देखणी ती पाऊले

विवेक मराठी    29-Aug-2025
Total Views |
@सुनंदा जोशी
 
 
pramilatai medhe
प्रमिलताईंची बुद्धी शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत सतर्क होती. सतत राष्ट्रचिंतन सुरू असायचे. सध्या चालणार्‍या घडामोडींकडे त्यांचे लक्ष असायचे. आजच्या शब्दात अपडेट असणे महत्त्वाचे, हे त्यांचे मत. त्या नेहमी म्हणायच्या,‘परिस्थिती कशीही आली तरी दृढतेने आपले काम कसे करावे हे आलेल्या प्रसंगातून शिकले पाहिजे. स्वावलंबन हा प्रमिलताईंचा स्थायीभाव होता.
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती,
 
वाळवंटातूनीसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती
 
अशा राष्ट्रभक्तीचाच ध्यास घेतलेल्या वंदनीय प्रमिलमावशींना सादर प्रणाम!!
 
 
वंदनीय प्रमिलमावशींचे जीवन उदात्त, उन्नत होते. सर्वच बाबतीत ज्येष्ठ-श्रेष्ठ असलेल्या प्रमिलमावशींचा सहवास मला लाभला त्याबद्दल मीच स्वतःला भाग्यवान समजते. माझ्या फक्त दोन आठवणी सांगते. वंदनीय प्रमिलमावशींच्या बरोबर वंदनीय मावशी स्मृती प्रदर्शनी परिक्रमा यात मला सहभागी होता आले. 9 ऑगस्ट 2003 ते 30 एप्रिल 2004 असा परिक्रमेचा कार्यक्रम होता. उत्तर प्रदेशात मी ह्या प्रदर्शनी बरोबर होते. दिल्लीला प्रदर्शनीचा प्रवास होता आम्ही पाच-सहा जणांनी प्रदर्शनी लावायची, प्रदर्शनीच्या संदर्भात व्यवस्था बघायची, एवढेच आमचे काम असायचे. त्याप्रमाणे आम्ही दिल्लीला स्टेडियमजवळच प्रदर्शनी लावली होती. जाहीर कार्यक्रम स्टेडियमवरच होता. चार वाजता गार्ड आले आणि म्हणाले, ”प्रमिल मावशी है क्या?” आम्ही विचारले, ”आपका क्या काम है?” ते म्हणाले, ”हमारी मॅडम आयी है, उनको प्रमिल मावशी से मिलना है।” आम्ही म्हटले,”ठीक है, तुम मॅडम को ले आओ। हम मावशी को खबर करते है।”
 
 
तो मॅडमला घेऊन आला. मॅडम म्हणजे सुषमा स्वराज होत्या. आम्ही त्यांचे स्वागत केले. ”आप बैठीये, मावशी अभी आयेंगी. खबर की है उनको।” असे आम्ही सांगितले. सुषमाजींनी विचारले, ”प्रदर्शनी प्रवास कैसे चल रहा है? सभी जगह व्यवस्था ठीक हो रही है ना?” त्यांनी हे विचारलं तेवढ्यात प्रमिलमावशी आल्या.
 
 
”सुषमा तुम आ गयी,” असे मावशींनी म्हटल्याबरोबर सुषमाजींनी मावशींना मिठीच मारली. मायलेकीच्या भेटीचा आनंद आम्ही अनुभवला. समिती मातृस्थानी आहे असे वंदनीय मावशी म्हणायच्या, तो प्रत्यय आला. खूप आनंद वाटला. वंदनीय प्रमिलमावशी वयाच्या 75व्या वर्षी प्रदर्शनी प्रवास करत होत्या, तो ही साध्या गाडीतून. प्रत्येक ठिकाणची योजना वेगळी असायची.
 
pramilatai medhe  
 
उत्तर प्रदेशच्या एका नगरामध्ये आम्ही सकाळी दहा वाजता पोहोचलो. तेथील योजना प्रमुखांनी दिवसभराचा कार्यक्रम मावशींना सांगितला. बारा वाजता कॉलेजमध्ये कार्यक्रम, तीन वाजता प्रबुद्ध लोकांसोबत बैठक, पाच वाजता सेविकांच्या बरोबर बैठक, व साडेसहा वाजता जाहीर कार्यक्रम. असे एकामागून एक कार्यक्रम असले की, त्यांची विश्रांती व्हायचीच नाही. तरी पण त्या सर्व कार्यक्रमांना उत्साहाने जात. उत्तम मार्गदर्शन करीत. एक सेविका म्हणाल्या, ”मावशी जी से हमें ऊर्जा मिलती है।”
 
 
साडेसहा वाजताच्या जाहीर कार्यक्रमानंतर मात्र आता त्यांना थोडी विश्रांती घेऊ द्या, कोणाला भेटायला येऊ देऊ नका, असे त्या योजना प्रमुखांना सांगावे लागले. सकाळी सर्व आटोपून मावशी तयारच होत्या. प्रवासातही आपले पातळ आपणच धुणार. स्वावलंबन हा त्यांचा स्थायीभाव होता. आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मावशींच्या बरोबरच्या प्रवासाचा आनंद खूप असायचा. काल एवढे लागोपाठ कार्यक्रम झाले त्याबद्दल मला राहावलं नाही म्हणून मी मावशींना म्हटले, ”एवढे कार्यक्रम ठेवायला नको होते. तीन कार्यक्रम तीन वेगळ्या ठिकाणी म्हणजे प्रवास आलाच. मावशी, काल तुम्ही खूप दमला होतात.” मावशी म्हणाल्या, ”आपण प्रदर्शनी प्रवास करायचे ठरवले ना? मग ज्या ठिकाणी जी योजना असते त्याप्रमाणे आपण ते केले पाहिजे. दमते ते शरीर. मन दमू द्यायचे नाही.”
 
 
वंदनीय ताईंचे शब्द येथे आठवले, त्या म्हणायच्या, वय वाढते ते शरीराचे, मनाने नेहमीच तरुण राहायचे. त्याला दमू द्यायचे नाही. समिती विचार प्रमिलमावशींमध्ये कसा भिनला ते दिसायचे. प्रदर्शनी प्रवासात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सर्वांचे भोजन एकत्रच होईल याचा कटाक्ष असे. त्या म्हणायच्या, चालकापासून आम्हा सर्वांपर्यंत आम्ही एकच आहोत, सर्वांची साथ आहे, म्हणूनच प्रवास सुरू आहे.
 
 
pramilatai medhe
 
जम्मूला एका कॉलेजमध्ये प्रदर्शनीसाठी जागा दिली होती. तेथे प्रदर्शनी लावली कॉलेजचे प्रिन्सिपल उद्घाटनाला आले होते. ते म्हणाले, ”प्रदर्शनी के बारे में, वंदनीय मावशी के बारे में, मै जानता नही हूं, लेकिन इधर पंकजा दीदी जो काम करती है वह काम अच्छा है, समाजोपयोगी है ये मैं जानता हूं, इसलिये पंकजा दीदी ने बुलाया और हम आ गये।”
त्यावर मावशी म्हणाल्या, ”हेच समिती कार्याचे वैशिष्ट्य आहे. व्यक्ती माहीत नाही, पण तिने सुरू केलेले काम माहीत आहे. पंकजा दीदी जम्मूसारख्या अस्थिर परिस्थितीत गेली 25 वर्षे काम करते आहे. आतंकवादाची सतत भीती असते, कठीण परिस्थितीत तेथे आपला छात्रावास चालू आहे. आता सकाळीच इथे प्रदर्शनी लावली आणि दुपारी कर्फ्यू लागला. लगेच ती हलवायला सांगितली. आता प्रदर्शनी कुठे घेऊन जाणार? आम्हाला कळत नव्हते. पंकजा दीदीने सांगितले, तळघरात न्या. त्याप्रमाणे सर्व साहित्य तळघरात नेले. पडदे बांधले आणि प्रदर्शनी लावली. माझ्या मनात आले आता जाहीर कार्यक्रम कसा होणार? पण ठरलेल्या वेळी पाच वाजता जाहीर कार्यक्रम सुरू झाला. 300पर्यंत उपस्थिती होती. या सगळ्यांना ताबडतोब निरोप कसे दिले, असे एका सेविकेला विचारले असता ती म्हणाली, इथे ठरलेल्या ठिकाणी कर्फ्यू आहे व कार्यक्रम होणार नाही, हे कळल्यावर तो तळघरात होणार हेच त्यांना माहीत असते. परिस्थिती कशीही आली तरी दृढतेने आपले काम कसे करावे हे या प्रसंगातून शिकले पाहिजे. आपला संकल्प दृढतेने पूर्ण करणे हेच सेविकेचे काम असल्याचे मावशींनी सांगितले.
 
 
प्रवासात मावशींची रसिकताही आम्हाला दिसली. गाडीत मावशी पुढे आम्ही चार-पाच जण मागे असायचो. तेव्हा मावशी म्हणायच्या अरे सगळे गप्प का? गीतं म्हणा, श्लोक म्हणा, नाहीतर आपण पद्यांच्या भेंड्या खेळू. त्यांना कितीतरी पद्ये पाठ होती. आमची मात्र तेवढी नव्हती, त्यामुळे आम्ही मावशींना म्हटले, मराठी गाणी श्लोक म्हटले तर चालेल का? त्या हसल्या व म्हणाल्या, ठीक आहे. म्हणा. पण त्या मात्र पद्येच म्हणत राहिल्या. त्यांची स्मरणशक्ती किती आहे हे आम्ही अनुभवतच राहिलो. अशा कितीतरी आठवणी आहेत प्रवासातल्या. प्रत्येक प्रवासाच्या ठिकाणी त्यांना आत्मीयतेने भेटायला येणारी माणसं असायची. आपण कुठे कधी भेटलो हेही त्या सांगायच्या.
 
आता तळेगावच्या आठवणी....
तळेगावला समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका वंदनीय ताई आपटे यांच्या नावे वंदनीय ताई आपटे प्रतिष्ठान आहे. नऊ मार्चला वंदनीय ताईंचा स्मृतिदिन असतो. दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो. या कार्यक्रमासाठी वंदनीय मावशींचा प्रवास तळेगावला असायचा 2006, 2007, 2008, 2011 यावर्षी त्यांचे येथे येणे झाले. वंदनीय प्रमिलमावशी 22 जुलैला प्रमुख संचालिका झाल्या. त्यानंतर नऊ-दहा सप्टेंबर 2006 ला त्या तळेगावात आल्या म्हणून त्यांचा प्रकट बौद्धिकाचा मोठा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाला आमदार गिरीश बापट हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. समितीच्या प्रमुख संचालिका म्हणून सेविकांनी तर त्यांचा सन्मान केलाच. परंतु इतरही 7 सेवाभावी संस्थांनी वंदनीय प्रमिलमावशींना सन्मानित केले. प्रमुख पाहुणे आमदार गिरीश बापट म्हणाले, स्त्रीचे स्थान व प्रतिष्ठा उंचावण्यासाठी स्त्रियांनीच पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे हे काम राष्ट्रसेविका समिती करीत आहे. वंदनीय प्रमिलमावशींचा त्यांनी गौरव केला व म्हणाले अशा मातृतुल्य व्यक्तीचा सन्मान मला करायला मिळाला, याचा आनंद वाटतो.
 
 
त्यावेळी वंदनीय प्रमिलमावशींनी आपले विचार मांडताना म्हटले की, स्त्रीला सबला व स्वावलंबी बनवण्यासाठी वंदनीय मावशींनी 1936साली समितीची स्थापना करून कार्याला सुरुवात केली. स्त्रीने सुशीला, सुधीरा व समर्थ बनले पाहिजे. समर्थ होण्यासाठी मातोश्री जिजाबाईंचे मातृत्व, अहिल्यादेवींचे कर्तृत्व, आणि लक्ष्मीबाईंचे नेतृत्व अंगी बाळगण्याची आवश्यकता आहे. वंदनीय मावशींचे उद्बोधन नेहमीच प्रेरणादायी असायचे. आतासुद्धा ते जाणवले. 17 ते 20 जुलै 2025 ला नागपूर येथे केंद्र बैठक झाली. त्यावेळी वीस तारखेला आभासी पद्धतीने त्यांनी उद्बोधन केले. त्या म्हणाल्या, सर्वजणी सतर्क रहा. चुकू नका. चांगले काम करा. असा त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला.
 
 
गेल्या तीन महिन्यांपासून त्या अंथरुणावरच होत्या, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची बुद्धी सतर्क होती. राष्ट्रचिंतन सतत सुरू असायचे. सध्या चालणार्‍या घडामोडींकडे त्यांचे लक्ष असायचे. आजच्या शब्दात अपडेट असणे महत्त्वाचे, हे त्या नेहमी म्हणायच्या.
 
 
गेल्या सप्टेंबरमध्ये मी मावशींबरोबर आठ दिवस कार्यालयात होते. चित्राताई बैठकीला गेल्या होत्या. जाताना म्हणाल्या, मावशींना सकाळी पाच वाजता कॉफी द्या. आंघोळ झाल्यावर त्या दमून जातात. मावशी साडेचारलाच उठत. त्यांच्या मागे मी पण. मी म्हणायची, थोडी उशिरा आंघोळ करा. तर मला म्हणाल्या, ‘अगं शाखेत प्रार्थना असते ना, ती आंघोळ करूनच म्हणायची ही माझी कित्येक वर्षांची सवय.’ त्यांचा कर्मठपणा त्याच्यातून दिसतो. मी त्यांना कॉफी दिली की म्हणायच्या, ’तुम्ही कशाला उठता? मी नंतर घेईन.’ मी फक्त एवढंच म्हटलं, ’मला एवढेच करता येते, ते करू द्या मावशी.’ त्यावर त्या म्हटल्या, ’ठीक आहे, कर तू.’ त्यांच्या या सहवासात मला आनंद वाटला. खूप शिकायला मिळालं. त्यांची दिनचर्या ठरलेली असायची. प्रभात शाखा झाली की, खाली अष्टभुजा मंदिरात जायचे, नंतर वर्तमानपत्र वाचायचे, न्याहारी करायची, मग आलेल्या सर्वांशी बोलणे, फोन घेणे. त्या सतत कार्यरत राहायच्या. त्यांच्यापासून ऊर्जा मिळे हेच खरे. जुलै बैठकीच्या वेळी मी मावशींना भेटायला गेले होते. तेव्हा त्या म्हणाल्या, ’कसे काम चालू आहे? चालू ठेवा बरं...’ त्यांनी हळूच हातात हात घेतला आणि आशीर्वाद दिला. तीच माझी शेवटची भेट ठरली.
 
- लेखिका राष्ट्र सेविका समितीच्या  पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका आहेत.