संग्राम सेनापती

विवेक मराठी    21-Aug-2025   
Total Views |
संघाची शताब्दी आहे, म्हणजे काय आहे? ही शताब्दी राष्ट्र जागरणाची शताब्दी आहे. ही ’स्व’बोध जागरणाची शताब्दी आहे. ही समरस समाजजीवन निर्माण करण्याची शताब्दी आहे. ही शताब्दी ’स्व’ कर्तव्य जागरणाची आहे. राष्ट्राला सामर्थ्य संपन्न करणार्‍या त्यागमय परिश्रमाची शताब्दी आहे. राष्ट्राला समृद्ध करणार्‍या महान यज्ञाची शताब्दी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महान राष्ट्राच्या पुनर्घटनेच्या संग्रामातील महान सेनापती आहेत. 
rss
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे भाषण नेहमीप्रमाणे उत्कृष्ट झाले, असे शिफारस पत्र देण्याची काही गरज नाही. 102 मिनिटांचे हे भाषण आहे. अशा भाषणातून राष्ट्रीय नेतृत्वाचे गुण प्रकट होत असतात. राष्ट्राचा नेता कणखर, दीर्घ दृष्टी असलेला, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीची उत्तम जाण असलेला, योग्य वेळी योग्य व कठोर निर्णय घेणारा, निर्णयांच्या परिणामांची पूर्ण जाणीव असणारा असावा लागतो. या बाबतीत जगातील काही नेत्यांचा उल्लेख करायला पाहिजे. पहिल्या महायुद्धात थिओडर रुझवेल्ट यांनी अमेरिकेचे नेतृत्व केले आणि हे सर्व गुण त्यांच्या नेतृत्वातून प्रकट झाले. दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेचे नेतृत्व करणारे होते, फ्रँकलिन रुझवेल्ट. ब्रिटनचे नेतृत्व करणारे विन्स्टन चर्चिल होते. नंतर रशियाशी संघर्ष करणारे जॉन एफ. केनेडी होते. या सर्वांच्या नेतृत्वात वरील गुणांचा परम्मोच दिसतो. अलीकडच्या काळात मार्गारेट थॅचर, जर्मनीच्या अँजेला मर्केल, सिंगापूरचे ली क्वान यू हेदेखील अशा महान नेत्यांच्या पंगतीत जाऊन बसतात. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत सहजपणे जाऊन समाविष्ट होताना दिसतात.
 
 
आपल्या प्रदीर्घ भाषणात नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कणखरपणे पाकिस्तानला सुनावले की, अणुयुद्धाच्या धमकीला भारत घाबरत नाही. आम्ही कोणतेही ब्लॅकमेल सहन करणार नाही. सिंधू पाणी कराराबाबत ते म्हणाले की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकणार नाही. सिंधूचे पाणी बंद म्हणजे बंद. ऑपरेशन सिंदूरविषयी ते म्हणाले की, आपण सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं, त्यांनी रणनीती ठरवली. लक्ष्य ठरविले आणि लक्ष्यावर प्रहार केला. अनेक दशकानंतर हा पराक्रम आपल्या सैन्याने केला. संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी लढाऊ विमानांच्या देशी उत्पादनावर आपण काम करीत आहोत. स्वावलंबी आणि आत्मनिर्भर भारत हे आपले लक्ष्य आहे. ट्रम्प यांचा उल्लेख न करता त्यांनी इशारा दिला की, आर्थिक धमक्यांपुढे भारत झुकणार नाही.
 
काही दशकांपूर्वी भीकेचा कटोरा घेऊन फिरणारा भारत अशी भारताची जगात प्रतिमा होती. चीनकडून मार खाणारा आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भाजून निघालेला देश ही भारताची ओळख होती. जागतिक शांततेची पोकळ प्रवचने देणारा, पण आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यास असमर्थ असलेला भारत अशा दुर्बळ भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत ताठ उभे केले, स्वाभिमानी केले. आजचा भारत जशाच तसे उत्तर देणारा भारत झालेला आहे.
 
अशा भारताचे स्वप्न सुभाषचंद्र बोस यांनी पाहिले, स्वामी विवेकानंदांनी पाहिले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाहिले, सरदार पटेल यांनी पाहिले आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम गेली शंभर वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संघ स्वयंसेवक आहेत, त्याचा त्यांना अभिमानही आहे. मातृभूमीच्या सेवेसाठी जीवन समर्पित करण्याची प्रेरणा त्यांना संघाकडूच मिळाली आहे.
 
या वेळच्या आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणात संघ शताब्दीचा त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दात उल्लेख केला. त्यांच्याच शब्दांत, “आज, मैं गर्व के साथ कहना चाहता हूं की 100 साल पहले, एक संगठन का जन्म हुआ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। राष्ट्र की सेवा के सौ वर्ष एक गौरवपूर्ण, स्वर्णिम अध्याय हैं। ’व्यक्ति निर्माण से राष्ट्र निर्माण’ के संकल्प के साथ, मां भारती के कल्याण के उद्देश्य से, स्वयंसेवकों ने अपना जीवन हमारी मातृभूमि के कल्याण के लिए समर्पित कर दिया।“
 
 
देशाच्या पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात संघाचा गौरवपूर्ण उल्लेख होणं, ही पहिलीच घटना आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू संघाचा पराकोटीचा द्वेष करणारे होते. त्यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांनी तोच वारसा पुढे चालविला आणि सोनिया गांधी परिवार तोच वारसा जपत आहेत. कुणी कोणत्या वारशात जगायचे, हा ज्याच्या त्याच्या निवड स्वातंत्र्याचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघ वारसा जगणारे पंतप्रधान आहेत. संघाचा मंत्र आहे,’राष्ट्र प्रथम, अन्य सर्व गोष्टी नंतर’. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात ’माँ भारती’ असे शब्दप्रयोग अनेक वेळा करतात. भारतमातेची कर्ममय भक्ती हा संघ विचारधारेचा कणा आहे.
 
यापूर्वी संघाचे स्वयंसेवक अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. लाल किल्ल्यावरून त्यांची देखील भाषणे झाली पण त्यांच्या भाषणात तेव्हा संघ आला नाही. कारण थोर राजनेता योग्य वेळी योग्य तेच बोलतो. संघ शताब्दीचे वर्ष ही संघाविषयी जाहीरपणे बोलण्याची योग्य वेळ आहे आणि ती वेळ साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाविषयी बोलले आहेत. व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण या संघमंत्राचे त्यांनी उच्चारण केले.
 
संघाची शताब्दी आहे, म्हणजे काय आहे? ही शताब्दी राष्ट्र जागरणाची शताब्दी आहे. ही ’स्व’बोध जागरणाची शताब्दी आहे. ही समरस समाजजीवन निर्माण करण्याची शताब्दी आहे. ही शताब्दी ’स्व’ कर्तव्य जागरणाची आहे. राष्ट्राला सामर्थ्य संपन्न करणार्‍या त्यागमय परिश्रमाची शताब्दी आहे. राष्ट्राला समृद्ध करणार्‍या महान यज्ञाची शताब्दी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महान राष्ट्राच्या पुनर्घटनेच्या संग्रामातील महान सेनापती आहेत. यासाठी त्यांचे संघविषयक वक्तव्य हे उपचाराचे भाषण नसून आचरणाचे मंत्र आहेत, असा त्याचा अर्थ करावा लागतो. अशा या महान नेत्यास अंत:करणपूर्वक वंदन!

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.