विशाल शिंदे - मूर्तीत प्राण फुंकणारा कलाकार

विवेक मराठी    25-Aug-2025   
Total Views |
ganesh festival 2025
सुप्रसिद्ध मूर्तीकार विशाल शिंदे यांच्या गणेशमूर्तीत पेंटिंग आणि शिल्पकला यांचा संगम दिसतो. स्वप्नातही विचार न करू शकणार्‍या गणेशमूर्तींचं त्यांनी दर्शन घडवले. गणेशमूर्तीत अक्षरशः त्यांनी प्राण फुंकले आणि मूर्ती जिवंत केल्या.
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या वाक्प्रचाराचा अर्थ एका कलाकाराचं काम पाहून उलगडतो. तो हरहुन्नरी कलाकार म्हणजे सुप्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे. त्यांनी आयुष्यात पहिली गणेशमूर्ती बनविली ती, वयाच्या तिसर्‍या वर्षी.
 
 
इतक्या लहान वयात मुलांना खेळण्याचीच फारशी समज नसते, त्या वयात गणशेमूर्ती घडवणे हे कसं साध्य झालं, यावर विशाल शिंदे म्हणाले की, “लहानपणी मी खेळायला कमी जायचो पण मूर्तिकामात जास्त रमायचो, असं माझे बाबा सांगतात. तेव्हाचा एक प्रसंग आठवतो. वय वर्ष तीन. तापाने अंग फणफणलं होतं. माझी किरकीर चालू होती. घरी गणपतीचं कामं चालू होतं. आई मला कडेवर घेऊन बाबा काम करत होते तिथे गेली. माझी किरकीर थांबावी म्हणून बाबांनी एक छोटा गणपती बनवून दाखवला. ते बघत बघत मी शांत झालो. हातात मातीचा गोळा घेतला, जमेल तसं मातीला वळण देत गेलो आणि गणपतीचा आकार तयार झाला. ही माझी गणपतीची पहिली मूर्ती. ही बाबांकडून मला मिळालेली सर्वात मोठी भेट आहे असं मी समजतो. बाबा हेच या क्षेत्रातले माझे पहिले गुरू आहेत.
 
 
”माझे बाबा सूर्यकांत रामचंद्र शिंदे. मिल कामगार, एक मध्यवर्गीय गृहस्थ. घरप्रपंच सांभाळून चित्रकला आणि शिल्पकलेची आवड जिवापाड जपणारे-जोपासणारे. करी रोडच्या चाळीतल्या एका मूर्ती कारखान्यात निरीक्षण करून गणेशमूर्ती बनवायला शिकले. 10-12 वर्षांचे असल्यापासून ते आज वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली तरी गणेशमूर्ती बनविण्याची त्यांची आवड तसूभरही कमी झालेली नाही. लहानपणी मी गणेशमूर्ती बनविण्यासाठी बाबांना मदत करायचो. मोठा झाल्यावर हे चित्र उलट झालं. बाबांची शैली जुन्या पारंपरिक पठडीतली, त्याचंच अनुसरण मीही करीत होतो. तरीही वसईचे प्रसिद्ध मूर्तिकार दुष्यंत हटकर यांच्या गणेशमूर्तींचं मला आकर्षण होतं, तसं थोडंबहुत करण्याचा माझा प्रयत्न असायचा.”
 
 
मातीच्या गंधावर जीव जडलेला कलावंत किशोरावस्थेत करिअर म्हणून निवड करतो ती चित्रकलेची. आणि त्यासाठी प्रवेश घेतो कलेचं शक्तिपीठ असलेल्या भारतातील सर्वात जुन्या संस्थेत, मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट इथे. याबद्दल विशाल म्हणाले, “शालेय वयात चाळीत लाल रंगाच्या कोब्यावर खडूने अनेक चित्रं रेखाटली. माझी ही आवड पाहून शिक्षकांनी पुढे जाऊन यातच करिअर कर, त्यासाठी जे. जे. मध्येच प्रवेश घे असा सल्ला दिला. घरातून तर आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची मोकळीक होतीच. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, गोपाळराव देऊसकर या विभूतींसारखी चित्रं काढता यावीत असं वाटत राहायचं. तसंच लहान मुलांच्या पुस्तकातील रेखाचित्रं रेखाटणारे जॉन फर्नांडिस यांच्या चित्रांचेही आकर्षण होतंच. मूर्तिकला लहानपणापासूनच करत आलो होतो. जे येतं नसतं तेच शिकण्याचं कुतूहल असतं. म्हणूनच मी पेटिंगमध्ये प्रवेश घेतला.
 

vishal shinde 
 सुप्रसिद्ध मूर्तीकार विशाल शिंदे
“पेंटिंग शिकण्याबरोबरच गणेशमूर्ती करणंही चालूच होतं. देवाच्या घरात जन्मलेला मुलगा देवाशी नातं तरी कसं तोडणार! 2002 ला जे.जे.मधून उत्तीर्ण झालो. त्याच कॉलेजमधील आम्ही दोन-तीन मुलं मिळून पेेंटिंग व शिल्पकलेत फ्री लान्सिंग करू लागलो. सोबत गणेशमूर्ती बनवणं चालूच होतं. अशातच माझ्या एका मित्राने त्याच्या कंपनीत नोकरीची भरती चालू आहे, एकदा इंटरव्ह्यू देऊन बघ, असं मला सांगितलं. नोकरीची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. हाती करत असलेल्या कामाचाच काय तो अनुभव. केलेली कामं घेऊन इंटरव्ह्यूसाठी गेलो. त्या आधारे नोकरी मिळालीही. आनंद झाला, त्या उपर आनंदाचा धक्का काय असतो तर त्यांनी सांगितलेला दरमहा पगाराचा गलेलठ्ठ आकडा. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवणारा कुटुंबातील मी एकमेव, त्यामुळे घरचेही खूश झाले. जानेवारी 2008मध्ये नोकरी लागली. एक-दोन महिन्यांतच पगारवाढ झाली. मध्यमवर्गीय कुटुंबातील आम्ही या नोकरीमुळे जीवनाची गाडी कशी सुशेगात चालली आहे म्हणून निश्चिंत झालो. मात्र सहा महिन्यांतच या गाडीचं इंजिन असं काही थांबलं की, पुन्हा सुरूच झालं नाही. हा अनपेक्षित धक्का होता. या कंपनीला फंडींग यायचं ते अमेरिकेहून. जागतिक मंदीच्या वार्‍यात कंपनी भुईसपाट झाली आणि आमची स्वप्नंही पत्त्यांच्या डावाप्रमाणे कोसळली.
 

”मुळासकट हलून गेलेल्या अवस्थेत मन विषण्ण झालं. गलेलठ्ठ पगाराच्या सवयीमुळे कुटुंबाच्या आर्थिक घडीचेही तीनतेरा वाजलेले. नोकरीमुळे आधी करीत असलेल्या फ्री लान्सिंगचे संपर्कही तुटलेले. जिद्दीने पुन्हा फ्री लान्सिंगची विस्कटलेली घडी सावरायला घेतली. पूर्वपदावर यायला वेळ लागत होता. हळूहळू कामं चालू झाली. एकदा सहज विचारात असताना मीच केलेल्या गणेशमूर्तीकडे नजर गेली आणि वीज चमकावी तसा मनात विचार आला, सुरुवातीपासून आपण गणेशमूर्ती करीत आलो आहोत, जे येतं तेच का करू नये आणि पूर्ण वेळ गणेशमूर्ती करण्याच्या या क्षेत्राकडे वळलो.”
 
 
हा विशाल यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंटच म्हणावा लागेल. गणरायाने त्यांना या क्षेत्राकडे वळण्याची बुद्धी दिली आणि विलोभनीय गणेशमूर्ती साकारणारा एक हरहुन्नरी कलाकार कलासक्त गणेशभक्तांना मिळाला.
 
 
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून पेटिंगचं शिक्षण आणि आता पूर्णतः मूर्तिकलेत करिअर. हा विरोधाभास असला तरी इतर मूर्तिकारांपेक्षा विशाल यांच्या गणेशमूर्ती प्राण फुंकावा इतक्या जिवंत वाटतात. याचं रहस्य विशाल यांनी सांगितलं. “माझ्या गणेशमूर्तीत पेंटिंग आणि शिल्पकला यांचा संगम असतो. जे.जे.मध्ये पाच वर्षांच्या शिक्षणात आम्हाला स्केचिंग, लॅण्डस्केप, पोर्ट्रेट, त्याचबरोबर लाइव्ह मॉडेल असायचं. जिवंत आकृती समोर असल्यामुळे रंगछटा, हावभाव, शरीराची लकब, हे सारं चित्रात उतरवायला स्वतःच्या वेगळ्या रंगांच्या पॅलेटचा उपयोग करत, जेणेकरून चित्र जास्तीत जास्त नैसर्गिक रूपात रेखाटले जाईल. यात सर्वात महत्त्वाचं शिकायला मिळालं ते र्कीारप अपरीेाूं (मानवी शरीरशास्त्र). कळत-नकळत गणेशमूर्तीत ती अ‍ॅनाटोमी उतरत गेली आणि मूर्तीत जिवंतपणा येऊ लागला.
  
मूर्तिकलेतल्या कामाच्या वाढत्या व्यापामुळे त्याचं पेंटिंग मागे पडलं. यावर विशाल म्हणतात की, “त्यानंतर माती हाच माझा कॅनव्हास झाला आहे. लॉकडाऊनमध्ये मात्र बर्‍याच वर्षांनी कॅनव्हास, ब्रश घेऊन रोज एकतरी चित्र रेखाटलं होतं. तेव्हाच्या त्यांच्या फेसबुक पेजवरील पेेंटिंगच्या पोस्टवरील कॅप्शन कलाकार जिवंत असल्याची ग्वाही देतं. ती कॅप्शन अशी, ’बर्‍याच वर्षांनी रंगांना हाक दिली, नशीब रंगांनी ओळख दाखवली’.
 
 
सगुण साकार गणरायाचे रूप अधिकाधिक आपले वाटावे असा त्यांचा प्रयत्न चालूच होता. “तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने बदल होत गेले. सोशल मीडियासारखे प्रभावी माध्यम तेजीत होते, तो काळ साधारण 2010चा. फेसबुक पेजवर concept statue (संकल्प मूर्ती) पोस्ट केल्या. पहिल्यांदाच वेगळ्या धाटणीच्या गणेशमूर्ती समाजात व्हायरल झाल्या आणि पसंतीस उतरल्या. गणेशमूर्तींची मागणी वाढू लागली. आमची त्रिमूर्ती गणेश चित्रशाळेची जागा अपुरी पडू लागली. 2012 मध्ये नेहमीच्या जागेतून मोठ्या जागेत स्थलांतरित व्हावं लागलं.”
 

ganesh festival 2025 
 
पारंपरिक चौकटीतून गणपती नुसता बाहेर पडला नाही तर विशाल यांच्या कल्पकतेचे धुमारे इतके शिगेला पोहोचले की, कधी स्वप्नातही विचार न करू शकणार्‍या गणेशमूर्तींचं दर्शन होत गेलं. उदा- गजमुख, पूर्वजन्मीची आई असलेल्या हत्तीणीला भेटायला देवत्व प्राप्त झालेला तिचाच इटुकला हत्ती गणेशरूपात, पार्वती बालगणेशाशी संवाद साधताना, दुर्मीळ असा कार्तिकेय व गणपतीचा भावंडभाव, गणेशकथेत विष्णू हा गणपतीचा मामा आहे, मामा-भाचा या नात्यातलं प्रेम इतकं अलवार दाखवलं आहे की, विष्णूंच्या आयुधांसोबत बालगणेश खेळतोय... अशा विशाल यांनी घडवलेल्या कल्पक मूर्तींची जंत्री फार मोठी आहे. लोक कलेचा सन्मान करतात आणि त्याचे रोकडे मोलही द्यायला तयार असतात. हा चांगला अनुभव गाठीशी येत असतानाच 2016 मध्ये 320 गणेशमूर्तींची आगाऊ नोंदणी असूनही विशाल यांनी काम रद्द केलं.
 
 
विशाल शिंदे सुप्रसिद्ध मूर्तिकार म्हणून नावारूपाला येत असतानाच त्यांनी हा धाडसी निर्णय का घेतला? हा प्रश्न कलासक्त गणेशभक्तांबरोबर त्यांच्या कुटुंबियांनाही पडला. काही जणांनी त्यांना वेड्यातही काढलं. मात्र विशाल हे स्वतःच्या निर्णयावर ठाम होते. अशा वेळी साथ हवी असते ती कुटुंबाची. ती त्यांनी पूर्णपणे दिली आणि विशाल यांच्यावर विश्वास ठेवला. 2010 पासून माघी-भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त संकल्प गणेशमूर्तींची मागणी वाढू लागली. या काळात क्षणाचीही उसंत मिळत नसे, त्याच त्याच प्रकारचं काम करुन मेंदू शिणलेला. नवकल्पनांचे विचारचक्र सुरू व्हायला फुरसतच मिळत नव्हती. आपण यात अडकलो आहे, आपल्या हातून नवं काही घडत नाही. हे कलाकाराच्या सर्जनशीलतेला कुंपण घातल्यासारखं आहे. प्रगतीच्या पुढच्या पायरीवर झेप घ्यायची असेल तर इथे थांबावं लागेल, हे मनाशी पक्कं करुन विशाल यांनी काम थांबवण्याचा निर्णय घेतला.
 
 
या मधल्या काळात त्यांनी गणेशकथांचे वाचन केलं. प्रत्यक्ष गणपतीसदृश वेगवेगळ्या वयोगटातील जिवंत माणसांचं गणेशरूपात शूट केलं आणि स्केचेस काढली. यात त्यांनी गणेशसदृश व्यक्तीच्या शारीरिक हालचालींचे बारीकसारीक कंगोरे, या हालचालींमुळे वस्त्रांमध्ये होणारे काही बदल, चेहर्‍यावरील हावभाव अशा बर्‍याच गोष्टींचा अभ्यास आणि सराव केला. या दरम्यान आर्थिक बाजू सुरळीत चालण्यासाठी फ्री लान्सिंग चालूच होतं.
 
 
 
2017 सालं उजाडलं ते सर्जनाचा सोहळा घेऊनच. त्या वर्षी हातून झालेलं काम लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. पूर्वीपेक्षा अधिक बारकावे, रंगसंगतीत विलक्षण ठहराव, भावभावनांचा मिलाप, अशा सार्‍याचाच समुच्चय गणेशमूर्तीतून प्रकट होत होता. वर्षभरात अनेक अनोख्या मूर्ती साकारल्या गेल्या.
 
 
विशाल सांगतात, “प्रत्येक मूर्ती त्याच आत्मीयतेने करत होतो. परंतु लोकांमध्ये मूर्तीवरून स्पर्धा दिसून येत होती. लोकांना गणेशमूर्तींतून आनंद मिळावा या शुद्ध हेतूने मी मूर्ती घडवत होतो. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत देव तुमच्या घरी येणार असतो, तेव्हा वातावरण प्रसन्न हवं, कलुषित नव्हे. समाज एकसंघ करण्याची गणपती या देवतेतील ताकद ओळखूनच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा घाट घातला. आपण स्पर्धा निर्माण करण्याचे निमित्त होऊ नये, असं मला वाटलं आणि 2019ला संकल्प गणेशमूर्ती बनविण्याचं थांबवलं. त्या वर्षापासून पारंपरिक गणेशमूर्ती करण्याचा निर्णय घेतला.
 
 
“निर्णय घेतला खरा, पण या पारंपरिक मूर्तीचा लोक स्वीकार करतील का, ही शंकादेखील होती. निर्णय घेतला होता, आता मागे वळून पहायचे नाही, जे काही होईल त्याला सामोरे जायचे, देव सोबत होताच.“
 
 
जो कलाकार प्रामाणिकपणे हे करतो त्याला काम मिळतेच, हा विशाल यांचा स्वानुुभव. याही कामाचं लोकांनी इतकं स्वागत केलं की, मदतीच्या अनेक हातांची गरज भासू लागली. सुरुवातीपासून कुटुंबाचा पाठिंबा होता, तो आता सक्रिय झाला. याचा परिपाक म्हणून 2018साली त्रिमूर्ती गणेश चित्रशाळेचं रूपांतर त्रिमूर्ती गणेश स्टुडिओत झालं. ‘त्रिमूर्ती’ हे नावच त्या तिघा भावंडाच्या एकत्रिकरणाचे प्रतीक. कुटुंबाच्या या सक्रिय पाठिंब्यामुळेच गणेशमूर्ती निर्मितीच्या नवकल्पनांना बहर येतो आणि विशाल आपल्या पूर्ण न्याय देऊ शकतात.
 

ganesh festival 2025 
 
विशाल शिंदे साकार करतात तशा पद्धतीच्या मूर्ती या दोन-चार वर्षांत बाजारात मूर्ती दिसू लागल्या आहेत. ही आपण स्पर्धा समजता का, असं विचारल्यावर ते म्हणाले की, “अजिबात नाही. हे बाजाराचे विपणन मानसशास्त्र (Marketing Psychology) आहे. एखादी वस्तू लोकप्रिय झाली की, बाजारात त्या वस्तूची मागणी वाढते. मातीकामाची आवड असलेला एक वर्ग आहे, त्यांनी माझ्या मूर्ती संदर्भ म्हणून वापरल्या. ही शिकण्याची पद्धती आहे, याला स्पर्धा किंवा कॉपी-पेस्ट असं मी मानत नाही. आम्ही जेव्हा जे.जे.मध्ये शिकत होतो, तेव्हा सुप्रसिद्ध कलाकारांची चित्रं संदर्भ म्हणून वापरत असू. कोणताही नवखा कलाकार दिग्गज कलाकारासारखा होण्याचा प्रयत्न करत असतो. मलादेखील वासुदेव कामत सरांसारखी चित्रं काढता यावीत असं वाटायचंच की! त्यात काही गैर नाही. नवी पिढी काहीतरी चांगलं करतेय याचंच समाधान मानायचं. आणि एक महत्त्वाचं, जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला शंभर स्पर्धक असले तरी फरक पडत नाही.
 
 
”नव्या पिढीने कलेचा वारसा पुढे न्यावा याच उद्देशाने मी 2018मध्ये क्लासही घेत होतो. आता कामाच्या व्यापामुळे शक्य होत नाही. त्रिमूर्ती स्टुडिओचा व्याप वाढता आहे. इथल्या कामाचा ताण हलका करते ती इथे काम करीत असलेली तरुण पिढी. या क्षेत्रात ज्यांना रूची आहे अशा मुलांना आम्ही संधी देतो. अट इतकीच प्रामाणिकपणे काम करा, भरपूर शिका आणि मोठे व्हा. शॉर्टकटच्या फंदात पडू नका. कोणतीही गोष्ट शिकायला पुरेसा वेळ द्यायला लागतो, तरच त्याच्या मर्मापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल आणि उत्तमोत्तम कलाकृती तुमच्या हातून घडतील.”
 
 
विशाल यांच्या गणेशमूर्ती इतक्या लोभस असतात की, विसर्जन करण्यास मन होत नाही. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी फायबरच्या गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली. घर आणि ऑफीससाठी शो पीस, कारचं डॅशबोर्ड अशा ठिकाणी लक्ष वेधून घेणार्‍या या मूर्तींची मागणी इतकी वाढत गेली की, वर्षाचे बारा महिने याचं काम सुरू असतं. अगदी कार कंपन्याही त्यांना अ‍ॅप्रोच झाल्या आहेत.
 
 
“मागणी पुरी करण्यात आम्ही कमी पडत आहोत. लवकरच याचीही पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे,” अशी ग्वाही विशाल यांनी दिली.
 
 
गणेशमूर्तिकाम, डॅशबोर्डच्या फायबर मूर्ती, चित्रकला, एकंदर विशाल यांच्या जीवनाविषयीचा सर्व प्रवास जाणून घेताना एक गोष्ट विचारल्यावर ते भावूक झाले. गणेश चतुर्थीला त्रिमूर्ती स्टुडिओतील शेवटची मूर्ती बाहेर पडते तेव्हाच्या भावनेविषयी विचारले. “दसर्‍याला गणेशमूर्ती बनविण्याची सुरुवात होते ते चतुर्थीच्या आदल्या दिवसांपर्यंत बारीकसारीक काम होतच राहतं. वर्षातील जेमतेम दीड-दोन महिने सोडले तर आम्ही गणपतीच्या सान्निध्यात असतो. गणेशमूर्ती रंगली की त्यात प्राणतत्त्वाचा भास होतो. खरं सांगू का, गणेश चतुर्थीला सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं तेव्हा आमच्याकडे अनंत चतुर्दशीचं मन हेलावणारं वातावरण असतं. या दहा दिवसांत स्टुडिओत मी फिरकतही नाही, इतकं मन जड होतं.”
 

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.