@पद्मश्री वासुदेव कामत
गणेशकथेत सामाजिक भावनेचं प्रतिबिंब दिसतं, याच भावनेने मी गणपती या देवतेकडे पाहतो. माझ्याकडून नेहमी वेगवेगळी गणेशरूपं साकार होतात किंवा तो साकार करून घेतो. गणपती साकारताना विलक्षण आनंद वाटतो. कारण हा देव आपल्याला जास्त जवळचा वाटतो.
हिंदू देवदेवतांमध्ये श्रीगणेश ही एकच अशी देवता आहे की, जिचे चित्र कुणीही, कधीही आणि कसेही काढले तरी ते सुंदरच दिसते. यामुळे गणपती हे सर्वांचं लाडकं दैवत असावं. शिवाय कुठल्याही माध्यमात (आकाशात, झाडाच्या खोडात, फळांत, फुलांत अगदी कुठेही) सोंडेसारखा आकार निसर्गात आढळला तरीसुद्धा त्या ठिकाणी गणेशाचंच अस्तित्व जाणवतं, हत्तीचं नाही, हे विशेष! महाराष्ट्र तसंच महाराष्ट्राबाहेर जे जे चित्रकार आणि शिल्पकार झाले, त्या प्रत्येकाने कधी ना कधी गणपती साकारला आहेच. म्हणूनच गजवदन ही जी संकल्पना आहे, ही गणपतीसाठीच आहे, हत्तीसाठी नाही. हत्ती हा पूर्णाकृती आला तरच त्याला हत्ती म्हणता येईल. परंतु फक्त सोंडेचा आकार असेल तर त्या ठिकाणी गणपती असल्याची भावनाच बघणार्याच्या मनात उत्पन्न होते.
पौराणिक कथेतील उल्लेखाला धक्का न लावता ज्या कुणी चित्रकाराने किंवा शिल्पकाराने गणपतीचं रूप पहिल्यांदा साकार केलं, त्या गोष्टीचं मला कौतुक वाटतं. कारण कोणत्याही गोष्टीचं वर्णन करायचं म्हटलं तर खूप काही करू शकतो. हे वर्णन सांगितलं जाऊ शकतं, गायलं जाऊ शकतं, परंतु त्याला दृश्य स्वरूप-मूर्त स्वरूप द्यायचं झालं तर त्यासाठी कुठलाही चित्रकार किंवा शिल्पकार लागतो. म्हणूनच ज्या कुणी गणपतीची मूर्ती किंवा चित्र पहिल्यांदा साकारलं तो खरोखरच एक उत्तम रचनाकार असावा असं मला वाटतं.
स्थूल शरीर, आखूड हातपाय, लंबोदर (मोठं पोट), अशा या नरदेहाच्या अवयवांवर गजमुख बसवल्यानंतरही एकंदर त्या देहाकाराचं संतुलन(बॅलन्स) साधून जी गणेशमूर्ती साकारतो, तो कलाकार निश्चित महान रचनाकार आहे, असं मी मानतो.
आपल्या हिंदू देवतांत नृसिंह आहे, वराहदेव आहे, तुंबरु आहे, शिवाय अनेक देवीदेवता आहेत ज्यांचे मुख पशूचे आहे, गणेशाच्या मूर्तीतही तेच आहे, परंतु गणपतीसारखे सौंदर्य अन्य कुणा देवतेला लाभलेले नाही. गणपतीमध्ये जे सौंदर्य लपलेले आहे, ते सौंदर्य निर्माण करणं हे सोपं काम नाही. म्हणूनच प्रथम गणरायाची मूर्ती ज्या अज्ञात चित्रकाराने किंवा शिल्पकाराने साकारली त्याला वंदन करावंसं वाटतं.
आपली अशी श्रद्धा असते की, मूर्ती तयार झाल्यानंतर भटजी, पुरोहित किंवा यजमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो. पण खरी प्राणप्रतिष्ठा पहिल्यांदा चित्रकार किंवा शिल्पकार करीत असतो. आपला जीव ओतून त्यात प्राण भरत असतो. कलाकाराने त्या देवतेच्या प्रत्येक अवयवांत जी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, ती चिरंतन असते. अगदी मूर्ती भंग पावल्यानंतरही त्या कलाकाराने जे काही आपलं कसब-प्राण त्या मूर्तीत-चित्रात ओतलेले असतात, ते कणाकणात कायम राहतं. हे फार महत्त्वाचं आहे.
चित्राच्या किंवा शिल्पाच्या माध्यमातून तयार झालेल्या मूर्त स्वरूपाला पाहून अनेकांना काव्य सुचलं, अनेकांनी स्तुतीपर भजने-कीर्तने रचली, अनेकांना त्याचं वर्णन करावंसं वाटलं. अनेकांना त्याला विविध विषयांत अंतर्भूत करावंसं वाटलं. हे त्या चित्रकाराचं/शिल्पकाराचं कौशल्य आहे.
गणपती हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचं दैवत आहे. त्याने प्रदान केलेल्या शक्तीनेच कलेच्या माध्यमातून तो साकारला जातोय. अंबुजा सिमेंट कॅलेंडरसाठी मी जेव्हा पहिल्यांदा गणपती करणार होतो तेव्हा अंबुजा सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) नरोत्तम सेखसारिया यांनी त्यांच्या कल्पनेतल्या गणपतीचे रूप माझ्यासमोर मांडलं. त्यांना सोने, चांदी रत्नजडित गणपतीची मूर्ती नको होती. तसंच चार भुजांऐवजी केवळ दोन भुजा असलेला गणेश हवा होता. या दोन बाहूंतील एक हात आशीर्वाद देणारा आणि दुसरा हात भक्तांनी अर्पण केलेला नैवेद्य स्वीकारणारा असावा. त्यामागे त्यांचा विचार असा होता की, दोन हात असलेला गणपती आपल्याला जास्त जवळचा वाटतो. कारण मानवी शरीरालाही दोन हात आहेत, तसे गणपतीला असतील तर तो आपल्यातलाच एक वाटेल आणि भाविक गणपतीशी अधिक जोडले जातील. तसं पाहिलं तर चार भुजांतील इतर दोन हातात पाश आणि अंकुश ही शस्त्रं असतात. ती दुसर्यांवर आघात करणारी, शिक्षा करणारी आहेत. भाविकांवर प्रेमाचा वर्षाव करणारा आपल्या घरातला एक असल्यासारखा वाटला पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. तो मलादेखील पटला आणि तेव्हापासून आजपर्यंत मी जेव्हा केव्हा गणपतीची मूर्ती कुठल्याही माध्यमात साकारतो, ती दोन भुजा असलेलीच असते. त्यानंतर चार हाताच्या गणपतीचे चित्र माझ्याकडून साकार झाले नाही. गेली नऊ-दहा वर्षे माझ्या मुलीच्या घरच्या गणेशोत्सवासाठी असलेली गणेशमूर्तीही मातीची आणि दोन भुजा असलेलीच घडवतो.
मला गणेशाची जी वेगवेगळी रूपं जाणवतात त्याच रूपात गणेशचित्र साकारत असतो. म्हणून मग गणपती कधी मित्र असल्यासारखा, कधी माझ्यासारखाच कलाकार असल्यासारखा, कलेचं दैवत म्हणून, तर कधी गणपतीला सतार वाजवताना, कधी लिहिताना साकारलं आहे. आतापर्यंत जेवढे चित्रकार झालेत त्यांनी सेल्फ पोट्रेट केलेलं आहे. तसं गणपतीनेही सेल्फ पोट्रेट करायला काय हरकत आहे, या विचारातून मी तसं गणेशचित्रही तयार केलं आहे.
कलाकृती साकार होण्यात निरीक्षण, चिंतन, प्रत्यक्ष कृती या तीन पायर्या प्रत्येक वेळी महत्त्वाच्या असतात. तुम्ही काहीतरी पाहत असता आणि तुम्हाला काही तरी सुचत असतं. हे सुचणं चिंतनातून येतं आणि त्याला लगेच धरातल म्हणजे कॅनव्हास देणं म्हणजे ते मूर्त स्वरूपात साकार करणं. आपल्याकडे अमूर्त चित्र म्हणजे Abstract Painting असं म्हटलं जातं आणि मूर्त म्हणजे Realistic Painting असं म्हटलं जातं.
गणपतीच्या विविध नावांत त्याच्या रूपाचेच दर्शन होत असतं. ज्ञानेश्वर माऊलींना तर अकार, ऊकार आणि मकार यात गणरायाचं दर्शन झालं. गणेशमूर्ती ही आपल्या मुळाक्षरातदेखील सामावलेली आहे. चराचरात गणेशाचं अस्तित्व जाणवतं. श्रीगणेशासंबंधी सरस्वती सूक्तात गणपतीला विघ्नकर्ता असं म्हटलेलं आहे. म्हणजे विघ्न आणणारा, मग तो सुखकर्ता, दुःखहर्ता आणि विघ्नहर्ता कसा काय झाला? असा प्रश्न पडतो. विद्वान याबद्दल अधिक स्पष्टपणे सांगू शकतील. परंतु एक लक्षात घेता येईल की, विघ्नकर्ता हा विघ्नहर्ता होणं ही एक विकासाची स्थिती आहे. विकास म्हणजे काय तर, तुम्ही सुधारू शकता. तुम्ही तुमच्यातील जो दुर्गुण आहे, तो दूर करू शकता, या विश्वासाचे गणपती हे प्रतीक आहे. बालगणेशाचे रूप आणि त्याचा स्वभाव पाहिला तर तो एक मस्तीखोर, हट्टी मुलगा आहे. अशा या मुलालाच प्रथम पूजनाचा मान दिला गेला आणि त्याच्यातील परिवर्तन नंतरच्या कथेतून आपणास दिसतं. गणेशकथेत सामाजिक भावनेचं प्रतिबिंब दिसतं, याच भावनेने मी गणपतीकडे पाहतो. यातून एक शिकवण मिळते की, कुणीही वाईट नसतं. त्याच्याकडून चांगलं घडू शकतं, तो सर्वोच्च होऊ शकतो, तो अग्र होऊ शकतो, हा विश्वास उत्पन्न करायचा असेल तर गणपतीकडे बघा. गणपती आज अग्रपूजेपर्यंत पोहोचलेला आहे, तर तुला का नाही जमणार, अशा प्रकारचा आत्मविश्वास जर एखाद्यात किंवा स्वतःत जागृत करायचा असेल तर गणपती हे अतिशय उत्तम उदाहरण आहे.
गणपतीस अग्रपूजेचा मान का द्यावासा वाटला, असा मी एक सामान्य माणूस, एक चित्रकार म्हणून विचार करतो तेव्हा हे गणपतीचे गुण मला जास्त भावतात. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी गणेश वंदन करावं अशी धारणा आहे. गणपती हे असं एकच दैवत आहे की, त्याचं नाव घेतल्यावर तो तुमच्या डोळ्यापुढे सहजपणे उभा राहतो. केवळ ॐ जरी काढला तरी त्या ठिकाणी तुम्हाला गणेशाचं दर्शन होतं. तुम्हाला जसा जमेल तसा कागदावर तुम्ही गणपती रेखाटलात तरी तो तुम्हाला समाधान देईल. इतक्या लवकर तुम्हाला कृष्ण, राम, विष्णू किंवा इतर देवतांची चित्रे काढता नाही येणार, हे माझं गणपतीबाबतचं सोपं विश्लेषण आहे. याचं विद्वान अधिक विद्वतेनुसार विश्लेषण करू शकतील. हे एकच दैवत आपल्याला सुलभ वाटतं. दिसायला, चिंतनाला, मांडायला, घडवायला आणि हात जोडून नमस्कार करायलादेखील.
आपल्याकडे मुख्य जे पाच संप्रदाय होते, गाणपत्य, सौर, शैव, वैष्णव, शाक्त. बुद्धकाळात दोन संप्रदाय जवळजवळ नामशेष झाले. शंकराचार्यांनी पंचायतनात सूर्यदेव आणि गणपतीची पूजा आणली. गणेश चतुर्थीची वाचनात आलेली पूजा अशी की, घरातल्या यजमानाने विहिरीजवळील किंवा नदीकिनार्यावरील मातीने स्वतः तयार केलेल्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा, नैवेद्य अर्पण करावे आणि विसर्जन करावे. ज्याला ते शक्य नसेल त्याने कागदावर गणपती काढायचा. अन्य कोणत्या देवतेची मूर्ती तयार करणं किंवा चित्र रेखाटणं ही पद्धती नाही, केवळ गणपतीच्या बाबतीत आहे. ही जी सुलभता आहे ना ती फार महत्त्वाची आहे. गणपती एकदा तुमच्या द्वारावर किंवा देवघरात असेल तर तुम्हाला कोणतंही संकट येणार नाही.
माझ्याकडून नेहमी वेगवेगळी गणेशरूपं साकार होतात किंवा तो साकार करून घेतो. गणपती साकारताना विलक्षण आनंद वाटतो. कोणीतरी या गणेशचित्राला चांगली किंमत द्यावी, त्या उद्देशाने मी कधीही चित्र करीत नाही. मला आतून वाटलं की मी गणेशाचं चित्र करतो. श्रीगणेश ही आनंद देणारी देवता आहे.
लेखक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
शब्दांकन - पूनम पवार