मौन रागम - विवाहसूक्ताचा परिचय करून देणारी सुरावली

कुटुंब (चित्र) कथा

विवेक मराठी    02-Aug-2025   
Total Views |
mouna ragam movie
Cine Talkies
मणी रत्नमचा मौन रागम हा सिनेमा भारतातील ठरवून केलेल्या लग्नपद्धतीबद्दल सूतोवाच तर करतोच, पण प्रेमविवाह आणि ठरवून केलेल्या लग्नांतील फरक सुद्धा दाखवतो. आयुष्याच्या जोडीदाराची निवड केवळ प्रेम किंवा आकर्षण ठरवू शकत नाही. मौन रागम विवाहाच्या ह्या महत्त्वाच्या पैलूलादेखील स्पर्श करतो.
भारतात अनेक कुटुंबात आधी विवाह होतो आणि नंतर प्रेम. पतिपत्नी स्वतंत्र राहणार असोत किंवा एकत्र कुटुंबात, झालेला विवाह, हा दोन कुटुंबांना जोडणारा असतो. ठरवलेल्या लग्नात, दोन्ही कुटुंबांचा आर्थिक वाटा असतोच शिवाय त्यांची प्रतिष्ठा जपलेली असते. म्हणून मुलगा आणि मुलगी या दोघांच्या आईवडिलांचा लग्नाच्या निर्णयात महत्त्वाचा वाटा असतो. अनेकवेळा लग्न जुळवून देणारा ईश्वर असे म्हटले तर पृथ्वीवर, आईवडीलच ईश्वराची जबाबदारी पार पाडतात. मात्र एकदा हनिमून संपला की या ईश्वराची जबाबदारीसुद्धा संपते. लग्न होणे सोपे पण ते टिकवायची जबाबदारी आता दोनाच्या चार झालेल्या हातात असते.
 
 
लग्न म्हणजे न सुटणारी गाठ असे म्हटले जाते. त्यातला जवळीकीचा मुद्दा हा कितीही रोमँटिक आणि हवाहवासा असला तरी फक्त शारीरिक आकर्षण आणि प्रेम ह्या दोनच गोष्टी संपूर्ण आयुष्य एकत्र जगण्यासाठी पुरेशा नसतात. स्वभाव, संस्कार, आवडीनिवडी, निर्णयक्षमता, मानसिकता, अनेक गोष्टीत असलेले कल, अगदी शारीरिक स्वास्थ्य, या गोष्टीत भिन्नता असू शकते आणि नाते, आयुष्यभर, मी नुसते टिकवायचे म्हणत नाही तर सांभाळायचे असेल तर तडजोडीची कधी ना कधी गरज भासते. फक्त हे नाते फुलवण्याची भावना दोन्हीकडून हवी.
 
लग्न यशस्वी होण्यासाठी काय करावे हा आता तर कळीचा मुद्दा आहे. आर्थिक स्वातंत्र्य आणि समाजाच्या बदललेल्या धारणा यामुळे हा बंध आता जबरदस्तीने टिकवणे कठीण झाले आहे.
 
जेव्हा जेव्हा मी 1986 मध्ये प्रदर्शित झालेला मणिरत्नम दिग्दर्शित मौन रागम हा सिनेमा पाहते, तेव्हा तेव्हा, प्री मॅरेज कॉउंसिलिंगमध्ये या सिनेमाचा अंतर्भाव करायला हवा, असे मला प्रकर्षाने वाटते.
 
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला यश लाभलेच, पण दर्दींची दाद सुद्धा या सिनेमाला मिळाली. अपूर्ण राहिलेले प्रेम, मनाविरुद्ध झालेले लग्न आणि दोन अनोळखी विरुद्ध प्रवृत्ती असलेल्या माणसांचा प्रवास ही थीम तशी परिचयाची होती, पण मणीरत्नमचे दिग्दर्शन आणि मुख्य पात्रांचा अभिनय याने हा सिनेमा क्लासिकमध्ये गणला गेला.
 
 
ऐंशीच्या दशकात, उच्चशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबातसुद्धा मुलामुलींचे लग्न, त्यांच्या आईवडिलांनी ठरवणे हे सर्वमान्य होते. चित्रपटातील नायिकेचे कुटुंब त्याला अपवाद नाही.
 
 
दिव्या (रेवती) कॉलेजमध्ये शिकणारी एक खेळकर, अल्लड मुलगी आहे. घरातील मोठी माणसे तिचे लग्न ठरवतात. मुलगा उच्चशिक्षित, चांगल्या कुटुंबातला, उत्तम नोकरी. नकार देण्यासारखे या स्थळात काही नाहीच. दिव्याला मात्र लग्न करायचे नाही. तिला शिकायचे आहे. स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. तिची स्वत:ची काही स्वप्ने आहेत. ती लग्नाला नकार देते आणि वडिलांना धक्याने हृदयविकाराचा झटका येतो. मानसिक दबावातून, अपराधी भावनेने, दिव्या लग्नाला होकार देते. या होकाराने एका रात्रीत दिव्याचे आयुष्य बदलून जाते. मुलाची नोकरी दिल्लीला असते. वेगळी भाषा, वेगळा प्रदेश आणि सोबतीला नवरा असलेला अनोळखी माणूस.
 
Cine Talkies 
 
नवीन लग्न झालेले हे जोडपे दिल्लीला जाते खरे पण दिव्या, चंद्र कुमारला (मोहन) पती म्हणून स्वीकारण्यास नकार देते आणि घटस्फोटाची मागणी करते.
 
घर, प्रतिष्ठा, माणसे, शिक्षण, पैसे, स्थैर्य या सर्व गोष्टी पाहून लग्न ठरवले जाते, पण मनाचा कानोसा काही घेतला जात नाही, अनेकवेळा तो गरजेचा वाटत नाही. लहान वय म्हणून दिव्या आडमुठेपणा करत आहे असे चंद्र कुमार समजत असतो पण वस्तुस्थिती वेगळी असते. दिव्या एका मुलाच्या, मनोहरच्या (कार्तिक) प्रेमात असते. हा मुलगा नक्षलवादी. त्याचे बिनधास्त पण लोभस वागणे. लोकांच्या मदतीला धावून जाणे दिव्याला त्याच्याकडे आकर्षित करते. हे प्रेम मात्र अल्पायुषी ठरते. रजिस्ट्रार ऑफिसच्या बाहेर, लग्नासाठी उभे असतानाच, पोलिसांच्या गोळीबारात, मनोहर ठार होतो. दिव्याच्या घरातील लोकांना याची कुणकुणही नसते. दिव्या, हे दुःख पचवते खरी, पण मनोहरची जागा कुणा दुसर्‍याला देणे तिला शक्य होत नाही.
 
 
तुझ्या भूतकाळाशी मला कर्तव्य नाही, घडलेले घडून गेले आहे. आपण दोघे मिळून आपला भविष्यकाळ चांगला बनवू, असे म्हणून चंद्र कुमार समजुतीने घेण्याचा प्रयत्न करतो, पण दिव्या घटस्फोटावर अडून राहते.
 
 
लग्न हा काही खेळ नाही की, वाटले तर केलं आणि नको तर मोडलं. एक वर्ष एकत्र राहूनही, जर तुमचे हेच मत कायम राहिले तर घटस्फोट मिळेल असे कोर्टात सांगितल्यावर, दिव्या एक वर्ष कुठे राहणार हा प्रश्न उभा राहतो. हे कारण सांगून ती आईवडिलांकडे गेली तर कदाचित ते तिला परत घेणार नाहीत, म्हणून चंद्र कुमार तिला स्वतःच्या घरी राहायला सांगतो.
 
 
एका छताखाली दोन अनोळखी माणसे आपले आयुष्य सुरू करतात. दिव्या सुरुवातीला आपला राग नवर्‍यावर काढते, पण सहवासाने माणसाची ओळख पटते. ज्या माणसाचा आपण एवढा अपमान केला तो किती मोठ्या मनाचा आहे, हे दिव्याला समजायला लागते. तरुण वयात ज्याला प्रेम समजत होतो ते एक वेडे आकर्षण आहे हे ही उमजते. चंद्र कुमारविषयी तिच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटतो. त्याच्यासाठी जेवण बनवणे, त्याची वाट बघणे, त्याच्याबरोबर बाहेर जाणे, त्याला आनंदी ठेवणे, त्याच्या भावनांचा आदर करणे ह्या गोष्टी तिला सुखावू लागतात आणि वर्ष संपते. ज्याच्यासाठी एवढा अट्टाहास केला असतो तो घटस्फोट तिच्या हातात येतो.
 
 
आता पुढे ?
 
दिव्या आपल्या नवर्‍याचे मन जिंकून घेईल का? तिचे बदललेले मन चंद्र कुमार जाणेल का?
 
अर्थात सिनेमाचा अंत प्रेक्षकांना आवडणारा आहे.
 
मणी रत्नमचा मौन रागम हा भारतातील ठरवून केलेल्या लग्नपद्धतीबद्दल सूतोवाच तर करतोच, पण प्रेमविवाह आणि ठरवून केलेल्या लग्नांतील फरक सुद्धा दाखवतो. एक स्वतंत्र विचाराची मुलगी आणि समजूतदार तरुण यांच्यातील हा विवाह आहे. दोन्ही भिन्न विचारांचे असूनही, परस्परांच्या निर्णयाबद्दल आदर, एकमेकांना समजून घेण्याचा केलेला प्रयास आणि प्रेम यामुळेच विवाह खर्‍या अर्थाने संपन्न होतो हे अत्यंत सहज घडणार्‍या प्रसंगातून मौन रागम दाखवून देतो.
 
 
मणी रत्नमच्या सर्वच सिनेमातली स्त्री पात्रे ही स्वतंत्र विचार करणारी पात्रे आहेत. दिव्या त्याला अपवाद नाही. लग्न न करण्याचा तिचा जो निर्णय आहे त्यात फसलेले प्रेमप्रकरण हे एकच कारण नाही.
 
दिव्या एक कॉलेजात शिकणारी मुलगी आहे. आईकडे हट्ट करणारी, तो वडिलांपासून लपवणारी, लहान बहिणीशी खेळणारी, भावाशी भांडणारी, जिची अनेक स्वप्ने आहेत. तिला आयुष्यात कुणीतरी बनायचे आहे. एका रात्रीत हे बदलते. अचानक लग्न ठरल्याने, काही दिवसांतच एका मुलीचे रूपांतर, एका स्त्रीमध्ये होते.
 
 
भले तो मुलगा चांगला आहे, कमावता आहे, सुशिक्षित आहे पण हा बदल, ही प्रगल्भता एका रात्रीत येणे शक्य आहे का? लग्न करण्याची तिची तयारीच नाही आहे. दिव्याच्या आडमुठेपणामागे हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे.
 
 
चंद्र कुमारला हे सांगून सुद्धा तो लग्न करण्याचा निर्णय घेतो कारण त्याला ती आवडली आहे. ती लहान आहे याची कल्पना त्याला आहे. तिचे मन बदलेल याचा विश्वास सुद्धा आहे.
 
 
लग्न म्हणजे काही पन्नास टक्के माझे, पन्नास तुझे असे काही नसते. कुणीतरी पहिल्यांदा प्रेमात पडतो. दुसरा केवळ प्रयत्न करतो. एक लग्न टिकवण्याचा जीवापाड प्रयत्न करतो, दुसरा केवळ साक्षी असतो आणि असेच समांतर चालत असताना माणसे एकमेकांच्या जवळ येत जातात आणि एकाच रस्त्यावरून संसाराची वाटचाल सुरु होते. आवश्यक असतो तो संयम. चंद्र कुमारमध्ये तो आहे. अर्थात तो सुद्धा काही संत नाही. प्रेम करणारा एक साधासरळ माणूस आहे. त्याचाही संयम सुटतो, त्यालाही राग येतो, तोही हताश होतो, पण तरीही तिचे मन जाणून घेऊन, स्वतःवर ताबा ठेवण्याचा त्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
 
 
दिव्याचा पहिला प्रियकर (कार्तिक) हा नक्षलवादी आहे. त्याच्या संगतीत दिव्याला अपेक्षित असलेले सुरक्षित जीवन तिला मिळाले असते की, आयुष्याचा प्रत्येक दिवस त्याच्या आणि तिच्या भविष्याच्या चिंतेत घालवावा लागला असतात? कदाचित तो चांगला माणूसही वाटतो, पण तो चांगला नवरा होऊ शकला असता का हा प्रश्न जसा दिव्याला पडतो, तसा आपल्यालाही पडतो.
 
 
लग्न नक्की का करावे? प्रेमासाठी का पैशासाठी हा प्रश्न विचारला तर सुज्ञ माणूस नक्कीच प्रेमासाठी असे उत्तर देईल. मात्र ज्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही असे स्वप्नाळू प्रेम आयुष्यभर साथ देऊ शकेल का? ह्या प्रश्नाचे उत्तर जसे दिव्याला मिळते तसे प्रेक्षकांनासुद्धा विचार करायला भाग पाडते.
 
 
भारतीय लग्नसंस्थेत, लग्न हे जन्माचे बंधन मानले जाते. लग्नाचा निर्णय पूर्ण आयुष्याचा असतो आणि म्हणूनच आयुष्याच्या जोडीदाराची निवड केवळ प्रेम किंवा आकर्षण ठरवू शकत नाही. मौन रागम विवाहाच्या ह्या महत्त्वाच्या पैलूला स्पर्श करतो.

प्रिया प्रभुदेसाई

प्रिया  प्रभुदेसाई

अर्थशास्त्रात पदवीत्तर शिक्षण.... सा. विवेक आणि दिव्य मराठीत दोन वर्षे चित्रपट विषयक सदर. दिवाळी अंक, मासिके यात चित्रपटाविषयक लेखन. सेन्सॉर बोर्डवर ज्युरी म्हणून चार वर्षांसाठी निवड.