संघ शताब्दीनिमित्त गोरेगावात शारदीय नवरात्र कीर्तन महोत्सव

विवेक मराठी    22-Sep-2025
Total Views |
 

vivek 
 
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला येत्या विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होत आहे. संघशताब्दीच्या निमित्ताने गोरेगावात शारदीय नवरात्रात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मसुराश्रम आणि संस्कार भारती(उत्तर पश्चिम समिती कोकण प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात हा कीर्तन महोत्सव संपन्न होणार आहे. दररोज सायंकाळी ४-३० ते ६-३० या वेळात गोरेगाव पूर्व येथील पांडुरंगवाडीमधील मसुराश्रम येथे ही कीर्तने होणार आहेत.
 
 
आज देशभरात संघाचे व्यापक रूप साकारले आहे. हिंदुत्वाचा आणि भारतीयत्वाचा विचार तळागाळापर्यंत रुजवणाऱ्या रा. स्व. संघाच्या स्थापनेला २ ऑक्टोबर २०२५, विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या विस्तारासाठी अगणित प्रचारकांनी आपल्या समिधा वाहिल्या. या संघऋषिंच्या समर्पणातूनच आजचे संघाचे स्वरूप साकारले आहे. अशा दहा महानुभाव संघऋषिंच्या समर्पणाची गाथा या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे. या महानुभावांमध्ये आद्य सरसंघचालक पू. डॉ. हेडगेवार, पू. गोळवलकर गुरूजी, वं. मावशी केळकर, दत्तोपंत ठेंगडी, मोरोपंत पिंगळे, नानाजी देशमुख, हरिभाऊ वाकणकर, बाळासाहेब देशपांडे, यादवराव जोशी, लक्ष्मणराव इनामदार यांचा समावेश आहे. प्रतिदिन यातील एका व्यक्तीवर कीर्तन होणार आहे.