सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुन्शी - बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख

विवेक मराठी    06-Sep-2025
Total Views |
 @ ओंकार जोशी 
munshi
सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुन्शी हे पुस्तक दोन विभागात विभागले आहे. पहिला विभाग मुन्शी यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकतो तर दुसरा विभाग राजकारणापलीकडचे मुन्शी आपल्यासमोर मांडतो. हे पुस्तक फक्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच सांगत नाही, तर त्यांची लोकशाहीवादी विचारसरणी आणि हिंदुत्वाच्या भूमिकेची झलकही दाखवतं.
भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणात मोलाचे योगदान देणारे, स्वातंत्र्यसैनिक, संविधान सभेचे सदस्य, समाजकारण व साहित्य क्षेत्र यांचा संगम असलेलं विलक्षण व्यक्तिमत्त्व म्हणजे कन्हैयालाल मुन्शी. त्यांच्या कार्याचा व्याप जितका विशाल, तितकाच तो प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक आहे. असे असले तरी, इतक्या महत्त्वपूर्ण योगदानानंतरही मुन्शी हे दुर्दैवाने व्यापक जनमानसात काहीसे दुर्लक्षित राहिले. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा जवळून परिचय करून देण्याचा प्रयत्न प्रसाद फाटक यांनी ‘सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुन्शी’ या ग्रंथातून केला आहे.
 
 
पुस्तकाचे नाव : सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुन्शी
लेखक : प्रसाद फाटक
प्रकाशक : भारतीय विचार साधना, पुणे.
पृष्ठसंख्या : 254
किंमत : 200 /-
पुस्तकासाठी संपर्क : भाविसा फाउंडेशन
87999 31616
 
 
कन्हैयालाल मुन्शी यांचा जन्म 30 डिसेंबर 1887 रोजी भडोच या गावी झाला. कन्हैयालाल यांचे वडील माणिकलाल मुन्शी इंग्रज सरकारच्या चाकरीमध्ये होते, त्यांची बढती होत होत ते डेप्युटी कलेक्टर पदापर्यंत पोहोचले. त्यांच्याकडे स्वतःची घोडागाडी होती. अशा सुखवस्तू घराण्यात कन्हैयालाल यांचे बालपण गेले; परंतु वडिलांच्या निधनानंतर कसोटीचा काळही त्यांनी अनुभवला. पुढे मॅट्रिक झाल्यानंतर कन्हैयालाल बडोदा येथे पुढील शिक्षणासाठी दाखल झाले आणि तिथे त्यांची गाठ पडली एका अत्यंत प्रभावी प्राध्यापकाशी, त्यांचे नाव होते अरविंद घोष! अरविंद घोष यांच्या उत्कट देशभक्तीचा मुन्शींवर प्रभाव पडला नसता तरच नवल. त्यानंतर मुन्शींना घडलेले काँग्रेसचे प्रथम दर्शन, बारडोलीच्या सत्याग्रहाच्या वेळी सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांचा मुन्शी यांच्यावर पडलेला प्रभाव, महात्मा गांधींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं गांधीमय होऊन जाणं; तसेच गांधींचे सत्याग्रहाचे आणि अहिंसेचे विचार पटेनासे झाल्यावर गांधीविचारांशी घेतलेली फारकत हा सर्व प्रवास पुस्तकात खूप उत्तम प्रकारे आला आहे आणि त्यामुळे मुन्शी यांचा राजकीय प्रवास वाचकांसमोर अगदी सविस्तरपणे उलगडत जातो.
 
 
 
मुंबई प्रांताच्या गृहमंत्रीपदी असताना कम्युनिस्ट नेत्यांमार्फत भडकावण्यात आलेल्या दंगलीला नियंत्रित करतेवेळी मुन्शी यांनी केलेली टिपण्णी पाहून त्यांची कर्तव्यदक्षता आपल्या ध्यानात येते. मुन्शी लिहितात,‘कायदा व सुव्यवस्था आणि देशाचे स्थैर्य यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये कम्युनिस्टांना कोणतीही सहानभूती दाखवू नका. कारण, सिद्धांत आणि कृती या दोन्हीमध्ये त्यांनी स्थैर्याला नष्ट करण्याची आणि सत्तेत येईपर्यंत स्थैर्य संपूर्ण नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेतलेली असते.’ ही कम्युनिस्टांची मनोवृत्ती आजच्या काळातही आपल्याला अनुभवायला मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी देखील मुन्शी यांचे आपुलकीचे संबंध होते. संघाच्या गुरुपूजन कार्यक्रमासही त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. अखंड हिंदुस्थानालाही त्यांचा पाठिंबा होता. त्याकरिता त्यांनी काँग्रेस आणि गांधींच्या विरोधात जाणे पसंत केले आणि वेळप्रसंगी कोणतेही आरोप अथवा वाद न घालता काँग्रेसमधून बाहेर पडून अखंड हिंदुस्थानाचा देशभर प्रचार केला. परंतु जेव्हा फाळणी होणं अटळ आहे, हे मुन्शी यांच्या लक्षात आले तेव्हा ते स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये परतले.
 
 
भारताचे स्वातंत्र्य, फाळणी आणि संस्थानांचे विलिनीकरण याबाबतही पुस्तकात विस्तृतपणे भाष्य केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळताना सर्व संस्थानांनाही स्वातंत्र्य मिळेल, असे जाहीर केले गेले होते. त्यांच्यासमोर तीन पर्याय ठेवले गेले, एक - भारतात सामील होणे, दोन - पाकिस्तानात सामील होणे, तीन - स्वतंत्र राहणे. व्ही. पी. मेनन आणि सरदार पटेल यांच्या असाधारण कौशल्यामुळे बहुतांश संस्थाने विनासायास भारतामध्ये विरघळून गेली. मात्र काही संस्थाने आडमुठी होती, ज्यात काश्मीर, जुनागड आणि हैद्राबादचा समावेश होता. यापैकी जुनागड आणि हैद्राबादशी मुन्शी यांचा जवळून संबंध आला. हैद्राबाद विलिनीकरणावेळी मुन्शी यांची मुत्सद्देगिरी आणि त्यांना आलेले अनुभव लेखकाने रंजकतेने मांडले आहेत. जुनागड संस्थानाचे विलिनीकरण आणि त्यानंतर सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण हा भाग या पुस्तकाचा सर्वोच्च बिंदू आहे. मंदिर उभारणीसाठी नेहरू अनुकूल नसतानाही सरदार पटेल, काकासाहेब गाडगीळ आणि मुन्शी यांनी सोमनाथचे पुनर्निर्माण कसे घडवून आणले, ही रोचक माहिती वाचकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. कन्हैयालाल मुन्शी हे स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे महत्त्वाचे शिल्पकार देखील होते. संविधान सभेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले. ते नामवंत वकील असल्याने देशाच्या रचनात्मक व घटनात्मक बाबींचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांच्या अनुभवसंपन्न कार्यामुळे ते संविधान निर्मितीत प्रभावी सहभागी ठरले.
 
 
लेखकाने पुस्तक दोन विभागात विभागले आहे. पहिला विभाग मुन्शी यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकतो तर दुसरा विभाग राजकारणापलीकडचे मुन्शी आपल्यासमोर मांडतो. सामाजिक प्रश्नांवर उत्तरे शोधायची असतील तर उत्तम मूल्यांची रुजवात समाजामध्ये होणे आवश्यक असते, असे मुन्शी यांचे विचार होते. त्याच अनुषंगाने त्यांनी मुंबई येथे भारतीय विद्या भवनची स्थापना केली. हे शिक्षणकेंद्र संस्कृत आणि संस्कृतीला वाहिलेले असेल याबद्दल मुन्शी यांच्या मनात स्पष्टता होती. मुन्शी स्वतः अत्यंत लोकप्रिय साहित्यिकही होते. त्यांच्या साहित्यावर लेखकाने ’शब्दप्रभू मुन्शी’ या सदरामध्ये आढावा घेतला आहे तसेच ’साहित्यिक मुन्शी’ हा एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय होऊ शकतो इतके त्यांचे साहित्य विपुल व लोकप्रिय होते, असे लेखक नमूद करतात. मुन्शी यांनी गुजराती, इंग्रजी आणि हिंदी भाषा मिळून जवळपास शंभरहून अधिक ग्रंथ लिहिले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी नाटके आणि कादंबर्‍या देखील लिहिल्या आहेत. इतके विपुल लेखन करणारा राजकारणी भारतामध्ये विरळाच! पाश्चात्य इतिहासकारांनी केलेली भारतीय इतिहासाची सदोष मांडणी खोडून काढण्यासाठी मुन्शी यांनी 1940 साली इतिहास लेखनाचा प्रकल्प भारतीय विद्या भवनच्या माध्यमातून आखला. प्रकल्पाचे संपादक आर. सी. मजुमदार यांनी हा महाप्रकल्प तडीस नेला. 1951 मध्ये पहिल्या खंडाचे प्रकाशन झालेल्या या प्रकल्पाचा शेवटचा म्हणजेच अकरावा खंड 1977 मध्ये मुन्शी यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशित झाला. या प्रकल्पावर देखील एक सविस्तर प्रकरण या पुस्तकात सामील करण्यात आले आहे.
 
 
 
भाविसातर्फे दिल्या गेलेल्या अभ्यासवृत्तीच्या मदतीने प्रसाद यांनी मुन्शींचा पत्रव्यवहार, वैयक्तिक नोंदी, कागदपत्रं, नियतकालिकं आणि इतर साहित्य यांच्या आधारे मुन्शींचा सर्वांगीण अभ्यास मांडला आहे. मुन्शी यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, भारतीय विद्या भवनची स्थापना, संविधान सभेतलं योगदान, सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणातील भूमिका आणि विश्व हिंदू परिषद स्थापनेतला त्यांचा सहभाग अशा अनेक पैलूंना स्पर्श करणारा हा अभ्यास आहे. हे पुस्तक फक्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच सांगत नाही, तर त्यांची लोकशाहीवादी विचारसरणी आणि हिंदुत्वाच्या भूमिकेची झलकही दाखवतं. पुस्तक अतिशय प्रवाही भाषेत लिहिलं गेलं आहे. या पुस्तकातील काही प्रकरणांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा, इतके ते महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा भाषेत ते मांडले गेले आहे. मराठीतून मुन्शी चरित्र मांडण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच झाला आहे. कन्हैयालाल मुन्शींच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची जवळून ओळख करून देणारं आणि प्रेरणादायी ठरणारं हे पुस्तक नक्की वाचावं असं आहे.