निंदा स्तुती न घे...

विवेक मराठी    03-Sep-2025   
Total Views |
- रमेश पतंगे
 
राज्यबळाचा वापर करायचा नाही, संयम ठेवायचा, मानसिक संतुलन ढळू द्यायचे नाही, परिस्थितीचा अभ्यास करीत राहायचा, सहकार्‍यांना बरोबर घ्यायचे, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यांच्या सहकार्याने योग्य निर्णय करायचा, हे देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आणि करून दाखविले.
devendra fadnavis
 
पहिल्या श्रेणीच्या राजकीय नेत्याच्या जीवनात त्याच्या नेतृत्वगुणाची कसोटी पाहणारे अनेक प्रसंग येतात. याप्रसंगी त्या नेत्याचे धैर्य, चिकाटी, मानसिक संतुलन, निर्णयक्षमता, नैतिक मूल्यांची जपवणूक, सर्व प्रकारची माहिती गोळा करण्याची क्षमता आणि योग्य वेळी योग्य निर्णय करण्याचीदेखील क्षमता, या सर्वांची कसोटी लागते. या कसोटीस जो उतरतो, त्याच्या राजकीय जीवनाचा प्रवास हा उत्तरोत्तर वरच्या श्रेणीत जाणारा असतो. या बाबतीत भारतातील आणि जगातील अनेक राजनेत्यांची उदाहरणे लक्षात घेण्यासारखी आहेत. सरदार वल्लभाई पटेल, श्रीमती इंदिरा गांधी ही दोन भारतातील राजकीय नेतृत्वाची मोठी नावे आहेत.
 
 
जर्मनीचे एकीकरण करणारा ऑटो व्हॉन बिस्मार्क, इटलीचा गॅरिबाल्डी, ब्रिटनचा ओलिवर क्रॉमवेल, विन्सटन चर्चिल, अमेरिकेचे जॉर्ज वाशिंगटन, अब्राहम लिंकन, रूझवेल्ट, असे थोर पुरुषदेखील वर दिलेल्या सर्व नेतृत्वगुणात श्रेष्ठ ठरले आहेत.
 
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सर्व नेत्यांच्या पंक्तीत नेऊन बसवणे आज घाई होईल, परंतु ज्या धैर्याने, चिकाटीने आणि मानसिक संतुलन राखून सर्वांचा समाधान करणारा निर्णय त्यांनी केला. यामुळे त्यांच्या नेतृत्व गुणांची कसोटी लागलेली आहे. मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आले. मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा आहे. हजारो युवक त्यांच्या मागोमाग आले. आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन येथील परिसर आंदोलकर्त्यांनी व्यापून गेला. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी जरांगे-पाटील यांनी ठाम भूमिका घेतली.
 
 
त्यांच्या आंदोलनाने अनेक प्रश्न निर्माण केले. त्यातील काही प्रश्न राजकीय आहेत. मनोज जरांगे-पाटील यांच्या मागे कोण आहे? आंदोलन पैशाशिवाय उभे राहू शकत नाही, ही रसद पुरविणारे कोण? त्यांचे राजकीय हेतू कोणते? मनोज जरांगे-पाटील यांना पुढे करून त्यांच्या खांद्यावर बंदुका कोणी रोखल्या आहेत? लक्ष्य कोण आहे? या प्रश्नांची भरपूर चर्चा झाली. काही चर्चा जाहीरपणे झाली, काही दबक्या आवाजात झाली. देवेंद्र फडणवीस हे लक्ष्य आहेत, हे न सांगताच सर्वांना समजले.
 
 
त्यांच्या विरूद्ध अर्वाच्च भाषा वापरली गेली. जातीमुक्तीवाल्यांनी त्यांची जात काढली. सकाळ संध्याकाळ महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांचा जप करणार्‍यांनी फडणवीसांच्या जातीचा तेवढाच जप सुरू केला. बहुसंख्य आमदार मराठा आहेत, तर ब्राह्मण मुख्यमंत्री कसा? हा महाराष्ट्राचा ‘पुरोगामी विचार’ या लोकांनी मांडला. देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाच्या कसोटीचा हा कालखंड आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर तिहेरी जबाबदारी आहे. पहिली जबाबदारी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था याची परिस्थिती कायम ठेवण्याची, दुसरी जबाबदारी आरक्षण मागणार्‍या मराठा समाजाला न्याय देण्याची आणि त्याच वेळी त्यांना न्याय देताना ओबीसी समाजगटावर अन्याय होणार नाही हे पाहण्याची. आणि तिसरी जबाबदारी देवेंद्र फडणवीस एका विचारधारेचे मुख्यमंत्री आहेत. या विचारधारेविषयी जेवढा अपप्रचार करता येईल तेवढा पुरोगामी मंडळींनी केलेला आहे. या विचारधारेचा एक चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यायचा होता.
 
 
चाणक्याने आदर्श राजकर्त्याची गुणवत्ता सांगितली आहे, त्यात पहिला गुण असा सांगितला की, राज्यकर्ता सदैव प्रजेचे हित करणाराच असायला पाहिजे. स्वतःच्या हिताचा विचार न करता प्रजेच्या हिताला त्याने अग्रक्रम दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर न्यायाची भूमिका घेताना कुणावरही अन्याय होणार नाही असा निर्णय केला. हे अतिशय अवघड काम आहे.
 
देवेंद्र फडणवीस एका विचारधारेचे मुख्यमंत्री आहेत. या विचारधारेविषयी जेवढा अपप्रचार करता येईल तेवढा पुरोगामी मंडळींनी केलेला आहे. या विचारधारेचा एक चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यायचा होता.
मराठा आंदोलन राज्यशक्तीचा वापर करून दाबून टाकणे फार अवघड नव्हते. मुंबईत येणार्‍या सर्व वाटा ते रोखू शकले असते. आंदोलकांवर मध्यरात्री पोलिस घालून सर्वांची उचलबांगडी करता येणे शक्य होते. असे काम दिल्लीत काँग्रेस शासनाने रामदेव बाबा यांच्या रामलीला मैदानावरील आंदोलकांच्या बाबतीत केले. नागपूरला गोवारी समाजाचा मोर्चा आला असता शरद पवार यांनी त्यांच्यावर पोलिस घातले. पळापळीत शंभहूरन अधिक गोवारी ठार झाले. असा कोणताही हिंसाचार करायचा नाही.
 
 
राज्यबळाचा वापर करायचा नाही, संयम ठेवायचा, मानसिक संतुलन ढळू द्यायचे नाही, परिस्थितीचा अभ्यास करीत राहायचा, सहकार्‍यांना बरोबर घ्यायचे, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यांच्या सहकार्याने योग्य निर्णय करायचा, हे देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आणि करून दाखविले.
 
 
अशा नेत्याच्या गुणसंपदेविषयी गीतेच्या बाराव्या अध्यायात श्लोक 13 ते 19 यात भगवान श्रीकृष्णाने फार सुंदर विवरण केलेले आह. विनोबा भावेंच्या गीताईत त्याचा फार अप्रतिम अनुवाद आहे. त्यातील काही शब्द असे आहेत,
‘कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी..
 
सदा संतुष्ट संयमी दृढ निश्चयी..
 
जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते (लोक)..
 
न उल्हासे, न संतापे, न मागे, न झुरे..
 
सम देखे सखे, वैरी तसे मानापमानही..
 
निंदा स्तुती न घे मौनी मिळे ते गोड मानी स्थिर बुद्धी..’
 
यामुळे देवेंद्र फडणवीस या सर्व काळात अतिशय शांतचित्त राहिले, स्थिर बुद्धी राहिले. आपल्याला काय करायचे आहे आणि कसे करायचे आहे, याविषयी त्यांची भूमिका स्पष्ट राहिली. आणि योग्य वेळी योग्य निर्णय ते घेऊ शकले.
 
राजकारणाचा विचार करता राजकीय प्रश्न कधी संपत नाहीत. एक प्रश्न संपल्यासारखा वाटतो, पण त्या प्रश्नात भविष्यातील प्रश्नांची बीजे असतात. पहिल्या श्रेणीच्या राजनेत्याला प्रश्न टाळता येत नाहीत, प्रश्नसंन्यास घेता येत नाहीत, हे प्रश्न अफजलखानासारखे असतात-त्यांच्या भेटीला जावे लागते. पुढे काय करायचे ते सांगण्याची काही गरज नाही.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.