बोले तैसा चाले

विवेक मराठी    17-Jan-2026
Total Views |
अभय बापट
9820235484
 
 
Ashok Moadk
संघविचार हे त्यांच्या जीवनाचे अधिष्ठान होते. विषयाची मांडणी करण्याची एक वेगळी पद्धत त्यांनी विकसित केली होती. त्यांचा व्यासंग, अभ्यास, तरल स्मरणशक्ती, वैचारिक स्पष्टता ही वाखणण्यासारखी होती. त्यांचे विचार हे केवळ विद्वतेपुरते मर्यादित नव्हते तर ते प्रत्यक्ष जगण्यात त्याचे आचरण असे.
मा. अशोकरावांबरोबर दीर्घकाळ काम करण्याचे भाग्य मला लाभले. अनेक संघटन सूत्रांचे प्रारूप प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. साधी राहाणी, उच्च विचारसरणी म्हणजे काय ह्याचे जिवंत उदाहरण त्यांनी दिले. त्यांचा व्यासंग, अभ्यास, तरल स्मरणशक्ती, वैचारिक स्पष्टता याबद्दल मी काय बोलावे? पण या सार्‍या गोष्टींचे आपल्याबरोबर काम करणार्‍या कार्यकर्त्यांवर दडपण न येऊ देता प्रसंगी बाळबोध वाटणार्‍या शंकांवरही विस्तृतपणे त्याला समजेल व पटेल अशा उदाहरणांसकट समजावून सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. संघविचार हे त्यांच्या जीवनाचे अधिष्ठान होते. विषयाची मांडणी करण्याची एक वेगळी पद्धत त्यांनी विकसित केली होती. विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याआधी प्रस्तावनेत सर्व बाजू विचारात घेऊन मग ते कुशल सर्जनप्रमाणे चिरफाड करत. आपला विषय अतिशय आक्रमकपणे मांडत व ते करताना कुठलेही विधान हवेत नसून त्याचा संदर्भ सांगत, विशेषतः समाजवादी, कम्युनिस्ट अशा राष्ट्रद्रोही विचारांवर ते अधिक तीक्ष्णपणे व मर्मभेदी हल्ला करत. पण हे करताना आपल्या कार्यकर्त्यांना वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणे हे आपले मुख्य कार्य आहे, हे जाणवायचे.
 
 
स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार, प. पू. गोळवलकर गुरुजी, पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित दीनदयाळजी, लोकमान्य टिळक ही सर्व त्यांची श्रद्धास्थाने होती. त्यांच्या विचारांचा सर्वांगीण अभ्यास त्यांनी केला होता. ते म्हणत की, या सार्‍यांनीच आपल्यावर आभाळाएवढे ऋण करून ठेवले आहे. यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण खूप काम केले पाहिजे.
 
समरसता हा त्यांच्या अभ्यासाचा नव्हे जगण्याचा विषय होता. अशोकराव अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना आरक्षण या विषयात एक पत्रकार परिषद झाली होती. ती पत्रकार परिषद संपल्यावरती एका पत्रकाराने विचारले की, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्हाला भूमिका कळली. पण अशोकराव मोडक म्हणून आपले काय मत आहे? क्षणार्धात अशोकरावांनी रुद्रावतार धारण केला. ते म्हणाले की, कोण अशोक मोडक? हा बॅनर मागे नसेल तर अशोक मोडकला काय मत आहे? जे संघटनेचे मत तेच अशोक मोडकचे मत. आमच्या इथे अशी वैचारिक भेसळ नाही. इतकी त्यांची स्पष्टता प्रत्येक विषयाची असे आणि एक प्रसंग अगदी काही वर्षांपूर्वीचा आहे.
 

Ashok Moadk 
 
अशोकरावांना भेटायला त्यांच्या पवई येथील निवासस्थानी जाणे व्हायचे. मुंबईत साधारणपणे बाहेरून येणार्‍याला त्याचे वाहन सोसायटीत पार्क करून ठेवता येत नाही. मी तेथील सुरक्षा कर्मचार्‍यांना घाबरत घाबरत विचारणा केली की, माझे वाहन सोसायटीत पार्क करू का? त्यांनी विचारले की, तुम्हाला कोणाकडे जायचे आहे? मी अशोकरावांचे नाव सांगताच त्याचा नूर पालटला. प्रेमळपणे त्याने जागा उपलब्ध करून दिली. मी सहजपणे चौकशी केली तेव्हा मिळालेल्या माहितीने मी थक्क झालो. तो म्हणाला की, अहो, थंडीमध्ये आम्ही आमचे काम करत असतो. पहाटे सर स्वतः चहा करून आम्हाला आणून देतात. मी घरी गेल्यावर अशोकरावांना हा प्रसंग सांगितला. तेव्हा कोणताही अभिनिवेश न बाळगता ते म्हणाले की,‘अरे अभय, ती ही आपलीच माणसे आहेत. त्यांचीही काळजी आपण नको का करायला?’ समरसता हे केवळ बोलण्याचा, चर्चासत्रात मांडण्याचा विषय नसून प्रत्यक्ष जगण्याचा विषय आहे, हे त्यांनी दाखवून दिले.
 
 
साधी राहाणी व उच्च विचारसरणी हा सुद्धा प्रत्यक्ष जगण्याचा विषय आहे. अनेक वेळा त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचे भाग्य मिळाले. काही काळ अशोकराव विधानपरिषद सदस्य होते. एस. टी. बसमध्ये आसनक्रमांक 1 व 2 हे आमदारांसाठी आरक्षित असते. जेव्हा-जेव्हा वाहकाला मी हे सांगायचो आणि ओळखपत्र दाखवायचो, प्रत्येक वेळी आमदार एस.टी.च्या लालपरीमधून प्रवास करत आहे व सगळ्या प्रवाशांशी तेवढ्याच प्रेमाने बोलत आहे, विचारपूस करत आहे, याचा त्या कर्मचार्‍याला बसलेल्या धक्क्यातून तो दीर्घकाळ बाहेर पडत नसे.
 
 
अशोकराव राष्ट्रीय अध्यक्ष असताना, बहुधा आंध्रप्रदेशचे प्रांत अधिवेशन होते. रेल्वे तिकीट न मिळाल्याने आणि बहुधा बसचा संप असल्याने हैद्राबादला कसे पोहोचायचे, असा प्रश्न होता.पण अशोकराव हायवेवरून ट्रक बदलत बदलत अधिवेशनस्थानी पोहोचले होते. असा प्रवास करणारा कार्यकर्ता हा सार्‍याच प्रवासी कार्यकर्त्यांचा आदर्श म्हणून नाही राहिला तरच नवलच!
 
 
मी एकदा त्यांना म्हणालो की,‘जागतिक स्तरावरील अनेक विचारवंतांवर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव आहे ज्यात टॉल्स्टॉय, गॉर्की, स्टोकिंन वगैरेचा सुद्धा समावेश आहे असे पुस्तक मी बघितले आहे.’ त्यांनी पाठपुरावा करून ती प्रत प्राप्त करून घेतली व ते पुस्तक चाळले होते, त्यांनी त्याचा अभ्यास केला. विद्यार्थी परिषदेचे प्रथम मुंबई शाखेचे नंतर राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची प्रवास करण्याची क्षमता अद्भुत होती. मुंबई अध्यक्ष म्हणून अगदी नगरापर्यंत नवीन आलेल्या कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत मग तो धारावीतील असू दे किंवा उच्चभ्रू वस्तीमधील असू दे तेवढ्याच सहजपणे त्यांचा वावर असे. आपण कार्यकर्त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी तेथे सहभागी झालो नाही तरी चालेल पण जेव्हा एखादा दु:खाचा प्रसंग ओढवला असेल तेव्हा आवर्जून तेथे गेले पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यांचा सूर्यनमस्काराचा आग्रह खूप होता. लांबच्या प्रवासात सकाळच्या वेळेस एखाद्या स्टेशनवर जर गाडी अधिक वेळ थांबणार असेल तर स्टेशनवर सतरंजी टाकून सूर्यनमस्कार करत.
 
 
विवेकानंद केंद्रामार्फत विवेकानंद व मार्क्स हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या वर्षी संघशताब्दी आहे व कम्युनिस्ट पक्ष स्थापनेचीही शंभर वर्षे झाली आहेत. दोन विचारसरणींचा गेल्या शंभर वर्षानंतर असलेला प्रभाव या निमित्ताने विवेकानंद केंद्राचे भूतपूर्व अध्यक्ष पी. परमेश्वरनजी यांनी लिहिलेल्या व मराठीत चं. प. भिशीकरांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाचे पुनःमुद्रण केले. पण दोन्हीही लेखक हयात नसल्याने याची प्रस्तावना अशोकरावांनी लिहिली. मूळ पुस्तकाएवढीच दमदारपणे पुस्तकाच्या हिर्‍याला अशोकरावांनी योग्य ते कोंदण बसवल्याने त्या पुस्तकाचे मूल्य कैक पटीने वाढले. हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत जावा म्हणून विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने 13 सप्टेंबर 2025 मध्ये विलेपार्ले येथे अशोकरावांची प्रकट मुलाखत घेतली. तब्येतीच्या नाजूक स्थितीतही त्यांनी ज्या प्रकारे कम्युनिस्टांची व विवेकानंदांच्या विचाराची (अशोकरावांच्या दृष्टीने ह्या मातीतला सनातन विचार ) मांडणी केली. ते पाहून ते इतक्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत हे खरे वाटत नव्हते. अशा त्यांच्या असंख्य आठवणी आहेत.
 
आदरणीय अशोकरावांना श्रद्धापूर्वक नमस्कार व भावपूर्ण श्रद्धांजली!
 
लेखक अ. भा. वि. प.चे माजी केंद्रीय कार्यालय मंत्री आहेत. विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र-गोवा, प्रांत प्रमुख आहेत.