फळपीकांतून साधली आर्थिक उन्नती

विवेक मराठी    28-Aug-2025
Total Views |
@संदीप भुजबळ
9987949539
पुणे जिल्ह्यातील कचरवाडी (ता. इंदापूर) येथील बरळ कुटुंबियांनी पारंपरिक शेतीला फाटा देत डाळिंब, जांभूळ, सीताफळ, पेरू व पॅशन फ्रुट आदी फळपीकांचे यशस्वी उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधली आहे. गेल्या तीन दशकांत त्यांनी आपल्या वडिलोपार्जित 18 गुंठे शेतीपासून सुरू केलेला प्रवास आज 18 एकर शेतीपर्यंत पोहोचला आहे.
 
 
krushivivek
 
इंदापूर हा तसा पुणे जिल्ह्यातला पूर्वेकडील अवर्षणग्रस्त दुष्काळी तालुका. पण नीरा-भीमा नद्यांच्या खोर्‍यात सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने गेल्या पाच दशकात या तालुक्याचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. हरितक्रांती व श्वेतक्रांती पाहिल्यानंतर या तालुक्याने गेल्या तीन दशकात फलोत्पादन क्रांती घडवून आणली आहे. आज या तालुक्याने डाळिंब, पेरु आणि केळी उत्पादनात देशात नाव कमावलेले आहे. त्याचबरोबर अन्य फळांच्या लागवडीतही इथल्या शेतकर्‍यांनी आघाडी घेतली आहे. याच शेतकर्‍यांमध्ये तालुक्यासह जिल्ह्यात आघाडीवर नाव घेतले जाते ते कचरवाडीतल्या माणिक ऊर्फ पांडूरंग व महादेव बरळ या बंधूंचे.
 
पांडुरंग आणि महादेव बरळ बंधूंची कचरवाडी गावात वडिलोपार्जित अवघी 18 गुंठे शेती होती. घरच्या गरिबीमुळे पांडुरंग बरळ यांनी तिसरीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर वयाच्या 10व्या वर्षापासून म्हणजे 1980पासून शेतात मजुरी करायला सुरुवात केली. सुरुवातीला पानमळ्यात मजुरी केली. त्यानंतर 1987पासून त्यांनी शिवणकाम करायला सुरुवात केली. 20 वषेर्र् कपडे शिवण्याचे काम केले. पण व्यवसायात मन रमत नव्हते. त्याच काळात त्यांचा प्रगत शेतकर्‍यांशी संपर्क आला आणि त्यांनी फळशेती पीकवण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी डाळिंबाची लागवड 1994 साली पाऊण एकर क्षेत्रावर केली. ’गणेश वाणा’च्या डाळिंब पीकाने त्यांना साथ दिली. अर्धा एकर शेतीच्या खरेदीपासूनचा प्रवास सुरू झाला. 2009साली सर्वांधिक 5 एकर शेतीची खरेदी करता आली. 2021-22 च्या दरम्यान त्यांची 18 एकर शेतीची खरेदी पूर्ण झाली. या शेतीसाठी त्यांनी 2 विहिरी आणि 2 शेततळी खोदली. निरा डाव्या कॅनॉलमधून 8 किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. त्याच पाण्यातून ते शेततळे भरतात. आज त्यांच्याकडे पाऊण एकर क्षेत्राची दोन शेततळी आहेत. यामध्ये किमान 2 कोटी लीटर पाणी साठवले जाते. याच पाण्याच्या जोरावर त्यांची 18 एकर शेती बहरली आहे. सुरुवातीला डाळिंबाची लागवड दोन दशके केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा इतर फळपीकांकडे वळवला. 2011 साली पावणे तीन एकरांवर ’कोकण बहाडोली जांभळा’ची लागवड केली. लागवडीनंतर चार वर्षांत त्यांना उत्पादन येऊ लागले. आज त्यांना दरवर्षी किमान 4 ते 6 टन जांभळीचे उत्पादन मिळते. याच जांभळाची विक्री त्यांनी गेल्या 3 वर्षांपासून अ‍ॅमेझॉनवर सुरू केली आहे. डाळिंब आणि जांभूळ फळपीकाच्या यशानंतर 2013 पासून त्यांनी पेरूच्या लागवडीकडे मोर्चा वळवला. त्यांच्याकडे पेरूच्या ’व्हिएनआर’ आणि ’तायवान पिंक’ या दोन जातीची आठ एकरांवर लागवड आहे. आज पेरू पीकातून एकरी लाख रूपयांचा नफा मिळवतात.
 

krushivivek 
 
डाळिंब, जांभूळ आणि पेरूनंतर त्यांनी सीताफळाची यशस्वी शेती केली. यातून त्यांना एकरी लाख रुपयांचा नफा मिळतोय. पण गेल्या काही वर्षांत फळमाशीचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांनी आपला मोर्चा ’पॅशन फ्रुट’ या विदेशी फळपीकाची एक एकरात लागवड केली. यासाठी त्यांनी राजस्थान, मध्यप्रदेश सीमेवरील किसान गड येथून बिया आणून नैसर्गिक रोपे तयार केली. तयार झालेल्या शंभर रोपांची त्यांनी आपल्या पाऊण एकर क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने त्याची लागवड केली. याखेरीज त्यांनी ’गॅग फ्रुट’ फळपीकाचा प्रयोग हाती घेतला आहे.
 
बरळ कुटुंबीय कोणत्याही पीकांची टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्त्वावर लागवड करतात. पीकाच्या लागवडीचे तंत्र सापडल्यानंतर त्याच्या लागवडीच्या क्षेत्रात ते वाढ करतात. आज पांडुरंग आणि महादेव बरळ या दोघा भावांनी आणि त्यांच्या पत्नी शुभांगी बरळ आणि नीता बरळ या दोन जावांनी एकत्रितपणे शेतीचे क्षेत्र वाढविले आहे. बरळ हे ’फॅमिली फार्मिंग’ करत असून त्यांच्या दोघांच्या मुलांनी म्हणजे अमर आणि अविनाश बरळ या दोघांनी कृषी पदवीचे शिक्षण घेतले आहे.
 
संपर्क
शेतकरी पांडुरंग बरळ, कचरवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे
 9922073432
 
आज दोघा भावांकडे मिळून 18 एकरपेक्षा जास्त स्वमालकिचे क्षेत्र आहे. या 3 दशकात त्यांना डाळिंब, सिताफळ, पेरू या पिकांनी आर्थिक भरभराट येण्यात मोलाची साथ दिली. पण त्यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरली ती, 2012 ते 14 दरम्यान पावणे तीन एकरमध्ये लागवड केलेली जांभळाळाची बाग. ’कोकण बहाडोली’ वाणाची रोपे पालघरहून आणून त्यांनी लागवड केली होती. आज याच जांभळाच्या शेतीने त्यांना मोठी ओळख दिली आहे. या जांभळाची त्यांनी अ‍ॅमेझॉनसारख्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विक्री करत लाखो रुपयांची कमाई केली आहे. कमीत कमी खर्चात येणार्‍या जांभळाच्या पिकाने त्यांना खर्‍या अर्थाने समृद्धी दिली आहे.
 
आज बरळ यांची पुढची पिढी आधुनिक फळशेती करत आहे. हे दोन्ही भाऊ आज जांभूळ पिकाची नर्सरी चालवत आहेत. आज बरळ कुटुंबिय 18 एकर शेतीच्या माध्यमातून दरवर्षी किमान 18 ते 20 लाख रुपयांच्या फळांची विक्री करत आहेत. यातून 12 ते 14 लाख रुपयांचा नफा मिळतोय. यासाठी घरातले किमान 8 ते 9 सदस्य राबत असतात.
 
 
आज बरळ कुटुंबीय वर्षाकाठी वेगवेगळ्या फळांचे किमान 50 टनापर्यंत उत्पादन घेत आहेत. एकेकाळी बरळ कुटुंबीयांना शेतमजुरी करावी लागली. पण परिस्थितीने त्यांना शिकवले. आता जिद्दीला कष्टाची जोड देत त्यांनी नेत्रदीपक प्रगती साधली आहे. या फळपीकांतून बरळ कुटुंबीयांनी शाश्वत शेतीचा मार्ग दाखवला आहे. या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी अनेक शेतकरी व तज्ज्ञ अभ्यासक त्यांच्या शेताला भेट देतात.
 
येत्या काळात बरळ यांची पुढची पिढी अमर आणि अविनाश हे फळांचा प्रक्रिया व्यवसाय उभा करण्याच्या विचारात आहेत.
 
 
लेखक मुंबई येथील ज्येष्ठ कृषी पत्रकार आहेत.