कलाक्षेत्रात नव्हतो तेव्हापासूनच माझं गणपती बाप्पाशी खास नातं आहे. लालबाग परळमध्ये लहानाचा मोठा झालो असल्याने गणपतीची आवड लहानपणापासूनच होती. शाळा सुटल्यानंतर वडिलांबरोबर गणपतीच्या मूर्ती बघायला जायचो. जवळच गणपतीच्या मूर्तींची कार्यशाळा होती, शाळा सुटल्यानंतर युनिफॉर्ममध्येच तासनतास तिथेच बसून मूर्ती न्याहाळायचो. मूर्ती बघताना कसा वेळ निघून जायचा हे मला कळायचंही नाही. त्यावेळी काकांकडे गणपती बसायचा. वडिलांसोबत कार्यशाळेत जायचो तेव्हा गणपतीच्या मूर्ती बघून हरखून जायचो. आपण जेव्हा घरी गणपती बसवू तेव्हा कोणती मूर्ती आणायची हे मी तिथेच ठरवायचो. काकांच्या घरी आम्ही लालबाग ते काळाचौकी हातगाडीवर गणपती आणायचो. गणपती विसर्जनाच्यावेळीही टेम्पो करायचो. सगळी मुलं मिळून चौपाटीवर जायचो. विसर्जन करताना आम्ही मुलं दहीहंडीचे थर लावायचो, खाण्यापिण्याची चंगळ असायची.
अभ्युदयनगरमध्ये मी जिथे राहायचो तिथे समोरच्या मोठ्या ग्राऊंडवर अकरा दिवस जत्रा असते, त्या जत्रेत अकरा दिवस मजामस्ती करायचो. गणपतीच्या या सगळ्या आठवणी आजही मनात घर करून आहेत. गणेशोत्सव आला की या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येतात.
अभिनय क्षेत्रात आल्यानंतर या सगळ्या गोष्टींवर काहीशी बंधनं आली. पण त्यातूनही मी या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. शेवटच्या दिवशी टेम्पो करायचा ही परंपरा मागच्या वर्षीपर्यंत कायम ठेवली होती. बिल्डिंगमधली मित्रमंंडळी, आईच्या मैत्रिणी सगळे मिळून विसर्जनाला जायचो. पण यावर्षी लालबागच्या नवीन घरी शिफ्ट झालो आहे. जुनी मित्रमंडळी लांब गेली आहेत. नवीन घरातला पहिला गणपती आहे. एकीकडे आनंदही आहे आणि दडपणसुद्धा आलं आहे. पण बाप्पावर विश्वास आहे आजपर्यंत त्याने सगळं करून घेतलं तसच यावर्षीही करून घेईल याची खात्री आहे.
- विवेक सांगळे
सुप्रसिद्ध अभिनेता
संकलन ः बागेश्री पारनेरकर