सहज बोलणे हित उपदेश...

विवेक मराठी    29-Aug-2025
Total Views |
@गीता गुंडे
वं. प्रमिलताईंच्या स्वर्गवासाची वार्ता ऐकून खूप दु:ख झाले. माझ्यासाठी त्यांचे व्यक्तित्त्व आदर्श होते. एक महिला घरच्या जबाबदार्‍या सांभाळून अविरत राष्ट्रकार्य करत असताना सतत कार्यकर्त्यांना सांभाळणार्‍या प्रमिलताई आता आपल्याला पुन्हा भेटणार नाहीत. त्यांची उणीव भरून न निघणारी आहे. त्यांच्या बरोबर असतांना मिळालेले पाथेय सतत आठवत राहील व कामासाठी मला व सर्वच कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहतील.

vivek
 
माझी व प्रमिलताईंची (त्यांचं नाव प्रमिला असं असलं तरी सर्वजण त्यांना प्रेमाने प्रमिलताईच म्हणत असत.) अधिक ओळख अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करायला लागल्यानंतर (1985 नंतर) झाली. त्यापूर्वी त्यांना एकदोनदा संघ समन्वय बैठकीत पाहिले होते. खरा परिचय त्यानंतर झाला. 1988 मध्ये डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी निमित्त. माझ्या आठवणीत ’विवेक’ तर्फे देवळाली येथे 20-25 कार्यकर्त्यांची एक कार्यशाळा झाली होती. तेथे परिवारातील प्रमुख संघटनांच्या प्रांत महिला प्रमुख व काही कार्यकर्ते पण होते. महिला विषयावर चर्चा झाली होती. तेव्हा त्यांच्याशी प्रथमच परिचय, गप्पा झाल्या. स्त्रियांनी सक्रिय व्हावे या वं. प्रमिलताईंच्या विचाराची ओळख झाली. व्यवहारातील त्यांच्या सहजतेचा मनावर कायमस्वरूपी ठसा उमटला.
 
त्यावेळच्या आपसांतील चर्चेमधून असे समविचारी महिलांनी भेटत राहिले पाहिजे, असा विचार आला व त्यातून महिला समन्वयाचे काम सुरू झाले. एकाच विचाराने प्रेरित होऊन विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या प्रमुख महिलांचा महिला समन्वय बैठकीतून घनिष्ठ परिचय झाला. त्यांचा सगळ्यानांच उपयोग झाला. विशेष म्हणजे प्रमिलताई वयाने, कार्याने, अनुभवाने आमच्यापेक्षा कितीतरी वरिष्ठ असूनही चर्चा, मार्गदर्शन करण्यात त्यांचा कुठेही मोठेपणाचा भाव नसे. मी विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ काम करायला लागल्यानंतर माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने, विचारांनी परिपक्व महिला कोणीच नव्हती. ती माझी गरज, उणीव प्रमिलताईंच्या रूपाने भरून निघाली.
 
स्त्रियांनी स्वावलंबी, कर्तृत्ववान, सक्षम होऊन राष्ट्रकार्याला केवळ हातभार लावावे असे नाही, दुय्यम भूमिका म्हणून नाही, तर आपल्या क्षमताचा पूर्ण विकास करीत समाजकार्यात, राष्ट्रकार्यात आपला प्रमुख पूर्ण सहभाग असावा, असा त्यांचा आग्रह असे. स्त्री शक्तिस्वरूपा आहे, अबला नाही असा विचारही त्या मांडत असत महिलांच्या प्रश्नांसंबंधी, स्थितीविषयी त्या संवेदनशील होत्या. महिला समन्वयाच्या बैठकींतून महिलासंबंधी विषयांवर आपली भूमिका काय असावी, अन्यायाची घटना घडल्यास त्यावेळी आपण काय करावे याचा विचार होतो. त्यावेळी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. आपली संस्कृती आणि परंपरांची जपणूक करावी, त्याचबरोबर मूल्यांची जपणूक करीत आधुनिक काळांत आवश्यक असे बदल अवश्य करावेत, असाही त्यांचा विचार होता.
 

vivek
1980 च्या दशकात स्त्रीमुक्ती आंदोलन सुरू झाले होते आणि त्यांचा विचार हा परंपरा तोडणारा, कुटुंबव्यवस्थेवर आघात करणाराही होता. वं. प्रमिलताई म्हणत की, कुटुंबात महिलांवर होणारा अन्याय दूर केलाच पाहिजे. परंतु ह्यासाठी कुटुंबव्यवस्थेवर आघात होता कामा नये याचीही काळजी घ्यावी लागेल. राष्ट्र सेविका समितीमध्ये स्व. वं. लक्ष्मीबाई केळकर (मावशी) यांनी महिलांची शारीरिक क्षमता ही स्वसंरक्षण करण्याची असावी ह्यासाठी शाखा माध्यमातून प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर बौद्धिक क्षमतेचाही विकास करण्याचा विचार केला. वं. प्रमिलताईंनी गेल्या अनेक वर्षांत नवीन आयाम जोडण्याचे प्रयत्न केले. पूर्वांचल, पंजाब, जम्मू काश्मीर या ठिकाणी संवेदनशील, प्रदेशांमध्येही काम करण्यासाठी सेविकांना प्रवृत्त केले; प्रोत्साहन दिले व काळजीही घेतली. महिला समन्वयाच्या अ. भा. कार्याची जबाबदारी माझ्यावर 1993 साली आली. त्यावेळी त्यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा अनेक वेळा होत.
 
नागपूरला गेल्यावर अहिल्या मंदिरांत त्यांना व वं. उषाताई यांना भेटायला जाणे सुरू झाले. त्यानंतर त्यांच्या आग्रहामुळे प्रवासांत तिथे राहणे सुरू झाले. त्यामुळे त्यांचा दिनक्रम, व्यवस्थितपणा, त्यांचा कार्यालयातील वावर, सर्वांची विचारपूस, छात्रावासांतील मुलींशी प्रेमाने वागणे, याचा अनुभव घेता आला. त्यांच्यापैकी कोणी विशेष प्राविण्य मिळविले असल्यास तिचे कौतुक करून त्या सर्वांना खाऊ वाटत असत. कार्यालयांत येणार्‍या प्रत्येकाला काहीतरी खाऊ हातावर ठेवल्याशिवाय जाऊ देत नसत. पुन्हा पुन्हा परत येण्याचे निमंत्रण देत असत. असं त्यांच व्यक्तित्त्व मला कार्यालयात राहिल्यामुळे अनुभवता आले.
 

vivek
माहिला समन्वयाच्या अखिल भारतीय बैठकींना सुरुवातीपासून त्या नेहमी उपस्थित असत. गेले काही वर्ष त्या प्रकृतीमुळे येऊ शकत नसत. त्यांची अनुपस्थिती जाणवत असे. बैठकींतील त्यांचा वावर मला खूप काही शिकवून गेला. त्या मधल्या वेळामध्ये उभे राहून अनेकांशी गप्पा मारीत असत, विचारपूस करीत, काही सुचवतही असत. आम्ही काही जणी बैठकीविषयी त्यांच्याबरोबर बसून ठरवित असू. त्या नेहमी काही नवीन विषयही सुचवत असत. पण कधीही हे झालंच पाहिजे, असे म्हणत नसत.
 
समन्वयाची जबाबदारी माझ्याकडे आल्यावर मला त्यांचे खूप सहकार्य मिळाले. माझ्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने आणि मानाने त्या खूप मोठ्या होत्या, तरीही त्यांनी तसे कधी वागण्यातून वाटू दिले नाही. अगदी सहजतेने बोलणे होत असे.
 
 
एकदा मी व अभाविपचे एक-दोन कार्यकर्ते स्व. दत्तोपंत ठेंगडीजींना सहज भेटायला गेलो होतो. सकाळचा अल्पोहार घेता घेता त्यांच्याशी बोलत होतो. तेव्हा ते म्हणाले होते, बौद्धिक व भाषणांतून कार्यकर्ते कमी घडतात, पण अशा सहज गप्पांतूनच कार्यकर्ते खरे घडत जातात. याचा मला पुरेपुर प्रत्यय स्व. प्रमिलताईंबरोबर आला. मी त्यांची बौद्धिकं फारच कमी ऐकलीत. परंतु अनौपचारिक गप्पा व त्यांचा कार्यकर्त्यांशी व्यवहार, बैठक कार्यक्रमातील त्यांचा वावर यातून मला खूप काही कळत-नकळत मिळत गेले.
 
 
माझ्या हृदयांत कायम कोरला गेलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख इथे अवश्य करावसा वाटतो. 1993 मध्ये महिला समन्वयाचे काम सुरू झाल्यानंतर 5-6 वर्षेच लोटली होती. एक अभ्यासवर्ग (अखिल भारतीय) आयोजित केला होता. त्याचा समारोप प्रमिलताईंनी करावा असे ठरले होते. दुपारी त्या मला म्हणाल्या, गीता, समारोपाचे भाषण लिहिले आहे. ते वाचून बघ, काही सुचवायचे असेल तर जरूर सांग. मला खूप संकोच वाटला, कारण त्या सर्व दृष्टीने माझ्यापेक्षा वरिष्ठ होत्या. मी म्हटले की, याची काहीच आवश्यकता नाही. त्या म्हणाल्या, तू समन्वयाची प्रमुख आहेस, तुला माहीत असलेच पाहिजे. ही त्यांची संघटनशरणता होती. माझ्या दृष्टीने ही खूपच मोठी गोष्ट होती. हा त्यांचा मोठेपणा खूप काही शिकवून गेला.
 
 
चालू घडामोडीसंबंधी त्या अतिशय सतर्क होत्या. त्यासंबंधी त्यांचे मत त्या संबंधित व्यक्तींना आवर्जून फोन करून सांगत. महिलांविषयी काही असेल तर त्या मला सांगत की, गीता, यावर आपल्याला काही तरी आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. आपला विचार मांडला पाहिजे. केवळ महिलांचा नाही तर राष्ट्रहिताचा विचार त्या करीत असत. त्यामुळे देशविदेशांतील चालू घडामोडी संबंधातही चिंता व्यक्त करीत असत.
 
स्व. प्रमिलताई स्मृतींच्या रूपाने सतत येणार्‍या पिढ्यांनाही प्रेरित करीत राहतील. त्यांना माझे शत शत प्रणाम!
 
- लेखिका अ. भा. महिला समन्वयाच्या
पूर्व संयोजिका आहेत.