बहुगुणी शेवगा

विवेक मराठी    25-Aug-2025
Total Views |
Shevga Sheng
@प्रिया फुलंब्रीकर
krushivivek 
शेवग्याचे झाड बहुगुणी, बहुपयोगी आहे. शेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर आयुर्वेदिक औषध निर्मितीत केला जातो. म्हणून हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेवगा पीक ओळखले जाते. बहुपयोगी असलेल्या शेवग्याच्या झाडाची ओळख करून देणारा हा लेख.
आशिया व आफ्रिका खंड हे शेवग्याचे मूळ उगमस्थान आहे. Moringaceae कुळातील Moringaम्हणजेच शेवगा हा एकमेव प्रकार असून शेवग्याच्या भारतात विविध प्रजाती आढळतात. आपण भारतामध्ये अन्न म्हणून वापर करतो त्या शेवग्याच्या प्रजातीचे वनस्पतीशास्त्रीय नाव Moringa oleifera असे आहे. मोरिंगा (Moringa) हा शब्द मुरुंगाई या तमिळ शब्दापासून निर्माण झालेला असून त्याचा अर्थ drumstick किंवा twisted pod असा आहे, तर oleifera हा शब्द oleum (oil) आणि ferre (to bear) या दोन लॅटिन शब्दांचा मिळून बनलेला संधी असून त्याचा अर्थ तेल देणारा (oil bearing) असा आहे. हे जलद गतीने वाढणारे पानगळीचे वृक्ष भारतात हिमालयाच्या पायथ्याशी दिसून येतात अशी शास्त्रीय नोंद आहे. मात्र भारतात इतरत्र शेवगा लागवड करून लावलेला आढळून येतो.
 
आरोग्यदायी शेवगा
 
अलिकडे भारतात शेवग्यावर विपुल संशोधन झाल्यामुळे शेवग्याचे माहात्म्य सर्वत्र सिद्ध झाले आहे.
 
शेवग्याच्या शेंगा, फुले व पाने हे भाग अन्न म्हणून सेवन केले जातात. शेवग्याच्या पानांत भरपूर प्रमाणात A, B , C, K जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम व प्रोटीन असल्यामुळे त्याची पाने ताजी खाल्ली जातात, तसेच वाळवून देखील सेवन केली जातात. वाळवलेल्या पानांची पावडर करून त्या पावडरची औषध म्हणून विक्री केली जाते. ही पानांची पावडर दररोज मधात मिसळून सेवन केल्यास त्याचा आरोग्यावर अधिक चांगला परिणाम झालेला दिसून येतो. ठिसूळ हाडांवर उपाय म्हणून ही पावडर मधातून घेतली जाते किंवा या पावडरीच्या कॅप्सूल्स पाण्याबरोबर घेतल्या जातात. मधुमेहींना देखील ही पावडर दररोज पाण्याबरोबर सेवन केल्याने रक्तशर्करा नियंत्रित राहण्यास मदत होते. हृदयरोग, रक्तदाबाच्या विकारावर देखील ही पावडर उपयुक्त ठरते. येथे एक मात्र लक्षात घ्यायला हवे की शेवगा ही जरी गुणकारी वनौषधी असली तरी औषध म्हणून त्याची मात्रा वैद्यकीय सल्ल्यानुसारच ठरवावी.
शेवग्याची पाने अत्यंत पौष्टिक असल्याने भारतातील आदिवासी या पानांची भाजी जेवणात आवर्जून समाविष्ट करतात. शेवग्याच्या पानांप्रमाणे शेवग्याची फुले सुद्धा औषधी आहेत. फुलांमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स विपुल प्रमाणात असतात. फुले सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा वाढून रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आदिवासी भागात पानांप्रमाणेच फुलांची देखील भाजी केली जाते किंवा दोन्हीची एकत्र भाजी केली जाते. शक्यतो झाडावरील फुले काढण्यापेक्षा जमिनीवर गळून पडलेली ताजी फुले वेचून भाजीकरता वापरली जातात. शेवग्याचे मूळदेखील औषधी असून जंतूनाशक आहे. तसेच शेवग्याच्या शेंगेतील बिया ह्या पाणी शुद्ध करण्यासाठी वापरल्या जातात. अलीकडे खूप कमी ठिकाणी शुद्ध स्वरूपात तुरटी मिळते. सहसा बाजारात मिळणारी तुरटी ही केमिकलमिश्रित असल्याने गढूळ पाणी शुद्ध करण्यासाठी शेवग्याच्या बिया हा आरोग्यासाठी सुरक्षित पर्याय ठरतो. या बियांपासून तेल काढले जाते. हे तेल खाद्य तेल म्हणून वापरले जाते. या तेलाचा केस आणि त्वचेवर लावण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच या तेलाचा सौंदर्य प्रसाधनांमध्ये आधारभूत घटक म्हणून वापर केला जातो. शेवग्याची सालसुद्धा औषधी असून ती उगाळून शरीराच्या सूज आलेल्या भागावर त्याचा लेप लावतात. शेवग्याच्या शेंगा चविष्ट व आरोग्यदायी असल्याने पिठले, आमटी, सांबार, सूप, लोणचे अशा विविध पदार्थांमध्ये वापरल्या जातात हे सर्वांना माहीत आहेच.
 
krushivivek 
 
विविध परागवाहकांना आकर्षित करणारा वृक्ष
 
 
शेवगा हे झाड अगदी मुरमाड जमिनीत देखील कमी पाण्यावर किंवा त्या प्रदेशात पडणार्‍या नुसत्या पावसाच्या पाण्यावर तग धरू शकते व चांगले वाढू शकते. उत्तम हवामान व पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी शेवगा हा साधारणपणे वर्षातून कमीतकमी दोन वेळा तरी उत्तम फुलतो किंवा अगदी बारमाहीदेखील फुलावर असतो. शेवग्याच्या फुलांवर मधुरस प्राशन करण्यासाठी पक्षी, माश्या, वटवाघळे असे विविध प्रकारचे परागवाहक येतात म्हणून शेतांमध्ये शेवगा लावलेला असावा.
 
 -------------------------------------------------------------------------------------------------------
 
शेवग्याच्या शेंगाचे चवदार लोणचे
 
चविष्ट आणि औषधी असलेल्या शेवग्याच्या शेंगांचे लोणचे अतिशय रुचकर लागते. पुढे दिलेल्या पाककृतीप्रमाणे लोणचे तयार करावे.
 
साहित्य : 10 शेवग्याच्या शेंगा, 4 टेबल स्पून तेल, 2 टिस्पून मेथी दाणे, 2 टिस्पून बडीशेप, 1 टिस्पून मोहरी, 1 टिस्पून हिंग, 1 टिस्पून हळद, 1 टेबल स्पून तिखट, 1/4 वाटी चिंचेचा कोळ, 1/2 वाटी चिरलेला गूळ, चवीप्रमाणे मीठ.
 
कृती : अगदी राठ नाहीत आणि अगदी कोवळ्या पण नाहीत अशा पक्व झालेल्या शेवग्याच्या शेंगा पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्या शेंगा सुती कपड्यात पूर्णपणे कोरड्या होईपर्यंत गुंडाळून ठेवाव्यात. शेंगा पूर्ण कोरड्या झाल्यावर साल काढणीने त्यांची फक्त वरची जाड साल अलगद काढून घ्यावी. त्यांचे 1.5 ते 2 इंच लांबीचे काप करावेत.
 
शेंगांचे काप गॅसवर चाळणीत घालून 10 मिनिटे हलके वाफवून घ्यावेत. काप मोडू नयेत यासाठी शेंगा जास्त वाफवू नयेत.
मेथीदाणे आणि बडीशेप वेगवेगळी कढईमध्ये घेऊन मंद आचेवर लाल होईपर्यंत खरपूस भाजून घ्यावी. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वेगवेगळे घेऊन बारीक पूड करावी. पहिल्यांदा कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हळद आणि हिंग घालून खमंग फोडणी करून घ्यावी आणि गॅस बंद करावा. फोडणी गरम असतानाच त्यात वाफवलेल्या शेंगांचे काप, चवीपुरते मीठ, मेथी पावडर, बडीशेप पावडर आणि तिखट घालावे आणि नीट ढवळावे. त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळावे. तयार झालेले लोणचे गार झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावे.
 
(टीप - तयार झालेले लोणचे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. लोणच्याची बरणी सौम्य सूर्यप्रकाश येणार्‍या कोरड्या जागी ठेवावी म्हणजे लोणचे चांगले मुरते. वाफवलेल्या शेंगा आणि चिंचेच्या कोळात बाह्य पाण्याचा अंश असल्यामुळे हे लोणचे मुरल्यावर लवकरात लवकर संपवावे. लोणचे जास्त काळ टिकवायचे झाल्यास त्यात गरम तेलाची मात्रा थोडी अधिक वाढवावी.)
 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
माती सुपीक करणारा शेवगा
 
महत्त्वाचे म्हणजे शेवग्यामुळे शेतातील जमीन सुपीक होते. शेवग्याच्या मुळांवरील गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जिवाणू (Nitrogen-fixing bacteria) असतात. त्या जीवाणूंमुळे मातीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढते. अशी नायट्रोजन-समृद्ध माती शेतातील पिकांच्या वाढीकरता आणि उत्पादनासाठी पूरक ठरते. अशा प्रकारे शेवगा जमिनीत नैसर्गिकरित्या नायट्रोजनचा पुरवठा करत असल्याने शेतामधील रासायनिक खतांचा वापर कमी करण्यास अथवा नैसर्गिक शेती करण्यास शेवगा सहाय्यकारी ठरतो. शेवग्याच्या या महत्त्वाच्या गुणधर्मामुळे या वनस्पतीची शेतामध्ये आंतरपीक किंवा मुख्य पीक म्हणून लागवड केल्यास उपयुक्त ठरते.
 
 
मधमाशीस प्रिय वनस्पती
 
 
शेवगा ही मधमाश्यांना आकर्षित करणारी वनस्पती आहे. मुख्य म्हणजे मधमाश्यांमार्फत शेवग्याचे उत्कृष्टरित्या परागीकरण होते. त्यामुळे शेतामध्ये शेवग्याची लागवड केलेल्या जागी मधुपेट्या ठेऊन मधमाशीपालन करणे शेतकर्‍यास अत्यंत लाभदायी ठरते. शेतकरी हा मधपाळ (मधमाशीपालक)देखील होऊन शेतीमधून अधिक उत्पन्न मिळवू शकतो. कारण शेवग्याला भरपूर फुले येत असतात. त्या फुलांना विशिष्ट गंध असतो. विशेषतः सकाळच्या वेळी शेवग्याच्या झाडाजवळ गेल्यास हा गंध प्रकर्षाने जाणवतो. मधुपेटीतील पाळीव मधमाश्यांना शेवग्याच्या फुलांमधून भरपूर मकरंद व पराग मिळतात. मधपाळास पेटीतील मधमाश्यांनी शेवग्यापासून तयार केलेला उत्कृष्ट प्रतीचा नैसर्गिक व औषधी मध मिळू शकतो. भारतात सर्व ठिकाणी शेवग्याची उत्तम वाढ होत असल्याने शेतकर्‍यांनी जर शेतामध्ये शेवग्याची अधिकाधिक लागवड करून तिथे शास्त्रीय पद्धतीने मधमाशीपालन केल्यास त्यांना शेवगा व मधमाशीपालन या दोहोंमधून आर्थिक लाभ मिळवता येतो. शेतात मधुपेट्या ठेऊन मधमाशीपालन केल्याने शेतातील पिकांची संख्या व गुणवत्ता वाढते. पेटीतील पाळीव मधमाश्यांपासून मिळणार्‍या मध, मेण, पराग, इत्यादी पदार्थांच्या विक्रीतून शेतकरी फायदा करून घेऊ शकतो. तसेच शेवग्याची पाने, शेंगा विकून शेतकर्‍यास चांगला आर्थिक लाभ मिळवता येतो. शिवाय शेतकरी शेवग्याच्या शेंगांतील बियांपासून किंवा छाट कलम पद्धतीने शेवग्याची रोपे तयार करू शकतात व त्या रोपांच्या विक्रीतून उत्पन्न मिळवू शकतात.
 
 
सर्वांगसुंदर असा हा बहुगुणी शेवगा शेतकरी बांधवांना आशेचा किरण दाखवत संजीवनी मिळवून देणारा ठरू शकतो.
 
लेखिका निसर्ग अभ्यासक आहेत.