प्रथम तुला वंदितो...- गणेशोत्सवातच मैफिलीचा श्रीगणेशा

विवेक मराठी    25-Aug-2025   
Total Views |
 
Manjusha patil
 
 
माझं बालपण सांगलीत गेलं आणि आमच्या घरी गणपती बसवण्याची प्रथा होती. माझे आईवडील गणेशभक्तच होते. एक आठवण आजही स्मरणात आहेे. मी पाचवीत असताना आम्ही अष्टविनायक दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी मी म्हैसकर बुवांकडे शिकत होते. अष्टविनायकाच्या प्रत्येक मंदिरात त्यावेळी मी एक गणपतीचं भजन म्हटलं. तिथे जे प्रेक्षक होते त्यांना माझं खूप कौतुक वाटलं.
 
 
पाचवीत असतानाच जणू गणपतीचा आशीर्वाद मिळाला. खर्‍या अर्थाने तेव्हाच गाण्याच्या मैफिलीचा श्रीगणेशा झाला होता. त्यानंतर हळूहळू स्पर्धांमध्ये बक्षीसं मिळायला लागली, नाव व्हायला लागलं. त्यावेळी सांगलीत घरगुती गाण्याच्या मैफिलींची पद्धत होती. छोटे छोटे घरगुती कार्यक्रम मिळायला लागले. साधारण 1983-84 साली माझा पहिला घरगुती कार्यक्रम झाला तो गणेश चतुर्थीलाच.
 
 
ganesh festival 2025
 
त्यानंतर जाहीर कार्यक्रम सुरू झाले. सांगलीचं ग्रामदैवतच गणपती त्यामुळे सांगलीच्या राजवाड्यातील गणेशोत्सव पाहण्यासारखा असायचा. राजमातांना गाण्याची प्रचंड आवड होती. तिथं माझं गायन दरवर्षी असायचं. बाबा सांगली बँकेत होते. बँकेतही माझ्या गायनाचा कार्यक्रम व्हायचा. गणेशोत्सव आणि माझं गायन हे एक समीकरणच झालं होतं.
 
 
 
हल्ली मात्र चित्र फारच बदललं आहे. शास्त्रीय गायन, संगीताचे कार्यक्रम फारसे होतच नाहीत. गणपती ही कलेची, बुद्धीची आणि विद्येची देवता आहे. डीजे हे गणपतीचं वैभव नाही, गणपतीसमोर वेडवाकडं नाचायचं ही आपली परंपराच नाही. हे सगळं पाहिल्यावर कलाकार म्हणून वाईट वाटतं. शास्त्रीय गायनच ठेवा असं नाही पण लोकसंगीत, भजन, अभंगाचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. पुढच्या पिढीला आपण काय दाखवतोय याचा विचार गणेश मंडळांनी केला पाहिजे. सण उत्सव आनंदासाठी आहेच पण त्याचा अर्थ परंपरा सोडून आधुनिकतेच्या नावाखाली बीभत्स स्वरूप देणं योग्य नाही.
 
- विदुषी मंजुषा पाटील
शास्त्रीय गायिका

बागेश्री पारनेरकर

सा. विवेकमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. रेडिओ, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमात काम करण्याचा अनुभव. विविध माध्यमातून योग आणि आहार विषयक लेखन. नाट्य, नृत्य, संगीत क्षेत्राची आवड. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनाचा अनुभव...