अलोट जनसागराला आपल्या वादनातून भक्तिरसात चिंब करतानाच गणेशोत्सवाचे पावित्र्य जपणे हे या बॅन्डचे वैशिष्ट्य. स्वरांजली बॅन्डची वाढत चाललेली लोकप्रियता आणि त्याची वैशिष्ट्ये या संदर्भात स्वरांजली बॅन्डचे सदस्य आणि भारतीय नौसेनेतून निवृत्त झालेले, संगीतज्ज्ञ महेश देवळेकर यांच्याशी या गणेश विशेषांकानिमित्त साधलेला संवाद.
पालखी निघाली राजाची...या गाण्याची धून ऐकू येताच लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आलेला गणेशभक्तांचा अलोट जनसागर बेभान होऊन थिरकायला लागतो. याच गाण्याचे अचूक सूर सादर करणारा बॅन्ड (वाद्यवृंद) म्हणजे लालबागचा स्वरांजली बॅन्ड. स्वरांजली बॅन्ड गेली 25 वर्षे वादनाच्या माध्यमातून लालबागच्या राजाची सेवा करीत आहे. त्यामुळेच आता स्वराजंली बॅन्ड आणि लालबागच्या राजाचे विसर्जन हे समीकरणच झालं आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आलेल्या अलोट जनसागराला आपल्या वादनातून भक्तिरसात चिंब करतानाच गणेशोत्सवाचे पावित्र्य जपणे हे या बॅन्डचे वैशिष्ट्य. स्वरांजली बॅन्डची वाढत चाललेली लोकप्रियता आणि त्याची वैशिष्ट्ये या संदर्भात स्वरांजली बॅन्डचे सदस्य आणि भारतीय नौसेनेतून निवृत्त झालेले, संगीतज्ज्ञ महेश देवळेकर यांच्याशी संवाद साधला.
‘’पालखी निघाली राजाची, या हो गणेश नगरात...गाण्याच्या या सुरूवातीच्या बोलातच मुंबईच्या लालबाग-परळ इथल्या गणेशोत्सवातील उत्साहाची झलक दिसते. मोबाईल जेव्हा आयुष्याचा भाग नव्हता, तेव्हा लालबाग-परळमधल्या मुलांसाठी कला सादर करण्यासाठी इथली गणेश मंडळे हे हक्काचे व्यासपीठ होते. ठिकठिकाणच्या गणेश मंडळातील कानावर पडत गेलेेलं वादन मनात आणि धमन्यांत इतकं भिनलं की, त्यातून वादनकलेची आवड निर्माण होत गेली. सुरूवातीला स्वान्तसुखाय, तर कधी शाळेच्या बॅन्ड पथकातून ही कला आणखी रूजत गेली. मात्र या कलेला योग्य दिशा मिळाली ती वादनकलेतील माझे गुरुवर्य स्व. सहदेव यशवंत गुरव मास्तर यांच्यामुळे” हे सांगताना स्वरांजली बॅन्ड पथकाचे सदस्य महेश देवळेकरांचा चेहरा आनंदाने फुलून आला होता. ते पुढे म्हणाले,
“वादनकलेतील बारकाव्यांसहित गुरव मास्तरांनी अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले. ऋषितुल्य माणसं भेटत गेली आणि आम्ही घडत गेलो. पूर्वी लालबाग राजा विसर्जनाच्यावेळी वरळीच्या श्री गुरुदत्त बॅन्डचे वादन होत असे. हळूहळू भाविकांच्या वाढत्या गर्दीला तो बॅन्ड अपुरा पडू लागला. श्री गुरुदत्त बॅन्डचे प्रमुख कुवळेकर (जे आज स्वरांजलीचे सदस्य आहेत.) यांनी आमच्या गुरुंना, तुमच्या बॅन्डमधील वादक आमच्या बॅन्डमध्ये जोडले गेले तर बरं होईल असं म्हटलं. लालबागच्या राजासाठी वादन करणं ही आमच्यासाठी पर्वणीच! आमच्या गुरुंनी अनुमती दिली. ते साल होतं, 1999. तेव्हापासून आतापर्यंत स्वरांजली बॅन्ड वादनकलेतून राजाची सेवा करीत आहे. हे विधिलिखित असावं म्हणूच राजाच्या सेवेत आम्ही रुजू झालो.”
महेश देवळेकर नौदलात 15 वर्षे होते आणि आश्चर्य म्हणजे या 15 वर्षात एकही वर्ष लालबागच्या राजाच्या वादनसेवेत त्यांचा खंड पडला नाही. या विषयी विचारल्यावर ते म्हणाले की,“अगदी खरं आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच सुट्ट्यांचं नियोजन होतं असतं. हे सुट्टीचे दिवस मी खास गणपतीसाठीच राखून ठेवायचो. घरातील सणसमारंभ, नातेवाईकांचे कार्यक्रम यात तडजोड व्हायची, पण राजाच्या वादनसेवेत कधी तडजोड केली नाही. राजाला सेवा देणं, ही मी स्वत:शी केलेली कमिटमेंट आहे. एक वर्ष मात्र असं झालं की, मला विसर्जनाच्या दिवशीच नोकरीवर रुजू व्हायचं होतं. या वर्षी आपल्या हातून सेवा होणार नाही या विचाराने मन खिन्न होतं. नोकरीवर हजर होण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोहचत असतानाच फोन आला की, तुमच्या जहाजाचा मार्ग बदलला असून तुम्हाला विशाखापट्टणमला जायचे आहे. तुमची सुट्टी आणखी तीन दिवसाने वाढली आहे. हा योगायोग नसून राजाचा कृपाशिर्वादच असल्याची माझी खात्री आहे. ज्या दिवशी माझी नौदलात भरती झाली, तो दिवसही अनंत चतुर्दशीचाच होता आणि त्यादिवशीही मी वादन केले. कोरोना काळात राजा विराजमानच झाला नाही तर कसलं वादन होणार, पण त्या वर्षीही एका पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून पालखी निघाली... चे वादन करुन राजाने माझ्याकडून सेवा करुन घेतली. आता सेवानिवृत्त झालो आहे, मात्र संगीत-वादन क्षेत्रात नवीन पिढी घडविण्याचे काम चालू आहे. देशाच्या सेवेसोबतच राजाची सेवा करता आली हे मी माझ्या पूर्वजन्माचे संचित आहे असं मानतो.”
कलाकार कसा घडत जातो, हे सांगताना ज्या गाण्याने स्वरांजली बॅन्डला ओळख मिळवून दिली, त्या संदर्भातील किस्सा महेश यांनी सांगितला. एक वर्ष ‘पालखी निघाली...’ गाण्याचं वादन झालं आणि तुफान गर्दीतून एक गृहस्थ माझ्याजवळ येऊन म्हणाले की, आता तुम्ही ज्या गाण्याचं वादन केलं, त्यात काही उणीव राहिली असं तुम्हाला वाटतं का? त्यांच्या या प्रश्नाने मी स्तब्ध झालो आणि त्यांना म्हणालो की, माझ्या परिने मी प्रयत्न केला आहे, तरीही काही चूक झाली असेल तर सांगा, सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू. त्यानंतर त्यांनी सांगितलं की या गाण्याच्या तिसर्या अंतर्यानंतर जो आलाप आहे, तोच या गाण्याचा आत्मा आहे. त्याचे वादन तुमच्याकडून राहून गेलंय. ते गृहस्थ होते, पालखी निघाली... या मूळ गीताचे लेखक विजय महाडिक.
गाण्याविषयी त्यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं, समजून घेतलं, नव्याने डिझाईन केलं, सराव केला. तेव्हापासून आजपर्यंत पालखी निघाली... गाण्याचं वादन हे संपूर्ण करण्याचा शिरस्ता स्वरांजली बॅन्डने घालून घेतला आहे. वादन करताना इतर गाण्यांची मागणी होत असतेच, त्याक्षणी दुसर्या गाण्याचं वादन आणि पुन्हा पालखी निघाली...चं वादन जोडून घेतो, पण गाणं कधी अपूर्ण सोडत नाही. श्री गुरुदत्त बॅन्डची मास्टर स्ट्रोक असलेली गाणी आणि स्वरांजलीची निवडक प्रसिद्ध गाणी अशा दोघांचा समन्वय स्वरांजली साधते.”
वादन म्हटलं रसिकांची फर्माइश ओघाने आलीच, अशा वेळी ट्रेडिंग गाण्याचं वादन होतं का? यावर महेश यांचं म्हणणं असं की, फर्माइश होतच असते. वादक म्हणून आमचीही जबाबदारी असते की रसिकांचा आदर करावा, पण त्याचबरोबर वादकाने हे भानही जपले पाहिजे की, आपण कोणत्या प्रसंगानिमित्त वादन करीत आहोत. गणेशोत्सव हा आपल्या हिंदूंचा मांगल्याचा आणि पावित्र्याचा सण आहे. या सणाला गालबोट लागेल अशा कोणत्याही गाण्याचं वादन स्वरांजलीकडून होत नाही. अशा गाण्यांची फर्माइश आली तरी नम्रपणे नकार देत त्यामागची कारणे आम्ही स्पष्ट सांगतो.
श्रीगणेश आगमनाची तयारी घर असो की मंडळ काही महिने आधीपासून सुरू होते. स्वरांजलीचीच्या तयारीविषयी सांगताना महेश म्हणाले की,“लहानपणापासून आपण बघत आलो आहोत की, सणासुदीच्या दिवसांआधी घरातील मोठी मंडळी बेगमीची तयारी करतात, जेणेकरून ऐन वेळी अतिरिक्त भार न पडता कामं सोपी होतात. अगदी त्याचप्रमाणे स्वरांजली बॅन्ड वादनाची तयारी, नियोजन, गाण्यांची निवड, वाद्ये सुस्थितीत राखण्यासाठीची काळजी अशा महत्त्वाच्या बाबींपासून आपले वादन अधिक दर्जेदार करण्यासाठी सज्ज असतो.”
“स्वरांजली बॅन्ड हे टीमवर्क आहे. कोणताही निर्णय अथवा बदल साधकबाधक चर्चा करुनच एकमताने केला जातो. आम्ही सादर करणार्या एखाद्या गाण्याला लोकांची स्वीकारार्हता कशी मिळू शकते याचा सर्वांगाने विचार केला जातो. तसेच दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतो, पहिले वादन करण्यापूर्वी त्या मूळ गाण्याच्या निर्मितीमागील भाव समजून घेऊन त्याचे वादन करावे तरच त्या गाण्याला आपण न्याय देऊ शकतो. दुसरं म्हणजे आपण कोणत्या प्रसंगात गाण्याचं वादन करणार आहोत. ज्यांच्यासमोर वादन होणार आहे, त्यांची त्याक्षणी भावस्थिती कशी आहे...या त्या दोन गोष्टी.”
“वाद्यांच्या देखभालीबद्दल बोलायचं झालं तर आमची वाद्ये खूप महागडी असतात. म्हणूनच वादन करताना त्याची जिवापाड काळजी घेतली जाते. आमची वाद्ये ही लश्रेुळपस blowing instrument (फुंक वाद्ये) आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अधिक काळजी घ्यावी लागते. प्रत्येक वादक प्रशिक्षित असल्याने वाद्यांची साफसफाई प्रत्येक जण स्वत:च करतो.”
लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या दिवशी वर्षानुवर्षे भाविकांचा जनसागर वाढतच आहे. गर्दी आणि वादन यांचा ताळमेळ कसा राखला जातो, तसेच आपल्या बॅन्डमध्ये वादकांची संख्याही वाढत आहे. अशा वेळी अचूक वादनासाठी काय सल्ला असतो? त्यावर महेश म्हणाले की,“ही लालबागच्या राजाची कृपा. आपण प्रयत्न केले तर देव नक्की साथ देतो. सामूहिक वादन हा असा प्रकार आहे की, एखाद्या वादकाचा एखादा ठेका चुकला तरी संपूर्ण वादन चुकू शकतं. हे टाळण्यासाठी आम्ही ग्रुपनुसार निरिक्षक नेमले आहेत. त्या ग्रुपच्या अचूक वादनाची संपूर्णतः जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली असते. आणि इतक्या वर्षांच्या माझ्या अनुभवावरून कोण कुठे, कसं चुकलं हे एवढ्या गर्दीतूनही ओळखू शकतो. मात्र स्वरांजलीतील सगळेच सदस्य आपापले काम चोख करतात, त्याचीच फलश्रुती म्हणजे स्वरांजली बॅन्ड दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.”
“याबरोबरच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्साही वातावरणात सगळेच बेधुंद असतात. सेल्फीचा आणि रिलच्या जमान्यात वादनावर आणि वाद्यावर परिणाम होणार नाही याची पूर्वसूचना वादकांना दिलेली असतेच. हीच शिस्त स्वरांजली बॅन्ड लोकप्रिय होण्यास कारणीभूत आहे असं आम्ही मानतो. अनेकांना स्वरांजली बॅन्डमध्ये सामील होऊन राजाची सेवा करायची आहे. स्वरांजलीने दर्जेदार वादनाने स्वतः ची ओळख निर्माण केली आहे. हा निर्माण झालेला दर्जा कायम राखणे हे बॅन्डमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. म्हणूनच स्वरांजलीत आम्ही प्रशिक्षित केलेल्या सदस्यांनाच सहभागी करून घेतो. एकमेकांचे सूर जुळल्याशिवाय वाद्यातून योग्य सूर उमटत नाहीत.”
वादकांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनाबद्दल महेश यांचे मत असं...“वादक म्हटलं की अशिक्षित, व्यसनी, बेरोजगार असा समाजाचा दृष्टिकोन असतं. पण आता काळ बदलला आहे. आजचे बहुसंख्य वादक शिकलेले आणि प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी व्यवसाय करणारे आहेत. वादन ही कला ते प्रामाणिकपणे आणि कष्टाने साध्य करतात. म्हणून वादनाची प्रशंसा करताना त्यांच्या अंगावर पैसे फेकणे हा आम्ही कलेचा अपमान समजतो.”
“एखादा कलाकार घडण्यामागे त्याची मेहनत, चिकाटी आणि परिश्रम असतात. प्रत्येक वेळेस कला सादर करताना त्याची परीक्षा होत असते. कला ही सहजसाध्य नाही, म्हणून वादकाच्या कलेचा सन्मान केला जावा एवढी माफक अपेक्षा आहे. तसंच कार्यक्रमाची सुपारी देताना नको तेवढा भावतोल करताना दिसतात, कलाकार हा तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येणार असतो, त्याच्या कलेचा मान राखत कलेचे मूल्य कमी होणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवे.”
लालबागच्या राजा चरणी काय मागणं मागाल असं विचारल्यावर महेश देवळेकर म्हणाले की,“न मागताच राजाने भरपूर दिलं आहे. लालबाग नगरीच्या या राजाने त्याच्या प्रजेला खूश करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली, हे आमचं परमभाग्य. वादनकलेतून अखंड सेवा घडू दे, ही त्याच्या चरणी प्रार्थना. जसं आम्हाला तू तुझ्या सेवेत रूजू केलंस तसंच नवीन पिढीला तुझ्या सेवेत रुजू करून घेण्याचं बळ आम्हाला दे, हेच मागणं असेल.”