सिंधुदुर्गातील शिवमंदिरे

विवेक मराठी    18-Aug-2025
Total Views |
@निलेश अशोक जोशी
Shiva temples Sindhudurg 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव तिथे शिवमंदिर आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात सिंधुदुर्गात शिवो भूत्वा शिवं यजेतची प्रचिती सर्वत्र येत असते. जिल्ह्यातील शिवमंदिराना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येक मंदिराचे काही ना काही ऐतिहसिक आणि पौराणिक महत्त्व आहे. याच मंदिरांबद्दल, तेथील लोकांनी जतन केलेल्या परंपरा याबद्दल माहिती देणारा लेख...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव तिथे शिवमंदिर आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. विशेषतः श्री रामेश्वर, श्री रवळनाथ यांची मंदिरे बहुसंख्य गावांत आढळतात. श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास केल्याने आणि शंकराची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. म्हणूनच श्रावणी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवमंदिरांत भाविकांची मोठी गर्दी असते आणि हर हर महादेवचा जयघोष करत, भक्तिमय वातावरणात पूजा-अभिषेक केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवमंदिरांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येक मंदिराचे काही ना काही ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे.
 
 
श्री कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर, ता. देवगड
 
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील श्री कुणकेश्वराचे मंदिर दक्षिण कोकणची काशी म्हणून परिचित आहे. समुद्राच्या काठावर असलेले हे मंदिर आणि त्याचा परिसर नितांत सुंदर आहे. श्रावणी सोमवारी ’हर हर महादेव’ आणि ’ओम नमः शिवाय’च्या जयघोषाने मंदिर आणि परिसर दुमदुमून जातो. जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरच्या अनेक भागांतून कुणकेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. मंदिर ट्रस्ट आणि एस.टी. प्रशासन यांच्याकडून भाविकांची चांगली व्यवस्था केली जाते.
 
 
श्री देव कुणकेश्वर देवस्थान कुणकेश्वर गावात समुद्रकाठी डोंगराच्या पायथ्याशी उंचवट्यावर वसलेले आहे. देवळाचा चौथराच मुळी 15 ते 20 फूट उंचीचा बांधून काढलेला आहे. त्यावर अजस्त्र दगडांनी देवालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. समुद्राच्या लाटांपासून देवळाचे रक्षण व्हावे म्हणून पश्चिमेस समुद्रालगत भक्कम दगडाचा मजबूत दुहेरी तट आहे. कुणकेश्वर देवस्थानाचा उल्लेख संगमेश्वर माहात्म्यातसुद्धा आला आहे. हे अतिशय प्राचीन देवस्थान असून त्याला दोन हजारांहून अधिक वर्षे पूर्ण झाली असावीत, असे म्हणतात.
 
 
कोकणात कुणकेश्वराच्या मंदिराएवढे विशाल आणि भव्य दुसरे देवालय आढळत नाही. त्याची बांधणी द्राविडी पद्धतीची आहे जी येथील इतर देवळांची आढळत नाही. मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या शिळा अजस्त्र असून बांधकाम करताना मोहकतेपेक्षा मजबुतीकडे विशेष लक्ष दिल्यामुळेच अगदी समुद्रकिनार्‍यावरील हे विशाल मंदिर अजून टिकाव धरून राहिलेले आहे. श्री कुणकेश्वराच्या गाभार्‍याचे शिखर बरेच उंच असून ते कोकणात मिळणार्‍या जांभा दगडाचा उपयोग करून बांधले आहे. देवस्थानचे क्षेत्रफळ सुमारे पाऊण एकर आहे. तटाबाहेर उत्तरेच्या बाजूला छोटा पण टुमदार असा जुन्या बांधणीचा तलाव आहे. मंदिरात एक व बाहेर एक असे दोन शिलालेख आहेत.
 
 
श्री रामेश्वर मंदिर, मिठबाव, ता. देवगड
 
देवगड तालुक्यात मिठबाव-कातवण-तांबळडेग गावचे श्रद्धास्थान म्हणजे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर. हे मंदिर जवळपास साडेचारशे वर्षांपूर्वीचे आहे असे म्हणतात. रामेश्वर मंदिराची स्थापना भोसलेकालीन म्हणजेच छत्रपती संभाजीमहाराजांच्या काळातील आहे. याचा पुरावा म्हणजे रामेश्वर मंदिराला 51 रुपये, रवळनाथ मंदिराला 25 रुपये, गजबादेवी मंदिराला 25 रुपये दर साल सनद मिळत आलेली आहे व ती अजूनही चालू आहे. पेशव्यांचे सेनापती चिमाजी आप्पांची पत्नी मनोरुग्ण झाली असता, तिला देव रामेश्वराकडे पाठवून दिले व रामेश्वराला गार्‍हाणे घातले गेले. तेव्हा रामेश्वराच्या कृपाशीर्वादाने तिच्यात सुधारणा झाली. त्यावेळी चिमाजी आप्पांनी ग्रामस्थ व मानकरी यांच्या मागणीवरून रामेश्वरासाठी पालखी भेट दिली. या रामेश्वर मंदिर परिसरात 11 सती समाधी मंदिरे आहेत.
 

Shiva temples Sindhudurg 
 
कलमठ हे तसे कणकवली शहराला खेटून असलेले शहर. शहरीकरणाच्या सीमा कलमठ शहरापर्यंत विस्तारल्या आहेत. कणकवली शहराला कुशीत घेऊन वाहणार्‍या जानावली नदीच्या किनार्‍यावर गर्द वनराईत काशी कलेश्वर मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे कलमठ गावाचे आद्य श्रद्धास्थान आहे. अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार होऊन सुंदर मंदिर उभे राहिले आहे. स्वयंभू पाषाणात असलेल्या काशी कलेश्वराच्या सान्निध्यात पोहोचल्यावर येणारी अनुभूती अलौकिक असते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पावणाई रवळनाथाची पाषाणे असून त्या मूर्तीच्या बाजूला वसाची मूर्ती आहे. गावरहाटीची सर्व परंपरा जपणार्‍या कलमठ गावात कलेश्वराच्या मंदिरात तरंगस्थान आहे. येथील तीन तरंग पूर्वसत्तेतील असून कलेश्वर, देवी, जैन यांचा समावेश आहे. कलेश्वरासमोर केलेला नवस पूर्ण होतो याची प्रचिती भक्तांना सातत्याने येत असते. मंदिरामध्ये दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्री, होळी यासारखे सण उत्साहात आणि पारंपरिक सोहळ्यात साजरे होतात. श्रावणी सोमवारी या मंदिरात भक्तांची गर्दी असते. काशी कलेश्वर मंदिराच्या बाजूला गांगो मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला विठ्ठलाई देवीची सुबक पाषाणमूर्ती आहे.
 
 
श्री स्वयंभू रवळनाथ, कणकवली
 
कणकवली शहराचे आराध्य दैवत श्री देव स्वयंभू रवळनाथ प्रत्येक भक्ताच्या हाकेला पावणारे असे आहे. काळेथर दगडात बांधलेले हे मंदिर पुरातन आहे. स्वयंभूची रुजीव पिंडी आणि पंचायतन असे देवस्थानातील प्रत्येक देवतेचे वेगळेपण गावच्या धार्मिक वैभवात भर घालते. स्वयंभूच्या मंदिरात पिंडीसमोर श्री गणेशाची पाषाणमूर्ती आहे. दगडाने बांधण्यात आलेल्या गाभार्‍यात पूर्वलिंग, शंख, कासव व अन्य देवतांच्या मूर्ती आहेत. गाभार्‍याच्या प्रवेशद्वारावर नंदी आणि जयविजयाच्या मूर्ती आहेत. येथे असणारी भक्तिमय शांतता साक्षात श्रीशंकर ध्यानस्थ बसल्याची जाणीव करून देते.
 
 
स्वयंभूच्या मंदिर परिसरात पूर्वी देवराई होती. शहराच्या बदलत्या रचनेप्रमाणे आज त्या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती आहे. स्वयंभू मंदिरात श्रावण महिन्यातील दर सोमवारी समाराधना होते. नवरात्रौत्सवात नऊ दिवस पुराणवाचन, तर दिवाळीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत पालखी प्रदक्षिणा होते. त्रिपुरारीला या ठिकाणी मोठी जत्रा भरते. याच दिवशी दुपारी भक्तांना महाप्रसाद देण्याची प्रथा आहे. महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो. रात्री गोंधळ घालून जागर होतो. गुढीपाडव्याला पंचांग वाचन करून संसारपाडवा साजरा होतो. फणस भाजून त्याचा प्रसाद दिला जातो. गाव पारध झाल्यावर शेतीच्या कामांना सुरुवात होते. श्रीदेव रवळनाथ मंदिरात पूर्वी गावचे न्यायनिवाडे होत असत. रहाटी संदर्भातील सर्व निर्णय येथे मानकरी व ग्रामस्थ बसून घेतात. रवळनाथाची सुबक अशी कोरीव पाषाणमूर्ती प्रत्येकाला आनंद देणारी आहे. ही शस्त्रधारी मूर्ती गावातील विघ्न दूर करण्यास सज्ज आहे. श्रद्धेने नतमस्तक होणार्‍या भक्ताला स्वयंभू रवळनाथ प्रसन्न होतो, अशी अनेक उदाहरणे आहेत.
 

Shiva temples Sindhudurg 
 
श्री विमलेश्वर मंदिर, वाडा, ता. देवगड
 
सिंधुदुर्गमध्ये असणार्‍या विविध पर्यटनस्थळांना भेटी देताना देवगड तालुक्यातील वाडा येथे असलेल्या श्री विमलेश्वर मंदिराला पर्यटक आवर्जून भेट देतात. येथील पांडवकालीन कोरीव लेणी पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकसुद्धा भेट देतात. देवगड-विजयदुर्ग मार्गावर देवगडपासून 14 किलोमीटर अंतरावर आणि विजयदुर्गपासून 18 किलोमीटर अंतरावर असणारे वाडा हे गाव. या गावापासून एक किलोमीटर अंतरावर श्री देव विमलेश्वर मंदिर आहे. श्री विमलेश्वर मंदिर हे दगडाच्या गुहेत कोरलेले आहे. त्याची रचना मंदिराचा गाभारा व सभागृह अशा प्रकारे दगडाच्या कोरीव कामातच झालेली आहे. गाभार्‍यामध्ये शिवलिंग आहे. मंदिरासमोरच्या दर्शनी भागावर मानवाच्या रूपातली शिल्पे कोरलेली असून या दगडाच्या गुहेबाहेर दोन्ही बाजूला माहूत आरूढलेले दोन हत्ती कोरलेले आहेत. मंदिरात टांगलेली विशाल घंटा लक्ष वेधून घेते. मंदिराचे खांब नक्षीकाम केलेले असून खूपच मोठे आहेत. 15 ते 16 फूट रुंद अशा पायर्‍या चढून गाभार्‍यात जाता येते. येथील शिवलिंग उंचावर आहे. त्याशिवाय या मंदिरामध्ये कौल प्रसादाची कामे करताना नंदीच्या माध्यमातून कौल लावला जातो. मंदिराच्या बाजूला सतत वाहणारे पाणी आहे. गोड पाण्याचा झरा बारमाही वाहतो.
 
श्री देव कुडाळेश्वर, कुडाळ
 
श्री देव कुडाळेश्वर हे कुडाळचे ग्रामदैवत. शहराच्या मध्यभागी एका छोट्याशा टेकडीवर श्री देव कुडाळेश्वराचे सुंदर मंदिर आहे. कुडाळ शहराला जसे ऐतिहासिक महत्त्व आहे तशी कुडाळच्या या जागृत ग्रामदैवतालासुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. बाराव्या शतकाच्या अखेरीला कुडाळ प्रांतात जनता अधिक एकोप्याने नांदण्यासाठी काही श्रद्धास्थाने निर्माण करण्यात आली. देवदेवतांच्या या स्थानावरून न्यायनिवाडे करण्याची संकल्पना राबवण्यात आली. याच बाराव्या शतकाच्या अखेरीला मच्छिंद्रनाथांनी रवळनाथ हे जागृत देवस्थान निर्माण केले. श्री देव कुडाळेश्वर म्हणजे मूळ रवळनाथ आहे असे म्हटले जाते. कुडाळचे ग्रामदैवत म्हणून कुडाळेश्वर हे नाव रूढ झाले.सभामंडपातून मुख्य मंदिरात प्रवेश करताना एक मोठी घंटा आपले लक्ष वेधते. ही घंटा शके 1114 म्हणजेच इसवीसन 1192 मध्ये भट्ट बाक्रे यांनी मंदिरात बसवल्याचा उल्लेख या घंटेवर आढळतो. या घंटेचे वजन 2 मणापेक्षा जास्त म्हणजे सुमारे 100 किलोहून अधिक आहे. म्हणजेच श्री देव कुडाळेश्वर मंदिर हे सुमारे 800 वर्षांपूर्वीचे आहे.
 
 
मुख्य मंदिर हे पूर्णपणे मातीचे आहे. मातीच्या तीन फुटाच्या भिंती, मंदिर बांधकामासाठीचे लाकूडसमान अद्यापही मजबूत आहे. मंदिरामध्ये मोठे खांब आहेत. यातल्या एका खांबावर चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा आहेत. 13 व्या शतकाच्या उत्तरार्धात कोकण प्रांतावर चंद्रभान आणि सूर्यभान हे शिलाहार मराठे देशक अधिकारी होते. चंद्रभान व सूर्यभान जिथे येत तिथे अशा चंद्र-सूर्याच्या प्रतिमा उमटवत, असा उल्लेख काही ठिकाणी सापडतो.
 
 
महालक्ष्मी, सोमेश्वर, बाराचा पूर्वस, कुडाळेश्वर, पावणाई, भैरव, जोगेश्वरी असे सप्ततरंग गावरहाटीत महत्त्वपूर्ण समजले जातात. समोरच एका बंदिस्त गाभार्‍यात देव कुडाळेश्वर महाराजांचं दर्शन आपल्याला होते. या गाभार्‍यामध्ये कुडाळेश्वर महाराजांसोबतच समादेवी, पावणाई, 2 गारुडतत्वे, चाळ्याचा अधिकारी, पवार वस, पूर्वेचा ब्राह्मण, मयेचा पूर्वस अशा देवता आहेत. गाभार्‍याच्या बाजूला श्री देव सोमेश्वर पिंडी स्वरूपात स्थापित आहे. तसेच गाभार्‍याबाहेर गणपती, राजसत्ता स्थापित आहेत.
 

Shiva temples Sindhudurg 
 
श्री देव कुडाळेश्वर महाराजांची साडेचार फुटांची काळ्या पाषाणाची मूर्ती तेजोमय आहे. कुडाळेश्वराच्या छातीवर असलेले पदक श्रीवत्सलांच्छन आहे. ते विष्णूचे प्रतीक आहे. मूर्तीच्या गळ्यात नरमुंडमाळ, रुद्राक्षमाळ आहे. हे शंकराचे प्रतीक आहे. हातात तलवार, डमरू, त्रिशूल, अमृतकुंभ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. कानात कुंडल हे नवनाथांचे प्रतीक आहे. म्हणजेच नवनाथांचे नऊ, ब्रह्मा, विष्णू, महेश असे तीन असे एकूण बारा तेजाचे सामर्थ्य कुडाळेश्वर महाराजांमध्ये आहे. त्यामुळे कोणतीही उपासना इथे केली तरी ती फलद्रूप होते असे म्हटले जाते. इथे वर्षभर महाराजांना नैवेद्य दाखवला जातो आणि 24 तास लामणदिवा तेवत असतो.
 
 
श्री देव कुडाळेश्वर मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून या उत्सवांना सुरुवात होते. रामनवमीचा उत्सव सुरुवातीला होतो. तो अकरा दिवसांचा असतो. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रोज रात्री पुराणकथन, श्रींची पालखी, त्यानंतर महाराजांचा दरबार भरतो. श्री देव कुडाळेश्वर महाराज राजेशाही थाटामाटात दरबारात प्रवेश करतात ते दृश्य विलोभनीय असते. असंख्य भाविक हे दृश्य डोळ्यांत साठवून ठेवत असतात. चैत्र, आषाढ, श्रावण, कार्तिक, माघ, फाल्गुन या महिन्यांत विविध उत्सव साजरे होतात. ते साजरे करताना सामाजिक भानही राखले जाते.
 
श्री देव रामेश्वर, वेंगुर्ले
 
वेंगुल्यार्र्चे ग्रामदैवत असलेले श्री देव रामेश्वर मंदिर इसवी सन सतराव्या शतकात स्थापन झाले असावे असा अंदाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1655 च्या सुमाराला दक्षिण-उत्तर कोकणातला बराच मुलूख काबीज केला आणि संगमेश्वरपासून मालवणपर्यंत सत्ता स्थापन केली. त्यावेळी राजापूरची काही ब्राह्मण घराणी कुडाळ येथे स्थायिक झाली. अशाच एका ब्राह्मण कुटुंबातील कै. ग. बा. धामणकर नावाच्या गृहस्थास हे रामेश्वराचे लिंग तलावाचे खोदकाम करताना सापडले. त्यांनी ते लिंग आपल्या घराजवळ आणून त्याची पूजाअर्चा केली. गावातील गावकर मंडळी व गौड सारस्वत व्यापारी वर्गाची संमती घेऊन या लिंगाची स्थापना गावच्या मध्यवर्ती ठिकाणी नागेश्वर भगवती मंदिरात त्यांनी 350 वर्षांपूर्वी केली. श्री देव रामेश्वराच्या गाभार्‍यात देवाचे लिंग असून लिंगासमोर नंदी आहे. बाजूला जैन, ब्राह्मणांचे शिला प्रतीक आहे. गाभार्‍याच्या बाहेरील बाजूस गणपतीची मूर्ती, तीन लिंगाकार शिला व एक नागाची शिला आहे. तर डाव्या बाजूला भगवतीची मूर्ती तसेच भगवतीच्या चाळा कुळ पुरुषाची मूर्ती आहे. वेंगुर्ल्याचे दैवत असलेल्या या देवाला इच्छापूर्तीसाठी दहीभात लिंपणे, साखरभात लिंपणे, महानैवेद्य, अभिषेक अशा प्रकारचे नवस बोलण्याची प्रथा आहे. वर्षभर मंदिरात विविध कार्यक्रम होत असतात. श्रावणी सोमवारला मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते.
 

Sindhudurg  
 
सावंतवाडी संस्थानचे देवस्थान श्री देव पाटेकर, सावंतवाडी
 
श्री देव पाटेकर हे सावंतवाडी संस्थानचे जागृत दैवत आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राजसत्तेचे प्रतीक म्हणून या देवस्थानाकडे पाहिले जाते. राजघराण्याने या देवस्थानाची स्थापना केली आहे. हे शिवाचे दैवत म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. याची स्थापना संस्थानातील पहिले राजे खेम सावंत भोसले यांनी केली. यापूर्वी श्री देव पाटेकर देवस्थान हे ओटवणे येथे संस्थानच्या जुन्या राजवाड्यामध्ये विराजमान होते. सावंतवाडी राजघराण्याचे श्री देव पाटेकर हे देवस्थान अष्टदिशा कलशयुक्त असून ते त्या कलशाची पूजा सावंतवाडी संस्थानाच्या राजघराण्याच्या एका खोलीमध्ये सुरुवातीला एका पाटावर स्थापन करून करण्यात आली. श्री पाटेकर देवस्थान हे 12 पंचायतनाचे देवस्थान आहे. या अष्टक कलशांमध्ये डब्यात ठेवलेल्या गणपती, लक्ष्मी, शिवलिंग आदी देवतांच्या मूर्ती पाहावयास मिळतात.
 
 
श्री देव पाटेकर देवस्थान हे शिवाचे दैवत आहे. देवस्थानच्या गाभार्‍यांमध्ये श्रीदेवी भवानी मातेची स्थापनाही करण्यात आली आहे. कालांतराने या मूर्तीची स्थापना कुणकेरी येथील शशी सावंत यांच्या घरी करण्यात आली. दरवर्षी सावंतवाडी संस्थानच्या पाटेकर देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रम व उत्सव होतात. त्यामध्ये प्रमुख उत्सव हे गणेश चतुर्थी, दसरा, मकर संक्रांत, घटस्थापना, देवीचा जागर, गोकुळाष्टमी, शिमगोत्सव, मोती तलावातील नारळी पौर्णिमा, ललिता पंचमी आदी असून सावंतवाडी संस्थानाचा गणेश चतुर्थी हा आगळावेगळा सण आहे.
 
 
दरवर्षी श्रावणी सोमवारी या देवस्थानामध्ये दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. तर लग्न, घरबांधणी व इतर कार्यक्रमांसाठी आवर्जून श्री देव पाटेकराला साकडे घातले जाते.
 
 
श्री देव रामेश्वर, आचरे, ता. मालवण
 
शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या परशुरामाच्या कोकण भूमीत ऐतिहासिक परंपरा लाभलेले काही पुरातन जागृत देवस्थान आहेत. मालवण तालुक्यातील आचरे गावचे रामेश्वर मंदिर हे त्यातलेच एक. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी रामेश्वराच्या प्रचितीने प्रभावित होऊन करवीर संस्थानकडून श्री देव रामेश्वरास इस 1720 मध्ये जनतरूपाषाण निनिक्षेप सहित इनाम दिले आणि आचरे गावचे नामकरण ’इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे’ असे झाले. येथे दर तीन वर्षांनी होणारी डाळप स्वारी, गाव पळण या प्रथा परंपरांबरोबरच गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत चालणारा रामनवमी उत्सव, वसंतोत्सव, कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतचा पूर्ण एक महिना चालणारा कार्तिकोत्सव, दसरा, शिमगोत्सव यांच्या सोबतीनेच येथे रंगणारा 42 दिवसांचा गणेशोत्सव या गावच्या सांस्कृतिक परंपरांना मोठे व्यासपीठ देतो.
 
 
रामेश्वराची स्वयंभू पाषाणपिंडी, त्यावर बसवला जाणारा झळकणारा मुखवटा, त्या भोवतीच्या नक्षत्रांच्या माळा भाविकतेचे दर्शन घडवितातात. खांबावरील नक्षीकाम प्राचीनता दर्शवते. या मंदिराचा मुख्य भाग 1684 मध्ये बांधण्यात आल्याचे उल्लेख सापडतात. त्यानंतर सभामंडप सन 1805 मध्ये बांधण्यात आला. सन 1830 मध्ये सभामंडप दुरुस्त करण्यात आला. या संस्थानचा सर्वात मोठा उत्सव म्हणून कार्तिकोत्सवाचा उल्लेख होतो. रात्री पालखीची आरासही संस्थांनी थाटाची असते.
 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शिवमंदिरे आहेत. काही मंदिरांचा अलीकडेच जीर्णोद्धारसुद्धा झाला आहे. काही मंदिरे अजूनही आपल्या जुन्या रूपातच आहेत. गावाच्या रूढीपरंपरांप्रमाणे त्या त्या मंदिरांमध्ये उत्सव साजरे होत असतात. प्रत्येक श्रावणी सोमवारी या मंदिरातून शिवभक्तांची गर्दी होते. महादेवाविषयीची भक्तिभावना यातून अधोरेखित होते. हेच या शिवप्रेमी कोकणचे संचित आहे.
 
 
निलेश अशोक जोशी
9422632156