@वैशाली भिडे बर्वे 9820382117 / अॅड. रुपाली ठाकूर 9820383118
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि विविध क्रीडा उपक्रमांत गुंतवणूक वाढल्यामुळे क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन बदलला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रातील खेळाडूंनी पदके कमवून जागतिक पटलावर क्रीडा क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे खेळात करिअर होऊ शकते हे निश्चित. पण त्याचबरोबर मुलं आणि पालकांच्या समोर क्रीडा क्षेत्रात कोणकोणत्या प्रकारची करिअर संधी आहेत?, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास खेळातून सुरक्षित भविष्य घडू शकते का? हे प्रश्न आहेत. ‘खेळावर बोलू काही...’ या पाक्षिक सदरातून आपण क्रीडा क्षेत्रातील संधी आणि त्या संबंधित मार्गदर्शन जाणून घेणार आहोत.
खेळ म्हणजे छंद... शिक्षण म्हणजे करिअर!
असा विचार आजही अनेक घरांमध्ये ऐकायला मिळतो. पण बदलत्या काळात हा विचार हळूहळू बदलतो आहे. आज खेळ म्हणजे केवळ मैदानावर धावणे किंवा बक्षिसे जिंकणे नाही - खेळ हा एक संपूर्ण उद्योग (Industry) बनला आहे.
कोणतेही करिअर निवडताना ते करिअर आपल्याला पुढच्या 15 - 20 वर्षांसाठी अर्थार्जन प्राप्त करून देऊ शकते की नाही हे पाहणे गरजेचे आहे,
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः॥
अर्थात - प्रयत्नांनीच कामे पूर्ण होतात, केवळ इच्छा केल्याने नाहीत. तर त्यासाठी कठोर परिश्रम आणि चिकाटी आवश्यक आहे.
उदा. - जसे, झोपलेल्या सिंहाच्या मुखात हरिण आपोआप शिरत नाहीत. त्याला स्वतः शिकार करावी लागते, म्हणजेच आळस केला तर यश मिळत नाही.
तसेच एखाद्या खेळाडूला सुद्धा कठोर शिस्त, परिश्रम आणि देशाभिमान ह्या तीन गोष्टी गरजेच्या आहेत. खेळाच्या वाटचालीतल्या एखाद्या टर्निंग पॉईंटवर आपण बरेच वेळा हतबल होतो. वाटेवरची वेगवेगळी वळणं आणि तिथली प्रलोभनं खुणावत असताना नेमक्या कोणत्या दिशेला वळायचं हे आपल्याला ठरवता येत नसते. जीवनाच्या किंवा खेळाच्या ज्या शर्यतीत आपण धावतोय त्या शर्यतीतील हा पहिला अडथळा. सोप्या आणि जवळच्या वाटा इथं आपल्याला खुणवत असतात अशा वेळी शॉर्टकटचा विचार न करता चालत राहणं ही, हा पहिला अडथळा पार करण्याची गुरुकिल्लीच मानायला हवी. कसोटीच्या ह्या मार्गावर ठाम विश्वास असल्यामुळेच अनेक जण नामवंत खेळाडू बनले आहेत.
मुलं आणि पालकांच्या समोर उद्भवणारा आजचा प्रश्न खेळात करिअर शक्य आहे का? असा नसून खेळात कोणकोणत्या प्रकारची करिअर संधी आहेत? योग्य मार्गदर्शन मिळाल्यास खेळातून सुरक्षित भविष्य घडू शकते का? हा आहे.
भारतामध्ये खेळांची सध्याची परिस्थिती खूप उत्साहवर्धक आणि विकसित होत आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी जागतिक स्तरावर उठून दिसत आहे, आणि खेळांबद्दल लोकांमध्येही वाढती आवड दिसून येत आहे. भारताच्या खेळ-क्रीडा क्षेत्राची सद्यस्थिती गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे, विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि विविध क्रीडा उपक्रमांत गुंतवणूक वाढल्यामुळे. यामध्ये क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळासोबतच इतर खेळांनाही महत्त्व दिले जात आहे. यामुळे देशातल्या युवा खेळाडूंना जागतिक पातळीवर खेळण्याच्या संधी मिळत आहेत.
खेलो इंडिया आणि फिट इंडिया सारख्या योजनांच्या माध्यमातून युवा खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. टॉप्स (Target Olympic Podium Scheme) सारख्या योजनांमुळे उच्च दर्जाचे खेळाडू तयार होत आहेत.
पुरुषांसोबतच महिला खेळाडूंनी विविध खेळांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधाना, (क्रिकेट), सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन), मेरी कोम (बॉक्सिंग), साक्षी मलिक (कुस्ती), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) यांसारख्या महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मान मिळवून दिला आहे.
स्पोर्टस् हब बनवण्याकडे वाटचाल
भारताला स्पोर्टस् हब बनवण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील विविध घटकांचा एकत्रित विकास आवश्यक आहे. क्रीडा पायाभूत सुविधा, क्रीडा शिक्षण, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन, आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भारत जागतिक स्तरावर एक महत्त्वाचा स्पोर्ट्स हब बनू शकतो. सरकार, खासगी क्षेत्र, आणि जनतेच्या एकत्रित प्रयत्नांनी हा उद्देश साध्य होऊ शकतो.
क्रीडा क्षेत्रात करिअर करणं प्रेरणादायी असलं तरी तेवढंच आव्हानात्मकही आहे. कारण -
1) स्पर्धेची तीव्रता
प्रत्येक खेळात हजारो खेळाडू असतात, पण शिखरावर पोहोचतात ते फार थोडे. सातत्याने स्वतःला सिद्ध करत राहणे आवश्यक.
2) शारीरिक आणि मानसिक ताण
इजा होण्याचा धोका, कठोर प्रशिक्षण, मानसिक दबाव, परफॉर्मन्सची अपेक्षा - यामुळे खेळाडूंना दुहेरी तयारी करावी लागते.
3) योग्य मार्गदर्शनाचा अभाव
लहान वयापासून योग्य कोचिंग, फिटनेस, पोषण आणि करिअर नियोजन नसेल तर प्रतिभा असूनही खेळाडू मागे पडतात.
4) आर्थिक गुंतवणूक
साधने, स्पर्धा, ट्रॅव्हल, ट्रेनिंग, आहार - या सर्वांचा खर्च मोठा असतो. सर्वांना समान संधी मिळत नाही.
5) स्थिरतेची चिंता
खेळाडूचा करिअर स्पॅन फार मोठा नसतो, त्यामुळे त्यानंतर काय? - याचे नियोजन आधीपासून आवश्यक.
6) अभ्यास आणि खेळ यामध्ये समतोल साधणे.
कमी वयातील खेळाडूंना हे सर्वात मोठं आव्हान ठरतं. दोन्ही सांभाळणं कठीण पण महत्त्वाचं.
पण का करावं मग क्रीडा करिअर?
कारण क्रीडा शिकवते - शिस्त, परिश्रम, नेतृत्व, टीमवर्क, समस्या सोडवणे, धैर्य, आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन. योग्य मेंटॉरशिप, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शन मिळालं तर ही आव्हाने संधींमध्ये रूपांतरित होतात.
खेळाच्या क्षेत्रात आज असंख्य करिअरच्या संधी उपलब्ध आहेत:
* खेळाडू (Professional Athlete)
* प्रशिक्षक (Coach)
* फिटनेस ट्रेनर
* स्पोर्टस् फिजिओथेरपिस्ट
* स्पोर्टस् न्यूट्रिशनिस्ट
* स्पोर्टस् सायकोलॉजिस्ट
* अँकर, कॉमेंटेटर, स्पोर्टस् जर्नलिस्ट, स्पोर्टस् मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, अंपायर, स्कोअर, रेफरी, डेटा अॅनालिस्ट,
परफॉर्मन्सनालिस्ट म्हणजेच, मैदानावर खेळणारा खेळाडू असो किंवा मैदानामागे काम करणारा तज्ज्ञ - प्रत्येकासाठी खेळात स्थान आहे.
यासाठी पालकांचे समुपदेशन खूप महत्त्वाचे असते. घरातील संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. पालक आणि मुलांमधील नातेसंबंध, सुसंवाद, असे आणि अनेक मुद्दे हल्ली दुर्लक्षित राहतात आणि म्हणूनच ह्या सर्व गोष्टींना अतिशय नाजूकपणे हाताळण्याची गरज भासते.
भावी पिढीला आभासी मैदानावरून प्रत्यक्ष मैदानावर आणणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
आमच्यासाठी खेळाडू हा शेवटपर्यंत खेळाडू असतो.
उदा. अशाच एका विद्यार्थ्याने फुटबॉलमध्ये जिल्हा स्तरावर प्रतिनिधित्व केले. डेटा अॅनालिटिक्समध्ये पदवीधर. त्याच्या साइन्टिफिक असेसमेंट चाचणीनंतर त्याला आम्ही त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी UKघ च्या नामवंत युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्टस् डेटा अॅनालिटिक्समध्ये स्पेशलायझेशन करायला संपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनतर लगेचच UK च्या एका कंपनीने त्याला स्पोर्टस् अॅनालिस्टच्या पदावर रुजू करून घेतले आणि आज तोच मुलगा क्रिकेट अॅनालिस्ट म्हणून संपूर्ण भारतातील क्रिकेटर्सचे अॅनालिसीस करतोय आणि पौंड्समध्ये कमावतोय. Passion ला Profession मध्ये परिवर्तित करण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
आज क्रीडा क्षेत्रात चाळीसहून अधिक वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीसाठी कोणते करिअर सर्वात योग्य आहे याचे शास्त्रीयदृष्ट्या मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
तुमच्या जिद्दीवर आधारित करिअर कधीही निवडू नका, नेहमी सर्वसमावेशक वैज्ञानिक मूल्यमापन करा.
लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर आहेत आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.