ठाकरे जिंकले, ठाकरे हरले

विवेक मराठी    17-Jan-2026   
Total Views |
@रमेश पतंगे
 
वारसा मिरविणार्‍या नामधारी ठाकरेंना हा वारसा काही पचविता आला नाही. म्हणून ते पराभूत झाले आहेत आणि हिंदुत्व विजयी झाले आहे. छत्रपती शिवयरायांपासून चालत आलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जोपासलेले हिंदुत्व विजयी झाले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात हा मूलगामी बदल आहे. इथून पुढे शरद पवारांचा जातवाद, ठाकरे बंधूंचा भाषावाद, प्रांतवाद, वसुलीवाद, यांना उतरती कळा लागली आहे. त्यांचे थडगे व्हायला अजून काही काळ लागेल. 
 
thackeray
 
महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे निकाल सर्वांपुढे आले आहेत. युतीने 29 पैकी 25 महानगरपालिकांत सत्ता मिळविली आहे. या विजयाचे श्रेय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी दिले आहे. देवाभाऊ असा त्यांचा आदराने सर्वजण उल्लेख करतात. निवडणूक घोषित झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निकालांविषयी जे जे अंदाज वर्तविले, ते तंतोतंत खरे झाले. 25 ठिकाणी आमची सत्ता येईल, असे ते म्हणाले होते. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईत फारसा फरक पडणार नाही, हेही त्यांनी सांगितले. आणि बहुतेक सर्व ठिकाणी तसेच झाले आहे.
 
 
राजकीय पक्षांच्या संदर्भात विचार करायचा तर हा विजय भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना यांच्या युतीचा विजय आहे. आणि राजकीय पक्षांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत झाली. निवडणुकांतील राजकीय पक्षांचे यशापयश हे स्वाभाविक असते. एखादा पक्ष विजयी होतो, दुसर्‍या पक्षाला अपेक्षित यश मिळत नाही. निवडणूक राजकारणातील हा सोपा आणि साधा विषय आहे.
 
 
परंतु ही निवडणूक फक्त राजकीय पक्षांतील आपापसातील स्पर्धेची लढाई नव्हती. महानगरपालिकांच्या निवडणुका वीज, पाणी, रस्ते, शाळा व अन्य नागरी सुविधा, या विषयांवर जरी लढवल्या जात असल्या तरी या वेळेला या लढतीचे एक वैचारिक अंगदेखील होते. हे वैचारिक अंग हिंदुत्वाचे होते. हिंदुत्व विरूद्ध जातवाद, भाषावाद, अल्पसंख्य तुष्टीकरणवाद, भ्रष्टाचार, अशी ही लढाई होती. आणि या लढाईत हिंदुत्व विजयी झाले आहे. आणि या हिंदुत्वाच्या विजयाचे श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना द्यायला पाहिजे. म्हणून या निवडणुकीत ठाकरे जिंकले आणि ठाकरे हरले असे म्हणायला पाहिजे.
 
 
आता नुकतेच जे मतदार झाले आहेत, त्यांना कदाचित हे माहीत नसेल की, महाराष्ट्रातील राजकारणात ‘हिंदुत्व’ हा विषय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथम आणला. रमेश प्रभू यांची केस 1995साली उभी राहिली आणि ती खूप गाजली. हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे त्यांची निवड रद्द झाली. केस सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाने भारताच्या राजकारणावर मूलगामी परिणाम करणारा निर्णय दिला. तो थोडक्यात असा की, हिंदुत्व हा केवळ धर्मविचार नसून ती एक जीवनपद्धती आहे. अनेक उपासनांचा त्यात समावेश आहे. हिंदुत्वाचा प्रचार धार्मिक प्रचार होत नाही.
 
 
तोपर्यंत भारतातील कोणताही राजकीय पक्ष निवडणूक प्रचारसभांत हिंदुत्वाचा उच्चार करण्यास धजावत नसे, बाळासाहेबांनी ती वाट मोकळी करून दिली. ही वाट त्यांचे सुपुत्र आणि पुतणे या दोघांनी बंद करून टाकली आणि ते सेक्युलरपंथी झाले. भारतीय जनता पक्षाने या वाटेचा महामार्ग तयार केला. आणि तो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दिवसेंदिवस प्रशस्त होत चाललेला आहे.
 
राजकारणातील हिंदुत्व म्हणजे काय? राजकारणातील हिंदुत्व म्हणजे मुसलमानांना शिव्याशाप नव्हे तर राजकारणातील हिंदुत्व म्हणजे विकास. राजकारणात उपासनापंथाचे काही काम नाही. राजकारणात हिंदुत्वाच्या आधारे विकास म्हणजे आर्थिक विषमता दूर करणे, विकासात सर्वांना सहभागी करून घेणे, भ्रष्टाचारमुक्त विकासयोजना राबिवणे, सर्वांना विकासाचा समान लाभ उपलब्ध करून देणे, हे काम केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले आणि महाराष्ट्रात देवाभाऊ यांनी करून दाखविले. हे राजकारणातील हिंदुत्व आहे.
 

vivek 
 
महानगरपालिकेतील भाजपा आणि शिवसेना (शिंदे) यांच्या महायुतीचा विजय हा हिंदू जनतेचा विजय आहे. हिंदू जनतेला झोपेतून जागे करणे, हे अतिशय अवघड काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षे या दिशेने प्रयत्न करीत आहे. ‘जाग जाग बांधवा, प्राण संकटी तरी’ अशी गीते गाऊन कार्यकर्त्यांनी जागृती यज्ञ धगधगीत ठेवला. आता कुठे हिंदू सर्वसामान्य माणसाला हे समजू लागले की, जात, भाषा, प्रांत, प्रादेशिक वाद, याच्या आहारी जाणे म्हणजे आपल्या हाताने आपल्या पोटात सुरा खुपसणे आहे. बटेंगे तो कटेंगे हा संदेश सामान्य माणसाला उमगू लागला आहे. शंभर टक्के लोकांना उमगला आहे, असे म्हणता येत नाही. पण ज्यांना उमगला त्यांनी महाराष्ट्रात चमत्कार घडवून आणला.
 
 
हेच हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जागे केले होते. आपल्याला आपल्या जीवनमूल्यांवर आधारित आणि जीवनपद्धतीवर स्वराज्य निर्माण करायचे आहे. आणि परमेश्वराचीच तशी इच्छा आहे. त्यांनी ब्राह्मणांपासून तथाकथित महार-मांगापर्यंत सर्वांना एकत्र केले. त्याला नैतिकतेचे अधिष्ठान दिले आणि रयतेचे राज्य निर्माण केले. छत्रपतींचा हा ध्येयवाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना उत्तम समजला होता. म्हणून ते महाराष्ट्रातील प्रमुख सत्ताकेंद्र झाले होते.
 
 
त्यांचा वारसा मिरविणार्‍या नामधारी ठाकरेंना हा वारसा काही पचविता आला नाही. म्हणून ते पराभूत झाले आहेत आणि हिंदुत्व विजयी झाले आहे. छत्रपती शिवयरायांपासून चालत आलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जोपासलेले हिंदुत्व विजयी झाले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात हा मूलगामी बदल आहे. इथून पुढे शरद पवारांचा जातवाद, ठाकरे बंधूंचा भाषावाद, प्रांतवाद, वसुलीवाद, यांना उतरती कळा लागली आहे. त्यांचे थडगे व्हायला अजून काही काळ लागेल.
 
 
महाराष्ट्र ही वैचारिक आंदोलनाची भूमी आहे. हिंदुत्वाचे वैचारिक आंदोलन महाराष्ट्रातच सुरू झाले. लोकमान्य टिळक त्याचे जनक आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर त्याचे सेनापती आहेत आणि डॉ. हेडगेवार त्याचे संघटक आहेत. बाळासाहेब ठाकरे त्याचे संसदीय राजकारणातील प्रवर्तक आहेत. हे हिंदुत्व जातवाद नाकारते, सर्वसमावेशकता हा त्याचा आत्मा आहे. सामाजिक समरसता ही त्याची सामाजिक ओळख आहे. सर्व उपासना पंथाचा आदर ही त्याची धार्मिक ओळख आहे. या हिंदुत्वाला घेऊनच यापुढील राजकारण सर्वांना करावे लागेल. राजकारणात आपला पक्ष टिकवायचा असेल आणि आपले अस्तित्व राखायचे असेल तर याशिवाय दुसरा मार्ग नाही. राजकीय चातुर्य आणि शहाणपण दाखवून राजकारणात येणार्‍या नव्या नेतृत्वाला हे सर्व समजून घ्यावे लागेल. महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांचा हाच संदेश आहे, असे मला वाटते.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.