अंतरंगी देवत्व जागविणारे - महिषासुरमर्दिनी स्तोत्र

विवेक मराठी    25-Sep-2025   
Total Views |
महिषासुरमर्दिनी स्तोत्र
मनाला अतिशय प्रसन्न करणारे, उर्जा देणारे महिषासुरमर्दिनी हे स्तोत्र आहे. महिष म्हणजे निष्क्रीयता, जाड्य, कृष्णता याचे प्रतीक. आपल्या मनातील आलस्य, उदासीनता याचा नाश आपल्या साधनेने करून आपल्या आतले देवत्व जागे केले तर देवी आपल्या आतच प्रकट होते. आपली चेतना जागृत होते आणि आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी असुरांचा नाश होतो, हा या स्तोत्राचा गर्भितार्थ समजून घ्यायला हवा.
अत्यंत रसाळ, शब्दलालित्य आणि यमक-अनुप्रास अशा अलंकारांनी नटलेले, म्हणायला गेलो तर उच्चारण करायला आव्हानात्मक पण म्हणू शकलो तर अमृतसेवनाचा आनंद देणारे आणि मुख्य म्हणजे वाणीसह बुद्धी आणि आत्म्यावर संस्कार करणारे महिषासुरमर्दिनी स्तोत्र तसे सुपरिचित आहे. हे स्तोत्र देवीच्या विविध कथा, विविध गुण, रूपे, निवास, शृंगार याचे वर्णन तर करतेच, पण देवीच्या सान्निध्यात असलेली विविध फुले, पशु, पक्षी आणि वनात राहणार्‍या विविध जमातींशी असलेले तिचे साहचर्य देखील या स्तोत्रातून आपल्याला दिसून येते.
 
 
महालक्ष्मी, महासरस्वती, महादुर्गा या देवीच्या तिन्ही रूपांचा गौरव यात आहे. दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण या वृत्ताचा वापर करून श्री रामकृष्ण कवी यांनी हे स्तोत्र रचले आहे. स्तोत्रात असलेली शब्दांची, नादाची पुनरावृत्ती आनंददायक आहेच पण त्यात अर्थांची विविधताही लपलेली आहे. मुख्यतः देवीचे शौर्य हा स्तोत्राचा विषय असल्यामुळे स्तोत्र म्हणताना शक्तीची, सामर्थ्याची अनुभूती येतेच, पण स्तोत्राच्या ध्रुवपदात महिषासुरमर्दिनी (महिषासुराचा वध करणारी) आणि रम्यकपर्दिनी (अतिशय सुंदर कुरळे केस असणारी) अशा दोन्ही विशेषणांना सारखेच महत्त्व आहे. त्यामुळेच हे स्तोत्र शौर्य आणि सौंदर्य, शक्ती आणि युक्ती, क्षमता आणि ममता, पारिपत्य आणि लालित्य, सामरिक आणि कौटुंबिक अशा सर्व स्त्रीगुणांचे वर्णन करत एका परिपूर्ण स्त्रीचे रूप आपल्यासमोर उभे करते. यातून शब्दसौंदर्य, भावसौंदर्य, नादसौंदर्य हे प्रकट होतेच पण आशयाला अनुकूल अशा शब्दांच्या अनेक अर्थांचे सौंदर्य आणि महत्त्वाचे म्हणजे त्यातला आध्यात्मिक आशय मनाला उन्नत करतो. देवीचे हे स्तोत्र समजून घेता घेता आपण अंतर्मुख होतो आणि खरी युद्धभूमी कोणती, आपले खरे शत्रू कोण आणि कशावर विजय मिळवायचा, हे आपल्या अंतर्दृष्टीला दिसू लागते.
 
 
अयि गिरीनन्दिनी नन्दितमेदिनी विश्वविनोदिनि नन्दनुते
गिरिवरविन्ध्यशिरोधिनिवासिनी विष्णुविलासिनि जिष्णुनुते
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..1
 
 
हे पर्वतकन्ये, तू पृथ्वीला आनंद देणारी, विश्वात क्रीडा करणारी, नंदीकडून स्तुती केली जाणारी, गिरिवर हिमालयात जन्म आणि नंतर विंध्य पर्वताच्या शिखरावर राहणारी, (लक्ष्मीरूपात) विष्णुप्रिया, (जिष्णु) इंद्र जिची स्तुती करतो अशी, (शितिकंठ) नीलकंठाची गृहिणी, हे भगवती, स्वतःचे विशाल कुटुंब असणारी, भक्तांसाठी खूप काही करणारी अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो. काही पाठात भूतिकृते असे म्हटले जाते. त्याचा अर्थ समृद्धी, सौभाग्य अशा विविध विभूती प्रदान करणारी असा होतो.
 
 
सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शंकरतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते..2
 
 
सुर म्हणजे देवांवर अनेक वरांचा वर्षाव करणारी, दुर्मुख-दुर्धर या राक्षसांचा नाश करणारी, स्वानंदात मग्न असणारी, त्रिभुवनाचे पोषण करणारी, शंकराला आनंद देणारी, किल्बिष म्हणजे (भक्तांच्या) पातकांचे हरण करणारी, घोषरत म्हणजे गर्जना करणारी किंवा विविध रणवाद्यांच्या घोषात रमणारी, दनुज म्हणजे दानवांचे दमन करणारी, दितीच्या पुत्रांवर (दानवांवर) रागावणारी, दानवांचा वाईट असा माज शोषून घेऊन उतरवणारी. (देवीचे लक्ष्मीरूप सागरातून उत्पन्न झालेले म्हणून) हे सागरकन्ये, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो. इथे देवांवर वरांचा वर्षाव करणारी असे म्हटले आहे, कारण जेव्हा जेव्हा देवलोकावर काही संकट आले आणि त्यांनी तिचे स्मरण केले तेव्हा तेव्हा तिने प्रकट होऊन देवांना संकटातून सोडवले आहे. देवीपुराणात दुर्धर व दुर्मुख या राक्षसांचा नाश केला असल्याच्या कथा आहेत.
 
अयि जगदम्ब मदम्ब कदम्बवनप्रियवासिनि हासरते
शिखरिशिरोमणितुङ्गहिमालयशृङ्गनिजालयमध्यगते
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते..3
 
जगदंब म्हणजे जगाच्या आणि मदंब म्हणजे माझ्याही माते, जिला कदंब वनात राहणे आवडते व जी हास्यविनोदात रममाण होते, किंवा जिच्या मुखावर सदैव मंद मधुर हास्य विलसत असते, जी उंच हिमालयाच्या शिखरावर असलेल्या शृंगारलेल्या चमकदार घरात राहते, अशी मधासारखी गोड असणारी, मधु आणि कैटभ या राक्षसांचा तिरस्कार करणारी, त्यांचा विनाश करणारी आणि या क्रीडेत रमणारी, अशा महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो!
 
इथे तिच्या हास्याचेही अनेक संदर्भ आहेत. ती असुरांना मोहित करण्यासाठी हसते, असुरराजाकडून आलेले प्रणय संदेश ऐकून ती मेघगर्जनेसारखी हसते, ती त्यांना ललकारताना हसते, ती विजयाच्या आनंदाने हसते. तिच्या महिषासुरमर्दिनी रूपात जेव्हा प्रकट झाली तेव्हा तिने केलेले भयानक विक्राळ हास्य ज्याला ‘अट्टहास’ म्हणतात, ते ऐकूनच महिषासुराने तिचा शोध घ्यायला आरंभ केला. या अनेक अर्थांनी तिला हासरते म्हटले जाते.
 
 
अयि शतखण्डविखण्डितरुण्डवितुण्डितशुण्डगजाधिपते
रिपुगजगण्डविदारणचण्डपराक्रमशुण्डमृगाधिपते
निजभुजदण्डनिपातितखण्डविपातितमुण्डभटाधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते..4
 
 
शत्रुसैन्यातील प्रचंड हत्तींच्या सोंडा कापून त्यांच्या शरीराचे शेकडो तुकडे करणारी, जिचे वाहन सिंह (मृग) आपल्या प्रचंड पराक्रमाने हत्तींची मस्तके विदीर्ण करतो, आपल्या हातातील खड्गाने चंडमुंड या राक्षसांची मुंडकी जिने तोडून टाकली अशी सैनिकांची अधिपती वीर नायिका अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो.
 
अयि रणदुर्मदशत्रुवधोदितदुर्धरनिर्जरशक्तिभृते
चतुरविचारधुरीणमहाशिवदूतकृतप्रमथाधिपते
दुरितदुरीहदुराशयदुर्मातिदानवदूतकृतान्तमते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..5
 
 
 
रणांगणावरील हिंसेच्या उन्मादाने मत्त झालेल्या शत्रूंना युद्धात ठार मारणार्‍या, नाश न होणार्‍या आणि कालबाह्य न होणार्‍या उग्र, उत्कट शक्ती जिच्या ठायी एकवटल्या आहेत, अतिशय चतुर आणि विचारपूर्वक कार्य करण्यात विख्यात असलेला, भूतांचा अधिपती शंकर याला जिने दूत म्हणून पाठवले (युद्धात शुंभनिशुंभ दैत्यांकडे दूत म्हणून देवीने शंकराला पाठवले आणि युद्ध सोडून निघून जा किंवा मरायला तयार व्हा असा संदेश पाठवला) दुरित म्हणजे अधम आणि दुरीह म्हणजे पापवासना किंवा दुष्ट इच्छा ठेवणारे दैत्य यांचा अंत करणारी अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये तुझा जयजयकार असो!
 
अयि शरणागतवैरिवधूवरवीरवराभयदारकरे
त्रिभुवनमस्तकशूलविरोधिशिरोऽधिकृतामलशूलकरे
दुमिदुमितामरदुन्दुभिनादमुहुर्मुखरीकृतदिङ्निकरे
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते..6
 
 
शरण आलेल्यांच्या वीरपत्नींना अभय देणारी, तिन्ही लोकांच्या मस्तकात शूल निर्माण करणार्‍यांच्या मस्तकावर आपल्या शुद्ध त्रिशूळाचा नेम धरणारी, पाण्याचा प्रवाह पसरावा तसा दुन्दुभीचा नाद विश्वात पसरवणारी अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो!
 
दोन कडव्यांत भयानक संहाराच्या वर्णनानंतरचे हे देवीचे दयाळू, कृपामय रूप! ज्या पतिव्रता रणात बळी जात असलेल्या आपल्या पतींच्या प्राणांची भीक मागतात त्यांना अभय देत देवीच त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करते. जी आपल्या कटाक्षाने देखील शत्रूचे भस्म करू शकते तिला शस्त्रांची आवश्यकता नाही! पण देवी कृपामयी आहे. तिच्या हातातले शूल (शस्त्र) देखील अमल म्हणजे पवित्र आहे. या शस्त्राचा स्पर्श त्या दैत्यांना देखील सद्गती देणारा असतो. तिचा दयाभाव युद्धातही कायम असतो तो असा.आपल्या विजयानंतर ती क्रोधावेशाने ज्या भयंकर रणगर्जना करते त्या कोलाहलाने, आणि त्यात मिसळलेल्या देवांच्या दुंदुभी वादनाने दाही दिशा कंपित होतात. दैत्यांचा विनाश करणारी भयंकरी आणि देवांना (विजयाने) आनंद देणारी शुभंकरी अशी दोन्ही रूपे यात दिसतात.
 
 
अयि निजहुङ्कृतिमात्रनिराकृतधूम्रविलोचनधूम्रशते
समरविशोषितशोणितबीजसमुद्भवशोणितबीजलते
शिवशिवशुम्भनिशुम्भमहाहवतर्पितभूतपिशाचरते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते..7
 
 
जिने असुरराज शुंभ याचा सेनापती धूम्रलोचन राक्षसाला केवळ आपल्या हुंकाराने भस्म केले आणि धुरात शतशः विदीर्ण केले ज्याचा रक्ताचा एक थेंब भूमीवर पडला तरी त्यातून असंख्य राक्षस तयार होत अशा रक्तबीज नावाच्या राक्षसाची जीवनवेल जिने शुष्क करून टाकली, ते सारे थेंब तिनेच त्या त्या स्थानी प्रकट होऊन पिऊन टाकले, शिव शिव म्हणत त्या कल्याणकारी महायुद्धात शुंभ आणि निशुंभ यांच्या आहुती देत जिने भूत व पिशाच गणांना तृप्त केले अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो.
 
 
धनुरनुषङ्गरणक्षणसङ्गपरिस्फुरदङ्गनटत्कटके
कनकपिशङ्गपृषत्कनिषङ्गरसत्भटशृंङ्गहताबटुके
कृतचतुरङ्गबलक्षितिरङ्गघटत्बहुरङ्गरटत्बटुके
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते..8
 
 
रणभूमीवर युद्ध करत असताना सतत हालचाल करत असलेल्या चमकदार धनुष्यासोबत जिच्या हातातील चकाकते कंकण नर्तन करते, जिचे सोनेरी रंगाचे, रक्तरंजित झालेले बाण ज्यांच्या अंगात घुसून लटकत असल्याने ते शत्रुसैन्यातील बुणगे जोरात आरोळ्या ठोकत आहेत, जिने शत्रुसैन्याचे चतुरंग दल (रथ-हत्ती-घोडे-पायदळ) चारी बाजूने वेढून खच्ची केले आणि युद्धभूमीला ओरडणार्‍या मठ्ठांच्या मंचात बदलून टाकले, त्यांची संख्या घटवली अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो. देवीने केलेल्या घोर संग्रामाचे चित्रण या कडव्यात आहे.
 
 
जय जय जप्यजये जयशब्दपरस्तुतितत्परविश्वनुते
झणझणझिञ्झिमिझिङ्कृतनूपुरशिञ्जितमोहितभूतपते
नटितनटार्धनटीनटनायक नाटितनाट्यसुगानरते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते..9
 
 
हे जये, तुझ्या नावाचा, तुझ्या जयकाराचा जप करावा अशी तू आहेस, तुझा जय असो. तुझे जयशब्द (युद्धाआधी स्फुरण देणार्‍या आणि युद्धानंतर विजयाच्या आरोळ्या) ऐकून स्तुती करण्यास तत्पर असे जग तुला नमन करते, तुझा जयकार करते. तुझ्या पैंजणाच्या झणझण झिमझिम झंकारनादाने शिव मोहित होतो, प्रसन्न होतो.नट-नट्या यांचा जो नायक तो अर्धनारीनटेश्वर त्याच्यासोबत या विश्व नाट्यात त्याच्या संगीतात तू रममाण होतेस अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो. या कडव्यात तिच्या नटार्ध रूपाची स्तुती आहे.ती साक्षात शिवाचे अर्धे स्वरूप आहे. हा खेळ, हे दिव्य नर्तन, गान म्हणजेच तर पुरुष-प्रकृती यांच्या द्वारे निर्मित सारे विश्व, संसार!
 
 
अयि सुमनःसुमनःसुमनःसुमनःसुमनोहर कान्तियुते
श्रितरजनीरजनीरजनीरजनीरजनीकरवक्त्रवृते
सुनयनविभ्रमरभ्रमरभ्रमरभ्रमरभ्रमराधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..10
 
 
देवीच्या अंतर्बाह्य सौंदर्याचे वर्णन यात आहे. सुमन, रजनी, भ्रमर या शब्दाच्या अनेक अर्थच्छटा यात आहेत. फुलासारखी कोमल, आनंद देणारी, उमलणारी, सु-मनाची, प्रसन्न, फुलासारखी मनोहर कांती असलेली अशी तू. देवीचे एक नाव रजनी किंवा शर्वरी असेही आहे. जीवांना विश्राम देऊन सकाळी उत्साहित, प्रफुल्लित करणार्‍या रात्रीसारखी ती सौम्य, सुखकारी आहे, पण दैत्य व असुर यांच्यासाठी ती काळरात्रीसारखी भयंकर आहे! रात्र जशी तारकांच्या तेजाने चमकते तशी ती आभूषणांच्या दीप्तीने झळकते. रात्रीने आवृत्त अशा चंद्रासमान तेजस्वी मुखप्रभा असलेली किंवा अंधारात चंद्र चमकावा तसे कृष्ण केशकलापात जिचे गौर मुख शोभते अशी, किंवा जी अंधकारातील जनांसाठी चंद्रासमान आहे अशी! भ्रमरांमधील श्रेष्ठ भुंग्यासारखे सुंदर चंचल नेत्र असलेली किंवा जिचे नेत्रविभ्रम किंवा जिचे मुख भुंग्याला आकर्षित करते, भुंगा जसा फुलाफुलांतला मध प्राशन करतो तशी जी एकेका असुराच्या रक्ताला प्राशन करते, भुंगे जसे रसपानाने मदोन्मत्त होतात तसे तिचे नेत्र रक्तपानामुळे उन्मादित होतात! या साधर्म्यामुळे भुंगे तिला अधिपती मानतात. अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो..
 
महितमहाहवमल्लमतल्लिकवल्लिकरल्लितभल्लिरते
विरचितवल्लिकपल्लिकमल्लिकझिल्लिकभिल्लिकवर्गवृते
श्रुतकृतफुल्लसमुल्लसितारूणतल्लजपल्लवसल्ललिते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..11
 
 
या कडव्यात देवीच्या सहकारी गणांचे वर्णन आहे. देवी समाजातल्या सर्वांना, अगदी सामान्य गिरिजनांना सोबत घेऊन लढली आहे. महाहव म्हणजे महाभयंकर किंवा महान प्रयोजन असलेल्या युद्धात मत्त अशा मल्लांशी, श्रेष्ठ योद्ध्यांशी लढण्यासाठी मोगरीच्या वेली सारख्या नाजूक भिल्ल स्त्रिया जिच्याभोवती मधमाश्यांच्या थव्याप्रमाणे भिरभिरत असतात, झिल्लक (नावाचे वाद्य वाजवणारे) आणि भिल्लक जातीचे, आणि ज्यांच्या झोपड्या वेलींनी आच्छादलेल्या असतात असे (वल्लिकपालिक) शिकारी जिच्या सोबत आहेत, ज्यांच्या हातातले भाले लवलवत आहेत अशा भिल्ल आणि भिल्लिणी जिच्याभोवती आहेत, लालसर, विकसित आणि कोमल अशा पानाफुलांची आभूषणे भिल्लिणी सारखीच कानावर धारण केलेली तू! अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या, पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो.. यात दिसणारे देवीचे रूप किती लोभस आहे! वनजीवन आणि त्याचे सृष्टीवैभव, लता-वेली-फुले-पाने यात रमणारे पण अन्यायाचा तीव्र प्रतिकार करणारे निसर्गस्नेही भिल्लसमूह देवीच्या जवळचे आहेत. ते देवीला साह्य करत आहेत आणि तिचा पल्लवशृंगार करत आहेत. अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो..
 
अविरलगण्डगलन्मदमेदुरमत्तमतंगजराजपते
त्रिभुवनभूषणभूतकलानिधिरूपपयोनिधिराजसुते
अयि सुदतीजनलालसमानसमोहनमन्मथराजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..12
 
 
या कडव्यात देवीचे मदनमनोहर रूप दिसते! ज्यांच्या गंडस्थळातून दाट मद सतत स्रवत आहे अशा हत्तिणीसारखी चाल असलेली गजगामिनी, तिन्ही भुवनांना भूषणावह असा जो चंद्र त्याच्या प्रमाणेच जी महाक्षीरसागराची कन्या आहे, रूपपयोनिधी -रूपाचा सागर आहे, सुंदर दंतपंक्ती, मोहक हास्य असलेली, जनमानसात लालसा उत्पन्न करणार्‍या मदन देवाची कन्या शोभावी अशी लावण्यवती, अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो.
 
 
कमलदलामलकोमलकान्तिकलाकलितामलभाललते
सकलविलासकलानिलयक्रमकेलिचलत्कलहंसकुले
अलिकुलसंकुलकुवलयमंडलमौलिमिलद्वकुलालिकुले
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..13
 
देवीच्या रूपाची मोहकता, कोमलता काय वर्णावी! जिचे लतेप्रमाणे वेलांटी घेऊन मस्तकाकडे वळलेले कपाळ (भाललता)स्वच्छ निष्कलंक कमळाच्या पाकळीप्रमाणे शुभ्र, तलम आहे, कांति कमळाच्या पाकळी समान आहे, जी सर्व चैतन्य व कलांच्या प्रकटीकरणाचे स्थान आहे, जिच्या सोबत खेळकर व मंजुळ आवाज करणारा राजहंसांचा थवा आहे, जिची चाल राजहंसासारखी आहे आणि जिच्या मस्तकावरच्या केशरचनेवर माळलेल्या बकुळीच्या फुलांवर भुंग्यांचे थवे घोंघावत आहेत अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो.
 
करमुरलीरववीजितकूजितलज्जितकोकिलमञ्जुमते
मिलितपुलिन्दमनोहरगुञ्जितरञ्जितशैलनिकुञ्जगते
निजगणभूतमहाशबरीगणरङ्गणसम्भृतकेलिरते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..14
 
ही गिरिगामिनी वनप्रिया कशी आहे? जिच्या हातातल्या बासरीच्या मधुर स्वराने कोकिळही लज्जित व्हावा अशी प्रेमदा, पुलिंद जनजातीच्या लोकांसह जी चित्ताकर्षक सूर गुणगुणते, निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्वतांवरील रंगीत वाटिकांमधून, गुंजारव करणार्‍या भुंग्यांच्या थव्यांमधून जी रमणींच्या जत्थ्यासह हिंडते, आपल्या अनुयायी गुणी भिल्ल स्त्रियांसोबत (महाशबरीगण) क्रीडा करण्यात रमून जाते! देवी मुळात गिरिकन्या आहे त्यामुळे आपले कार्य संपल्यावर ती स्वाभाविकपणे आपल्या मूळ स्वरूपात, आपल्या मूळ स्थानी, सहजपणे स्थानिक सख्यांमध्ये मिसळून जाते, हे किती विलोभनीय आहे!
 
कटितटपीतदुकूलविचित्रमयूखतिरस्कृतचंडरुचे
प्रणतसुरासुरमौलिमणिस्फुरदंशुलसन्नखचन्द्ररुचे
जितकनकाचलमौलिमदोर्जितनिर्भरकुन्जरकुम्भकुचे
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..15
 
 
जिच्या कमरेच्या पिवळ्या रेशमी वस्त्राच्या तेजस्वितेपुढे सूर्याचे तेजही निस्तेज वाटते, जिच्या समोर मस्तक टेकणार्‍या देव आणि दानवांच्या मुकुटांतील रत्नांच्या तेजामुळे तिच्या पायाच्या बोटांची नखे चंद्रासारखी चमकतात, कनकगिरी जिंकल्यावर हत्तीने मस्तीत आपले मस्तक उचलेले असता जसे दिसेल तसे तिचे कुंभाप्रमाणे घाटदार असलेले स्तन दिसतात अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या, पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो.
 
 
विजितसहस्रकरैकसहस्रकरैकसहस्रकरैकनुते
कृतसुरतारकसंगरतारकसंगरतारकसूनुसुते
सुरथसमाधिसमानसमाधिसमाधिसमाधिसुजातरते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..16
 
 
जिने आपल्या हजार हातांनी दैत्यांच्या हजार हातांवर विजय मिळवला, जिला भक्तांचे हजारो हात नमस्कार करतात, जिने तारकासुराच्या युद्धात देवांना तारणारा पुत्र कार्तिकेय निर्माण केला आणि त्याच्याकडून जिला नमस्कार केला जातो, राजा सुरथ आणि वाणी समाधी (हे महिषासुरमर्दिनीचे आद्य भक्त आहेत त्यांची कथा देवी सप्तशतीमध्ये देवी महात्म्यात आहे) या दोघांकडेही (धनिक अथवा निर्धन भक्तांकडे) समान भावाने पाहते, दोघांनीही समान रूपाने केलेल्या तपस्येने, समाधी अवस्थेने जी प्रसन्न होते अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो..
 
पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे
अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत्
तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..17
 
या कडव्यात रचनाकार देवीच्या महात्म्याचे वर्णन करतो. जिची पदकमले करुणेचे निधान आहेत अशा हे शुभदेवी, जो दररोज तुझ्या चरणकमलांची भक्तिपूर्वक सेवा करतो त्याला, हे कमलनिवासिनी कमले, त्याला कमळात तुझ्या पायाशी स्थान मिळणार नाही, तो स्वतःच कमलनिवासी श्रीनिवास होणार नाही, असे कसे होईल? अर्थात तो स्वतः श्रीने युक्त म्हणजे धनवान होईलच. तुझ्या पायाशीच मोक्ष आहे या धारणेने त्यांचे ध्यान करणार्‍या मला आणखी काय हवे? किंवा असे करणार्‍या माझ्यासारख्या भक्तांचे कल्याण का नाही होणार? हे महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो.
 
 
कनकलसत्कलशीकजलैरनुशिञ्चति तेऽङ्गणरङ्गभुवं
भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम्
तव चरणं शरणं करवाणि मृडानि सदा मयि देहि शिवं
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..18
 
 
जो तुझ्या प्रासादाच्या आवाराचे सुवर्णाप्रमाणे चमकणार्‍या पात्रातील जलाने सिंचन करतो, त्याला घटाप्रमाणे उन्नत उरोज असणार्‍या शचीकडून आलिंगन मिळाल्यासारख्या आनंदाचा अनुभव का मिळणार नाही? (तो इंद्रपदी का बसणार नाही) हे वागीश्वरी, मी तुझ्या पायी शरण आलो आहे माझ्यावर कृपा कर (आणि मला माझ्या कल्याणाचा मार्ग दाखव.) हे महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो..
 
तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते
किमु पुरुहूतपुरीन्दुमुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते
मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमु न क्रियते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..19
 
 
जो तुझ्या सौम्य चंद्रासम स्वर्गीय वदनाचे सतत ध्यान करतो, त्याचे मन अमल होते. त्यावर डाग रहात नाही. अशा भक्ताला सुरलोकातील चंद्रवदना देखील तुझ्या भक्तीपासून परावृत्त करू शकणार नाहीत. शंकराचा मान हेच जिचे धन आहे अशा तुझ्या कृपेने काय घडू शकणार नाही? अशा, महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या, पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो.हे दोघांचे अभेद्य असणे, शंकराचा अपमान सहन न होऊन सतीचे अग्निकुंडात उडी घेणे हे दोघांचे अभिन्नत्व या कडव्यातून अधोरेखित होते.
 
 
अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे
अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते
यदुचितमत्र भवत्युररी कुरुता दुरुतापमपाकुरुते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ..20
 
 
हे उमे, तू या दीनावर दया करच, हे रमे, लक्ष्मीमाते, तू जशी जगाची माता आहेस तशीच माझीही माता आहेस. भविष्यातही तुझी कृपा माझ्यावर सदैव राहो. माझी विनंती उचित असेल तर तू ती मान्य कर (किंवा माझ्यासाठी जे उचित असेल ते कर) तू माझे दुःख दूर कर, माझ्या अभिमानाचा, अहंकाराचा नाश कर, जेणेकरून तुझ्या भवनात येण्याची योग्यता मला प्राप्त होईल! हे महिषासुराचा वध करणार्‍या, सुंदर केशसंभार धारण करणार्‍या, पर्वतकन्ये, तुझा जयजयकार असो.
 
 
मनाला अतिशय प्रसन्न करणारे, उर्जा देणारे हे स्तोत्र आहे. महिष म्हणजे निष्क्रीयता, जाड्य, कृष्णता याचे प्रतीक. आपल्या मनातील आलस्य, उदासीनता याचा नाश आपल्या साधनेने करून आपल्या आतले देवत्व जागे केले तर देवी आपल्या आतच प्रकट होते. आपली चेतना जागृत होते आणि आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी असुरांचा नाश होतो, हा या स्तोत्राचा गर्भितार्थ समजून घ्यायला हवा. शुंभ-निशुंभ म्हणजे राग-द्वेष तर मधुकैटभ म्हणजे आपला अभिमान. धूम्र म्हणजे धूसरता, दुविधा. हत्ती जणू आपल्या इच्छांचे कळप. देवीची आराधना करून तिची कृपा प्राप्त करायची म्हणजे तिच्या हातून आपल्या दुर्गुणांचा पाडाव करायचा.रक्तबीजाच्या कथेतला सामजिक जबाबदारीचा आशय ओळखायचा.एका समस्येतून दुसर्‍या समस्येचे बीज पडते तेव्हा ते रुजण्याआधीच वरचेवर ते झेलून नष्ट करावे लागते. यासाठी देवीचे हजार हात, हजार जिव्हा म्हणजे आपणच तर आहोत!
 
 
देवीचे मूर्तरूप नेत्रसुखद तसे हे कर्णसुखद शब्दरूप. शब्दांची विलक्षण कलाकुसर, नाद, ताल, लय हे अनुभवताना पराक्रम, स्फुरण आणि प्रेरणा देणारे हे स्तोत्र नित्य श्रवणात आणि शक्य तर पठणात अवश्य असायला हवे!

विनीता शैलेंद्र तेलंग

विनीता शैलेंद्र तेलंग (D.pharm.Post Dip.in Ayu.Pharm.)

 पुनर्वसु आयुर्वेदीय औषधी निर्माण या नावाने स्वतःचा आयुर्वेदिक औषध निर्मितीचा 1995 पासून व्यवसाय .सुमारे शंभर उत्पादने . बेळंकी व हरीपूर येथे चालणाऱ्या कामातून स्थानिक महिलांना रोजगार .

१९८८ ते ९० अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे औरंगाबाद येथे पूर्ण वेळ काम .

 भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्य. या संस्थेतर्फे तीन अनाथाश्रम, एक अल्पमुदत निवासस्थान, कुटुंब सल्ला केंद्रे इ .उपक्रम चालतात .नुकत्याच सुरु केलेल्या नर्सिंग विभागाची संपूर्ण जबाबदारी . अनेक अन्य सामाजिक कामात सक्रिय.

त्याचबरोबर अनेक संगीत व नुत्यविषयक कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन. काव्य लेखन, विविध अंक संपादन याबरोबर ग्राहक हित, सा.विजयंत, सा. विवेक, विश्वपंढरी, प्रसाद ,छात्रप्रबोधन या अंकात नैमित्तिक लेखन. अनेक स्मरणिकांचे संपादन,  रा.स्व.संघाची पश्चिम महाराष्ट्र महिला समन्वय समिती सदस्य .