशी नऊ ’क्षेत्रम’ आहेत. अहोबिळम तर झालंच पण तेलंगणा येथील यादगिरीगुट्टा ह्या स्थानाला तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या देवस्थानाचा दर्जा दिला होता. त्याच धर्तीवर मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. सिंहाचलम, पेंचलकोना, मंगलगिरी, अंतर्वेदी, धर्मापुरी, वेदाद्री आणि कद्री ही ती स्थाने आहेत. बहुतांशी ही स्थाने योग नृसिंह किंवा लक्ष्मी नृसिंहासाठी प्रसिद्ध आहेत.
महाविष्णूच्या अवतारांमधल्या मत्स्य आणि कूर्म अवताराची फारच कमी मंदिरे आढळतात. परंतु अगदी मोजकी अशी तिसर्या वराह अवताराची मंदिरे सोडली तर नृसिंहाची मंदिरे खूप जागी आढळतात. विष्णूच्या दशावतारांपैकी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा अवतार. अशा महाशक्तिशाली आणि महाबलवान नृसिंहाला नमस्कार असो!!