वितळलेल्या हिमनद्यांमुळे दिसू लागले प्राचीन जग

विवेक मराठी    06-Sep-2025
Total Views |
 @डॉ. श्रीकांत कार्लेकर
भूशास्त्रज्ञांच्या दृष्टीने हिमनद्यांनी तयार केलेली भूरूपे, त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे ढीग, तयार केलेल्या घळी ही सगळी भूरूपे व त्यांचे पुराजीव आणि भूशास्त्रीय काळातील नेमके स्वरूप समजून घ्यायला विलयन प्रक्रियेची मदत होते आहे. हिमालयातील वितळणार्‍या हिमनद्या भूतकाळातील पर्यावरण, संरक्षित सूक्ष्मजीव आणि वस्तू आपल्यासमोर नव्याने आणू लागल्या आहेत. हे प्राचीन बर्फ शास्त्रज्ञांना भूतकाळातील विषाणू उत्क्रांती, हवामान बदल आणि प्रागैतिहासिक मानवी जीवन यांसंबंधीही नवीन माहिती मिळविण्यासाठी मदत करत आहे यात शंका नाही.
 
vivek
 
 
संयुक्त राष्ट्रांनी (U. N.)2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून घोषित केले आहे आणि 2025 पासून 21 मार्च हा दिवस जागतिक हिमनदी दिन म्हणून ओळखला जाईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक देशांनी हा दिवस हिमनदी संवर्धन दिवस म्हणून पाळला. मध्य आशियातील ताजिकिस्तान या भूवेष्टित देशाने 29 ते 31 मे 2025 दरम्यान दुशान्बे येथे हिमनदींच्या संवर्धनावरील या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. 2025 हे आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून घोषित करणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या या ठरावाला अफगाणिस्तान, अल्जेरिया, अर्जेंटिना, कॅनडा, चीन, जर्मनी, भारत, नेपाळ, नॉर्वे, पाकिस्तान, रशिया आणि अमेरिका यासह अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे.
 
 
या वर्षाचे आणि दिवसाचे मुख्य उद्दिष्ट हे जागतिक हवामान प्रणालीमध्ये हिमनद्या, बर्फ आणि हिम यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागतिक पातळीवर जागरूकता वाढवणे हा आहे. पृथ्वीच्या हिमावरणातील (Cryosphere) बदलांचे समुद्रपातळी, जलचक्र, विविध भूआपत्ती (Geohazards) आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर होणारे परिणाम याकडे लक्ष वेधणे हा उद्देशही त्यामागे आहेच. जगभरातील हिमनद्यांचे संवर्धन आणि अनुकूलन या धोरणांबाबतची सांख्यिकी, ज्ञान आणि माहितीच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हे देखील या घोषणेमागचे उद्दिष्ट आहे. याचबरोबर हिमनद्यांच्या वेगाने वितळण्यामुळे त्याखाली दडलेली आजपर्यंत अपरिचित अशी जी एक नवीन सृष्टी आपल्याला दिसू लागली आहे त्याचाही विचार यात आहेच.
 
 
 
एकविसाव्या शतकात जगभरातील हिमनद्या वितळण्याचा वेग मागच्या शतकातील वेगाच्या तिप्पट झाल्याचे निरीक्षण झुरीच विद्यापीठ आणि जागतिक हिमनद्या नियंत्रण सेवा (World Glacial Monitoring Services) यांनी काही वर्षांपूर्वी नोंदविले होते. एकूण 165 वर्षातील हिमनद्या विलयनाची आकडेवारी लक्षात घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला होता. यासाठी 1850 पासून ठेवण्यात आलेल्या 5000 नोंदींचा उपयोग करून घेण्यात आला होता. उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासातून आता असेही लक्षात आलेय की, जगातील दहा हजारापेक्षा जास्त हिमनद्यांचा वितळण्याचा वेग लक्षणीयदृष्ट्या वाढला आहे. 1800 ते 1850 या काळात बर्फ वितळण्याचा जो वेग होता त्याच्यापेक्षा चौपट वेगाने, तर 1851 ते 1900 या कालखंडातील वेगाच्या तिप्पट वेगाने, आणि 1901 नंतर दुपटीने वेगात वाढ झाल्याचे लक्षात आले. जागतिक तापमान वाढीचा हा परिपाक असून आता तापमान वाढ झाली नाही किंवा तापमान स्थिर राहिले तरी हिम वितळण्याची ही प्रक्रिया अशीच चालू राहील असा अंदाजही वर्तविण्यात आलाय. पृथ्वीवरील अंटार्क्टिक व आर्क्टिक वगळता हिमनद्यांनी व्याप्त असे सगळ्यात जास्त क्षेत्र हिमालयात आहे. हिमालयातील हिमनद्यांची लांबीसुद्धा जगातील इतर हिमनद्यांच्या लांबीपेक्षा जास्त आहे. हिमालयात सुमारे चाळीस हजार चौरस किमी क्षेत्र हिम व हिमनद्यांनी व्यापलेले आहे. हिमालयातील नद्याही पूर्वीपेक्षा तिप्पट वेगाने वितळत असल्याचे निरीक्षण झुरीच विद्यापीठ आणि जागतिक हिमनद्या नियंत्रण सेवा यांनी नोंदविले आहे. हिमालयातील पिंडोरी ही हिमनदी दरवर्षी 13 मीटर तर गंगोत्री तीस मीटर वेगाने मागे हटते आहे.
 
 
vivek
 
हिमनद्या वितळण्याच्या या प्रक्रियेला प्रामुख्याने वाढते जागतिक तापमान जबाबदार आहे. हिमनद्यांच्या अशा वेगाने वितळण्यामुळे आजपर्यंत अपरिचित अशी एक नवीन सृष्टी आता आपल्याला दिसू लागली आहे. पुरातत्त्व आणि भूशास्त्र वैज्ञानिकांच्या दृष्टीने तर माहितीचे एक विलक्षण भांडारच उघडे पडू लागले आहे. तापमान वाढीमुळे जगातील सर्व हिमनद्या वितळू लागल्याचे दृश्य परिणाम असून हिमनद्यांखाली दडलेल्या नजीकच्या भूतकाळातील व हजारो दशके आधीच्या कालखंडातील अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. मानव उत्क्रांतीचा इतिहास समजण्याच्या दृष्टीने अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता यातून शास्त्रज्ञांना दिसते आहे.
 
 
पुराजीव आणि पुरातत्त्व विज्ञानासाठी ही एक मोठीच पर्वणी असल्याचे मानले जाते आहे. ही शास्त्रे आज अनेक आधुनिक संशोधन पद्धती व उपकरणे वापरून प्राचीन मानवी सांगाडे, हत्यारे यांचा शोध घेत आहेत. त्यांना या हिम विलयन प्रक्रियेतून खूप नवीन गोष्टी मिळत असल्याचा दावा केला जातोय.
 
 
 
लाखो वर्षांपासून हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळल्यामुळे, हिमवादळांमुळे व हिमस्खलनामुळे बर्फात गाडल्या गेलेल्या गिर्यारोहकांचे देह, अवशेष, त्यांनी बरोबर नेलेली अवजारे इतकेच नव्हे तर अश्मयुगीन माणसाचे पुरावेही यामुळे आता दिसू लागले आहेत. तसेच हिमालयातील वितळणार्‍या हिमनद्यांमुळे अनेक पुरातत्त्वीय वस्तू आणि प्राचीन मानवी सांगाडे दिसत आहेत. तिबेटमधील बर्फाच्या गाभ्यांमध्ये 1,400 वर्षे जुने बाणाचे टोक आणि 1,700 प्राचीन विषाणू आढळले आहेत. माउंट एव्हरेस्टवर जुने बर्फात गाडले गेलेले अनेक मृतदेह, अलीकडेच आढळले आहेत. ही घटना तापमान वाढ आणि हिमनद्या वितळण्याच्या वाढत्या वेगामुळे घडत आहे. पूर्वीच्या हिमाच्छादित उंच शिकारी मैदानांमध्ये वापरात असलेली बर्फावर घसरण्याची आयुधे आणि ओझे वाहून नेणार्‍या घोड्यांचे अवशेष यासारख्या गोष्टीही उघड्या पडलेल्या दिसून आल्या आहेत. थंड आणि उष्ण कालावधीतील महत्त्वपूर्ण हवामान बदल सुचविणारे तिबेट पठारावरील गुलिया हिमनदीतील एका बर्फाच्या गाभ्यात 41,000 वर्षांपूर्वीचे विषाणूंचे जीनोम सापडले आहेत. हिमालयातील शिखरावर जाताना मृत्युमुखी पडलेल्या शेकडो गिर्यारोहकांचे मृतदेह वितळू लागलेल्या आणि कमी होत चाललेल्या बर्फामुळे उघड झाले आहेत. मेक्सिकोतील सर्वात उंच ज्वालामुखी, पिको डी ओरीझबा याच्या 5547 मीटर उंचीच्या शिखरावरचा बर्फ वितळून गेल्यामुळे त्याखालचा ज्वालामुखीय खडक डोकं वर काढू लागलाय. युक्रेनचे हिमक्षेत्र आणि न्यूझीलंडच्या हिमनद्या वितळू लागल्यामुळे, जुना गाळ, झाडाझुडुपांचे बुंधे आणि इतर अवशिष्ट पदार्थ या बरोबरच अनेक मृतदेह दरवर्षी उघडे पडताहेत. कारीबू या हिम अस्वलाच्या शेणाचे ढिगच्या ढीग युक्रेनच्या प्रदेशात हजारो वर्षे बर्फाखाली दबले होते. आता ते उघडे पडल्यामुळे त्यांचे विघटन सुरू होऊन सगळीकडे त्याची दुर्गंधी पसरते आहे.
 
 
चिलीमधल्या हिमनदीखाली दबून गेलेल्या सागरी सरपटणार्‍या, मृत प्राण्यांचा एक मोठा प्रदेशच होता. तो आता पुन्हा दिसू लागला आहे. पुराजीव काळातील अनेक अश्म हत्यारे, बाणांची टोके, पिसासकट असलेले बाण पन्हाळी (Arrow shafts) अशा वस्तू अनेक हिमाच्छादित प्रदेशात पुन्हा वर येऊ लागल्यात. स्विस आल्प्समध्ये 1970मध्ये नाहीशा झालेल्या दोन जपानी गिर्यारोहकांचे अवशेष सापडलेत. 5000 मीटर उंचीवर असलेल्या या पर्वताच्या 3000 मीटर उंचीच्या प्रदेशात ते सापडलेत. अनेक दिवस चालू असलेल्या हिम वादळात अडकून ते बेपत्ता झाले होते. त्यांचा शोधही लागला नव्हता. 1999 मध्येे ब्रिटीश कोलंबियात, इटालियन आल्प्समध्ये 5300 वर्षांपूर्वीच्या ब्रांझ युगातील मानवाचे, तर 2007 मधे दक्षिण अमेरिकेतील अर्जेन्टिनात इंका संस्कृतीतील तीन लहान मुलांचे मृतदेह हिमविलयनानंतर उघडे पडले आहेत.
 
 
हिमनद्या वितळण्याच्या लक्षात येण्यासारख्या घटना 1990 नंतर प्रकर्षाने दिसून येऊ लागल्यात. मात्र 2006 पासून तापमानात जशी वाढ होऊ लागली तश्या हिमनद्या वितळून 6000 वर्षे जुनी हत्यारे, अंगरखे (Tunics) व इतर अवजारे उघडी पडू लागली. आधुनिक काळात हिमाच्छादित प्रदेशात कोसळलेल्या अनेक विमानांचे आजपर्यंत न आढळलेले अवशेषही बर्फ वितळल्यामुळे आता मिळू लागले आहेत. 15 ऑगस्ट 1942 पासून मार्सिलीन आणि दुमोलिन या दोन व्यक्तींची शरीरे, त्यांच्या पायातील बूट व डोक्यावर असलेल्या हॅटसह, 19 जुलै 2017 रोजी स्विस आल्प्समधल्या त्सांफ्लुरॉन हिमनदीच्या वितळलेल्या भागात आढळून आली. या भागात दर वर्षी एक ते दीड मीटर उंचीचा बर्फाचा थर वितळून जात असल्याचे आता लक्षात आले आहे. इ. स. 2050 पर्यंत आल्प्समधून बहुतांशी बर्फ वितळून गेले असेल असाही एक अंदाज मांडण्यात आलाय.
 
 
ऍलेक्स लोवे आणि डेव्हिड ब्रिज या ऑक्टोबर 1999मध्ये हिमालयातील हिमस्खलनात सापडलेल्या दोन गिर्यारोहकांचे मृतदेह 1 मे 2016 रोजी वितळून गेलेल्या हिमनदीत आढळून आले.
 
 
जगभरातील हिमनद्यांच्या व हिमक्षेत्रांच्या विलयन विभागातून एकूण 3500 मानवनिर्मित वस्तू (Artifacts) आत्तापर्यंत दिसून आल्या आहेत. यांचे सगळ्यात मोठे प्रमाण नॉर्वेतील ओपलंड भागात वितळलेल्या हिमनद्यांच्या प्रदेशात आहे. या सर्व प्रकारातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही ही अवजारे, गाडल्या गेलेल्या सजीवांची शरीरे ती गाडली गेली तेव्हा जशी होती तशीच आजही आहेत. मात्र आता उघडी पडल्यावर त्यांचे विघटन सुरू झालेय. पुरातत्त्वतज्ञांच्या दृष्टीने तर पाषाण युगातील हत्यारे व अवजारे त्यांच्या मूळ स्वरूपात दिसण्याची ही मोठीच संधी आहे.
 
 
भूशास्त्रज्ञांच्या दृष्टीनेही हिमनद्यांनी तयार केलेली भूरूपे, त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे ढीग, तयार केलेल्या घळी ही सगळी भूरूपे व त्यांचे पुराजीव आणि भूशास्त्रीय काळातील नेमके स्वरूप समजून घ्यायला या विलयन प्रक्रियेची मदत होते आहे. हिमालयातील वितळणार्‍या हिमनद्या भूतकाळातील पर्यावरण, संरक्षित सूक्ष्मजीव आणि वस्तू आपल्यासमोर नव्याने आणू लागल्या आहेत. हे प्राचीन बर्फ शास्त्रज्ञांना भूतकाळातील विषाणू उत्क्रांती, हवामान बदल आणि प्रागैतिहासिक मानवी जीवन यांसंबंधीही नवीन माहिती मिळविण्यासाठी मदत करत आहे यात शंका नाही.
 
 
जगभरातील हिमनद्या वितळू लागल्यानंतर आता एक प्राचीन जगच पुन्हा नव्याने अवतीर्ण होत असल्यासारखे दृश्य, जगभरातील सर्वच हिमाच्छादित प्रदेशात दिसू लागण्याची ही घटना केवळ विलक्षण अशीच म्हणावी लागेल.