इतिहासतपस्वी - गजानन भास्कर मेहेंदळे

विवेक मराठी    26-Sep-2025
Total Views |
@मोहन शेटे  9850425851

vivek 
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे 17 सप्टेंबर रोजी पुण्यात निधन झाले. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी इतिहासाच्या संशोधनकार्याला वाहून घेतले होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. अशा या गजाननराव मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख...
 
भारत इतिहास संशोधक मंडळ म्हणजे अभ्यासकांचे माहेरघर! त्याची शताब्दी मोठ्या थाटात साजरी झाली होती. माझ्याकडे कार्यक्रमात मदतीसाठी तरुण स्वयंसेवक आणण्याची जबाबदारी होती. मी काही महाविद्यालयीन युवकांना घेऊन तेथे गेलो खरा, पण माझ्या मनात धाकधूक होती की, यांच्याकडून काही बेशिस्तपणा तर होणार नाही ना! शेवटी मी मुलांना एकत्र करून म्हटले, इथं शिस्तीत राहायचं बरं का! कारण इथं आसपास खूप मोठी माणसं वावरत असतात. ते समोर उभे असलेले गृहस्थ दिसताहेत का? दिसायला साधे आहेत पण हिमालयाच्या उंचीचे आहेत ते.
आता मुलं डोळे विस्फारून पाहू लागली. तरी एकाने विचारलेच, कोण आहेत ते? मी म्हणालो, गजाभाऊ मेहेंदळे! आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सर्वात जास्त अभ्यास यांचा आहे. मुलांना धाक वाटावा म्हणून मी असं बोललो खरं. पण आश्चर्य तर पुढेच घडलं. काही मुलांनी बिनधास्तपणे त्यांच्याशी ओळख करून घेतली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. प्रकांडपंडित गजाभाऊ महाविद्यालयातील या तरुण मुलांशी हसतखेळत दिलखुलास गप्पा मारत आहेत हे दृश्य विलक्षण होतं. गजाभाऊ अभ्यासक होते, पण रुक्ष नव्हते. सर्व वयोगटांत मिसळणारे होते.
 
 
14 सप्टेंबर 2025ची सकाळ! शिवशंभू विचार मंचचे महाराष्ट्रातल्या गावागावातून आलेले तरुण अभ्यासक! व्याख्यान ऐकायला उत्सुक झालेले.... आणि व्यासपीठावर उभे राहातात साक्षात गजानन भास्कर मेहेंदळे! वाणीचा गंगौघ वाहू लागतो. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही की अभिनिवेश नाही. अत्यंत शांतपणे, नर्मविनोदी शैलीत ज्या तथाकथित फर्मानाद्वारे औरंगजेब कसा धर्मसहिष्णु होता हे दाखवण्याचा खटाटोप आजवर करण्यात आला ते फर्मानच कसे फसवे आहे, हे सप्रमाण सिद्ध केले जाते.
 
 
गजाभाऊंच्या बोलण्यातून त्यांच्या पाच तपांहून अधिक संशोधनाची प्रगल्भता, लक्षावधी कागदपत्रांच्या अभ्यासातून आलेली पारखी नजर, देशविदेशांतील ग्रंथ, त्यांचे लेखक व त्या लेखनामागील हेतू, कळत-नकळत झालेल्या त्यांच्या चुका, एखादे वाक्य ग्रंथातील कोणत्या खंडातील कोणत्या पानावर आहे ही संदर्भ देण्यातील अचूकता, मराठी, संस्कृत, फारसी, इंग्रजी ऐतिहासिक समकालीन कागदपत्रांतील पुरावे या सगळ्याचे विराट दर्शन घडत होते. औरंगजेबाने छ. संभाजी महाराज व छ. राजाराम महाराज यांच्या मुलींची लग्ने संभाजीराजांना पकडणार्‍या मुस्लीम सरदाराच्या मुलांबरोबर लावून दिले. औरंगजेबाच्या या नीच वृत्तीचे वर्णन करताना एरवी तटस्थपणे बोलणारे गजाभाऊ गहिवरले. त्यांचा कंठ दाटून आला आणि हे पाहाताना समोरच्या श्रोत्यांचीही मनं हेलावली. पण त्यांच्या भाषणाने भारावलेल्या आम्हाला काय ठाऊक होते की, अजून तीन दिवसांनी आपल्याला गजाभाऊंना श्रद्धांजली वाहावी लागणार आहे.
 
गजाभाऊंचा जन्म 1947 साली मुंबई येथे झाला. युद्ध हा त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय होता. त्यांनी डिफेन्स स्टडीज मध्ये एम.ए.ची पदवी प्राप्त केली होती. 1971च्या भारत-पाक युद्धात प.बंगालमध्ये प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन त्यांनी दैनिक तरुण भारतसाठी वार्तांकन केले होते. शिवचरित्राप्रमाणेच पहिले आणि दुसरे महायुद्ध यावर त्यांचा प्रचंड अभ्यास होता. मराठ्यांच्या संग्रामकथांप्रमाणे चर्चिल, हिटलर, स्टॅलिन यांच्या युद्धनेतृत्त्वाबद्दल ते भरभरून बोलत.
 ’शिवचरित्र’ हा त्यांचा ध्यास होता. मूळ कागदपत्रे वाचण्यासाठी ते मोडी लिपी शिकले. मोगल साधने जाणण्यासाठी फारसी शिकले. गेली पन्नास वर्षे ही अखंड ज्ञानसाधना चालूच होती. शिवाजी महाराजांवरील प्रत्येक ऐतिहासिक कागद त्यांनी चिकित्सक वृत्तीने वाचला होता. ’राजा शिवछत्रपती’ या त्यांच्या ग्रंथातील एकेका वाक्यासाठी खाली पानभर दिलेल्या संदर्भ व टीपा पाहिल्या की, त्यांच्या प्रचंड विद्याव्यासंगाने वाचक थक्क होत असे.
 
’शिवचरित्र’ हा त्यांचा ध्यास होता. मूळ कागदपत्रे वाचण्यासाठी ते मोडी लिपी शिकले. मोगल साधने जाणण्यासाठी फारसी शिकले. गेली पन्नास वर्षे ही अखंड ज्ञानसाधना चालूच होती. शिवाजी महाराजांवरील प्रत्येक ऐतिहासिक कागद त्यांनी चिकित्सक वृत्तीने वाचला होता. ’राजा शिवछत्रपती’ या त्यांच्या ग्रंथातील एकेका वाक्यासाठी खाली पानभर दिलेल्या संदर्भ व टीपा पाहिल्या की, त्यांच्या प्रचंड विद्याव्यासंगाने वाचक थक्क होत असे. अनेकदा दोन घटनांमधील रिकामी जागा आपल्या तर्कबुद्धीने भरण्याचा मोह भल्या भल्या इतिहासकारांना आवरत नाही. मात्र ग. ह. खरे यांच्यासारख्या व्रतस्थ गुरूच्या तालमीत तयार झालेल्या गजाभाऊंनी ती चूक कधी केली नाही. ’समकालीन विश्वासार्ह ऐतिहासिक पुराव्यातून जे सिद्ध होईल तेवढेच मी सांगणार’, हा वसा त्यांनी कधी सोडला नाही.
 
 
मात्र असे असले तरी ऐतिहासिक ललित कलाकृतींचेही महत्त्व ते जाणत होते. इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने दुर्गप्रतिकृती प्रदर्शनाचा दृकश्राव्य कार्यक्रम आम्ही आयोजित करत असू. अलंकारिक भाषा, कविता, नाट्यमय संवाद अशा प्रकारे नटवलेली कलाकृती गजाभाऊंसारख्या प्रखर सत्यनिष्ठ व्यक्तीला आवडेल का? अशी शंका माझ्या मनात होती. म्हणून थोडेसे घाबरतच मी त्यांना निमंत्रण दिले. मात्र अनुभव असा की, ते उत्साहाने आले आणि कौतुकही केले. आणि ते म्हणाले की, इतिहास समाजापर्यंत पोचवण्यासाठी अशा माध्यमांची मदत जरूर घेतली पाहिजे. फक्त ते आकर्षक पद्धतीने मांडण्याच्या नादात सत्याचा धागा सुटणार नाही, याचे पथ्य पाळले की पुरे!
 
 
 
निरंतर ज्ञानसाधना ही त्यांची तपश्चर्या होती. त्यांनी मनात आणले असते तर पुण्यात आणि सर्व महाराष्ट्रात व्यासपीठावरून सत्कार घेत त्यांना मिरवता आले असते. राज्य व देश पातळीवरील पुरस्कार त्यांच्या पायाशी चालत आले असते. पण त्यांनी निग्रहपूर्वक हा मोह टाळला. कारण सत्कार, पुरस्कार, कीर्ती हे त्यांना त्यांच्या अध्ययन एकाग्रतेतील अडथळे वाटत असत. हा त्यांचा संयम आणि साधेपणा आजच्या काळात अत्यंत दुर्मीळ आढळणारा गुण आहे. मात्र एखादा तरुण अभ्यासक इतिहासातील शंका घेऊन आल्यास ते तत्परतेने मार्गदर्शन करत. शंकानिरसन करत असताना त्या संदर्भात आणखी काय वाचले पाहिजे, याची यादीच ते देत असत. युवा संशोधकांची एक नवी पिढी त्यांनी घडवली.
 
 
 
ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळापासून हे दिसून आले आहे की, ’इतिहास’ हा विषय केवळ ज्ञान म्हणून न राहाता राज्यकर्त्यांच्या हातातील ते एक शस्त्र बनले. समाजावरील आपली पकड पक्की करण्यासाठी आपल्या सोईचा इतिहास त्यांनी शिकवला. स्वातंत्र्यानंतर काही गटांनी आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी इतिहासातून भेदाभेदांचे विष पेरण्याचे कारस्थान रचले. महापुरुषांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आले. आक्रमकांचे अत्याचार लपवून टाकून उलट त्यांचे उदात्तीकरण चालू झाले आणि सोशल मिडीयाच्या उदयानंतर या भ्रामक प्रचाराला जणू वादळाचे रूप आले. दंगली घडवून समाजमन दुभंगून टाकण्याचे उद्योग सुरू झाले.
 
 
अशा वेळी गजाभाऊंसारखा इतिहासकार मात्र ठामपणे सत्य इतिहास मांडत राहिला. तोफेचा गोळा आदळल्यावर भक्कम तटबंदी ढासळावी तसे गजाभाऊंचे ग्रंथ प्रकाशित होताच लबाड लेखकांच्या चुकीच्या लेखनाचे मनोरे जमीनदोस्त होऊ लागले. ’सत्य प्रतिपादना’बरोबरच ’असत्य खंडनाचेही’ काम करण्यासाठी गजाभाऊ मेहेंदळे हे वैचारिक रणांगणावर पाय रोवून उभे ठाकले.
 
 
गेल्या काही वर्षांत अनेक विचारवंतांच्या आणि संघटनांच्या अथक परिश्रमातून हिंदुत्व ही एक ताकद उभी राहिली. राजकीय क्षेत्रातही त्याचे पडसाद उमटू लागले. मात्र यामुळे ज्यांच्या राजकीय स्वार्थाला सुरुंग लागला अशा शक्ती अस्वस्थ झाल्या. मग त्यांनी एकच कार्यक्रम राबवायला सुरुवात केली ते म्हणजे ’हिंदुत्व ही संकल्पना बदनाम करणे’ यासाठी विध्वंसक संघटना जन्माला घालण्यात आल्या. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले इतिहासकार उभे करण्यात आले. विषारी प्रचार करणारी हजारो पिवळी पुस्तकं बाजारात आणण्यात आली. त्यांच्या प्रचाराचे दोन प्रकार होते. एक म्हणजे हिंदुत्व ही ब्राह्मणी, मनुवादी, पेशवाई, प्रतिगामी संकल्पना आहे. तेव्हा ब्राह्मणेत्तरांनी तिकडे जाऊ नये. आणि दुसरे म्हणजे इस्लामचे आक्रमण कधीच वाईट नव्हते. औरंगजेब तर मंदिरांना दान देत होता. शिवाजी महाराजदेखील सर्वधर्मसमभाव मानत होते. अशा प्रकारे ब्रिगेड, बामसेफसारख्या विकृत संस्थांनी समाजमन गढूळ केलं होतं. त्या काळात गजाभाऊंची ’छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर?’, ’इस्लामची ओळख’, ’औरंगजेब’ अशी पुस्तके समोर आली आणि सिंहाच्या फक्त डरकाळीने जंगलातील कोल्ह्यालांडग्यांनी पायात शेपूट घालून धूम ठोकावी तशी विरोधकांची अवस्था झाली.
 
 
हिंदुत्व विचारधारा मांडणार्‍या नव्या पिढीतील लेखक, वक्ते, सोशल मिडियावर ब्लॉग टाकणार्‍या व युट्युब चॅनल आणि व्हिडिओज निर्माण करणार्‍यांसाठी गजाभाऊ एक थिंक टँक होते. वैचारिक खाद्य पुरवणारा अक्षय धनाचा साठा गेल्यामुळे हिंदुत्व विचारधारेचे अतोनात नुकसान झाले आहे. कोणतीही सिद्धी प्राप्त करण्यापूर्वीच प्रसिद्धीच्या मागे धावणार्‍या आजच्या काळात एका विषयाच्या अध्ययनासाठी एखादी व्यक्ती संपूर्ण जीवन समर्पित करते, ही सुद्धा आख्यायिका वाटू शकते. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या तपोभूमीवर राजवाडे-खरे यांची परंपरा व्रतस्थपणे जपणारा गजानन भास्कर मेहेंदळे नावाचा तपस्वी अनंताच्या प्रवासाला निघून गेला.
 
 
या ज्ञानयोगी इतिहासऋषीला भावपूर्ण श्रद्धांजली!