@सौरभ गोखले
अनेक मराठी कलाकारही गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या ढोलताशा वादनाचे चाहते आहेत. त्यातूनच 2014 साली काही मराठी सिनेकलाकारांनी एकत्र येऊन या कलावंत ढोलताशा पथकाची स्थापना केली. आज त्यांची लोकप्रियता वाढत आहे आणि आणखी कलाकार जोडले जात आहेत.
गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्याच हृदयाच्या अतिशय जवळची आणि लाडकी देवता. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला मुंबई-पुण्यातून. लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला. त्यावेळी स्वातंत्र्याची प्रेरणा सर्वांच्या मनात जागी होण्यासाठी या सार्वजनिक उत्सवाचा, त्यातून होणार्या एकत्रिकरणाचा उपयोग झाला. आज हा उत्सव आपली परंपरा बनला आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवातील लक्षवेधी गोष्ट म्हणजे इथली ढोलताशा पथकं. उत्सवाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून येथील हौशी लोकांनी ढोलताशाचा या उत्सवात समावेश केल्याचा उल्लेख आढळतो. गेल्या काही वर्षांपासून पथकांची संख्या बरीच वाढली. सगळी पथके शिस्तबद्ध आणि तालबद्ध वादन करतात आणि पथकात तरुणाईचा उत्साह सळसळताना दिसतो. अनेक मराठी कलाकारही गणेशोत्सव आणि या ढोलताशा वादनाचे चाहते आहेत. 2014 साली काही मराठी सिनेकलाकारांनी एकत्र येऊन या पथकाची स्थापना केली. पडद्यावर दिसणार्या कलाकारांसोबतच पडद्यामागे असणारे तंत्रज्ञ, संगीतकार, सहाय्यक टीम असेही अनेक जण या पथकाचा भाग आहेत. सौरभ गोखले, श्रुती मराठे, अनुजा साठे, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, शाश्वती पिंपळीकर, तेजस बर्वे, मीरा सारंग यांसारखे अनेक कलाकार कलावंत पथकात ढोलताशा वादन करतात.
गणेशोत्सवाच्या साधारण एक महिना आधीपासून सरावाला सुरुवात होते. असं म्हणतात की ’आवड असली की सवड मिळते.’ पथकात असणारे सगळेच कलाकार आणि इतर सदस्यही या महिनाभराचे वेळापत्रक आधीच आखून ठेवतात. महिनाभर रोज संध्याकाळी 6 ते 9 कसून सराव चालतो. सगळेच कलाकार कामाच्या वेळा ठरवून घेऊन सरावाला पोचण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा कलाकार तर मुंबईला शूटिंग सुरू असताना ते वेळेत संपवून 4 तासांचा प्रवास करून पुण्यात सरावाला हजर असतात. सरावामध्ये नवनवीन ताल शिकण्यासाठी आवश्यक असणारा योग्य तो वेळ सरावासाठी देण्याचा प्रत्येक कलाकाराचा प्रयत्न असतो.
कलावंत पथकात प्रत्येक सदस्य वादनाव्यतिरिक्त असणारी कामं स्वतःहून करतो. वाद्याची देखभाल अतिशय महत्त्वाचा भाग असतो. ढोल चांगला वाजायला हवा असेल तर तो योग्य पद्धतीने ताणलेला असायला हवा. आठवड्यातले काही दिवस सरावाच्या सुरुवातीचा एक तास ढोलताशाच्या देखभालासाठी राखीव असतो. या वेळात ढोल आणि ताशा पूर्ण मोकळा करून, साफ करून वादनासाठी पुन्हा तयार केला जातो. देखभालीसाठी कुठलीही वेगळी टीम नसते. पथकाच्या प्रत्येक सदस्याला देखभाल करावी लागते. सगळे सदस्य ते अतिशय मनापासून आणि आनंदाने करतात. सिने अभिनेते आणि इतर सदस्य यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, हेच कलावंत पथकाचे वैशिष्ट्य आहे.
आजपर्यंत कलावंत पथकाने मुंबईतील सिद्धिविनायक, पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, भाऊसाहेब रंगारी गणपती या आणि अशा अनेक ठिकाणी वादन केले आहे. जिथे वादन असेल तिथल्या मिरवणुकीची शोभा सुंदर वादन करून वाढवणे यावर सगळ्या वादकांचा भर असतो.
या व्यतिरिक्त या वर्षी कलावंत पथकाने कलावंत ट्रस्टची स्थापना केली आहे. गणपतीच्या 10 दिवसांत ढोलताशा वादन तर होतेच मात्र वर्षभरात इतर विधायक कामे व्हावीत या उद्देशाने ट्रस्टची स्थापना झाली. या जून महिन्यात ट्रस्टने अतिशय दर्जेदार व्याख्यानमाला आयोजित केली होती. शिवाय येत्या काळात सामाजिक काम करणार्या कार्यकर्त्यांना नागरी गौरव पुरस्कार देणे, त्याचबरोबर कलावंत करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करणे आणि काही समाजपोयोगी कामे करणे हे कलावंत ट्रस्टचे येत्या काळातील उद्दिष्ट आहे.
लेखक सुप्रसिद्ध कलाकार व कलावंत ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.