जिवाभावाची सुहृद आणि सहकारी

विवेक मराठी    12-Sep-2025
Total Views |
डॉ. विद्या देवधर
- 9440372777
 
pramilatai medhe  
प्रमिलाताईंच्या निधनाने समितीच्या ज्येष्ठ सेविका सुशीलाताई महाजन यांना खूप दु:ख झाले. आपल्या बरोबरीची समितीतील सहकारी आणि जिवाभावाची सुहृद जग सोडून गेल्याचे ते दु:ख होते. दोघीही समवयस्क आणि दीर्घकाळ समितीत एकत्र काम केलेल्या सहकारी. म्हणून सुशीलाताईंच्या ज्येष्ठ कन्या विद्याताई देवधर यांनी सुशीलाताईंनाच प्रमिलाताईंच्या आठवणी सांगण्याचा आग्रह केला. त्या आठवणींमधून त्यांच्यातील स्नेहमय नात्याला उजाळा मिळाला. 97 वर्षांच्या सुशीलाताई रोज एक आठवण फोनवर त्यांना सांगत होत्या.
वंदनीय प्रमिलाताई मेढे यांना मी अगदी लहानपणापासून पाहात आले आहे. दहावी-अकरावीनंतर समितीच्या वर्गांवर शिक्षिका म्हणून जाऊ लागल्यावर त्यांची भेट होत असे. नागपूरला 1973 मध्ये मी तृतीय वर्ष करायला गेले, त्यावेळी त्यांचा अधिक सहवास मिळाला. माझ्या लग्नाला त्या मुंबईला आल्या होत्या आणि माझ्या मुलीच्या, करिश्माच्या लग्नाला नागपूरलाही होत्या. कस्तुरीला मुलगा झाला तेव्हा सुशीलाताई पणजी झाली, याचे त्यांना खूप कौतुक वाटले. वंदनीय उषाताई आणि वंदनीय प्रमिलाताई या दोघी आपला पणतू पाहायला आवर्जून घरी आल्या होत्या.
 
 
प्रमिलाताई आपल्याशी इतक्या प्रेमाने व आपुलकीने बोलतात याचं मला अप्रूप तर वाटतच असे. पण त्या सर्वच सेविकांशी अशाच प्रेमाने वागत होत्या. म्हणून याचं कारण माझा समितीशी असणारा संबंध हे नसून मी सुशीलाताईंची मुलगी आहे याच्याशी अधिक आहे. मला त्यांना जास्त वेळा भेटता आले, सहजपणे बोलत आले, कारण माझी आई सुशीला महाजन आणि प्रमिलाताई या अगदी बरोबरीच्या. मला आठवतंय तेव्हापासून आई समितीची मुंबई प्रदेशाची सहकार्यवाहिका आहे. त्यामुळे प्रांतिक बैठकीच्या वेळी आईची आणि त्यांची भेट होतच होती. 1964-65 पासून आई अखिल भारतीय बैठकींना जाऊ लागली. पुढे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि समितीच्या भारतातील 55 प्रतिष्ठानांची प्रमुख म्हणून तिने जबाबदारी सांभाळली. त्यामुळे आईची आणि प्रमिलाताईंची नियमितपणे भेट होऊ लागली. प्रमिलाताईंच्या निधनाने आईला खूप दु:ख झाले. आपल्या बरोबरीची समितीतील सहकारी जग सोडून गेल्याचे ते दु:ख होते. म्हणून आईलाच मी प्रमिलाताईच्या आठवणी सांगण्याचा आग्रह केला. तिच्या आठवणींना, त्यांच्यातील स्नेहमय नात्याला उजाळा मिळाला. आई रोज एक आठवण फोनवर संगत होती.
 
 
‘अहिल्या मंदिर जेव्हा घेतलं तेव्हा आजच्यासारखी मोठी इमारत नव्हती. समोर मोकळी जागा भरपूर होती आणि माडीवर एक खोली होती. तिथे प्रमिलाताई राहात होत्या. त्या एकाच खोलीत त्यांचं स्वयंपाकघर आणि सर्व वावर असायचा. अखिल भारतीय बैठकीच्या वेळी मी, प्रमिलाताई, शकुनताई वर्‍हाडपांडे, वंदनीय उषाताई आणि प्रभाताई देशपांडे या सर्व समवयस्क मैत्रिणी भेटत होत्या. बैठकीत सुद्धा आम्ही पाच जणी सतत बरोबर राहात असू. रात्री उषाताई, शकुनताई आणि प्रभाताई या तिघीजणी झोपायला आपल्या घरी जायच्या. मी आणि प्रमिलाताई मात्र त्यांच्या घराच्या खाली पायरीवर बसून रात्री खूप वेळ गप्पा मारत असू. आमच्या गप्पा म्हणजे समितीचे कार्य किती वेगवेगळ्या प्रकाराने वाढवता येईल याबद्दलच्या चर्चा होत्या. आम्हाला दोघींनाही वाचनाची आवड होती. समितीच्या कार्याबद्दल दृष्टीकोन स्पष्ट होता. या चर्चांमधून अनेक नवीन विषय आम्हाला सुचत गेले. अशाच एका गप्पांमध्ये प्रत्येक प्रांताला कार्यवाहिका असतेच, पण केंद्राकडून एक पालक अधिकारीही असावा अशी कल्पना आम्हाला सुचली. दुसर्‍या दिवशी बैठकीमध्ये ती मांडली गेली आणि सर्व ज्येेष्ठ मंडळींनीही ती उचलून धरली. पुढे पालक अधिकारी म्हणून कार्यवाहीतही आणली गेली. प्रमिलताईंना त्यावेळी आसाम आणि केरळ दिला होता तर माझ्याकडे गुजरात होता...’असे सांगून आई पुढे म्हणाली, ‘प्रमिलाताईंचे आणखी एक वैशिष्ट्य मला इथे मुद्दाम सांगायचं आहे. आम्ही दोघीजणी रात्री साडेबारा-एक वाजेपर्यंत बोलत बसलो तरी प्रमिलाताईंचा पहाटे साडेचार वाजता उठण्याचा नेम कधीही बदलला नाही. तो अगदी अलिकडेपर्यंत टिकून होता.’
 
 
प्रमिलाताईंना लवकर उठण्याची तर सवय होतीच पण आपलं लुगडंही त्या कायम स्वतः धुवत होत्या. नीटनेटकं चापूनचोपून लुगडं नेसणं हेही त्यांचं आणखी एक व्यवस्थितपणाचं उदाहरण म्हणता येईल. मीही नागपूरला अनेकदा गेले, राहिले. तेव्हा प्रमिलाताई उठून पहाटे त्यांचे सर्व आवरताना मधले दारही लावून घेत. प्रकाशाने आणि आवाजाने आमची झोपमोड होणार नाही याची काळजी घेत. नियमितपणे सकाळचं काही वाचन करून मग सहा वाजता प्रात:स्मरणाला सर्व मुली व सेविकांमध्ये येऊन बसत.
प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्वभाव असतोच, असे आम्ही आग्रहाने सांगतो. समितीच्या अधिकारी आणि प्रचारिकांच्या सहवासात हा अनुभव सर्वांनाच येतो. सुशीलाताई सांगतात,‘प्रमिलाताईंच्या सहवासात मला प्रेमळ जीवाभावाची बहीण भेटली होती. मधुकरराव महाजनांच्या निधनानंतर पंधराव्या दिवशीच वंदनीय ताईंनी मला केरळला पाठवले होते. त्यानंतर पुढे काही दिवसांनी प्रमिलाताईंबरोबरही केरळचा प्रवास होता. एक दिवस सकाळपासून माझं मन अगदी बेचैन होतं. त्यांच्या ते लक्षात आलं. दुपारी एकटीच मी जरा आडवी झाले आणि डोळाही लागला. जाग आली तेव्हा माझ्या शेजारी बसून प्रमिलाताई मला प्रेमाने थोपटत होत्या. माझा एकटेपणा अलगदपणे दूर करत होत्या. आम्ही दोघीजणी कितीतरी वेळ अशा एकमेकींच्या हातात हात धरून स्वस्थ बसलो. जणू आपले गुज एकमेकींना सांगत होतो.’
 
 
 
समितीचे कार्य म्हणजे प्रवास आणि संपर्क! प्रमिलाताईंनी तर अखंड प्रवास केला. वंदनीय मावशींबरोबरही प्रवास केला तसेच अखिल भारतीय सहकार्यवाहिका म्हणून वेगवेगळ्या प्रांतातून अनेकदा त्यांचा प्रवास होत असे. त्याची एक आठवण सुशीलाताईंनी आपल्या पुस्तकातच लिहिली आहे. ती अशी, ‘वसई विभागाच्या दिंडीसाठी माननीय प्रमिलाताई मेढे आल्या होत्या तेव्हा त्यांचा त्या विभागातही प्रवास ठरवला होता. त्यासाठी गोविंदभाई ठक्कर यांची गाडी मिळाली. मी, वसई विभागाच्या प्रमुख माननीय सुशिलाबाई वैद्य आणि माननीय प्रमिलाताई, प्रथम केशवसृष्टी पाहण्यासाठी गेलो. तेथून वज्रेश्वरीला गेलो. तोपर्यंत खराब रस्ता सोडला तर प्रवास सुखाचा चालला होता. संध्याकाळी साडेचार वाजता आम्ही पुढे जव्हार, तलासरीच्या प्रवासाला निघालो. प्रत्येक ठिकाणी आजूबाजूच्या खेड्यातल्या महिलांनाही बोलावले होते. प्रमिलाताई सर्वांशी संवाद साधत होत्या.
 
jk 
 
सुंदर टाररोडवरून आमची गाडी जेव्हा धावत होती तेव्हा सर्व प्रवासच निर्विघ्न झाल्यासारखा आम्ही अगदी खुशीत होतो. तोच गाडी एकदम थांबली. सारथी खाली उतरले. गाडीची समजूत घातली व गाडी पुन्हा सुरू झाली. तरी जरा कुरकुरतच गाडी पुढे सरकते आहे याची आम्हाला जाणीव होती. शेवटी साडेसहाच्या सुमारास मनोरच्या अलीकडे सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर गाडीने रस्ता सोडून आडरस्ता पकडला. दोन-तीन मिनिटांत तिथे एक बैठे घर आम्हाला दिसले. ते विश्व हिंदू परिषदेने वनवासी लोकांसाठी सुरू केलेले आरोग्यकेंद्र होते. त्याला गोविंदभाईंची सर्व मदत होती. आमच्या गाडीचे सारथी पूर्वी तिथे येऊन गेल्यामुळे त्यांची तेथे चांगली ओळखही होती. तीन-चार कार्यकर्तेही होते. गाडी तेथे पोचल्यावर थोडा वेळ प्रयत्न करून पाहिले.
 
 
पेट्रोल संपले असे वाटले म्हणून आम्ही तिघीजणी द्रुतगती मार्गावर उभ्या राहून येणार्‍या जाणार्‍या गाडीला हात दाखवून मदत मागत होतो. शेवटी एका सरदारजीला आमची दया आली, त्यांनी एक गॅलन पेट्रोल आम्हाला दिले पण तेवढ्यानेही उपयोग झाला नाही. रात्रीचे आठ वाजून गेले होते. शेवटी आमच्या गाडीवाल्याने जाहीर केले की, गाडी पुढे जात नाही. आम्ही अवाक होऊन एकमेकींकडे बघतच राहिलो. तिथले कार्यकर्ते म्हणाले, ‘आम्ही इथे बायकांना राहू देत नाही पण तुम्ही अडचणीत आहात आणि गोविंदभाईंच्या गाडीने आला आहात म्हणून इथे राहा.’
 
 
भवताली किर्रर्र रान, मानवी वस्तीही या ठिकाणाहून लांब आणि घर म्हणजे एक मोठा हॉल आणि त्याच्या चारी बाजूंनी फक्त जाळ्या, भिंती तर नाहीतच. नाही म्हणायला वैद्यकीय तपासणीची आणि औषधाची अशी खोली होती. पण ती खोली उघडून द्यायला ते कार्यकर्ते तयार नव्हते. रात्री मुक्कामाला मनोरला जायचे म्हणून जवळ खाण्याचेही काही नाही. शेवटी त्या कार्यकर्त्यांनीच आम्हाला वरण-भात जेवायला घातला आणि ते त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी निघून गेले. आमचा गाडीवानही त्यांच्याबरोबर गेला. त्या काळोख्या रात्री जवळजवळ उघड्या अशा या घरात थंडीने कुडकुडत आम्ही सकाळ उजाडण्याची वाट पाहत होतो.
 
 
शेवटी एकदाचे थोडे उजाडले. झोपलो नव्हतोच तेव्हा उठण्याचा प्रश्नच नाही. त्या गाडीवानाला आमचा जव्हारचा पत्ता देऊन दुपारी चार वाजेपर्यंत या गाडीची लहर लागली तर येण्यास सांगितले होते. आम्ही आमची बोचकी उचलून हमरस्त्यावर येऊन उभ्या राहिलो. अंधुक दिसू लागले होते. पुन्हा मनोरला जाणार्‍या प्रत्येक वाहनाला आम्ही हात करू लागलो. शेवटी एका टेम्पोला आमची दया आली. त्यांनी मनोरपासून पाच किलोमीटर वरील चारोटी नाक्यावर आम्हाला नेण्याचे कबूल करून तेथे सोडले. त्यानंतर एक रिक्षा मिळाली आणि नऊच्या सुमारास आम्ही मनोरला पोहोचलो.
 
 
पुन्हा जव्हारला जाण्याची चिंता आम्हाला लागली. या धावपळीत प्रमिलाताईनी एकदाही नाराजी दाखवली नाही की काही कुरकुरही केली नाही. संध्याकाळी चार वाजता जव्हारला कार्यक्रम होता. बस सोयीची नव्हती. शेवटी एक सेविका, चंपानेरकर, यांच्याशेजारी एक मुसलमान सद्गृहस्थ होते, त्यांनी स्वतःच्या गाडीने आम्हाला जव्हारला पोहोचवले.
 
जव्हारला विक्रमगड आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या जवळजवळ दोन-अडीचशे बायका कार्यक्रमाला आल्या होत्या. कार्यक्रम छान झाला. तेथून आम्हाला तलासरीला जायचे होते. ते मुस्लीम बंधू आम्हाला सोडून मनोरला परत गेले होते. तोच आमचा गाडीवान आला आणि आम्ही समाधानाचा श्वास टाकला. संध्याकाळी सहा वाजता तलासरीला जायला निघालो. पुन्हा आमची परीक्षा सुरू झाली. आता दुसरा पेपर होता. अंधार पडला होता. रात्र वाढत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट जंगल होते. रस्त्यावर चिटपाखरुही नाही. फक्त आमची गाडी आणि त्या गाडीत आम्ही तिघी बायका. रस्ता संपता संपेना. मग आम्ही मोठ्याने रामरक्षा म्हंटली, भीमरूपी म्हटले. नंतर सुशीलाबाईंनी आम्हाला कथेकरी ढंगात एक गोष्ट सांगितली.
 
 
आम्ही आमच्या गाडीवानाला मधूनमधून सारखे, रस्ता चुकला नाही ना, असे विचारत होतो आणि कोणालातरी रस्ता विचार असे टुमणे लावत होतो. पण तो कोणाला विचारणार? झाडांना की आमच्या सावलीला? शेवटी आमच्या या विचारण्याने जेव्हा तोही चिडला तेव्हा कुठे आमची तोंडे बंद झाली. अखेर एका कोणत्यातरी गावाच्या चौरस्त्यावर आमची गाडी आली आणि त्या ठिकाणी आमच्या गाडीवानाला न जुमानता आम्ही रस्ता न चुकल्याची खात्री करून घेतली व निश्चिंत मनाने तलासरीला रात्री दहा वाजता पोचलो.
 
 
तेथे माधवराव काणे थोड्या काळजीनेच आमची वाट बघत होते. पुढचा कार्यक्रम आटोपून प्रवासाचा मोठा अनुभव गाठी बांधून आम्ही परत आलो. या अशा आगळ्यावेगळ्या अनुभवांमध्ये प्रमिलाताईंचा सहवास हा आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा होता, कारण एक तर त्यांच्या मावशींबद्दलच्या आठवणी आम्हाला ऐकायला मिळाल्या. त्याचप्रमाणे प्रमिलाताईंच्या उदार मनाची आणखी जवळून ओळख झाली. ते म्हणजे वसईपासून दूर असलेल्या या मनोर, जव्हार, तलासरी भागामध्ये सुशीलाबाईंनी किती बायकांना जोडले आहे याचे प्रमिलाताईंनी जाहीर कौतुक तर केलेच, पण पुन्हा पुन्हा त्या सुशीलाताईंना या कामाबद्दल धन्यवाद देत होत्या. सुशीलाताई वैद्य या आमच्याहूनही मोठ्या सत्तरीच्या ज्येष्ठ सेविका होत्या.’
 
 
वंदनीय प्रमिलाताईंच्या धडाडीची, धाडसी स्वभावाची आणखी एक ओळख तशाच स्वभावाच्या सुशीलाताईंनी पुढे लिहिली आहे. 1990 मध्ये आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये केलेल्या हिंसाचारानंतर समितीच्या सेविका वारंवार जम्मूमधील काश्मिरी पंडितांना जाऊन भेटत होत्या. त्यांना मदत करण्याचे, धीर देण्याचे, मोठे काम या सेविकांनी केले होते. त्या निमित्ताने सुशीलाताई दोन-तीन वेळा जम्मूला गेल्या होत्या.
 
 
सुशीलाताई लिहितात...‘1992 मध्ये समितीचा एक मोठा कार्यक्रम जम्मू येथे घ्यायचा होता. त्याच्या तयारीसाठी मी पंधरा दिवस आधी जम्मूला गेले होते. यावेळी जम्मू आणि आजूबाजूच्या लहान गावांतून आम्ही प्रचारासाठी जात होतो. आठ दिवसांनी समितीच्या अखिल भारतीय प्रमुख कार्यवाहिका माननीय प्रमिलाताई मेढे तिथे आल्या. जम्मूला आम्ही एका बैठकीसाठी बसने जात होतो आम्ही ज्या बसथांब्यावर थांबलो होतो, तिथे आमची बस आल्यावर आम्ही बसमध्ये चढलो. आमची बस जेमतेम दुसर्‍या थांब्यावर पोचली असेल तोच मोठा आवाज ऐकू आला. ज्या थांब्यावरून आम्ही बसने निघालो त्याच थांब्यावर बॉम्बस्फोट झाला होता. आम्ही बचावलो होतो. आमच्यासारख्या कधीतरी जाणार्‍यांना एखादे वेळीच असा अनुभव येई, पण तिथे राहणार्‍यांना क्षणोक्षणी अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागते आहे, याबद्दल मी आणि प्रमिलाताई बर्‍याच वेळ बोलत होतो.
 
 
त्या काळात कोणी ना कोणी आपल्या घरी आम्हाला जेवायला बोलवीत असे. एकदा रात्री एका घरी जेवायला गेलो होतो. तिथून येण्यास उशीर झाला. रात्रीचे अकरा वाजून गेले. आमचे समिती कार्यालय एका देवळाच्या आवारात होते. देवळाचा परिसर मोठा असून त्याला मोठी कोटासारखी भिंत होती. आम्ही पोहोचलो तेव्हा त्याचा मुख्य दिंडी दरवाजा बंद झाला होता. दरवानाला आमचा आवाजही बाहेरून पोहोचेना. बाहेर निरव शांतता...जम्मूचे अस्थिर वातावरण.. आता काय करावे? त्या देवळाच्या मागच्या बाजूला एक लोखंडी जाळीचे दार असल्याचं आम्हाला आठवले. आम्ही मागच्या बाजूला गेलो. दार चांगलेच उंच होते. माननीय प्रमिलाताईंनी ओचा पदर बांधला आणि त्या नऊवारी साडीमुळे दारावर चढून आत उतरल्या. दरवानाला भेटून पुढचा दिंडी दरवाजा त्यांनी उघडून घेतला. जर प्रमिलाताईंनी हिंमत केली नसती तर ती रात्र आम्हाला तेथेच बाहेर कुठेतरी काढावी लागली असती.
 
 
वंदनीय मावशींचा वाचनाचा नेहमीच आग्रह असे. त्यांचे स्वतःचे वाचन भरपूर होतेच, परंतु सेविकांनीही वाचले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. कोणती पुस्तके वाचली पाहिजेत, हे त्या नेहमीच आम्हाला सांगत असत. तसेच आपण वाचलेल्या पुस्तकांबद्दलही एकमेकांना सांगितले पाहिजे, असाही त्यांचा आग्रह होता. सुशीलाताई म्हणाल्या,‘मला आणि प्रमिलाताईंना वाचायचा नाद असल्यामुळे आमच्यामध्ये या पुस्तकांच्या विषयातील वैचारिक देवाण-घेवाण अनेकदा होत असे. अगदी अजूनपर्यंत फोनवरही आम्ही अशा अनेक चांगल्या पुस्तकांबद्दल किंवा चांगल्या माहितीबद्दल एकमेकींशी बोलत होतो. 2019 पर्यंत मी अखिल भारतीय बैठकींनाही जात होते. त्यामुळे आमच्या भेटीही होत होत्या. करोनानंतर मात्र प्रवास थोडा कमी झाला. 2022 मध्ये अखिल भारतीय महिला चरित्रकोश प्रकाशन समारंभाला मी आवर्जून नागपूरला गेले, ती प्रमिलाताईंची भेट घेण्याची तीव्र ओढ होती म्हणूनच. आम्हाला दोघींनाही या भेटीने अतिशय आनंद झाला. किती बोलू असे होऊन गेले होते.’ ...प्रमिलाताई आणि सुशीलाताई यांच्या या हृद्य भेटीची मी साक्षीदार आहे.
 
 
प्रमिलाताई जेव्हा काही वाचत तेव्हा त्याबद्दल चर्चा करायला त्यांना आवडत असे. वंदनीय मावशींवरील चित्रपट निर्मितीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली तेव्हा 2003-04 मध्ये आम्ही अनेकदा भेटलो, बोललो. तेव्हा वंदनीय मावशींमधील बारकावे मला त्यांच्याकडूनही जाणून घेता आले. महिला चरित्रकोशाची संपादक आणि प्रकल्प प्रमुख म्हणून काम सुरू केल्यानंतर, गेली दहा वर्षे आमच्या अनेक भेटी झाल्या. 2022 च्या प्रारंभापासून ऑगस्टमध्ये खंडाचे प्रकाशन होईपर्यंत दरमहा आठ ते पंधरा दिवस मी व मेधा ब्रह्मापूरकर नागपूरला जात होतो. त्यावेळी तर काय लिहिले आहे ते वाचून दाखवणे, आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐकणे हे रोजचे काम होते. त्वरित आणि योग्य निर्णय घेण्याची त्यांची क्षमता मी त्यावेळी फार जवळून अनुभवली.
 
 
20 जुलै 2025 रोजी पहाटे मी त्यांची ओझरती भेट घेतली, तेव्हा पाच-सहा दिवसांनी परत नागपूरला येत असल्याचे, मी त्यांना सांगितलं होतं. कामाचा उत्साह आणि कामातील नेमकेपणा वाढवणार्‍या अशा अनेक आठवणी आहेत. त्या बळावर आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत. हीच वंदनीय प्रमिलाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.