तुजवीण रामा विश्रांती नाही

विवेक मराठी    06-Sep-2025   
Total Views |
Karunastake
स्वामींचे अंत:करण जितके कोमल तितके तर्कनिष्ठही आहे. करुणाष्टकात स्वामींची अंतःकरणाच्या गाभार्‍यातून आलेली रामभेटीची तळमळ आणि अत्युच्च भक्तिभावना दिसून येते, तसेच दासबोधातील समासांत स्वामींची तर्कनिष्ठ प्रखर बुद्धिमत्ताही दिसून येते.
समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेल्या ’अनुदिनि अनुतापे’ या करुणाष्टकाची पूर्तता मागील लेखात झाली. पुढील वेगळ्या करुणाष्टकाची चर्चा करण्यापूर्वी स्वामींच्या एकंदर करुणाष्टक या आकृतिबंधाविषयी थोडेसे सांगितले पाहिजे. करुणाष्टकातील पदलालित्य, विचारांचा सच्चेपणा, भावनांचा ओलावा, रामभेटीची आतुरता, अंतःकरणाची व्याकुळता इत्यादी गुणांनी वाचकांना करुणाष्टके वाचायला, म्हणायला आवडतात. पारंपरिक उपासनेत करुणाष्टके भावपूर्ण स्वरात म्हटली जातात. त्याने रामाच्या प्रेमाची भक्तीची गोडी अनुभवता येते, असा भाविकांचा अनुभव आहे, तथापि आजच्या काळात भगवंताविषयी भक्तिप्रेमभावाला भोळेपणा समजून बुद्धिप्रामाण्याला महत्त्व दिले की, आपण सुशिक्षित गटात मोडतो, असा एक सार्वधिक समज झाला आहे.
बुद्धिप्रामाण्यात भाबडेपणाला स्थान नसते, हे खरे असले तरी रामदासस्वामींच्या कोमल अंतःकरणाची घडण कशी होती, याचा प्रत्यय येण्यासाठी करुणाष्टके अवश्य वाचावी, ऐकावी. त्यात वेगळा आनंद आहे. तेथे भाबडेपणा नाही. दांभिकता तर मुळीच नाही. स्वामींचे अंत:करण जितके कोमल तितके तर्कनिष्ठही आहे. करुणाष्टकात स्वामींची अंतःकरणाच्या गाभार्‍यातून आलेली रामभेटीची तळमळ आणि अत्युच्च भक्तिभावना दिसून येते, तसेच दासबोधातील समासांत स्वामींची तर्कनिष्ठ प्रखर बुद्धिमत्ताही दिसून येते. करुणाष्टकांविषयी प्रा. रा. द. रानडे यांचा अभिप्राय खूप काही सांगून जातो. रानडेसरांनी त्यांच्या 'Mysticism in Maharashtra' या ग्रंथात लिहिले आहे की, ’करुणाष्टके shows in abundance of what a mild texture Ramadasaa's mind was made. Very often he calls upon God from the very depths of his heart.'
 
 
स्वामींनी लिहिलेले साहित्य साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात ठेवून त्यावर विवेचन करावे लागते. करुणाष्टकांची भाषा साधीसोपी असली तरी त्यातील काही शब्दांचे अर्थ पटकन समजत नाहीत, श्लोकातील आशयावरून त्याचा अंदाज करता येतो - कै. ल. रा. पांगारकर, शंकरराव देव, प्रा. रा. द. रानडे आदी प्रज्ञावंतानी तसेच आधुनिक काळातील विचारवंत लेखकांनी ’करुणाष्टके ’या विषयावर अभ्यासपूर्ण अर्थस्पष्टीकरण केले आहे. पूर्वी लोक हे श्लोक पाठ करीत असत. अनेक वर्षांच्या पाठांतरातून त्यात काही पाठभेद निर्माण होतात. शब्दांचे, श्लोकांचे क्रम बदलले जातात. तेव्हा प्रा. रा. द. उर्फ गुरुदेव रानडे यांनी 1926 साली प्रकाशित केलेल्या त्यांच्या ’रामदास वचनामृत’ या पुस्तकात दिलेल्या काही करुणाष्टकांची संहिता मी जशीच्या तशी लेखांत घेतली आहे. प्रा. रानडे हे अलाहाबाद विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख होते. त्यांनी शोधन केलेली करुणाष्टके प्रमाण मानायला हरकत नाही.
 
 
’अनुदिनि अनुतापे’ या करुणाष्टकातील शेवटच्या 15व्या श्लोकात स्वामी सांगतात की, जलचर प्राणी सदैव पाण्यातच राहात असल्याने त्यांना पाणी हे वेगळेपणाने माहीत नसते. तद्वत, हे रामा दिवसरात्र प्रत्येक क्षणी तुझ्याजवळ असूनही मी तुला जाणू शकलो नाही. तेव्हा सकळ भुवनात वास करणार्‍या रामा, तू आता मला भेट दे. ही रामभेटीची तळमळ, आतुरता तशीच पुढे चालू ठेवून स्वामींनी ”सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी” हे करुणाष्टक आपल्याला दिले आहे. त्यातील पहिला श्लोक असा आहे -
 
दुःखानले मी संतप्त देहीं। तुजवीण रामा विश्रांति नाहीं।
आधार तुझा मज मी विदेसीं । सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ॥ 1 ॥
 
अन्वयार्थ - दुःखरूपी अग्नीने मी देहातून (मनातून) होरपळून निघत आहे. (दुःखाचे चटके असह्य झाल्याने) तुझ्या (भेटी) शिवाय (मन) विश्रांती पावणार नाही. (घरदार सोडून) परक्या ठिकाणी मला तुझा आधार आहे. (तेव्हा) हे सर्व उत्तम गुणांनी युक्त (रामा) तू मला केव्हा भेट (दर्शन) देशील.
 
 
रामदासस्वामी म्हणजे लहानपणीचे नारायण स्वतःच्या लग्नमंडपातून विवाह सोहळा सुरू होण्यापूर्वीच पळाले, त्यावर आधुनिक काळात समर्थांवर टीकाही झाली. नियोजित वधूचा कळवळा येऊन ते स्वामीवर तुटून पडले. तथापि ही टीका अनाठायी व चुकीची आहे. त्या प्रसंगी ’सावधान’ शब्द कानावर पडताच नारायण पळाला, त्यावेळी त्याचे वय 11 वर्षे व नियोजित वधूचे वय 5/6 वर्षे होते. नारायण पळाल्यावर लग्नासाठी तयार केलेल्या त्या मुलीचे लग्न त्याच मंडपात दुसर्‍या वराशी लावून देण्यात आल्याचे आत्माराम स्वामींनी ’दासविश्रामधाम’ या ग्रंथात स्पष्ट केले आहे. रामदासस्वामींच्या ठिकाणी निजज्ञानाची पहाट उगवण्याची ती वेळ होती. ते विधिलिखित होते. ती ज्ञानपहाट ’सावधान’ शब्द ऐकताच उदय पावली आणि नारायणाला तेथून पळून जाण्याची प्रेरणा मिळाली. इतकाच या घटनेचा अर्थ आहे, असो.
 
 
रामदास तेथून निघाल्यावर गोदावरीच्या काठाकाठाने प्रवास करीत रामभेटीची आस मनात धरून नाशिकला येऊन पोहोचले. तेथील राममय वातावरण पाहून त्यांना आनंद झाला. टाकळी जवळील एका छोट्याशा गुहेत राहून स्वामींनी गोदावरीतीरी आपली साधना सुरू केली. आपले घरदार, प्रेमळ आई, भाऊ, नातेवाईक, सवंगडी सार्‍यांचा त्याग करून एक बारा वर्षांचा मुलगा रामभेटीसाठी इतक्या दूर, कोणाचा आधार नसलेल्या अनोळखी ठिकाणी येऊन राहातो व तप:साधना करतो, त्याची मानसिक स्थिती आपण कल्पनेने समजू शकतो. स्वामींना नाशिक क्षेत्री कोणाचा आधार आश्रय नव्हता, तरी आपण निराधार आहोत, असे त्यांना कधी वाटले नाही. कारण रामावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. म्हणून, ’आधार तुझा मज भी विदेसी’ असा भाव ते व्यक्त करतात.
 
 
रामाचा आधार वाटला तरी मनातील दुःख काही कमी होत नव्हते. दुःखरूपी अग्नी मनात तेवत असल्याने मन आणि शरीर होरपळत आहे असे स्वामी म्हणतात. नाशिकला साधकदशेच्या काळात स्वामींना कोणी ओळखत नव्हते. उलट काही टवाळखोर, घरदार सोडून आलेल्या या मुलाची कुचेष्टापण करीत असतील. प्रेमळ माणसांचा विरह व ही कुचेष्टा असे दुहेरी दुःख सहन करीत स्वामींनी तप:साधना चालू ठेवली, ती केवळ रामाच्या दृढ विश्वासावर, रामाच्या आधारावर. काही अभ्यासकांनी याचा अर्थ ’आध्यात्मक्षेत्रात मी नवीन आहे. त्यासाठी मला रामाचा आधार आहे’ असा लावला आहे. तथापि ही अध्यात्म साधना स्वामींना घरी राहूनही करता आली असती, परंतु बालवयात आपल्या सुहृदांचा त्याग करून त्यांनी रामसान्निध्यासाठी नाशिक हे तीर्थक्षेत्र निवडले. यावरून तेथे होणार्‍या भौतिक त्रासाचे निवारण होण्यासाठी स्वामींना रामाचा आधार होता असे वाटते. आध्यात्मिक प्रगतीसाठी रामाची भेट हे स्वामींचे ध्येय होते, ते रामाच्या आधाराशिवाय शक्य नव्हते हा भाग वेगळा. तरी भौतिक त्रास सहन करण्यासाठी कोणाचा तरी आधार लागतो, तो स्वामींच्या निराश्रित स्थितीत रामाचा होता. रामावर त्यांची सारी भिस्त होती. तेव्हा सर्वगुणांचा साठा असलेल्या रामा, तू मला केव्हा भेटशील अशी अंत:करणाच्या गाभार्‍यातून स्वामी रामाला विनंती करीत आहेत. तुझ्या भेटीसाठी माझा जीव तळमळत आहे, माझी साधना चालू आहे, पण तुझ्या भेटीचे इप्सित साध्य होत नाही, याला काय कारण असावे हे स्वामी पुढील श्लोकात सांगणार आहेत. ते पुढील लेखात पाहू.

सुरेश जाखडी

'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..