पहलगाम तिरंगा यात्रा - मुस्लीम राष्ट्रीय मंचाचा अभूतपूर्व ऐतिहासिक प्रयोग

विवेक मराठी    21-Aug-2025
Total Views |
@सुषमा पाचपोर
 
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर त्या ठिकाणी झालेला अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढते. अनेक दशके अतिरेकी कारवायांच्या जखमा बाळगणारे काश्मीर आता बदलते आहे. या यात्रेमुळे आज तेथून दहशतवाद नाही तर बंधुभाव आणि सद्भाव, हिंसा नाही तर मानवता आणि शांती हा संदेश अधिक दृढपणे जगासमोर आला आहे. पहलगाम तिरंगा यात्रा हा केवळ एक कार्यक्रम मात्र नव्हता तर भारताच्या आत्म्याचा उद्घोष होता. मुस्लीम भगिनींनी लाथपुरा चौकीतील सैनिकांना राखी बांधणे हे केवळ औपचारिक नव्हते तर त्यातून विविधतेत एकता हा भारताच्या शक्तीचा संदेश प्रसृत झाला आहे. 
 
Pahalgam Tiranga Yatra
 
 
काश्मीरमधून जगाला दिला विश्वशांती, बंधुता, सद्भावना आणि विकासाचा संदेश
भारताचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या काश्मीरमधून काही महिन्यापूर्वी पाक-समर्थित आणि पुरस्कृत इस्लामी अतिरेक्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून निर्घृण आणि अमानुष पद्धतीने त्यांची त्यांच्याच नातेवाईकांसमोर हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण विश्व स्तब्ध झाले होते. पुढे काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानी सैन्याला, त्यांनी आश्रय दिलेल्या अतिरेक्यांना आणि त्यांना प्रच्छन्नपणे पाठिंबा देणार्‍या अमेरिकेलासुद्धा असा काही धडा शिकविला की संपूर्ण जगाने भारताच्या रणनीतीची प्रशंसा केली. प्रस्तुत लेखाचा तो विषय नाही पण पुढे जी चर्चा करावयाची आहे त्याचा संदर्भ लागण्यासाठी हा उल्लेख आवश्यक आहे म्हणून संक्षेपाने केला आहे.
 
 
 
पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या सावटाखाली या वर्षीचा स्वातंत्र्य दिन काश्मिरात साजरा झाला. पण या सोहळ्याच्या दोनच दिवसानंतर काश्मीरवासियांना आणि जगाला देखील अचंबित करणारे एक अभूतपूर्व दृश्य पहावयास मिळाले. मुस्लीम राष्ट्रीय मंच या संघटनेच्या वतीने पहलगाम अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप आणि निरपराध हिंदू शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका विशेष तिरंगा आणि सद्भाव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा यात्रेमुळे संपूर्ण काश्मीर खोर्‍यातील वातावरण तिरंगामय झाले होते. प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज होता, हृदयात देशभक्तीचा सागर लहरत होता आणि ओठांवर ‘भारत माता की जय’चा उद्घोष होता. ही यात्रा म्हणजे केवळ एक इव्हेंट नव्हता तर काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे आणि नेहमीकरता राहील असा एक सशक्त संदेश संपूर्ण जगाला यातून देण्यात आला.
 
 
या ऐतिहासिक यात्रेचे नेतृत्व केले होते मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक आणि संरक्षक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. इंद्रेश कुमार, मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफझल, डॉ. शहीद अख्तर (दिल्ली), अबू बकर नकवी (राजस्थान), डॉ. शालिनी अली (दिल्ली), रेश्मा हुसेन (जयपूर), एस. के मुद्दिन (जबलपूर), इस्लाम अब्बास (आग्रा), मोहम्मद फारुख (इंदोर), डॉ. सलीम राज (रायपुर), ठाकूर राजा रईस (वाराणसी), सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ता सिराज कुरेशी (ग्वाल्हेर), काश्मीरचे क्षेत्रीय संयोजक मीर नझीर, गो प्रकोष्ठ संयोजक फैझ खान, डॉ. इम्रान चौधरी (दिल्ली), प्रोफे. आफताब अन्वर शेख, प्रोफ. अरमान शेख (पुणे) आणि इस्लामिक विद्वान कारी अब्रार जमाल आणि स्थानिक काश्मिरी मुस्लीम बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात या अभूतपूर्व कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
Pahalgam Tiranga Yatra 
 
ही यात्रा केवळ स्थानिक लोकांपुरतीच मर्यादित नव्हती तर याला एक व्यापक संदर्भ होता. संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व या यात्रेत झाले होते. त्यामुळे या यात्रेचा संदेश हा सगळ्या देशात आणि जगात देखील पोहचला. पहलगामच्या निसर्गरम्य वातावरणातून निघालेला हा संदेश अगदी स्पष्ट होता-दहशतवाद आणि विघटनवाद या भूतकाळातल्या गोष्टी आहेत, वर्तमान आणि भविष्य घडवायचे असेल तर ते शांतता, बंधुभाव आणि विकासाच्या मार्गानेच शक्य होईल, असा हा संदेश होता. हिंदू आणि मुस्लीम यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे दाखवून दिले आहे की भारताची खरी शक्ती ही त्याच्या विविधतेत अनुस्यूत असलेली एकत्वाची भावनाच आहे. या यात्रेदरम्यान ‘हर घर तिरंगा, हर दिल हिंदुस्तान’या सारख्या घोषणांनी पहलगामचा सारा आसमंत भारून टाकला होता.
 
 
पहलगाम येथील तिरंगा यात्रा झाल्यानंतर मंचाच्या महिला कार्यकर्त्यांनी जवळच लाथपुरा येथील सी.आर.पी.एफ.च्या शिबिरात जाऊन तेथे तैनात सैनिकांना राखी बांधली. आम्ही नेहमीच तुमच्या सुरक्षा आणि कुशल-मंगल यासाठी प्रार्थना करीत असतो, असेही सांगितले. त्या सैनिकांसाठी हा एक भावपूर्ण असा क्षण होता आणि प्रत्येकाला आपापल्या घराची आठवण आल्यावाचून राहिले नाही, हे देखील खरे. या कार्यक्रमाने ही गोष्ट अधोरेखित केली की भारतीय जनता आणि सैनिक यांचे नाते हे केवळ कर्तव्यभावनेने ओतप्रोत नाही तर कौटुंबिक आणि स्नेहपूर्ण आहे.
 
 
डॉ. इंद्रेश कुमार यांनी यावेळी आपल्या भाषणात असा मुद्दा मांडला की,‘काश्मीर भारताचा मुकुट आहे आणि भारत जगाचा मुकुट आहे आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. दहशतवाद आणि अलगाववाद यांची मुळे आता कमजोर झाली आहेत. ही यात्रा स्पष्ट संदेश देत आहे की पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि एक दिवस तो देखील तिरंग्याच्या छत्रछायेत परत येईल. जगातील कोणतीच शक्ती भारताची एकता, अखंडता आणि सम्प्रभूता मिटवू शकत नाही. काश्मीर आता बदलत आहे आणि भारताच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहे.’
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा उल्लेख करीत डॉ. इंद्रेश कुमार म्हणाले,‘संघाने गेल्या 100 वर्षाच्या प्रवासात देशप्रेम, अनुशासन, समाजसेवा आणि संघटन यांचा प्रसार केला. जे लोक संघावर आरोप करतात, विशेषतः काँग्रेस, ही एक अशी पार्टी आहे जिने देशाची फाळणी करवली, हिंदू व मुस्लीम हे दोन वेगळे समाज आहे असे रुजवले, आणि हे दोघे एकत्र राहू शकत नाही असा खोटा प्रचार केला. आजच्या या कार्यक्रमाने हे दाखवून दिले की हे दोन वेगळे समाज नाहीत तर एकच आहेत. देश, संस्कृती आणि परंपरा यामुळे आम्ही एकच आहोत.’
 
Pahalgam Tiranga Yatra 
 
मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफझल म्हणाले की,‘आज मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे कार्यकर्ते आणि काश्मीरचे लोक एकत्र येऊन हा संदेश देत आहेत की जसे दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा बंगळूरू भारताचे आहे तसेच काश्मीरदेखील भारताचा अविभाज्य अंग आहे.’ त्यांच्या या विधानाने मुस्लीम समाज देखील अखंड भारताच्या संरक्षणात सिद्ध आहे ही बाब अधोरेखित होऊन गेली.
 
 
हेच सूत्र पुढे नेत मंचाचे राष्ट्रीय संयोजक राजस्थानचे अबू बकर नकवी म्हणाले की,‘हिंदू आणि मुसलमान दोघेही या देशाचे रक्षणकर्ते आहेत ही गोष्ट आम्हाला सर्वांच्या दृष्टीस आणून द्यायची होती. हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता. जगातील सर्व विघटनवादी शक्तींना ही यात्रा म्हणजे एक पूर्वसूचना आहे, इथे हिंदू आणि मुसलमान दोघेही एकत्र उभे आहेत आणि अखंड भारतासाठी कार्य करीत आहेत. भारताला आव्हान देणार्‍या सर्व शक्तींसाठी ही यात्रा म्हणजे एक आव्हान आहे.’
 
 
राष्ट्रीय अल्पसंख्य शैक्षणिक संस्था आयोगाचे अध्यक्ष आणि मंचाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. शहीद अख्तर यांनी काश्मीरच्या सांस्कृतिक इतिहासावर जोर देत सांगितले की,‘काश्मीर भारताचा केवळ भौगोलिक हिस्सा मात्र नाही तर भारताचा आत्मा आणि सांस्कृतिक वारसा स्थान आहे. याच भूमीवरून अनेक ऋषी, मुनि, सुफी आणि संतांनी मानवजातीला बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला. दहशतवाद काश्मीरची ओळख नाही तर शांतता आणि स्नेह हीच खरी ओळख आहे. या मातीतून जेव्हा पुनः बंधुभाव आणि शांततेचा संदेश प्रसृत होईल तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल.’
 
 
मंचाच्या राष्ट्रीय संयोजिका डॉ. शालिनी आली म्हणाल्या की, ‘आमचे ‘वतन’-देश एक आहे, झेंडा एक आहे, आणि नागरिकतासुद्धा एकच आहे. आम्ही हिंदुस्तानी होतो, आहोत आणि भविष्यातही राहू. पाकव्याप्त काश्मीर देखील आमचाच आहे. ही यात्रा भारतीय एकता आणि अभिमानाचे प्रतीक आहे.’
 
Pahalgam Tiranga Yatra 
 
इस्लामचे अभ्यासक विद्वान कारी अब्रार जमाल म्हणाले की, ‘सैनिकांना राखी बांधणे म्हणजे केवळ एक सांकेतिक गोष्ट नाही तर मुसलमान देखील या भूमीला आपली माता मानतात ही वास्तविकता व्यक्त करणे आहे. जेव्हा मुस्लीम भगिनी सैनिकांना राखी बांधतात तेव्हा ते याचे प्रतीक आहे की आमची संस्कृती आणि आस्था या देशाच्या रक्षणासाठी समर्पित आहे. मुसलमान काही वेगळेच आहेत हा भ्रम या यात्रेमुळे समाप्त होईल‘, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
 
 
देशभरातून आलेले मंचाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि काश्मीरमधील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर त्या ठिकाणी झालेला अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढते. अनेक दशके अतिरेकी कारवायांच्या जखमा बाळगणारे काश्मीर आता बदलते आहे. या यात्रेमुळे आज तेथून दहशतवाद नाही तर बंधुभाव आणि सद्भाव, हिंसा नाही तर मानवता आणि शांती हा संदेश अधिक दृढपणे जगासमोर आला आहे. पहलगाम तिरंगा यात्रा हा केवळ एक कार्यक्रम मात्र नव्हता तर भारताच्या आत्म्याचा उद्घोष होता. मुस्लीम भगिनींनी लाथपुरा चौकीतील सैनिकांना राखी बांधणे हे केवळ औपचारिक नव्हते तर त्यातून विविधतेत एकता हा भारताच्या शक्तीचा संदेश प्रसृत झाला आहे. ‘हम सब का वतन एक है, झंडा एक है’, या घोषणेचे स्वर येणार्‍या काळात भारताच्या अखंडतेचा आधार बनतील आणि संपूर्ण जगाला शांतता, बंधुभाव आणि सद्भावनेचा संदेश देत राहतील यात शंका नाही.
 
 
तिरंगा यात्रेनंतर मंचाचे मार्गदर्शक, डॉ. इंद्रेश कुमार, राष्ट्रीय संयोजक डॉ. शहीद अख्तर, प्रोफेसर नसीब आली, आणि दीपक कुमार यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी यात्रेसंबंधी चर्चा केली.
-सुषमा पाचपोर 8767861445
(लेखिका मुक्त पत्रकार आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या महिला प्रकोष्ठ सह संयोजिका आहेत.)