‘लढाऊ’ अध्यायाची यशस्वी सांगता!

विवेक मराठी    28-Aug-2025   
Total Views |
mg21
मिग-21 विमाने भारतीय हवाई दलात 1963 मध्ये सामील झाली आणि त्यानंतर जवळपास प्रत्येक युद्धात वा संघर्षात त्या विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता ही विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दिसणार नाहीत. येत्या महिन्याभरात ती निवृत्ती घेतील. गेल्या सहा दशकांपासून मिग-21 विमाने भारतीय हवाई दलाची शान होती. येत्या महिन्याभरात मिग-21 लढाऊ विमाने भारतीय हवाई दलातून अपरिहार्य निवृत्ती स्वीकारतील आणि एका गौरवशाली लढाऊ अध्यायाची यशस्वी सांगता होईल. भारतीय हवाई दलात मानाचे स्थान पटकावलेल्या मिग-21 विमानांच्या निवृत्तीची म्हणूनच दखल घेणारा लेख..
काहीच दिवसांपूर्वी म्हणजे 18 व 19 ऑगस्ट रोजी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग व फ्लाईंग ऑफिसर प्रिया शर्मा यांनी राजस्थानच्या बिकानेरस्थित नाल हवाई तळावरून मिग-21 लढाऊ विमानांतून उड्डाण केले तेव्हा तो एक भावुक क्षण होता. याचे कारण यापुढे मिग-21 विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दिसणार नाहीत. येत्या महिन्याभरात ती निवृत्ती घेतील. गेल्या सहा दशकांपासून मिग-21 विमाने भारतीय हवाई दलाची शान होती. इतका प्रदीर्घ काळ एखाद्या जातीच्या लढाऊ विमानाने हवाई दलाच्या ताफ्यात राहणे हे अपवादात्मकच मानले पाहिजे. तो विक्रम मिग-21 च्या नावावर जमा आहे. मात्र आता त्या विमानांना निरोप देण्याची वेळ आली आहे. एका गौरवशाली अध्यायाची यशस्वी सांगता चंदीगड येथील आयोजित सोहळ्यात होईल. ज्या वैमानिकांनी मिग-21 मधून उड्डाण करीत शत्रूला आव्हान दिले, शह दिला; त्या सर्व वैमानिकांसाठी या लढाऊ विमानांची निवृत्ती चटका लावून जाणारी असेल यात शंका नाही. भारतीय हवाई दलात मानाचे स्थान पटकावलेल्या मिग-21 विमानांच्या निवृत्तीची म्हणूनच दखल घ्यायला हवी.
 
 
कर्मचार्‍याला सेवानिवृत्ती घ्यावी लागते. तशी घेणार्‍याच्या तोडीस तोड पर्याय सापडला नाही तर त्या कर्मचार्‍यास मुदतवाढ द्यावी लागते. मिग-21 लढाऊ विमानांना देखील ते धोरण तंतोतंत लागू पडते. गेली साठहून अधिक वर्षे मिग-21 व त्याच्या सुधारित आवृत्तींच्या लढाऊ विमानांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली आहे. परंतु गेल्या काही काळात ही विमाने कोसळून वैमानिक किंवा नागरिकांच्या झालेल्या मृत्यूंमुळे ती विमाने बदनाम झाली होती. ’फ्लायिंग कॉफिन’ म्हणजे उडत्या शवपेटिका असा त्या विमानांचा लौकिक झाला होता. तथापि तरीही या विमानांच्या स्क्वाड्रनला निरोप देण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात येत होता. सक्षम पर्याय उपलब्ध नसणे हे त्याचे प्रमुख कारण. स्वदेशी बनावटीच्या तेजस हलक्या लढाऊ विमानांचा (लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) समावेश भारतीय हवाई दलात झाला आहे आणि आगामी काळात त्यांची संख्या वाढणार आहे. मात्र हेही खरे की मुळात ’तेजस’ या लढाऊ विमानांच्या उत्पादनास अतोनात विलंब झाला आहे. हवाई दल प्रमुखांनी त्यावर आपली नाराजीही व्यक्त केली आहे. पण ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने (एचएएल) उत्पादनास गती देण्याची ग्वाही दिली असल्याने असावे मात्र मिग-21 लढाऊ विमानांना अखेर निरोप देण्याचे निश्चित झाले आहे.
 
 
1962 च्या चीन युद्धात भारताने हवाई दलाचा फारसा उपयोग केला नव्हता. तसा तो केला असता तर कदाचित चित्र निराळे दिसले असते असे जाणकार सांगतात. त्यातच 1960 च्या दशकात पाकिस्तानला अमेरिकेने स्टारफायटर ही लढाऊ विमाने पुरवली आणि त्यामुळे भारतीय हवाई दलात देखील सक्षम सुपरसॉनिक (ध्वनीपेक्षा जास्त वेगाची) लढाऊ विमाने असण्याची निकड निर्माण झाली. भारतीय हवाई दलाचे तत्कालीन उपप्रमुख हे त्यासाठी ब्रिटनच्या दौर्‍यावर गेले होते. ब्रिटिश बनावटीच्या ‘लायटनिंग’ लढाऊ विमानांचा पर्याय उपलब्धही होता. तथापि भारताकडे त्यावेळी परकीय चलनाची असणारी चणचण पाहता इतका मोठा खर्च करण्यास मर्यादा होत्या. तेव्हा भारताने आपली व्यूहनीती बदलली आणि भारतातच उत्पादन करण्यास अनुमती मिळेल अशा विमानांच्या खरेदीस प्राधान्य दिले. त्या निकषांवर मिग जातीची विमाने बसत होती. तत्कालीन सोव्हियत रशियाने देखील भारताला अनुकूल अटीशर्तींवर मिग जातीच्या विमानांचे भारतात उत्पादन करण्यास परवानगी दिली. तेथून भारताचा मिग-21 बरोबर प्रवास सुरू झाला तो आजवर चालूच होता. भारताने नाशिकमध्ये मिग जातीच्या विमानांच्या सांगाड्याचे (फ्रेम) आणि कोरापूट येथे इंजिनच्या उत्पादनाचे नियोजन केले. परिणामतः आयातीवर असणारे अवलंबित्व कमी झाले आणि विमानांचा उत्पादन खर्च आटोक्यात ठेवता आला. ही विमाने भारतीय हवाई दलात 1963 मध्ये सामील झाली आणि त्यानंतर जवळपास प्रत्येक युद्धात वा संघर्षात त्या विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 
 
mg21
 
मिग जातीच्या लढाऊ विमानांची रचना सोव्हियत रशियाने 1960 च्या दशकात केली. पहिल्या प्रारूप विमानाचे (प्रोटोटाइप) उत्पादन 1954 मध्ये झाले तर प्रत्यक्ष उत्पादन गॉर्की, मॉस्को व टिबिलिसी येथे 1959 मध्ये सुरू झाले. मिग-21 जातीच्या विमानांनी आपली क्षमता जगभरातील अनेक संघर्षभूमीवर सिद्ध केली. व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकी सामरिक शक्तीसमोर; शिवाय आखाती युद्धात इजिप्त, सीरिया, इराक या देशांनी इस्रायलच्या लढाऊ विमानांना आव्हान मिग-21 विमानांच्या भरवशावरच दिले होते. त्यामुळे या विमानांचा गवगवा जगभर झाला. भारतीय हवाई दलाच्या अनेक वैमानिकांनी या विमानातून शत्रूराष्ट्राच्या कारवायांना शह दिला.
 
 
ताशी दोन हजार किलोमीटरहून अधिक वेग असणारे, उंचावरून उडू शकणारे अशी रचना असणार्‍या मिग-21 ने शत्रूची सर्व प्रकारची विमाने पाडली. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात जरी या विमानांचा वापर मर्यादित होता तरी 1971 च्या युद्धात मात्र पाकिस्तानी हवाई दलातील सेबर, मिराज इत्यादी जातीच्या विमानांना भारताच्या मिग-21 विमानांनी निष्प्रभ केले. किंबहुना खर्‍या अर्थाने मिग-21 ची लढाऊ क्षमता सिद्ध झाली ती 1971च्या युद्धात. पाकिस्तानच्या एफ-86 किंवा एफ-104 स्टारफायटर अथवा शेनयांग- एफ 6 या लढाऊ विमानांच्या कारवायांना शह मिग -21 ने दिला आणि आपले हवाई प्रभुत्व सिद्ध केले. यातील विलक्षण बाब म्हणजे शेनयांग एफ-16 म्हणजे रशियाच्या मिग-21 जातीच्या विमानाची चिनी बनावटीची प्रतिकृती होत. बांगलादेश युद्धात पूर्व पाकिस्तानातील तेजगाव येथील धावपट्टीवर मिग-21 मधून बॉम्बफेक करण्यात आली. त्या मोहिमेचे नेतृत्व विंग कमांडर बिष्णोई यांनी केले होते. त्या मोहिमेचा फायदा असा झाला की पाकिस्तानची लढाऊ विमाने उड्डाण करू शकली नाहीत, कारण मिग-21 मधून करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्याने धावपट्टी उध्वस्त झाली होती. पुढील 48 तासांत भारताने पूर्व पाकिस्तानात हवाई प्रभुत्व सिद्ध केले. 1999 मधील कारगिल युद्धात देखील मिग-21 विमानांचा वापर करण्यात आला आणि अगदी अलीकडे 2019 मध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईक साठीही मिग-21 बायसन जातीच्या विमानांचा वापर करण्यात आला. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान चालवत असलेले मिग-21 विमान पाकिस्तानने पाडले; वर्धमान त्यातून बचावले पण पाकिस्तानी भूमीत त्यांचा शिरकाव झाल्याने पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतले. कालांतराने त्यांची सुटका करण्यात आली. या सगळ्याचा मथितार्थ हा की, मिग-21 विमानांचे योगदान प्रदीर्घ काळ भारतीय हवाई दलात राहिले आहे. कारगिल संघर्षविराम झाल्यानंतर महिन्याभरातच पाकिस्तानी नौदलाच्या शांतताकाळातील टेहळणी करणार्‍या अटलांटिक विमानाने कच्छच्या रणात भारतीय हद्दीत घुसखोरी केली. तेव्हा भारतीय हवाई दलाने त्वरित कृती करीत मिग-21 ताफ्याला रवाना केले आणि पाकिस्तानचे विमान पाडले.
 
 
सोव्हियत रशियाचे विघटन झाले आणि मिग-21 विमानांचे उत्पादन थांबले. सुट्या भागांचीही चणचण निर्माण झाली. 1996 यामध्ये सरकारने मिग-21 जातीच्या सव्वाशे लढाऊ विमानांच्या आधुनिकीकरणास (अपग्रेड) मान्यता दिली. तरीही विमान म्हणजे शेवटी यंत्रच. तेव्हा त्याची देखभाल कितीही केली तरी ते कधीतरी निवृतीच्या उंबरठ्यावर पोचतेच. त्यातच या विमानांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. गेल्या साठेक वर्षांत भारतात मिग-21 जातीच्या उत्पादन झालेल्या विमानांची संख्या सुमारे नऊशे इतकी आहे. पैकी 482 विमाने कोसळली आणि त्यांत 170 वैमानिकांना प्राणास मुकावे लागले अशी माहिती तत्कालीन संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी 2012 मध्ये संसदेत दिली होती. अगदी अलीकडे म्हणजे 2023 मध्ये प्रशिक्षणादरम्यान मिग-21 जातीचे एक विमान सुरतगड येथे नागरी वसाहतीवर कोसळले. त्यात वैमानिक जरी बचावले तरी तीन नागरिकांचा मृत्यू झाला. 2006 मध्ये आलेल्या ‘रंग दे बसंती’ चित्रपटाने मिग-21 जातीच्या विमानांचा विषयच हाताळला होता. सुरुवातीस त्यावरून काहूर उठले तरी तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी आणि एअर मार्शल अहलुवालिया यांना त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नव्हते. परिणामतः चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग खुला झाला. मुद्दा हा की मिग-21 विमानांचे सामर्थ्य जरी वादातीत असले तरी त्यांच्या अपघातांनी ते बदनाम होत होते. 1990 च्या दशकताच ती विमाने निवृत्त होणे अपेक्षित असले तरी प्रथम 2019 हे वर्ष मुक्रर करण्यात आले होते; मग 2023 आणि आता प्रत्यक्षात 2025 मध्ये मिग-21 विमाने निवृत्त होतील.
 
 
हा विलंब झाला तो प्रामुख्याने तेजस लढाऊ विमानाच्या उत्पादनात होणार्‍या विलंबामुळे. स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानांची संकल्पना 1980 च्या दशकातच मांडण्यात आली होती. सुखोई व राफेल विमानांमुळे हवाई दलाचे सामर्थ्य वाढलेले असले तरी हवाई दल पूर्ण ताकदीने उभे राहायचे तर सर्व स्क्वाड्रन (विमानांच्या तुकड्या) कार्यरत हव्यात. तेजस विमानाने पहिले उड्डाण 2001 मध्ये केले तरी हवाई दलात ती विमाने 2016 मध्ये सामील झाली. त्यासाठी ‘45 स्क्वाड्रन’ तुकडी तयार करण्यात आली. तेजस हे मिग-21 च्या तुलनेत सरस आहे. त्याचे वजन कमी; त्यामुळे लवचीकता जास्त आहे. शिवाय ‘जीई’च्या इंजिनमुळे त्याची विश्वसनीयता वधारलेली आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत तेजस विमानांचे उत्पादन होत आहे आणि विमानांची क्षमता पाहता अनेक देशांना त्यांची भुरळ पडू शकते. त्यातून आयातीस संधी व चालना मिळू शकते. तेजस विमानांच्या उत्पादनातील विलंब अनेक कारणांनी होता. त्यासाठीच्या इंजिनच्या अनुपलब्धतेमुळे असो वा त्या विमानांत एकीकृत क्षेपणास्त्र यंत्रणा अंतर्भूत करण्यातील अडचणींमुळे. आजमितीस हवाई दलाला 36 तेजस विमानेच मिळाली आहेत आणि आणखी चार विमाने पुढील वर्षीच्या प्रारंभी हस्तांतरित करण्याची हमी ‘एचएएल’ने दिली आहे. 83 तेजस विमानांच्या खरेदीसाठी 48 हजार कोटींचे करारपत्र सरकारने 2021 मध्ये ‘एचएएल’ला दिले. पुढील आठ वर्षांत या विमानांचे हस्तांतरण होईल. परंतु आजवरचा विलंब पाहता हे वेळेवर होईलच याची खात्री देता येणे कठीण.
 
 
2019 मध्ये भारतीय हवाई दलाने मिग-27 लढाऊ विमानांना निरोप दिला. मिग-29 विमानांना देखील येत्या काही वर्षांत निरोप देण्यात येईल. या पार्श्वभूमीवर प्रश्न येतो तो मिग-21 च्या निवृत्तीनंतर काय हा. याचे कारण भारतीय हवाई दलातील स्क्वाड्रनची संख्या 2029 पर्यंत खाली येईल. पूर्ण क्षमता 42 स्क्वाड्रनची आहे. ही तफावत मोठी आहे. तेव्हा मिग-21 च्या निवृत्तीनंतर निर्माण होणारी पोकळी भरून काढणे हे मोठे आव्हान सरकारसमोर असणार आहे. हवाई दलाला अर्ध-सक्षम ठेवणे देशाला परवडणारे नाही. पाकिस्तान हवाई दलात 25 तर चीन हवाई दलात 66 स्क्वाड्रन आहेत हे लक्षात घेतले म्हणजे भारतीय हवाई दलातील उणीव प्रकर्षाने लक्षात येऊ शकते. तेव्हा तेजस विमानांच्या उत्पादनाला वेग देणे निकडीचे. तूर्तास येत्या महिन्याभरात मिग-21 लढाऊ विमाने भारतीय हवाई दलातून अपरिहार्य निवृत्ती स्वीकारतील आणि एका गौरवशाली लढाऊ अध्यायाची यशस्वी सांगता होईल.

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार