@चित्राताई जोशी
प्रमिलताईंनी सदैव सार्यांवर प्रेमाची पखरण केली. कर्मचार्यांपासून छात्रावासातील मुलींपर्यंत. प्रांतोप्रांतीच्या सेविकांनी, संतमहंतानी, विविध संस्था संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या मातृस्पर्शाची, पे्रमवात्सल्याची अनुभूती घेतली आहे. मा. प्रमिलताई म्हणजे ‘चरैव इति’ किंवा ‘चल निरंतर चल, चल’ या ओळीचं साक्षात प्रकटीकरण होतं. ‘समितिसवे मरण जीवन प्राप्त होवो’ असं जीवन जगणार्या त्या यापेक्षा वेगळं काय सांगणार? अनुशासन हा त्यांच्या बौद्धिकाचा नव्हे तर आचरणाचा कृतिशीलतेचा विषय होता.
1936 चं वर्ष. वर्धेला वं. मावशींचं मन स्त्रियांच्याकरता तळमळत होतं. स्त्री ही समाजाचा एक घटक आहे, स्वत:च्या घराइतकीच समाजाची, देशाशी तिची बांधीलकी आहे आणि ती तिनं योग्य पद्धतीनं निभावली पाहिजे अशी त्यांची धारणा होती. ती ‘स्व’सरंक्षणक्षम असलीच पाहिजे. मात्र ‘स्व’ म्हणजे केवळ स्वत: असे त्यांना अभिप्रेत नसून त्यांना अपेक्षित असलेला ‘स्व’ व्यापक होता. स्वत:बरोबरच तिला स्वसंस्कृती, स्वदेश, यांचे रक्षण, जोपासना करता आली पाहिजे. त्या द़ृष्टीनंच त्यांनी सारं वाचन, अध्ययन, चिंतन केलं. त्या वेळी स्त्रीकरता शिक्षणाची दारं नुकतीच उघडू लागली होती. क्वचित ती अर्थाजर्नालाही बाहेर पडत होती. अनेक क्षेत्रं तिला खुणावत होती. लेखन, कविता हे सारं ती प्रसिद्ध करू लागली होती. ती मुखपृष्ठांचा विषय बनू लागली होती. मात्र तिने केवळ व्यक्ती विकासालाच प्राथमिकता न देता, राष्ट्राचा एक घटक आणि त्याची जबाबदारी यालाच प्राधान्य द्यावे यासाठी प. पू. डॉक्टरांशी विचारविमर्श करून त्यांनी वर्धा येथे 1936 ला विजयादशमीच्या पवित्र दिवशी राष्ट्र सेविका समितीची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून आजवर राष्ट्र सेविका समितीच्या प्रांगणात अनेक सुंदर फुलं फुलली, कालांतरानं म्लान झाली. त्यातलंच एक पुष्प प्रमिलताई मेढे. जे पूर्णतः मातृभूमिचरणी समर्पित झालं आणि ‘मोक्षदायी पावन झालं.’
सर्वस्व अर्पिले मातृभूमिचे पायी
‘सर्वस्व अर्पिले मातृभूमिचे पायी’, असं जीवन त्यांच्या रूपानं समितीच्या सेविकांनी प्रत्यक्ष अनुभवलं, बघितलं, त्या छत्रछायेत अनेक व्यक्तींच्या आयुष्याचं सोनं झालं. जीवनाला एक दिशा मिळाली. ते जीवन म्हणजे माननीय प्रमिलाताई मेढे, ज्यांच्या मनात केवळ विश्वकल्याणाचेच भाव होते. त्यांच्या श्वासप्रश्वासालाही हिंदुत्वाची मधुर लय होती. त्यांच्या संवादाला प्रेरणेचा नाद होता. जे भेटतील ते सारे त्यांचे स्वकीय होते. निकट येणार्या व्यक्तीचा अचूक अंदाज घेत त्या तिला कार्यप्रवण करीत. तिचं जीवन त्यामुळे आकार घेत असे. त्यांच्या देवलोक गमनाची बातमी कळताच सिकंदराबाद येथील पूनम भिडे लिहितात,‘त्यांनी बाबांना पत्र लिहून मला आसाम आणि मणिपूरच्या प्रवासात बरोबर नेल्यामुळेच मला जगाकडे नव्या दृष्टिकोनातून बघण्याची संधी मिळाली. भारतातील इतर लोकांमध्ये असलेला उत्साह अनुभवल्यामुळे मलाही नव्या भारताकडे सतत उत्साहाने बघण्याची संधी मिळाली.’
सुप्रसिद्ध निवेदिका रेणुका देशकर यांनी त्यांच्या संवादातील एक छोटासा प्रसंग लिहिलाय- “मावशी, पूर्वी, तुमच्यासमोर वाचत बसले होते... ‘स्वाहा मी स्वधा...सोमादि औषधी विविधा...मी घृत मीचि समिधा....’आणि तुम्ही सहज पुष्टी जोडलीत...‘मीचि विश्वजननी !!’ प्रत्येक स्त्री मध्ये विश्वाची जननी होण्याची ताकद असते, असं तुम्ही म्हणाला होतात...आणि त्यातून एक भव्य विचार देऊन गेलात.” भगवंतानं दिलेल्या या देणगीचा विचार न करता आपणच कोतेपणाने ती आपलं मातृत्व आपल्या मुलांपुरतंच सीमित करते आणि आपल्याही आनंदाला मुकते आणि समाजालाही वंचित करते.
त्यांनी स्वतः प्रेमाची पखरण केली. कुणाला काय आवडतं हे त्यांच्या बरोबर लक्षात असायचं अन् ती व्यक्ती आली की तिला ते आवर्जून देत असत. कर्मचार्यांपासून छात्रावासातील मुलींपासून तर प्रांतोप्रांतीच्या सेविकांनी, संतमहंतानी, विविध संस्था संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही त्याची अनुभूति घेतली आहे. त्यामुळेच आलेल्या जवळजवळ प्रत्येक लेखात त्यांच्या मातृस्पर्शाचा, पे्रमवात्सल्याचा उल्लेख आहे.
मोठ्या व्यक्तींचं बोलणं सहज उपदेश असतं. केवळ ते आपल्याला समजलं पाहिजे. विवेकानंद केंद्राच्या अ. भा. उपाध्यक्षा पद्मश्रीप्राप्त निवेदिता भिडे या मूळ वर्धेच्या. वं. मावशींबरोबर क ार्यरत असलेल्या निरलस अशा काकू भिडेंची नात. देवी अहल्या मंदिरात दर वर्षी श्रीरामजन्मोत्सव होत असतो. प्रतिपदा ते अष्टमी प्रवचनं असतात. त्या मालिकेत दोन वर्ष निवेदिताताईंची प्रवचनं झाली. पहिल्या दिवशी सुरुवात करताना त्या म्हणाल्या,‘माझा रामायणाचा विशेष अभ्यास नाही पण मा. प्रमिलाताईंचा आग्रह म्हणून मी आले. अभ्यास केला. मोठ्यांच्या आग्रहात अनुग्रहही असतो. त्यांच्या या प्रवचनाचं पुस्तकही केंद्रानं प्रकाशित केलंय. व्यक्ती जोडणंं आणि त्यांना कार्याशी जुळवून ठेवणंं असं दोन्ही त्यांनी सातत्यानं केलं.
मा. प्रमिलताई म्हणजे ‘चरैव इति’ किंवा ‘चल निरंतर चल, चल’ या ओळीचं साक्षात प्रकटीकरण होतं. वं. मावशींबरोबर त्यांच्या नेपाळ, बद्रीकेदार इत्यादी यात्रा झाल्या. त्यांचं विपुल सान्निध्य त्यांना लाभलं. आणि त्यातून त्यांनी उदात्त उन्नत असं जे जे ते अचूक टिपलं. त्यामुळेच की काय अंजनगावसुर्जी येथील श्रीनाथपीठ, श्रीदेवनाथपीठाचे स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज लिहितात-“व.ं मावशी के ळक रांची आत्मिक छबी वं. प्रमिलमावशींमध्ये होती.” वं. मावशींनी सूत्ररुपानं मांडलेल्या काही गोष्टींचं त्या फार छान विवेचन करीत. उदा. चित्र-पात्र-वस्त्र आणि क्षेत्रं ही मानवी जीवनाला प्रभावित करतात. मावशी नेहमी भारत या शब्दाचा अर्थ सांगत भा म्हणजे ज्ञान, तेज, प्रकाश यात रत म्हणजे रममाण झालेला देश. यामुळेच प्रमिलताई नेहमी याचं विवेचन करत सांगत असत. भारत या नावामागे केवढी उदात्तता आहे. भारताचा उल्लेख भारत असाच करा. इंडिया नाही. भारत दॅट इज इंडिया असं म्हणावं. कोणत्याही भाषेत बोलताना भारतच शब्द वापरावा. त्यांचं स्वतःचंही मौलिक चिंतन होतं. बुद्धी कुशाग्र होती अन् सतत वाचन अध्ययन चालू असे. वाचनही सर्व तर्हेचं होतं. ज्या आवडीनं त्या ’रामचरितमानस’ किंवा ‘ग्रामगीता’ वाचत त्याच तन्मयतेनं ’Think line’ वाचत. तरुण भारताच्या अग्रेलखाइतकंच उन्मेखून ‘स्वस्तिका’ बंगाली, ‘साधना’ गुजराती वाचत. आपलं अभिमतही नोंदवत, संबंधित व्यक्तीपर्यंत पोचवीत असत. उदारीकरण, जी.एस.टी.सारखे विषय सेविकांनी समजून घेतले पाहिजे याकरिता तसे विषयही व्याख्यानमालेत तज्ज्ञांकडून ठेवले जात. त्यातूनच ‘उदारीकरण का सच’सारखं अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांचं पुस्तक सेविका प्रकाशन प्रसिद्ध करू शकलं. अर्थसंकल्पावरील चर्चाही त्या आवर्जून ऐकत.
चल निरंतर
प्रवास हा संघटनेचा मजबूत खांब आहे. कार्यकर्त्यांना चालना, प्रेरणा द्यायला, कार्याला गति द्यायला प्रवास हा आवश्यक असतो. प्रमिलताईंनी काश्मीर ते कन्याकुमारी असा सतत प्रवास केला. असम, मणिपूर, उत्तराखंड, बंगाल, राजस्थान, सार्या प्रांतात प्रवास केला. कधी समिती शिक्षा वर्गाच्या निमित्तानं तर कधी प्रांत बैठकी म्हणून प्रांताचा सघन प्रवास. साधारण सत्तरपासून तर 2012 पर्यंत देशात आणि यु. के., यु. एस. ए., श्रीलंका, केनिया असाही त्यांचा प्रवास झाला. प्रारंभीच्या काळात प्रवासी कार्यकर्ते कमी होते. प्रवासाची साधनं बेताची होती, आणि काही असली तरी आर्थिक स्थितीमुळे त्यांचा उपयोग अशक्य असे. पूर्वांचलचा प्रवास हा अतिशय खडतर असे. गोहाटी ते इम्फाल बसचा प्रवास जवळजवळ 22-24 तास लागत. वाटेत चेकिंग व्हायचं. 77-78 पासून त्यांचा त्या भागात प्रवास सुरू झाला. तो जवळजवळ 2012 पर्यंत चालू होता. त्यातून अनेक सेविका तयार झाल्या. विनोदकुमारी, मेमा प्रचारिका म्हणून निघाल्या. त्या पायाभरणीच्या आधारावरच दोन तीन वर्षापासून तिथे असलेल्या अस्थिर, भयावह परिस्थितीत समितिला झेपेल असं ‘इमा लक्ष्मी छात्रावास’ प्रारंभ करता आलं. आज सहावी ते दहावी या वर्गातील पंधरा मुली तिथे शिकताहेत.
1981 च्या दशकात त्यांचा पूर्व व पश्चिमी उत्तरप्रदेश प्रवास असायचा. तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू व्हायचा तो फेब्रुवारीपर्यंत. दोन्हींचे जिल्हे भरपूर. पूर्वीच्या प्रवासात रेखाताई राजे तर पश्चिमेत शरददीदी बरोबर असायची. या दिवसात उत्तराखंडात वगैरे तर कडाक्याची थंडी असायची. पण स्थानिक सेविकांना हाच कालखंड योग्य वाटायचा. आपला नऊवारीचा आग्रह न सोडता हा प्रवास शाल स्वेटर, मफलर, मोजे करीत पूर्ण व्हायचा. मेरठ, नैनिताल, इटावा, डेहराडून, उत्तरकाशी, लखनौ, आग्रा, मथुरा, सर्व प्रांतात घराघरातून संबंध, संवाद त्यामुळे नागपूरच्या स्मृतिसभेला तिथल्या सेविका आवर्जून आल्या. अनेक प्रांतांचं प्रतिनिधित्व राहिलं. अलीकडे मा. नितीनजी गडकरी त्यांना भेटले की म्हणत, ‘प्रमिलताई, तुम्ही आधी पूर्वांचलात खूपच खराब रस्ते आणि खड्डेच खड्डे असलेल्या रस्त्यांवर प्रवास केलात पण आता बघा प्रवास किती सुखकर झाला आहे’ तो अनुभव घेण्यासाठी त्यांचंही मन तयार होतं पण 94 वर्षाच्या शरिराला एवढा प्रवास करणं कठीण होतं. कारण तीनचार महिन्याच्या अंतरानं त्या पडल्यामुळे दोन्ही हिपबॉल घालावे लागले होते. पाठीचे मणके दबलेले होते. प्रसंगोपात उजवा हात, डावा पाय फ्रॅक्चर झालेले होते. अँजिओप्लास्टीही झाली होती. यांनतरही बंगलोर, भोपाळ, नाशिक, पुणे, जुन्नर असा प्रवास त्यांनी 2022-2024 मध्येही केला. गोंदियाच्या पालावरच्या शाळेतही जाऊन आल्या.
साधारणतः 1982 सालचा भाद्रपद महिना. गौरी गणपती झाल्यावर मा. प्रमिलताईंचा केरळ प्रांताचा प्रवास होता. या प्रवासात त्या मला घेऊन गेल्या. एर्नाकुलमपासून प्रवास सुरू होणार होता. जवळजवळ 36 तासांचा प्रवास असेल. सर्व व्यवस्था कार्यालयातून घेऊन आम्ही निघालो. थर्मासमध्ये कॉफीही बरोबर घेतलेली.जेवायला प्रारंभ करण्यापूर्वी पोळीचा छोटा तुकडा त्यावर भाजीची फोड असं खिडकीत ठेवलं. तसं त्या रोज ताटात काढत आणि मग पक्ष्यांकरता बाहेर ठेवत. एवढा लांबचा हा माझा पहिलाच प्रवास. माझ्या सामान्यज्ञानात खूप भर पडली. कृष्णा, गोदावरीचं विशाल पात्र प्रथमच बघितलं. साधारणतः दुसर्या दिवशी चारची वेळ असेल प्रमिलताईंनी सर्व आवरलं एर्नाकुलम यायला तसा अवकाश होता. पण अंबाडा घालून पातळ सारखं करुन त्या तयार झाल्या. एर्नाकुलमच्या आधी कालडी हे छोटं स्टेशन होतं. तिथं गाडी थांबली आणि आवाज आला,‘ताईजी, यहीं उतरना है.’ आम्ही पटकन खाली उतरलो. प्रवासाचा प्रारंभ कालडीपासून होता. गाडी विलंबानं पोचली होती. शाखेची वेळ झाली होती. त्यामुळे एर्नाकुलमला जाऊन परत मागे येणं अवघड होतं त्यामुळे कार्यकर्त्यांनी आधीच उतरावं अशी योजना केली होती. तेव्हा मोबाईल नव्हते पण प्रमिलताईंना आलेला लिखित कार्यक्रम बघून हा अंदाज आला असावा. कालडी हे छोटं गाव. प्रमुख कार्यवाहिका येणार म्हणून मुलींमध्ये केवढा उत्साह होता. केळीच्या सोपांच्या साह्यानं दुतर्फा सजावट केली होती. अंतराअंतरावर बांबू, त्याला दोरी बांधलेली केळीचा गाभा सोलून त्याच्या लांब पट्ट्या सोडलेल्या, खाली त्याला रंगसंगती साधून विविध रंगांची फुलं लावलेली. आजूबाजूला सारं काही हिरवंगार नारळी, पोफळी इत्यादी. गाडीतून उतरुन सरळ शाखास्थानी गेलो. दैनंदिन सायंशाखेतील सेविका, गृहिणी व स्वयंसेवक असे सर्व उपस्थित होते. योजनेनुसार ठरल्या वेळी शाखा, गीत, बौद्धिक झालं. तिथल्या सेविकांना हिंदी किंवा इंग्लिश दोन्ही येत नव्हतं. त्यामुळे तिथले बौद्धिक प्रमुख भट हे प्रमिलताईच्या बौद्धिकाचा मल्याळममध्ये अनुवाद करीत. तो अनुवादही त्या लक्षपूर्वक ऐकत, भाव बरोबर उतरतो आहे का इत्यादी. त्यांनी ताईंना सांगितलं, ‘तुम्ही थोडं थोडं बोला. मी तेवढा भाग अनुवादित करीन, मग पुढचं सांगा.’ जवळजवळ दीड तास शाखा झाली. नंतर मग आम्ही कॉफी प्यायलो, मग निवासस्थानी जाऊन स्नानादि उरकलं. पण त्यांचं राहणं एवढं व्यवस्थित होत की, त्या एवढा प्रवास करुन सरळ तिथे आल्या आहेत हे कुणाच्या ध्यानीही आलं नाही. चेहर्यावर थकवा वगैरे काही नाही. व्यवस्थितपणा इतका होता की पाय पुसायचा टॉवेल वेगळा, हात-तोंड पुसायचा वेगळा. सर्व कपडे त्या स्वतः धूत. प्रवासातही तिथले कपडे तिथेच धुवत. ओले कपडे ठेवायला वेगळी पिशवी असे. कुंकू, फेण्या भाग्यनगरहून आणायच्या. प्लॅस्टिक वायरची बॅग तामिळनाडू असं खूप काही निश्चित होतं.
एकदा आम्ही मृदुला भांगे पाठकचं बाळ बघायला गोंदियाला गेलो. मी कार्यालयात नवीनच होते. त्या दिवशी माझा उपवास होता. सकाळी उपवास व रात्री धान्यफराळ अशी घरातली पद्धत होती. तसं मी त्यांना सांगितलं. विदर्भच असल्यामुळे धान्यफराळाची आवड असते त्यामुळे त्यांनीही ते आनंदानं केलं. पण येताना त्यांनी मला समजवून सांगितलं की अशी व्यवस्था सगळीकडे होणार नाही. जिथं जसं असेल तसं आपण करायचं आणि कार्यालयातही सकाळी जेवायचं व रात्री उपवास करायचा. कारण सकाळी नेहमीच आपण सर्व काही भाजी, चटणी, कोेशिंबीर सर्व काही क रतो. याच प्रवासात रेल्वेत चढता उतरताना त्यांचं माझ्या पायाकडे लक्ष गेलं. त्यावर सूज आहे असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी कधीपासून आहे वगैरे चौकशी केली. त्यांनी विचारल्यावरच सूज आहे हे मला कळलं. दुसर्या दिवशी त्या मला डॉक्टर पेंडसे यांच्याकडे घेऊन गेल्या. असं त्यांचं बारीक लक्ष असे.
सिंधु दर्शन यात्रा सुरू झाल्यानंतर दुसर्या वर्षी मा. इंद्रेशजी, तरुण विजय यांच्या निमंत्रणावरून सिंधुदर्शन यात्रेला गेलो. मा. प्रमिलताई मंचावर होत्या. कार्यक्रम बराच वेळ चालला. मंचावर अनेक मान्यवर होते. तासाभरानंतर मंचावर कोका कोला फिरवण्यात आला. तो न घेणार्या दोन व्यक्ती होत्या एक मा. जॉर्ज फर्नांडिस व दुसर्या मा. प्रमिलताई. याच वेळी मा. प्रमिलताईं त्यांच्याशी एक विषय बोलल्या की,“आपले जवान देशाच्या संरक्षणाकरता प्राणपणानं लढतात. सर्वस्व ओवाळून टाकतात. तेव्हा आपण एक गोष्ट करु शकू का?”
“कोणती?” त्यांनी विचारलं.
“मिलिटरी कॅन्टीनमध्ये उपलब्ध असलेल्या दैनंदिन वापराच्या वस्तू आपण स्वदेशी ठेवू शकू का? त्या ठेवाव्यात.” जॉर्ज फर्नांडिस यांना ही हे आवडलं व तसा प्रयत्नही झाला.
वैचारिक पाथेय
जिथे सेविका असतील तो त्यांच्या दृष्टीनं कुंभच असायचा. यावर्षी प्रवीण वर्गावर त्या निवासाला जाऊ शकल्या नाहीत. 6 डिसेंबर 24ला पडल्यापासून वॉकर, व्हीलचेअरचा उपयोग सुरू झाला. त्यामुळे बाहेर जाण्यावर मर्यादा आल्या. पण एक दिवस वर्गावर थोडा वेळ जाऊन आल्या. रस्त्यानं त्रास होत होता. पण तिथे गेल्यावर सर्वांशी बोलल्या. सेविकांबरोबर फोटो झाला. 18 ते 20 जुलै अ. भा. बैठक स्मृति मंदिर परिसरात झाली. एकच दिवस थोडा वेळ जायचं असं नक्की केलं पण वीस तारखेला येत नाही असं म्हणाल्या. दिवसातनू दोनतीनदा जायचं का विचारलं पण होकार आला नाही पण दुपारी अडीचला म्हणाल्या,‘ऑनलाईन दाखवा मला.’ कारण त्या टेक्नोसॅव्ही होत्या. एक दीड महिन्यापूर्वीपर्यंत फेसबुक बघत/वापरत होत्या. तीन वाजता त्यांचा ऑनलाईन बैठकीतील सेविकांशी पाच मिनिटांचा संवाद झाला. व्यास सभागृह गलबलून गेलं. पाच वाजता समारोप झाला आणि अनेक सेविका अहल्या मंदिरात त्यांना भेटायला आल्या. नेत्रा फडकेचं भजन ऐकलं तर कुणाचं गीत. प्रत्येकाला आपल्या हातानं पेढा दिला. कुणाला भरवलाही. सेविकांना बघून त्या क्षीण हातांमध्ये ऊर्जा निर्माण झाली. कार्यकर्ता संवादगंगेतील स्नान हेच अवभृथ स्नान होतं. पेढा, लाडू, चिवडा या शारीरिक पोषणाच्या बाबी पण कार्यकर्त्याचं तर मनोबल सर्वाधिक हवं म्हणून वैचारिक पाथेयही देत. त्यामुळे हात, हृदय आणि मस्तिष्क यांचं सामंजस्य असावं, हृदयात आर्द्रता, ओलावा, प्रेम असावं. गतिशील राहा, निरंतर कामात रहा.. ध्येयाशी प्रामाणिकता ठेवा.. कोणत्याही चुकीच्या गोष्टींमध्ये फसू नका, समितिशी एकरूप व्हा...हा संदेश दिला.
‘समितिसवे मरण जीवन प्राप्त होवो’ असं जीवन जगणार्या त्या यापेक्षा वेगळं काय सांगणार? खरं तर त्यांचं जीवन हेच खूप बोलकं आहे. अनुशासन हा त्यांच्या बौद्धिकाचा नव्हे तर आचरणाचा कृतिशीलतेचा विषय होता. प्रत्येक काम व्यवस्थित वेळच्यावेळी झालंच पाहिजे हे छात्रावासातल्या लहानग्यांनाही उमगलं. ‘मावशींबद्दल लिहा गं काही’ म्हणताच तासाभरात टेबलवर पंधरावीस कागद व्यवस्थित चिमटा लावून ठेवलेले दिसले. त्यातली एक लिहिते, ‘मौसी के साथ रहके मैने बहुत कुछ सिखा। जैसा खुद खुदका काम करना, समय का पालन करना, स्वच्छता रखना, दूसरों को मदद करना, ज्ञान देना आदि। मौसी बहुत जादा स्ट्राँग थी। उनकी इतनी उम्र होने के बाद भी वे अपने कपडे खुद धोती थी। मौसी रोज प्रातःस्मरण, सायंस्मरण में समयपूर्व आती थी। कुछ भी हो जायें चाहे उनके तबियत भी क्यों ना खराब हो, पर आती ही थी। मौसी बहुत जादा स्ट्राँग थी...बाकी मौसीयों से भी जादा। मौसी छात्रावास के बालिकाओंपर बहुत जादा प्रेम करती थी।’ (हे मनोगत पूर्वांचलच्या मुलीचं आहे ते तिचंच वाटावं म्हणून व्याकरण दोष काढले नाहीत.) पण जे हिनं लिहिलं तेच शिरीषा कोमल लिहिते Reflecting on Mananeeya Pramila Taiji, my heart is filled with gratitude for her very being, which was an embodiment of profound mamta— a nurturing compassion that radiated the true RSS female vision. Her spirit continues to illuminate my path, making remembering her one of my sweetest emotions, a source of enduring prana.
Taiji’s defining quality was this boundless mamta, which she infused into every interaction. This was profoundly evident in her extraordinary attention to detail, remembering specific names of countless sevikas and swayamsevaks even across continents. Despite looking out for thousands, she remembered us even away from Bharath, often using an endearing 'my' followed by our name, clearly showing her deep personal connection. Her deep understanding of inner and outer worlds allowed her to offer simple yet effective direction in her boudhiks, guiding without judgement. I recall a varg in Bharath where I reacted emotionally, and she instantaneously called out, “He Sirisha!”—a sound I still hear, bringing me back into focus for the greater good. Such was her exquisite balance of character and charm in handling me and other sevikas. Her calm, assured presence of reason resonated universally; indeed, countless vishwa vibhaag had the privilege of her heart and mind’s wisdom, notably during the All Africa varg in Durban in 2004, a truly cherished memory for South Africa. ”
अशाच भावना यु. एस. ए. च्या कीर्तिदा आणि यु.के.च्या विदुलाताईंनी व्यक्त केल्या. या देशात समिती म्हणून प्रवास करणार्या त्या पहिल्या अधिकारी. त्यांचं नऊवार बघून विदुलाताईंना व आणखी काही सेविकांना प्रश्न पडला. पण जसं त्यांनी बोलायला सुरुवात केली, त्यांची शब्दसंपदा, त्यांची शब्दफेक, मुद्दे मांडण्याची पद्धती सारेच प्रभावित झाले. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना त्यांनी आपलंसं केलं. इग्लंडची छोटी दीपवंदना त्यांना पत्र लिहायची, त्यात वर लिहिलं असायचं ‘ताईजी, ओपन विथ स्माईल’ शिल्पा छेडानं साधारणतः 1998 साली आग्रहानं कार्यालयात कॉम्प्युटर दिला. त्यामुळे ताईंशी रोज मेलवर संवाद होईल, हा विचार होता. पण नंतर तिचं पत्र आलं,‘ताईजी, मी चूक केली का? तुमचं पत्र आलं की तुमचं अक्षर माझ्याशी बोलायचं. केव्हाही काढून वाचताना आनंद व्हायचा ते आता या टायपिंगनं साधत नाही.’ त्यांचं अक्षर फार सुरेख होतं. त्यात घरातील सर्वांची विचारपूस असे.
आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजींनीही शोकसंवेदना पत्रात नमूद केलं की ‘कर्म, साधना और निष्ठा से सुसज्जित स्नेहमयी प्रमिलाताई का जीवन अपने आप में एक संदेश था। राष्ट्र सेविका समिति की संचालिका के रूप में उन्होंने अनेक लोगों को दिशा देने का कार्य किया और देशभर के कार्यकर्ताओं से उनका आत्मीय संबंध रहा। उनके द्वारा विभिन्न अवसरों पर मिलने वाले आशीर्वचन व मार्गदर्शन की कमी को मैं और मेरे जैसे अनेक लोग महसूस करेंगे। आज वह सशरीर हमारे बीच नहीं है पर उनके जीवनमूल्य व विचार लोगों को निरंतर देश व समाज के लिए कार्य करने की प्रेरणा देंगे।’
अशी ही ममता दिनांक 31 ला मौन झाली, वार्धक्यानं. पण हे वार्धक्य शेवटपर्यंत आग्रही होतं तत्त्वाकरता, प्रार्थनेकरता, शुचितेकरता, मूल्यांकरता. अंतिम दिवशीही सकाळी 6.10 ला समितीची प्रार्थना झाली. शांत होण्याच्या अर्धा तास आधी आलेल्या प्रशांत व सुमेधा पोळ यांच्याशी, नंतर शिल्पाताई व शांताक्कांशी बोलणं झालं आणि 9 वाजून 5 मिनिटांनी ‘जनम-मरण एका सासाचं अंतर’ हे सत्य सांगत या लोकातून प्रयाण केलं. शेवटी मन एकच म्हणतं, असं व्यक्तित्व पुन्हा होणं कठीण.