@प्रमोद कोनकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे दोन महत्त्वाचे उत्सव. पण त्याबरोबर दशावतार ही लोककला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्राण आणि अविभाज्य भाग आहे. त्यातूनही गणेशोत्सव आणि दशावतार यांचे थेट नाते आहे. याच दशावताराच्या पंरपरेविषयी आपण जाणून घेणार आहोत.
मराठी रंगभूमी वेगवेगळ्या भागांत नटराजाच्या विविध रूपांत आपल्याला दर्शन देत असते. त्यापैकी दशावतार ही लोककला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. ही लोककला याच लाल मातीत रुजली आणि संस्कारित झाली आहे. दशावतार म्हणजे कोकणचा सांस्कृतिक वारसा, कोकणची अस्मिता, कोकणचे वैभव! साहित्य, नाट्य, संगीत, नृत्य, गायन, वादन, शब्दसृष्टीच्या चित्रमयतेने आभासी निर्माण केलेले नेपथ्य आदी या दशावतारी रंगभूमीची वैशिष्ट्येे आहेत. ‘दशावतारी नाट्य’ हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वतःचे लोकनाट्य आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग आणि गोव्यात पेडणे, डिचोली, साखळी आदी पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानातील भागात दशावतारी लोककला सादर केली आहे.
दशावतारी नाट्य म्हणजे विष्णूने साकारलेल्या मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की या दहा अवतारांवर आधारलेले नाट्य, असा त्याचा ढोबळ अर्थ होतो. विष्णू हा सृष्टीचा पालनकर्ता. त्याचे एकूण 24 अवतार. त्यात दहा अवतारांना नाट्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व असले, तरी त्यातील अनुक्रमे पहिले चार (मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह) प्राणिसदृश असल्यामुळे त्यांना दशावतारी रंगमंचीय नाट्यात स्थान नाही. बुद्ध आणि कल्की या दोन अवतारांचा केवळ उल्लेख होतो. वामन, परशुराम, श्रीराम आणि कृष्ण या चार अवतारांतच दशावतारी नाट्य मर्यादित राहते. सोबत देव, दानव, नारद, संकासूर आणि पूर्व दशावतारात गणपती, ऋषी, सिद्धी आदी पात्रे येतात.
नेटके खेळता दशावतारी,
तेथे येती सुंदर नारी,
नेत्र मोडिती कळाकुसरी,
असा श्लोक समर्थ रामदासांच्या दासबोधात आहे. त्यावरून रामदासांचादेखील कोकणातील दशावतारी नाटकांबद्दल बारकाईने अभ्यास होता हे जाणवते. दशावतारी नाटकात हुबेहूब स्त्रियांसारख्या नेत्रपल्लवी करणार्या नट्या आपणास दिसत असल्या, तरीही त्या नट्या नसून ते काम करणारे सर्व पुरुष नट असतात, असे समर्थांनी सांगितले आहे. यावरून असे स्पष्ट होते की, दशावतारी नाटकात स्त्रियांची कामे पुरुष नट मंडळीच करीत असतात आणि तेदेखील एवढे हुबेहूब असे की, आपणास त्यातील फरक ओळखूही येऊ नयेत आणि त्याचा मनाला चकवा व्हावा.
कोकणातील जत्रा आणि जत्रेतील रात्री दशावतारी नाटकांनीच रंगत असतात. प्रत्येक मंदिरातील जत्रेची तिथी ठरलेली असते. त्या तिथीला कोणत्या दशावतारी नाटक मंडळींचे नाटक होणार हे ठरलेले असते. वालावलकर दशावतारी नाट्यमंडळ, गोरे दशावतारी नाट्यमंडळ चेंदवणकर, पार्सेकर, नाईक-मोचेमाडकर, खानोलकर आदी अनेक जुनी नाट्यमंडळे आहेत. आता ती संख्या काही शेकड्यांत जाऊन पोहोचली आहे. यात काम करणारे नट शेतकरी कुटुंबातील असतात. पूर्वी यांचे शिक्षण कमी असले, तरी पुराणकथांचा त्यांचा अभ्यास फारच दांडगा असायचा. कारण ते नाटकातून सादर करत असलेले नाट्यप्रसंग, ज्यांना दशावतारी आख्यान असे म्हटले जाते, ते पुराणकथांवर आधारित असायचे. साधारणतः रामायण-महाभारत महाकाव्यातील, तसेच शिवपुराण, विष्णुपुराण, नवनाथ कथा इत्यादी पुराणांतील विविध नाट्यमय आणि उद्बोधक प्रसंग निवडून त्यांचे नाट्यरूपांतर केलेले असायचे. त्यातून कळत-नकळत धर्मशिक्षण आणि लोकशिक्षणाचा संस्कार व्हायचा. घाटमाथ्यावर कीर्तनकार, प्रवचनकार होते. त्यांनी भारुडे, लळित या लोकगीतांनी समाज संस्कारित केला. कोकणातील शेतकरीवर्गाकरिता तेच काम करण्यासाठी पुराणकथांचा आधार घ्यावा लागला. वेद आणि उपनिषदे दशावतारी कलावंतांच्या अभ्यासापलीकडची होती. त्यापेक्षा पुराणकथांमधील नाट्ये त्यांना भावली आणि त्याच नाट्यांनी रंगमंचीय स्थान प्राप्त केले.
प्रत्येक दशावतारी नाट्यमंडळाच्या मालकापासून त्या दशावतारी नाट्यातील कलावंतापर्यंत, सर्वांना ‘दशावतारी पेटारा’ आपले दैवत वाटते. तो पेटारा त्यांचा ‘पंचप्राण’ असतो. हे पेटारे बांबूच्या बेळांपासून विणलेले असतात. त्यात गणपतीचा मुखवटा, दोन लाकडी हात, समई, निरांजन, पंचारती आणि देवपूजेचे साहित्य असते. रंगपटात प्रयोगापूर्वी हे सर्व मांडून गणेशाची पूजा केली जाते. दशावतारी सर्व पात्रे रंगपटात रंगून झाली, की ‘गुरुदेव दत्त’ असा सामूहिक जयजयकार करतात. ‘नवलगुरू रायाची धन्य आरती’ ही आरती रंगपटात सादर करतात आणि दशावतारी नाटकाला प्रारंभ करण्यासाठी रंगमंचाकडे म्हणजेच मंदिरातील बाकड्याकडे प्रयाण करतात.
दशावतारी नाटकात आडदशावतार आणि दशावतार असे दोन भाग असतात. त्यांना आपण पूर्वरंग आणि उत्तररंग असे म्हणता येईल. पूर्वरंगात भगवान श्री विष्णूच्या पहिल्या अवताराचे (मत्स्य अवताराचे प्रतीक म्हणून) शंक अर्थात संकासुराचे दर्शन घडते. पूर्वरंगात संकासुराचे बोलणे ‘मालवणी’ बोलीतून होते. तो ‘संकासूर’ ग्राम्य विनोद करतो. त्यातून जी ‘हसवणूक’ निर्माण होते, ती रसिक प्रेक्षकांना रंगमंचाकडे खेचते. उत्तररंगात जी पुराणकथा रंगत जाते, ती मात्र अस्खलित मराठी, संस्कृतप्रचुर भाषेतच रंगत जाते. त्या वेळी त्या अल्पशिक्षित, शेतकरी, ग्राम्य नटाचे उद्गार ऐकून भाषा पंडितांनीही तोंडात बोटे घालावीत, अशी ‘स्वगते’ हे दशावतारी नट सादर करतात आणि नाटकात रंगत भरत जातात.
दशावतारी नाट्याचा प्रारंभ रंगमंचावर गणेशपूजनाने होतो. गणपतीची पूजा, आरती होते. पारंपरिक गीते म्हटली जातात. सूत्रधार आणि गणपती यांचे संवाद रंगतदार आणि पारंपरिक असतात. त्यात विशेषतः बदल नसतो. पुढील नाट्यप्रवेश निर्विघ्न पार पडण्यासाठी गणपतीला प्रार्थना केली जाते. गणपती म्हणजे दशावतारी लोककलेच्या रथाचा सारथी अशीच कलाकारांची भावना असते. आख्यानाचा विषय कोणताही असला, तरी गणपतीच्या आराधनेनेच त्याचा प्रारंभ होतो. मात्र केवळ प्रारंभापुरताच नव्हे, तर दशावतार नाट्यसंस्थांचे चालक आणि सर्व कलाकारांच्या दैनंदिन जीवनातही गणपतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
राजेशाहीच्या काळात दरबारी गायक, कीर्तनकारांनी अध्यात्माचा प्रसार केला. रामायण-महाभारतातील कथांचे सादरीकरण त्यांनी केले. त्यामुळे तळागाळापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या. तोच लोककलेचा वारसा दशावतारी नाटकांच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोपासला जात आहे. गणपतीची पूजा हा त्यातील सर्वांत महत्त्वाचा उपचार आहे. त्या त्या गावातील ग्रामदेवता हे त्या त्या मंडळांचे अधिष्ठान असते. वालावलकर मंडळाचा देव लक्ष्मीनारायण हा अधिपती आहे. चेंदवणकर मंडळाचा पाताळेश्वर, परुळे गावच्या मंडळाचा आदिनारायण, माणगावच्या मंडळाची अधिष्ठात्री यक्षिणी आहे. त्या त्या देवस्थानांच्या अधिपत्याखाली त्या नाटक कंपन्या आहेत. परंतु गणपतीचे पूजन हा आद्योपचार आहे. मंडळाच्या पेटार्यातील गणपतीची पूजा नाटकापूर्वी केली जाते. नैवेद्यही अर्पण केला जातो. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला या गणपतीची पूजा केली जाते. पण वर्षभर दर महिन्यातील संकष्टीला या गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. माघ महिन्यातील गणेश जयंतीला गणेश चतुर्थीप्रमाणेच पेटार्यातील गणपतीची पूजा करतात.
प्रत्येक मंडळाच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत. मात्र गणपतीचे पूजन आवर्जून केले जाते. पार्सेकर दशावतार मंडळाचे मालक तर बाराही महिने गणपतीचे पूजन करतात. वालावलकर दशावतार मंडळाच्या पेटार्यातील गणपती शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला लाल किंवा तांबडा गणपती म्हणतात. गणेशोत्सवात मंडळाचे मालक आपापल्या परीने घरगुती गणपतीचे पूजन करतात. पण वालावलकर, मटकर, तेलंग ही कुटुंबे दशावतारी मंडळाच्या पेटार्यातील लाल गणपतीप्रमाणेच मूर्ती आपल्या घरी आणतात आणि पूजन करतात. त्यात बदल करता येत नाही. सिंधुदुर्गातील प्रथेप्रमाणे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस किंवा अकरा दिवस गणपतीचे पूजन केले जाते. काही जण 21 दिवसही गणपती ठेवतात. मात्र प्रथेनुसारच गणपतीची मूर्ती घरी आणली जाते.
सिंधुदुर्गातील गावागावांमध्ये तिथीनुसार कार्तिक महिन्यापासून सुमारे चार महिने होणारे जत्रोत्सव म्हणजे दशावतारी नाटकांची जत्राच असते. जेथे जेथे जत्रा असेल, तेथे नाट्यप्रयोगाच्या आधी गणपतीचे पूजन मंडळाकडून केले जातेच, मंडळाच्या गणपतीच्या पेटार्यातील गणपतीला नवस बोलले जातात. अनेक भाविक हा गणपती आपल्या घरी घेऊन जातात आणि तेथे त्याची यथासांग पूजा करतात.
गणेशोत्सव आणि दशावतारी नाटक कंपन्यांच्या बाबतीत आणखी एक कथा सांगितली जाते. व्यासांनी महाभारताची रचना केली, ते महाभारत गणपतीने लिहून काढले. गणेशचतुर्थीच्या दिवशी महाभारताच्या लेखनाला प्रारंभ झाला आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी लेखन पूर्ण झाले. अत्यंत एकचित्ताने गणपतीने महाभारत लिहिले. त्यावेळी तो एवढे दिवस एकाच जागी बसून होता. त्यामुळे त्याच्या अंगाची लाही लाही झाली. तो दाह शमविण्यासाठी व्यासांनी गणपतीच्या अंगावर मातीचा लेप दिला. त्यामुळे गणपतीच्या अंगाची आग शांत झाली. या सार्या कथेचा गणेशोत्सव आणि दशावतारी लोककलेचा थेट संबंध लावला जातो. गणेशोत्सवात अकरा दिवस गणपतीची पूजा करण्याची प्रथा तेव्हापासूनच सुरू झाल्याचे मानले जाते.
दशावतारी नाटकांमध्ये प्रामुख्याने महाभारतातील कथांचे सादरीकरण होते. प्रत्यक्ष गणपतीनेच महाभारत लिहिले असल्यामुळे लोककलेच्या माध्यमातून ते सादर करताना गणपतीचे स्मरण करणे आद्यकर्तव्य आहे, असे मानले जाते. म्हणूनच गणपतीला या लोककलेचा सारथी म्हटले जाते. अनेक प्रसंगांवर मात करण्याची ऊर्जा गणपती देतो. त्यामुळेच अगदी अडाणी कलाकारसुद्धा तोंडाला रंग फासला की रंगमंचावर गेल्यानंतर उत्तम बोलतो. दशावतारी नाटकाला लिखित संहिता नसते. उत्स्फूर्तपणे प्रत्येक कलाकार त्या वेळच्या आख्यानानुसार संवाद फेकत असतो. प्रत्येक पात्राची पल्लेदार स्वगते, स्पष्ट उच्चार, कमावलेले आवाज, पुरुषांनी साकारलेली ‘स्त्री’ भूमिका आणि संगीत नृत्यमय लढाया! दशावतारी नाट्यात नेहमी देवांनी दानवांशी केलेला संघर्ष, त्यातून दृष्ट प्रवृत्तीचा झालेला नाश आणि अंतिम विजय सत्याचाच होतो, याचे दर्शन होते.
दशावतारात पात्रपरिचय करून दिला जात नाही. नारद, शंकर, विष्णू ही पात्रे रंगभूषेवरून, वेशभूषेवरून ओळखू येतात; पण त्या दशावतारी नाटकाचा नायक- राजा किंवा खलनायक, राक्षस, त्यांच्या पत्नी आपला उल्लेख पल्लेदार स्वगतामधूनच करतात. ते प्रारंभीचे पल्लेदार स्वगत समोरील प्रेक्षक एकाग्रतेने ऐकत असतात आणि त्यानुसार मनात कथानकाची बांधणी करतात. नटदेखील दशावतार सादर होत असताना समोरील पात्राच्या संवादानुरूप आपल्या संवादाची बांधणी रंगमंचावरच करीत असतात. स्वतःची भूमिका सादर करीत असताना दशावतारी कलाकाराला कोणीही दिग्दर्शक नसतो. मूळ ग्रंथातील त्या पुराणकथेला कोणताही धक्का न पोहोचवता नाटक पुढे जात असते. शेवटपर्यंत तो नट त्या पुराणकथेशी आणि आपल्या प्रेक्षकाशी प्रामाणिक राहतो. उत्स्फूर्तपणे बोलण्याची ही बुद्धी फक्त गणपतीच देतो, अशी त्यांची श्रद्धा आहे.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दशावतारी नाट्य मंडळाचे मालक आणि त्यातील वाद्यवृंदासह बहुतेक सर्व कलाकार गणेशोत्सवातील विविध आयामांशी निगडित आहेत. अनेकांच्या मूर्तिशाळा आहेत, अनेक जण या मूर्तिशाळांमध्ये माती मळण्यापासून मूर्ती तयार करणे आणि रंगविण्याचे काम करतात, काही जण उत्सवातील भजनांच्या साथीसाठी आवश्यक तबला-पेटी, नाल अशा वाद्यांची निर्मिती, दुरुस्ती अशा कामांमध्ये व्यग्र असतात. काही जण फुले, मखरे तयार करतात. आपल्या हृदयात गणपतीचे स्थान अढळ अशी त्यांची श्रद्धा असते.
बर्याच जाणकार मंडळींच्या मतानुसार अलीकडे दशावतारी नाट्यात बदल होत आहे. त्याचा ढाचा, रूप, रंग बदलत आहे. तो बदल एक पारंपरिक लोककला म्हणून दशावतारी कलेला मारक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अलीकडे सुशिक्षित तरुण एक छंद म्हणून दशावतारात येऊ लागले आहेत. कथादेखील पुराण सोडून काल्पनिक होऊ लागल्या आहेत. दशावतारांची नावे नाटक, सिनेमा या नावांवरून पडू लागली आहेत. काही तरुण दशावतारात न शोभणारे विनोद करू लागले आहेत. दशावतारी नाट्यमंडळींची पूर्वीची हलाखीची परिस्थिती पालटून त्यात बदल झालेला आहे. ‘रात्रीचो राजा, सकाळी कपाळावर बोजा’ ही म्हण आता दूर गेली. बहुतेक सर्व दशावतारी नाट्य मंडळांकडे स्वतःची वाहने आहेत. पण अलीकडे सुशिक्षित कलावंतांचा भरणा दशावतारी कंपनीत झाल्यामुळे लोकांना आवडणारी चित्रपटगीते, नाट्यगीते दशावतारात गाऊ लागले. लढाईचा पारंपरिक नाच मागे पडत असून, त्याची जागा आधुनिक नृत्याने घेतली आहे. हे काळानुरूप झालेले वरवरचे बदल आहेत. तरीही दशावतारी नाट्यसंस्था, चालक आणि नटांची गणपतीशी असलेली निष्ठा मात्र अजूनही कायम आहे.