योगाचा अपहार होतो आहे का?

विवेक मराठी    20-Sep-2025
Total Views |
 
@वृंदा टिळक
 
‘योगाचे विश्व विश्वातला योग- योगाच्या त्रिविध आयामांचा वेध-आर्थिक : सामाजिक : राजनैतिक’. या शीर्षकापासूनच वाचकाची मनोभूमिका तयार व्हायला सुरुवात होते. कोणालाही, कोणत्याही दृष्टीने पुस्तक वाचणार्‍यालाही या पुस्तकात नवीन काहीतरी वाचायला मिळेल, विचारांना चालना मिळेल हे निश्चित! अभ्यासकांना तर हे पुस्तक संदर्भ म्हणून वापरता येईल.
book
 
पुस्तकाचे नाव : ‘योगाचे विश्व विश्वातला योग

योगाच्या त्रिविध आयामांचा वेध

आर्थिक : सामाजिक : राजनैतिक’

लेखिका : नयना सहस्रबुद्धे

मुखपृष्ठ : विजय बोधनकर
 
प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन्स
 
पृष्ठसंख्या : 170
 
मूल्य : 250 रुपये
 
योगाचा अपहार होऊ शकतो का? होत असेल तर त्यावर उपाय काय? विश्वभरात योगाशी संबंधित बाजारपेठ झपाट्याने वाढत असताना त्यात आज भारत कुठे आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे आणि उत्तरांकडेही घेऊन जाणारे ‘योगाचे विश्व -विश्वातला योग’ हे नयना सहस्रबुद्धे लिखित पुस्तक जून 2025 मध्ये प्रकाशित झाले.
 
 
जीवनदर्शन आणि जीवनमूल्ये ह्यांची अनोखी वीण असलेली भारतीय जीवनपद्धती हा एक अमूल्य वारसा आहे. संस्कार, आरोग्य, निसर्ग, विश्वकल्याण या सार्‍याचा विचार ब्रह्मांडाच्या ज्ञानाच्या आणि भानाच्या आधारावर केला गेलेला आहे. भक्ती, ज्ञान, अध्यात्म, कला यामधून ज्ञानपरंपरा विकसित झालेल्या आहेत. यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे योग.
 
 
हे पुस्तक लिहिणार्‍या नयना सहस्रबुद्धे या रूढार्थाने योगतज्ज्ञ नाहीत. त्या एक सामाजिक कार्यकत्या आणि लेखिका आहेत. सध्या त्या भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांना हे पुस्तक का लिहावेसे वाटले असेल, हा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकेल! त्याचा उलगडा होतो पुस्तकाच्या शीर्षकातील इतर शब्द वाचल्यावर. पुस्तकाचे पूर्ण शीर्षक असे आहे, ‘योगाचे विश्व विश्वातला योग- योगाच्या त्रिविध आयामांचा वेध-आर्थिक : सामाजिक : राजनैतिक’. या शीर्षकापासूनच वाचकाची मनोभूमिका तयार व्हायला सुरुवात होते.
 
 
योग या विषयाच्या विविध पैलूंकडे अत्यंत औत्सुक्यपूर्ण नजरेने पाहणारे हे पुस्तक आहे. हे पुस्तक लिहावेसे का वाटले ते सांगताना लेखिका म्हणते, सरकारने नौफ मरवाईला पद्मश्री पुरस्कार दिल्याचे जाहीर झाले. त्या नंतर एकदा परममित्र पब्लिकेशनचे संस्थापक माधव जोशी भेटले होते. तेव्हा बोलताना एका परदेशातील व्यक्तीला एवढा मोठा पुरस्कार का दिला असेल असा विषय निघाला.... शंभर सव्वाशे वर्षांपासून म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणानंतरच्या काळापासून भारतातील अध्यात्म असेल, योग असेल, आयुर्वेद असेल हे पूर्ण जगात वेगाने पसरायला सुरुवात झाली. अर्थात त्याही आधी शतकानुशतके या तिन्हींचा प्रसार होत होताच. जागतिक योगदिनापासून आता जगाचे लक्ष त्याकडे विशेषत्वाने वेधले गेले. मग मनात ह्याविषयीचा विचार सुरू झाला. त्यातून या पुस्तकाचा उगम झाला.
 
 
भारताची मृदू संपदा (सॉफ्ट पॉवर) म्हणून योग, आयुर्वेद, अध्यात्म, कला या गोष्टी जगभरात भारताविषयीचा आदर वाढवत आहेत. भारताची विश्वगुरूपदाकडे जाणारी वाट सबळ करत आहेत. भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून योगाचे महत्त्व कळलेले आहे. योगाभ्यास आणि साधना ही आपली परंपरा आहे. पतंजलीचे योगशास्त्र, भगवद्गीतेतील योग, योगाचे आध्यात्मिक महत्त्व, त्याची दैनंदिन जीवनाशी घातली गेलेली सांगड हे सर्व भारतात पूर्वापार चालत आलेले आहे.
 
 
 
एखादा विचार, तत्त्वज्ञान, उपक्रम जेव्हा मर्यादित परिघात असतो तेव्हा आणि नंतर जेव्हा तो विश्वभर पसरतो तेव्हा, या दोन्ही अवस्थांत फरक असू शकतो का? असतो का? असे असणे अपरिहार्य आहे का? या विषयी काय करायला हवे? काय करता येईल? ऋषिमुनींनी साधना म्हणून केलेला योग जनसामान्यांपर्यंत पोचला आणि आता विश्वभरात त्याचा प्रसार झाला. या प्रवासात त्याचे बदललेले रूप, समोर उभी असणारी आव्हाने ह्यांचा वेध हे पुस्तक घेते. मात्र केवळ प्रश्न उपस्थित करण्यापर्यंतच न थांबता, त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो.
 
 
 
आंतरराष्ट्रीय योगदिनाचा प्रस्ताव, त्याला अनेक देशांकडून मिळालेली संमती व काही देशांकडून झालेला विरोध, यामागची राजनीती आणि मुत्सद्देगिरी ह्याचा परामर्श घेत हे पुस्तक विश्वभरात आंतरराष्ट्रीय योग दिन कसा साजरा केला जातो ते सांगते. योग आणि भारतीय कला, योग आणि खेळ, योग शिक्षण या विषयीचे लेख वाचायला मिळतात.
 
 
 
विविध ठिकाणी विविध नावांनी अनेक योग उदयाला आलेले आढळतात. कधी चांगल्या, कधी भेसळ झालेल्या तर कधी विकृत रुपातल्या ह्या योगांचाही उल्लेख पुस्तकात आहे. यिन योगाचा धावता आढावा घेतलेला आहे. योग ह्या विषयांतले तज्ज्ञ काय म्हणतात ह्यावर तर एक संपूर्ण प्रकरण आहे. अनेक विषयांना या पुस्तकात स्पर्श केला आहे. ज्या जिज्ञासूंना उत्सुकता असेल ते अधिक अभ्यास नक्कीच करू शकतील.
 
 
 
योग अभ्यासक आणि प्रसारक दोन्हींमध्ये महिलांचा वाटा आता खूप मोठा आहे. स्त्री विशिष्ट जाणिवेतून आता महिला योग करतात. महिलाकेंद्रित योगदृष्टीचे आकलन आणि विचार इथे लिहिलेला आपल्याला दिसतो.
 
 
 
भारताने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वतःला प्रस्तुत करण्याची आवश्यकता आहे. योगाचा अपहार अनेक जण करू पाहत असताना आपण सावध राहण्याची गरज आहे. अनेक स्टार्टअप्स आणि कॉपीराईट क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांना हे पुस्तक अनेक नवनवीन विषय पुरवते आहे!
 
 
 
अगदी योगवर्गात वापरल्या जाणार्‍या मॅटपासून ते घातल्या जाणार्‍या कपड्यांपर्यंत, योग विषयावरील वर्ग, ऑनलाईन क्लासेस ते व्हिडिओज ह्या सगळ्यांद्वारे खूप पैसा मिळवला जातो आहे. ही भारताने देखील एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. कॉपीराइट्स विषयी जागरूक राहिले पाहिजे असे हे पुस्तक वाचल्यानंतर निश्चितच वाटते.
 
 
 
अनेक संदर्भांचा अभ्यास करून तसेच योग विषयक काही संस्थांना भेटी देऊन, प्रमुख व्यक्तींच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक सिद्ध झालेले आहे. त्यामुळे त्या पुस्तकाची विश्वासार्हता वाढलेली आहे. पुस्तकाच्या शेवटी संदर्भ सूची दिली असल्याने अगदी मुळापासून वाचण्याची उत्सुकता असलेले वाचक, त्या त्या पुस्तकांचे वाचन करू शकतील. अशा प्रकारचे, समग्र योगाचा साकल्याने विचार करणारे निदान मराठीतले तरी हे एकमेव पुस्तक आहे.
 
 
 
पुरोमार्गमध्ये लेखिका म्हणते की भारतीय समुदायाने योगाचे पावित्र्य व स्वायत्तता टिकवून ठेवण्याची जबाबदारी उचलायची वेळ आली आहे. हे अतिशय महत्त्वाचे विधान आहे.
 
 
अगदी कोणालाही, कोणत्याही दृष्टीने पुस्तक वाचणार्‍यालाही या पुस्तकात नवीन काहीतरी वाचायला मिळेल, विचारांना चालना मिळेल हे निश्चित! अभ्यासकांना तर हे पुस्तक संदर्भ म्हणून वापरता येईल.
 
 
 
प्रकाशन समारंभात डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले की, सगळ्या योगवर्गात पाठ्यपुस्तक म्हणून वापरावे असे हे पुस्तक झाले आहे. विशेष पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रसिद्ध असणार्‍या परममित्र पब्लिकेशन्स ह्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे.