आपलं सारं आयुष्य प्रमिलताईंंनी समिधारूपानं समितीसाठी, पर्यायानं राष्ट्रासाठी अर्पण केलं, झिजवलं. तरुण सेविकांना प्रेरणा देत राहिल्या आणि माझ्यासारख्या असंख्य सेविकांच्या मुलांना ध्येयदिशा देत राहिल्या.त्यामुळेच प्रमिलताईंच्या जीवनाविषयी लिहिताना म्हणावंसं वाटतं, ‘यज्ञातील जी समिधा झाली!‘
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समिती या दोन संस्कारतीर्थांशी आम्हा दोघा भावांची ओळख अतिशय लहान वयात, म्हणजे बहुधा आम्ही शाळकरी वयात असतानाच झाली. आमचे वडील बापू जोगळेकर सरकारी नोकरीत होते. संघाशी आणि समितीशी आमचा परिचय झाला तो मातुल घराण्याकडून, म्हणजे संघाशी आमचे मोठे मामा, संघप्रचारक बाळासाहेब साठ्ये यांचेकडून आणि समितीशी आई सुमन साठ्ये-जोगळेकर हिच्यामुळे. न कळत्या वयात आम्ही बोट धरून आईबरोबर समितीच्या शाखेतही गेलो आणि शाळेत जाऊ लागल्यावर स्वतंत्रपणे संघशाखेत जाऊ लागलो आणि संघमय झालो.
मामा संघप्रचारक, त्यामुळे तो घरी नसे. आणि तो काळ असा होता की, सरकारी नोकरांना उघडपणे संघकार्यात भाग घेता येत नव्हता, पण बापूंचा आग्रह आम्ही संघशाखेत गेलोच पाहिजे असा होता आणि आई तर समितीची कार्यकर्ती असल्याने शाखेत गेलो नाही तर रात्रीचं जेवण नाही असा तिचा कटाक्ष होता. अशा शिस्तीत आम्ही दोघे भाऊ संघशाखेत जाऊ लागलो. तेव्हा जडलेली ती संघ-प्रीती आजही आमच्या पंचाहत्तरीत आमच्या मनावर आणि जीवनावर स्वार होऊन बसली आहे, तिचे संपूर्ण श्रेय त्या तिघांना निर्विवादपणे द्यावेच लागेल.
आमच्या घरी वारंवार येणार्यांमध्ये क्वचित पूजनीय गुरुजी होते, मावशी केळकर होत्या, ताई आपटे होत्या, दत्तोपंत ठेंगडी होते, जगन्नाथराव जोशी होते, मोरोपंत पिंगळे होते, दामुअण्णा दाते होते आणि नानाराव ढोबळेही होते.
वंदनीय मावशी केळकर, वंदनीय ताई आपटे, वंदनीय उषाताई चाटी या तिघी संचालिका तर आईमुळे परिचित होत्याच, परंतु त्या तिघींपेक्षा अधिक जवळीक आणि परिचय झाला तो चौथ्या प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांच्याशी. पहिल्या तिघींशी परिचय झाला तो त्या संचालिका असताना आणि प्रमिलताईंशी झाला तो त्या प्रमुख कार्यवाहिका झाल्यापासून. आईचा जन्म 1929 चा आणि प्रमिलताईंचाही 1929 चाच. आई मार्चमधली तर प्रमिलताई जूनमधल्या. गंमतीगंमतीत त्या म्हणायच्या, सुमनताई मोठ्या आहेत माझ्यापेक्षा. पण दोघींचं खरं नातं बहिणी-बहिणीसारखं होतं, त्यामुळेच नागपूरला जाणं झालं तर उदयला, मला आणि लग्न झाल्यानंतर अलकालाही आईचं सांगणं असे, अहिल्या मंदिरात जाऊन प्रमिलताईंना भेटून या असं..
प्रमिलताईंचा जन्म नंदुरबारचा, फार लहानपणीच त्यांचा समितीशी संबंध आला. भावंडात त्या वयानं मोठ्या होत्या, त्यामुळे घरच्या जबाबदार्या त्यांच्यावरच आल्या आणि मनात नसतानाही त्यांना नोकरी करावी लागली. त्यांचीही नोकरी सरकारीच होती, वरिष्ठ पदावर त्या होत्या. परंतु घरच्या जबाबदार्यातून मोकळ्या होताच त्यांनी मुदतपूर्व स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचण्याचा निर्णय घेतला. अर्थात समाजसेवेसाठी म्हणजे समितीच्या कार्यासाठी हे त्यांच्या मनात निश्चित होतं. वयाची पस्तीशी नुकती ओलांडली असतानाच त्या घर सोडून नागपूरला समितीच्या मुख्यालयात, अहिल्या मंदिरात, राहण्यास आल्या..
समितीच्या केंद्र कार्यालय प्रमुख, अखिल भारतीय कार्यवाहिका, विश्व विभागाच्या प्रमुख, सह-प्रमुख संचालिका आणि प्रमुख संचालिका अशा विविध पदांवर त्यांनी 1965 ते 2012 कार्य केलं. पद कुठलंही असो, समितीचं काम हेच एकमेव जीवनध्येय मानून त्या झपाटल्यागत कार्य करत राहिल्या, तरुण सेविकांना प्रेरणा देत राहिल्या आणि माझ्यासारख्या असंख्य सेविकांच्या मुलांना ध्येयदिशा देत राहिल्या. मी तरुण भारतचा संपादक असतानाही त्यांना भेटलो, लोकसत्तात निवासी संपादक असतानाही भेटलो आणि सक्रीय पत्रकारितेतून निवृत्त झाल्यानंतर विवेकानंद केंद्राच्या प्रकाशन विभागाची जबाबदारी सांभाळत असतानाही अहिल्या मंदिरात जाऊन भेटत राहिलो. पद कुठलंही असो, राष्ट्रासाठी काम करायचंय, देशासाठी आयुष्य द्यायचंय असं त्यांचं सांगणं असे, एका परीनं जाणीव करून देणं असे..
माझी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली ती आणीबाणीनंतर. तेव्हा मी बँकेची नोकरी सोडून तरुण भारतात जाण्याच्या विचारात होतो. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ज्या दोघांचा आशीर्वाद मला घ्यायला मिळाला, त्यातले पहिले होते विद्यार्थी परिषदेचे सर्वेसर्वा यशवंतराव केळकर आणि दुसर्या समितीच्या तेव्हाच्या कार्यवाहिका प्रमिलताई मेढे. दोघांनीही निर्णयाला पाठिंबा तर दर्शवलाच, परंतु नवीन काही करताना सारं काही मनासारखं होत नसतं, ते मनासारखं व्हावं, घडावं यासाठी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून वावरावं लागतं याचं भान ठेव असा वडिलकीचा सल्लाही दिला. तो तेव्हा कदाचित पाळता आला नसेल, पण आज मात्र तो आठवतो..
1978 साली प्रमिलताईंनी कार्यवाहिका पद स्वीकारलं आणि देशाच्या कानाकोपर्यात समितीच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी प्रवास सुरू केला. त्यांचा प्रवास बव्हंशी रेल्वेनेच होई, आरक्षण झालेले असे सहसा घडत नसे. डब्यात मिळेल त्या जागी, कधी खाली वर्तमानपत्र पसरून तर कधी अनारक्षित डब्यातील वरच्या फळीवर बसून प्रवास करणे त्यांच्या वाट्यास येई. तब्बल 32-34 वर्षे त्यांचा प्रवास होत राहिला. पुढे पुढे समितीच्या कार्यास आर्थिक स्थैर्य आल्यानंतर त्या वरच्या वर्गानं, आरक्षित डब्यातून किंवा प्रसंगी विमानानंही प्रवास करत राहिल्या. विश्वाचा प्रवास इंग्लंड, अमेरिका, केनिया, श्रीलंका असा आणखीही काही देशांमध्ये होत राहिला. न्यू जर्सीच्या महापौरांनी तर प्रमिलताईंना मानद नागरिकत्वही देऊ केलं. संघपरिवारातील अनेक उच्चपदस्थांनी कार्यविस्तारासाठी परदेश प्रवास केला, परंतु एखाद्या देशाचं किंवा नगरीचं मानद नागरिकत्व मिळालेल्या बहुधा प्रमिलताई एकमेव असाव्या..
प्रमिलताई उत्तम इंग्रजी, हिंदी, मराठी बोलत पण त्याचबरोबर त्यांचा संस्कृतचाही अभ्यास दांडगा असावा, कारण त्यांच्या बोलण्यातून संस्कृत ग्रंथातील संदर्भही येत आणि वचनेही. प्रमिलताईंनी समितीच्या कामासाठी आयुष्य वेचायचे ठरवल्यानंतर स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी वाचनाची जी सवय लावून घेतली ती पुढच्या पिढ्यांतील सेविकांनी आणि स्वयंसेवकांनीही अभ्यासण्यासारखी आहे. त्या प्रचंड वाचन करत, वाचलेल्या ग्रंथातील व पुस्तकातील उपयुक्त संदर्भांच्या नोंदी ठेवत, त्याचा उपयोग आपल्या बोलण्यात करत आणि माझ्यासारखा एखादा पत्रकार संदर्भ देताना चुकला तर लक्षातही आणून देत..
मी काही अहिल्या मंदिरात वारंवार जाणारा समितीचा कार्यकर्ता नव्हतो, मी असलोच तर त्यांच्या स्नेहातील एका सेविकेचा मुलगा होतो, त्यांच्या विचाराच्या वृत्तपत्रात किंवा नियतकालिकात लेखन करणारा एक सामान्य पत्रकार, लेखक, कार्यकर्ता होतो. पण सामान्य सेविकेशी असणार्या नात्याएवढेच स्नेहाचे नाते आमचे होते. भेटायला गेलो आणि अन्य कामात-बैठकीत असूनही त्यांनी कधी भेट नाकारली, असे घडलेच नाही. अलीकडे अलीकडे अंथरुणाला खिळून पडल्यागत स्थिती झाली तेव्हाही त्या भेटल्या तर हात हातात घेत,‘हात लिहिता राहू दे, राष्ट्रासाठी कार्यरत राहू दे’ असं म्हणत. हात आपण सोडवून घेण्याचा प्रश्नच नसे, त्या सोडतील तेव्हाच तो सुटायचा. तुरुंगात राहिल्याने पूजनीय बाळासाहेब देवरसांशी माझा जवळून परिचय झाला, माझ्या विवाहाला ते आवर्जून वेगळी वाट करून डोंबिवलीत आले, त्यांच्या येण्याच्या निमित्ताने संघाची प्रांताची बैठकच डोंबिवलीत झाली, पण बाळासाहेबांच्या हातात हात देण्याचे धैर्य मला कधीही झाले नव्हते, ती आपुलकी मला त्या मातृत्वरूपी हातात कायम जाणवली..
नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, ठसठशीत कुंकू ही प्रमिलताईर्ंंची ओळख. त्यांचं मन विलक्षण संवेदनशील होतं, स्वर मृदू होता. त्यांची वेशभूषा, त्यांचं लेखन ‘दक्ष’ या प्रतिमेला शोभणारं होतं. सीमावर्ती भागातील सेविकांविषयीचं त्यांना असणारं ममत्व काकणभर जास्तच होतं. त्यांचं बोलणं मार्मिक असे, गांभीर्यानं ओतप्रोत भरलेलं असे, त्यांची शैली नर्मविनोदी होती. संचालिका पदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्यांचा देश-विदेशातील सेविकांशी उत्तम संपर्क होता. नव्वदी ओलांडल्यानंतरही व्हॉटसअप, फेसबुक, सारख्या समाजमाध्यमांवर त्यांचा वावर असे. अपडेट राहणं म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रमिलताई होत्या...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी किंवा समितीच्या संचालिकांनी संघटनेच्या कामासाठी आणि समाजातील मान्यवर संस्था-संघटनांनी दिलेल्या आमंत्रणावरून अनेकदा देशभरात प्रवास केला. प्रमिलताईंनीही वयाची पंचाहत्तरी पार केल्यानंतर वंदनीय मावशींच्या जन्मशताब्दीनिमित्ताने मावशींंच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनी दाखवण्यासाठी देशभर प्रवास केला. साध्या मोटारीनं सलग 266 दिवस हा प्रवास केला. जवळपास 28 हजार किलोमीटर अंतर पिंजून काढलं, शंभराहून अधिक शहरातील कार्यक्रमात भाग घेतला, भाषणे दिली, मुलाखती दिल्या, हजारो मान्यवरांच्या भेटी घेतल्या, शेकडोंशी पत्रव्यवहार केला. यातली काही भाषणे, काही मुलाखती, काही विचार विविध नियतकालिकातून प्रसिद्धही झाले, परंतु या प्रवासाच्या भाषणांव्यतिरिक्तच्या निखळ नोंदी, प्रवासासंदर्भातील डायरी याचा विशिष्ट कालावधीनंतर किंवा विशिष्ट विषयासंदर्भात ऐतिहासिक दृष्टीकोनातून अभ्यास व अध्ययन झाले नसल्यास होण्याची गरज आहे...
समितीसाठी सारं आयुष्य द्यायचं असं ठरवल्यानंतर प्रमिलताईंनी गतायुष्याकडे वळून पाहिलंच नाही. स्वतःला समितीसाठी समर्पित केल्यानंतर त्या संपूर्णपणे आत्मविलोपी बनल्या. आपल्या देहावरही आपला अधिकार नाही हे त्यांनी मनोमन ठरवूनच टाकलेलं होतं. त्यामुळेच अतिशय कर्मठ जीवनशैली त्यांनी स्वीकारली होती. भल्या पहाटे सुरू होणारा त्यांचा दिवस दिवसभरातील भेटीगाठी झाल्यानंतर रात्री उशिरा मेल्स पाहणं, पत्रव्यवहार पाहणं, आवश्यक फोन करणं यात त्या घालवत.
प्रवासावर मर्यादा येऊ लागल्यानंतर आणि वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर बहुधा मृत्यू समीप आल्याची जाणीव त्यांना होऊ लागली होती. आपल्या मृत्यूनंतर कुठलेही अंत्यसंस्कार करू नयेत, कसलाही शोक पाळू नये, अंत्यदर्शनाचे सोपस्कार देखील पाळू नयेत, हे त्यांनी स्पष्टपणे मोजक्याच सेविकांना सांगून ठेवलं होतं. देहदानाचा संकल्प त्यांनी सोडला होता. हे ही त्यांचे अधोरेखित करण्याजोगे वेगळेपण. आपला देह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या हाती अभ्यासार्थ सोपवून त्या परलोकाला निघून गेल्या..
विवेकानंद केंद्राचं काम मी अलीकडे करत असे. केंद्रात म्हटलं जाणारं एक गीत आहे, ‘चले निरंतर चिंतन मंथन ‘अशा चरणानं सुरु होणारं. त्यात एक ओळ आहे, ‘मन में परम विजय विश्वास‘ असा. प्रमिलताईंचं जीवन त्याला साजेसं होतंच. मात्र हा लेख लिहित असताना मला सारखं आठवत होतं ते संघात गायलं जाणारं दुसरंच गीत, ‘राष्ट्रास्तव जे झिजले कणकण‘ या शीर्षकपंक्तीनं सुरू होणारं. त्यात एक कडवं आहे ‘विश्वाचे हे विशाल उपवन, स्वदेश शोभे जणू तपोवन, असे जाणुनी अर्पून तनमन, मातृभूमीचे करी नंदनवन.‘ प्रमिलताई समितीच्या कामानिमित्त विश्वाच्या विशाल उपवनात हिंडल्या, पण त्या रमल्या स्वदेशाच्या विशाल तपोवनात. आपलं सारं आयुष्य त्यांनी समिधारूपानं समितीसाठी, पर्यायानं राष्ट्रासाठी अर्पण केलं, झिजवलं. त्यामुळेच प्रमिलताईंच्या जीवनाविषयी लिहिताना त्या ओळीत बदल करून म्हणावंसं वाटतं, ‘यज्ञातील जी समिधा झाली!‘