@संतोष वाघोलीकर, 9405245997
नांदेड जिल्ह्यातील सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचे संस्थापक, कर्मयोगी के.ना. तथा बाबासाहेब देशमुख यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. देशमुख यांनी संस्कृती संवर्धन मंडळाच्या माध्यमातून कृषी, ग्रामविकास, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रांत बहुमोल योगदान दिले. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या विचार व कार्याला उजाळा देणारा लेख.
ज्या समाजाने वाढवले, त्याचे ऋण फेडणे हे जीवनाचे इतिकर्तव्य असे समजून आजन्म सेवेत असलेले कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांचा जन्म 27 मार्च 1926 रोजी झाला. मराठवाड्यासारख्या अविकसित भागांतील तेलंगणा-कर्नाटकाच्या अगदी सीमेवरील सगरोळी (ता. बिलोली, जि.नांदेड) या लहानशा खेड्याचे ते जमीनदार. मनाने परिर्वतनवादी. बालपणापासून आजी राधाबाईंच्या सहवासाने त्यांच्यात दयाळूपणा, शिस्त आणि समतेचे बीज रुजले. हैदराबाद येथे शिक्षण पूर्ण करून ते गावी परतले. शेती व मातीत रमू लागले. पण हैदराबाद संस्थानात रझाकारांच्या उद्रेकामुळे त्यांना बेळगावला वास्तव्य करावे लागले. हे संस्थान भारतात विलीन झाल्यावर ते पुन्हा सगरोळीत परतले. सुशिक्षित, मृदु स्वभाव, लोकांच्या अडचणीत धावून जाणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये. या गुणांमुळे गावकर्यांनी त्यांना सगरोळी ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच म्हणून निवडून दिले. 1952 ते 1978 ही पंचवीस वर्षे ते सगरोळी ग्रामपंचायतीचे सरपंच होते. गावात रस्ते, नळ योजना, नाली, पथदिवे, मंदिर सुधारणा अशा अनेक योजना राबविल्या. नांदेड जिल्ह्यातील पहिले पोस्ट ऑफिस सगरोळीत सुरू करण्याचा सन्मान त्यांच्या नावावर नोंदला गेला. बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड होती. वाचनसंस्कृती वाढावी यासाठी 22 एप्रिल 1955 रोजी हैदराबाद राज्याचे गृहमंत्री दिगंबरराव बिंदू यांच्या हस्ते सगरोळी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन केले. 1969साली महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षात सगरोळी ग्रामपंचायतीला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला व याशिवाय कंपोस्ट खत खतनिर्मितीबद्दल राज्यस्तरीय सन्मान मिळाला.
संस्कृती संवर्धन मंडळाची स्थापना
शिक्षण, शेती व ग्रामविकासाविषयी बाबासाहेबांना कळवळा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात निजामाच्या राजवटीखाली असलेल्या या भागात शिक्षणाचा मागमूसही नव्हता, विशेषतः मुलींच्या शिक्षणाचा तर विचारही होत नसे. पण बाबासाहेबांची कन्या सुलोचना चौथी उत्तीर्ण झाल्या. बाबासाहेबांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्यास पाठवले. हिंगणे येथील कर्वे शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. संस्थेमध्ये महर्षी धोंडो कर्वे यांची भेट झाली. महर्षी कर्वे यांचे कार्य पाहून बाबासाहेब प्रेरित झाले. 1958 मध्ये स्वतःची दीडशे एकर जमीन दान करून त्यांनी ‘संस्कृती संवर्धन मंडळा’ची स्थापना केली. त्या काळात 36 मुलींना घेऊन वसतिगृह सुरू केले. आज गरीब, वंचित, अनाथ मुलांसाठी हे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र ठरले आहे. 1970 ते 1980 हा काळ संस्था विस्ताराचा पाया ठरला. शिक्षणाबरोबरच आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन ‘संजीवनी आरोग्य मंदिर’ सुरू करण्यात आले. आज ही संस्था शिक्षणाबरोबरच पर्यावरण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, जलसंधारण, कृषी विकास व कौशल्य विकास या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे.
दुष्काळात अभूतपूर्व कार्य
1972साली देशात व राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. याची झळ सगरोळीवासियांनाही सोसावी लागत होती. अन्नटंचाई निर्माण होताच गावकर्यांनी बाबासाहेबांकडे धान्यासाठी धाव घेतली. सगरोळी बहुविध सेवा सोसायटीच्या गोदामात धान्य असूनही तहसीलदार परवानगी देत नव्हता. सोसायटी चेअरमन व बाबासाहेब यांनी तहसीलदारांची तमा न बाळगता गावकर्यांना धान्य वाटप केले. ही बातमी कळताच तहसीलदारांनी बाबासाहेब, चेअरमन व कार्यकारिणीवर गुन्हा दाखल केला. परिस्थिती गंभीर झाल्यावर बाबासाहेबांनी नांदेडच्या जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. सर्व हकिकत सांगितली. बाबासाहेबांचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन जिल्हाधिकार्यांनी तहसीलदाराला फटकारले. खटला मागे घ्यावा व सोसायटीला मदत करावी असा आदेश दिला. संत दामाजीपंतांच्या कार्याचा वसा सोसायटीने कृतीतून साकार केला. यामागे बाबासाहेबांनी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले.
सामूहिक सिंचनाचा प्रयोग
बाबासाहेबांचे जल व कृषी क्षेत्रातील कार्य अजोड आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1987-88 मध्ये सगरोळीत सुरू झालेला सामूहिक सिंचनाचा प्रयोग आजही अनुकरणीय आहे. हा प्रयोग मिझेरियर(जर्मनी) संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात आला. एकाच विहिरीचे पाणी चार-पाच शेतकरी कुटुंबांनी सामायिकपणे वापरणे, पंपसेटची संयुक्त मालकी अशी या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये होती. हे कार्य अटकळी, आदमपूर, सगरोळी या गावांमध्ये यशस्वी ठरले. 1989-90मध्ये हा परिसर दुष्काळाने होरपळत असताना, सगरोळी मात्र पाण्याच्या प्रयोगांमुळे आश्वासक ठरत होते. पाण्याचे सामायिकीकरण ही शेतीतील सुधारणा असली, तरी ग्रामविकासाच्या दिशेने उचललेली निर्णायक पायरी ठरली.
नागदरवाडीचे जलकार्य
1990 साली दुष्काळामुळे नागदरवाडी गाव उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर होते. शेती संपली होती. तरुण पिढी स्थलांतरित झाली होती. स्त्रियांना मैलोनमैल पाणी आणावे लागत असे. अशा संकटाच्या वेळी गावातील युवक हनुमंत केंद्रे यांनी बाबासाहेब व संस्कृती संवर्धन मंडळाशी संपर्क साधला. वॉटर आणि नाबार्ड यांच्या सहकार्याने जलसंवर्धन प्रकल्प राबवण्यात आला. चेक डॅम्स, जलटाक्या, कंटूर बंडिंग अशा उपाययोजनांमुळे ग्रामस्थांनी पाण्याचे महत्त्व नव्याने समजून घेतले. या प्रकल्पात महिलांचा सहभाग विशेष ठरला. आज नागदरवाडीचा हा अनुभव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. हे गाव आजूबाजूच्या दोन तालुक्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे, हीच या यशस्वी परिवर्तनाची ठळक साक्ष आहे. ‘पाणी‘ या चित्रपटातून या संघर्षाची गोष्ट देशभर पोहोचली आहे.
कृषीक्षेत्रातील योगदान
शेतकर्यांना शाश्वत शेतीची जाणीव देणार्या विविध प्रयत्नांतून बाबासाहेबांनी नवा मार्ग दाखवला आहे. शेती सुधारण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी ‘जयेदवी अॅग्रीकल्चर प्रोड्यूसर कंपनी‘ची स्थापना केली. ट्रॅक्टर हे त्या काळी शेतकर्यांचे स्वप्न होते, ते त्यांनी गावकर्यांचे अंगणात आणले. शेतकर्यांसाठी ट्रॅक्टर प्रशिक्षण व दुरूस्तीची सोय या माध्यमातून त्यांनी करून दिली.
एप्रिल 2001मध्ये सगरोळीत झालेला राज्यस्तरीय ‘सेंद्रिय शेती मेळावा‘ हा नवी कालाटणी देणारा ठरला. या मेळाव्यात तज्ज्ञांनी सेंद्रिय शेतीच्या संधी स्पष्ट केल्या. शेतजमिनीची सुपीकता, पाण्याची साठवण क्षमता, रासायनिक खतांचे दुष्परिणाम, तसेच योजनांचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘कृषी समृद्धी’ प्रकल्प राबवण्यात आला. पुढे बाबासाहेबांचे कृषी विचार लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी सगरोळी येथे ‘कृषी विज्ञान केंद्र‘ सुरू करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी ज्ञान, नव तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन देणारे प्रभावी केंद्र ठरले आहे.
बाबासाहेबांनी सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेतला. सगरोळी व अटकाळी भागातील 500 बेघरांना घरे मिळवून दिली. सामाजिक वनीकरण व वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला. त्यांच्या प्रयत्नाचीं दखल घेऊन राज्य व केंद्र शासनाने दलित मित्र पुरस्कार, इंडियन मर्चंट चेंबर पुरस्कार, राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र आदी पुरस्काराने सन्मानित केले आहे. बाबासाहेबांच्या पश्चात ज्येष्ठ पुत्र देविदास देशमुख यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून संस्थेचा नवसंचार घडवला. त्यानंतर प्रमोद देशमुख यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि मूल्यनिष्ठ नेतृत्वाखाली संस्था नव्या उंचीवर पोहोचली. आज रोहित आणि श्रद्धा देशमुख नवे दृष्टिकोन, आधुनिक व्यवस्थापन आणि सृजनशीलतेसह कार्यरत आहेत.
एकूणच बाबासाहेबांनी सगरोळीत कृषी, शिक्षण, जलसंधारण, ग्रामविकासाचा फक्त पायाच घातला नाही, तर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असणार्या संस्थांचे जाळे निर्माण केले. त्यांनी पेरलेली मूल्यांची बीजे इथल्या तरूणांच्या मनात रूजत आहेत.
संपर्क
प्रमोद देशमुख, अध्यक्ष
संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड
मो.9823989997