श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथुनिया नुठवूं माथा

विवेक मराठी    05-Aug-2025
Total Views |
@प्रा. डॉ. ज्ञानेश्वर भामरे
9421548377
Sant Tumkaram Maharaj 
तुकोबांची अभंगगाथा ज्या देहू मावळ परिसरात लिहिली गेली त्या परिसरात असणारा श्रीक्षेत्र भंडारा डोंगर म्हणजे तुकोबांचे साधनास्थान. आजही या डोंगरावर ती गुहा आहे. या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर ज्या ठिकाणी पांडुरंगाचा चरणस्पर्श झाला. तेथेच महाराष्ट्रातील वारकरी, समाजातील दानशूर व्यक्ती व विविध संस्था यांच्या आर्थिक मदतीने भव्य असे मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला होता. आज या मंदिराचे 80 टक्के काम झाले आहे. येत्या दोन वर्षात मंदिर पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आहे. हे मंदिर कसे उभारले जात आहे याची माहिती देणारा लेख..
संत तुकाराम महाराजांचा 375 वा वैकुंठागमन सोहळा अर्थात ’त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव’ अलीकडेच महाराष्ट्रातील देहूसह विविध ठिकाणी संपन्न झाला. महाराष्ट्रात असे एकही गाव नाही जेथे तुकोबांचा अभंग पोहोचला नाही अथवा म्हटला जात नाही. वेदशास्त्रसंपन्न रामेश्वरशास्त्री भट यांनी तर तुकोबांची आरती रचून ’तुकीता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले’ असा महिमा गायिला आणि ’तुका विष्णू नाही दुजा’ असे म्हणून संत तुकाराम महाराजांचे संतत्व व देवत्व मान्य केले. तुकोबांची अभंगगाथा ज्या देहू मावळ परिसरात लिहिली गेली त्या परिसरात असणारा श्रीक्षेत्र भंडारा डोंगर म्हणजे तुकोबांचे साधनास्थान. आजही या डोंगरावर ती गुहा आहे जेथे तुकोबा ध्यानधारणा आणि पूर्वाश्रमीच्या वारकरी संतांच्या ग्रंथांचे चिंतन-मनन करीत.
 
 
श्रीक्षेत्र भंडारा डोंगर महात्म्य
 
महिपती ताराबादकर यांनी 3484 ओव्यांत संत तुकारामांचे चरित्र लिहिले आहे. ते या डोंगराचे महात्म्य वर्णन करताना म्हणतात, ’एकदा तुकोबांच्या पत्नी जिजाई (तुकोबा ज्यांना ’आवली’ म्हणत) भंडारा डोंगरावर भाकरी व भोपळाभर पाणी घेऊन भर दुपारी तळपत्या उन्हात अनवाणी जात होती. तुकोबा जेवल्याशिवाय आपण जेवायचे नाही असे तिचे व्रतच होते. जाताना तिच्या पायात काटा रुतला, तो निघता निघेना. पायातून रक्तस्त्राव होत होता. भोपळ्यातील पाणी सांडले गेले. आता काय करावे म्हणून ती रडत होती. पांडुरंगास तिचे दुःख बघवेना. पांडुरंग तिच्या समीप गेले. (संदर्भ अ.7/ओवी 65 ते 71). आवली म्हणे ते वेळा । हा का येथे पातला मेला । भ्रतार माझा वेडा केला । संसारी अवकळा याचेनी॥ (अ.7/ओवी89). पांडुरंगाने तिच्याकडे पाहिले की, ती दुसरीकडे पाहात असे, परंतु अष्टदिशेला तोच दिसत होता.(अ 7./91)... ऐसे म्हणवोनी पंढरीरायें । मांडीवरी घेतला तिचा पाय। कांटा काढून टाकीला पाहें । दुःख नोहे अणुमात्र ॥ कृपादृष्टी पाहतांचि देव । मागील क्लेश विसरली सर्व । तो माया लाघवी देवाधिदेव । न कळे माव ब्रम्हादिकां ॥ (अ.7/ओ.107,108) पुढे महिपती म्हणतात - धन्य भंडारा डोंगर जाण । यासी लागले पांडुरंगाचे चरण। धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण । जेथे वैष्णवजन अवतरला ॥ (अ.7/ओ.166).
 
 
या डोंगरावर सुमारे 400 वर्षांपूर्वीचा नांदूरकी वृक्ष आहे. या वृक्षाखाली तुकोबा अभंग म्हणत आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सुदुंबरे गावचे संताजी जगनाडे ते अभंग लिहून घेत असत.
 
संत तुकाराम महाराज यांनी ध्यानधारणा केलेली गुहाSant Tumkaram Maharaj 
 
 
छत्रपती शिवरायांना व मावळ्यांना क्षात्रधर्माचा उपदेश
 
छत्रपतींनी तुकाराम महाराजांना पाठविलेला नजराणा त्यांनी विनम्रपणे परत पाठविला, तेव्हापासून तुकोबांची निर्लोभवृत्ती पाहून शिवरायांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर अधिकच दुणावला. ते तुकोबांची कीर्तने, उपदेश श्रवण करीत. हा उपदेश तुकोबा सार्वजनिकरित्या न करता गुप्तपणे देहू-मावळ परिसरात शिवाजी महाराजांच्या होणार्‍या भेटीदरम्यान करीत असावेत. कारण परचक्र (इस्लामी सत्तेचे) हल्ले या प्रांतात होत असत.
 
गनिमी कावा कसा करावा
 
तुकोबा म्हणतात, पाईकाला (सैनिकाला) चोरवाटा ठाऊक असाव्यात, पाठलाग करणे, माग काढणे, याबाबतीत तो तरबेज असावा, शत्रूला स्वतःचा मागमूसही लागू देता कामा नये, त्याने आपले रक्षण करून शत्रूचे वर्चस्व हरून घ्यावे. असा पाईक त्रैलोकीचा धनी (बलवंत) म्हणून शोभतो. (अभंग क्र.1064, तुकारामगाथा, शासकीय प्रत). गोळ्या, बाणांचा भडिमार पाईकाने सहन करावा (1063), त्याने जीवावर उदार व्हावे (1062) असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
स्वामीस उपदेश
 
स्वामी म्हणजे छत्रपती शिवरायांना उपदेश करताना संत तुकाराम म्हणतात- स्वामीला पाईकांमध्ये, त्यांचे कर्तृत्व पाहून श्रेष्ठ-कनिष्ठ असा स्तर, दर्जा ठरवावा लागतो. कर्तृत्ववान बलवान अशा पाईकांचे मोल ठरविले पाहिजे. (1069) केवळ वेतन खाऊन प्रत्यक्ष युद्धप्रसंग आला म्हणजे पळ काढणारे पाईक असतात, अशा पाईकांमुळे इतरांचे धैर्य खचू शकते. अशा पाईकांची भ्याड, पळपुटे म्हणून अवहेलना होण्यापेक्षा त्यांचे पाय कापणे उचित होय (1071).
 
 
थोडक्यात, ज्या मावळ प्रांतात तुकोबांनी क्षात्रधर्माचा उपदेश केला, तो मावळप्रांत भंडारा डोंगराच्या पायथ्याशी आहे. हा केवळ उपदेश नसून पाईकाने स्वामींशी कसे वागावे, तसेच स्वामींनी पाईकांशी कसे वागावे, याची आचारसंहिता व नीतिशास्त्रच आहे.
इथे उभे राहत आहे संत तुकारामांचे वैभवशाली मंदिर
 
या मंदिराचे काम स्थापत्यशास्त्राच्या नागरशैलीत होत असून वास्तुविशारद म्हणून पद्मश्री सन्मानित चंद्रकांत सोमपुरा हे आहेत. त्यांना परेशभाई सोमपुरा, निखिल सोमपुरा, रमेशचंद्र सोमपुरा सहाय्यक म्हणून आहेत. या वास्तुविशारदांना भारतातील अयोध्येमधील राममंदिरासह अक्षरधाम, सोमनाथ मंदिर तसेच परदेशातील (यूएसएमधील) हिंदू, जैन मंदिरांसह अनेक भव्य मंदिरे उभारण्याचा अनुभव आहे.
 
सदर मंदिराची वैशिष्ट्ये
 
राजस्थानातील बन्सीपहाडपूरच्या गुलाबी दगडात मंदिराचे स्तंभ, स्तंभावरील मूर्ती, परिक्रमा मार्गातील मंडोवरमूर्ती, दिशादेव मूर्ती (मंडोवर गोखला), तुकाराम महाराजांच्या जीवनावरील भिंती-शिल्पे, मंदिराचे तीन मोठे दरवाजे, बीम, छत यांचा समावेश आहे. मंदिरात विठ्ठल-रखुमाई व संत तुकारामांची मूर्ती ह्या मुख्य जागेवर येणार आहेत.
 
 
भक्तांसाठी प्रदक्षिणामार्ग छतावर मंडपावर भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम व कोरीवकाम केले आहे. मंदिराबाहेरील खांब हे चौरसाकृती आणि आतील खांब अष्टकोणाकृती असून त्यावर 2200 वैष्णवांच्या मूर्तींचे कोरीवकाम केलेले असेल.
 
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे संत तुकाराम महाराजांनी ज्या वृक्षाखाली बसून साधना केली तो 400 वर्षांपूर्वीचा नांदुरकी वृक्ष हा मंदिराचाच एक भाग असणार आहे.
 
श्री विठ्ठल-रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट
 
उपरोक्त ट्रस्टची स्थापना तुकोबारायांवर श्रद्धा असणार्‍या देहू, मावळ पंचक्रोशीतील शेतकरी कुटुंबातील वारकर्‍यांनी केली. या ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, सदर मंदिरासाठी कराळे-पाटील परिवाराने जमीन उपलब्ध करून दिली, तर काही जमीन ट्रस्टने खरेदी केली. ज्ञानोबा-तुकाराम यांचे विचार ही प्रेरणा होतीच, पंचक्रोशीतील भाविक एकत्र येऊन एक सभा घेण्यात आली. मंदिर उभारावे असे ठरले, पण ते कसे असावे, कसे बांधावे याबाबत आम्ही संभ्रमात होतो. माझे स्नेही गजानन बापू शेलार व आम्ही काही मंडळी भारतभर फिरलोत. अनेक भव्य व वैभवशाली मंदिरे पाहिलीत. त्यातून सर्वोत्कृष्ट पाच कोणती हे ठरविले. चर्चेअंती अशा मंदिरांसारखे एखादे मंदिर येथे असावे असे ठरले.
 
 
भंडारा डोंगरावरील दगड हा टणक असल्याने त्यावर नक्षीकाम करणे कठीण होईल म्हणून आम्ही राजस्थानातील गुलाबी रंगाचा दगड निवडला की, ज्याचे आयुष्य 2000 वर्षे आहे आणि जो अयोध्येतील राममंदिरासाठी वापरला गेला. अयोध्येतील राममंदिर उभारणार्‍या वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांना या संदर्भात भेटलो. त्यांनी सुमारे 100 कोटी रुपये लागतील, असे सांगितले. आम्ही त्यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक केली. मध्यंतरी कोरोना महामारीमुळे मंदिराचे काम काही काळ बंद पडले, जीएसटी 18 टक्के झाला, अशा अनेक कारणांमुळे बांधकामाच्या दरात देखील वाढ झाली. महाराष्ट्रातील वारकरी, विविध पक्षाचे राजकारणी, उद्योगपती, विविध संस्था यासाठी आर्थिक मदत करीत आहेत. मंदिराचे 80 टक्के काम झाले आहे. येत्या दोन वर्षात मंदिर पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आहे. शासनास मंदिरांना थेट देणगी येता येत नाही, परंतु परिसर विकास करता येतो म्हणून मंदिरासाठी सर्वांनी आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
ते पुढे म्हणाले की, श्रीक्षेत्र देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले असता, त्यांच्याशी पाच मिनिटे भेटीचा वेळ मिळाला. त्या दरम्यान त्यांना मंदिर बांधकामाविषयी सर्व कल्पना दिली व मंदिर पूर्णत्वास आल्यानंतर उद्घाटनास येण्याचे निमंत्रणही दिले. त्यांनी माहिती ऐकून शासनातील संबंधित व्यक्तींना दखल घेण्यासंदर्भात आश्वासन दिले व सकारात्मक प्रतिसाद दिला.
 
 
केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी डोंगरालगतची 100 एकर गायरान जमीन परिसर विकासासाठी दिली. त्यात कॉरिडोर, भक्तनिवास, पाच किलोमीटरचा भंडारा डोंगर प्रदक्षिणामार्ग इ. चा समावेश आहे.
 
 
आजच्या युवकांना अशी भव्य मंदिरे आकर्षित करतात देवदेवता, संत-महापुरुष त्यांचे कार्य जाणून घेण्याची जिज्ञासा, श्रद्धा निर्माण होते. मग अशी मंदिरे संस्कृती संक्रमणाची केंद्रे ठरतात. ट्रस्टच्या माध्यमातून डोंगरावर येणार्‍या भाविकांसाठी दररोज अन्नदान केले जाते. तुकाराम महाराजांची जन्मतिथी वसंत पंचमी आणि त्यांचा माघ शुद्ध दशमी हा अनुग्रह दिन या निमित्ताने कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. वर्षाकाठी सुमारे सव्वा लाख भाविक भेट देतात.
 
अशा या पवित्र श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर ज्या ठिकाणी पांडुरंगाचा चरणस्पर्श झाला, त्या भूमीत श्रद्धेने नतमस्तक झालेला माथा उठवूच नये असे वाटते. तुकोबारायांच्या अभंगाचा आधार घेत म्हणावेसे वाटते की, ’येथुनिया नुठवूं माथा!
संदर्भ :
1. ’तुकाराम गाथा’ - शासकीय प्रत.
2. ’तुकाराम दर्शन’ - डॉ. सदानंद मोरे.
3. श्री महिपती कृत ओवीबद्ध ’श्री तुकाराम चरित्र’
4. ’श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट’ चे अध्यक्ष श्री बाळासाहेब काशीद यांच्याशी झालेला संवाद.
5.Web - http://devstan.rajstangov.in(pdf)
dnyaneshwarbhamare900@gmail.com
लेखक तुकाराम गाथेचे अभ्यासक आहेत.