आमचे बाबा... हे आमचे सौभाग्य

विवेक मराठी    17-Jan-2026
Total Views |
@आशिष मोडक  8879234230
 

Ashok Moadk 
दादा यांचे 2 जानेवारी 2026 रोजी रात्री निधन झाले. गेली जवळजवळ पंचवीस वर्षे भारताबाहेर राहिल्यानंतरही, त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या आठवड्यात मी व माझी पत्नी स्मिता (आणि माझी मोठी बहीण अर्चना) - आम्ही तिघेही अक्षरशः त्यांच्या शेजारी उपस्थित राहू शकलो, हे आमचे मोठे सौभाग्य मानतो. 2 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजल्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी शांतपणे देह ठेवला. ती पौर्णिमेची रात्र होती - जणू देवानेच दादांच्या प्रस्थानासाठी योग्य वेळ निवडली होती.
गेल्या काही दिवसांत दादांबद्दल व्यक्त झालेला प्रेमाचा, आदराचा आणि आपुलकीचा ओघ पाहून शब्द अपुरे पडतात. या कठीण काळात आम्हाला भेट देणार्‍या, मेसेज पाठविणार्‍या किंवा फोन करून धीर देणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार. तुमचे शब्द, संवेदना आणि दादांबरोबरच्या आठवणी सांगणे - हे आईसह आम्हा सर्वांसाठी फार मोठे बळ देणारे ठरले.
 
लहानपणापासूनच आम्ही दादांना नानाजी ढोबळे, यशवंतरावजी केळकर, सदाशिवरावजी, मदनजी, बाळासाहेब आपटे, दत्ताजी अशा अनेक ज्येष्ठ विचारवंत व कार्यकर्त्यांच्या सहवासात पाहिले. त्यांपैकी अनेकजण घरी आलेले आठवतात. लहान असताना कधी कधी आम्ही दादांसोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनांना जात असू. त्या वेळी झालेली प्रभावी भाषणे ऐकल्यावर दादांशी मग मनातील प्रश्न विचारण्याची संधी मिळे व साध्या-सोप्या भाषेत दादांनी समजवल्याचे आठवते. 1985-86 च्या सुमारासचा काळ होता व आम्ही 10-11 वर्षांचे होतो व आंबेडकर - फुले - सावरकर आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रातील केलेले योगदान या विषयी दादांनी सोप्या शब्दांत मला सांगितलेल्या आठवणी आज ही लक्षात आहेत.
 
 
वय वाढत गेले तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विद्यार्थी परिषद यांची समज अधिक खोल होत गेली. डोंबिवलीतील कनिष्ठ महाविद्यालयाचा काळ आणि पुण्यातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या वर्षांत मला विद्यार्थी परिषदेच्या कामात सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळाली. 80 आणि 90 च्या दशकाच्या संधिकालात विद्यार्थी परिषदेनं काश्मीर प्रश्नावर उचललेला ठाम सूर, मोर्चे, अभ्यासवर्ग, परिसंवाद आणि राज्यस्तरीय अधिवेशने या सगळ्यांत मी सहभागी होत होतो. डोंबिवली शहर कार्यकारिणीचा सदस्य म्हणून मिळालेला अनुभव, तसेच त्या काळातील मिलिंदजी, चंद्रकांतदादा, विनोदजी, राजेश पांडेयजी यांसारख्या नेतृत्वाचे विचार प्रत्यक्ष ऐकण्याची संधी - हे सर्व परिषदेचे काम करायला दादांनी दिलेल्या प्रोत्साहनाशिवाय शक्य झाले नसते. अर्चनाने पुढे पूर्णवेळ बाहेर पडून जणू त्यांचे स्वप्नच पूर्ण केले.
 

Ashok Moadk 
 
काही दिवसांपूर्वी कोणीतरी मला विचारले - लहानपणी घरी दादा कसे होते? शिस्तप्रिय होते का? अभ्यासासाठी दबाव टाकायचे का?
 
दादा आम्हाला कधीच ओरडले नाहीत, कधीही सक्ती केली नाही. तरीही त्यांची उपस्थिती आणि एखादा शब्द पुरेसा असायचा. अर्चना आणि मला त्यांनी स्वतः ज्या मूल्यांवर उभे राहिले, ती मूल्ये समजावून सांगितली आणि त्यांचे महत्त्व मनावर ठसवले. घरातील स्वच्छता त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. रोज सकाळी ते स्वतः घर झाडत आणि झाडू कसा नीट वापरावा, हे आम्हाला शिकवत. घरी येणार्‍या प्रत्येक पाहुण्याला किमान चहा तरी दिलाच पाहिजे - हे त्यांनी कृतीने शिकवले. अनेक घरी आलेल्या पाहुण्यांनी दादांनी स्वतः बनवलेला चहा प्यायला असेल.
 
 
दादा अतिशय कर्मकांडप्रिय नव्हते. सनातन धर्मावरील त्यांचा विश्वास अढळ होता. श्लोकांचे, पूजाविधींचे त्यांचे ज्ञान सखोल होते; पण त्याचबरोबर व्यवहार्यता सर्वांत महत्त्वाची आहे, हे त्यांनी आम्हाला समजावून सांगितले.
 
 
 
दादांचा एक असाच आग्रह नेहमी असे तो सूर्यनमस्कारांवर. स्वतः वयाच्या 80 पर्यंत त्यांनी 25 सूर्यनमस्कार कधी चुकविले नाहीत. कॅन्सरचे दुखणे कळेपर्यंत तर दवाखाना हा प्रकार त्यांना फार कधी ठाऊक नसे. जसे व्यायामाचे तसे तेच स्वतःचे कपडे दररोज अंघोळी बरोबर धुवायचे...
 
 
कनिष्ठ महाविद्यालयात असताना सामाजिक समरसता या विषयावर मी आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत सहभागी झालो होतो. माझे मुद्दे लिहून मी त्यांना वाचून दाखवले. तो मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीचा काळ होता. त्यांनी अत्यंत संयमानं माझं ऐकलं आणि पुढील पंचेचाळीस मिनिटे प्रत्येक मुद्दा कसा विस्तारावा, काय केंद्रस्थानी ठेवावं, हे समजावून सांगितलं. ते जणू एक बौद्धिकच. त्या स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला याचे श्रेय खरे तर त्यांचेच.
 

Ashok Moadk 
 
शिक्षणाचे महत्त्व दादांनी नेहमीच अधोरेखित केले. वाचा, समजून घ्या आणि ऐकायला शिका, हा त्यांचा कायमचा सल्ला होता. त्यांच्या मते, विचारांची योग्य मांडणी ही सखोल वाचन, विषयाचे आकलन आणि तज्ज्ञांचे विचार ऐकण्यातूनच घडते. अपुरी समज असताना मोठे दावे करणं ही सार्वजनिक जीवनातील मोठी चूक आहे, असे ते नेहमी सांगत. अखेरपर्यंत दादा एक निष्ठावान स्वयंसेवक राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी आणि मूल्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य घडले.
 
 
अर्चना आणि मी - दादांची मुले म्हणून जन्माला आलो, हे आमचे सौभाग्य आहे. वैयक्तिक पातळीवर त्यांना जवळून पाहण्याची, समजून घेण्याची संधी आम्हाला मिळाली. आज मनात असंख्य आठवणी, प्रसंग आणि किस्से गर्दी करून आहेत. कधी कधी वाटते - त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील किमान दहा टक्के तरी गुण माझ्यात उतरवता आले असते तर...
 
दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. पण त्यांनी आयुष्यभर जगलेली मूल्ये, त्यांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांनी घडवलेली माणसे - हेच त्यांचे खरे अस्तित्व आहे. हा विचारांचा, मूल्यांचा आणि साधेपणाचा वारसा जपणे - हीच माझ्या परीने त्यांना खरी श्रद्धांजली आहे.