सोशल मीडिया - मुलांची गरज की व्यसन?

विवेक मराठी    02-Jan-2026
Total Views |
@वैद्य ज्योत्स्ना पेठकर
 
social media  
सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो, व्हिडिओ टाकणे, एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणे, कुठलीतरी छोटीशी achievement टाकणे आणि मग त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात याकडे लक्ष ठेवून असणे, किंवा insta, facebook स्टोरी टाकणे, स्टेटस टाकणे आणि मग ते कुणी-कुणी पाहिलं हे सातत्याने चेक करत राहाणे हे वरवर कितीही साधे वाटले तरी ‘लक्ष वेधून घेण्याची‘ ही सवय एकेक पायरी चढत कधी व्यसन बनते ते कळत नाही. नकार ऐकण्याची सवय नसलेली पिढी हवं तसं घडत नाहीये म्हटल्यावर चिडचिडी होऊ लागते. छोट्या-छोट्या गोष्टींवर भडकणे, पटकन रडू येणे, प्रत्येक छोट्या गोष्टीचा बाऊ करणे, अशी लक्षणांची मग सुरुवात होते.
आपल्या मुलांचे संगोपन करताना कुठल्याही पिढीतील पालकांसमोर विविध आव्हाने असतात. त्यांचे शिक्षण, व्यवसाय, नोकरी, आयुष्याचा जोडीदार-लग्न, संसार अशा सगळ्याच आघाड्यांवर मुलांना सगळं छान मिळावं म्हणून प्रत्येक पालक (भारतीय पालक) धडपड करत असतो. अजाणत्या वयाच्या टप्प्यावर भुलवणार्‍या वाईट गोष्टींकडे त्यांचे पाऊल पडू नये म्हणून पालक दक्ष असतात. पण पिढी दर पिढी ही आव्हाने अधिकच टोकाची होत चालली आहेत आणि यापुढे काही बाबतीत ती अधिकच जटिल होऊ शकतील असे दिसते. आयुष्याचा प्रचंड वेग, हरवत चाललेली जीवनमूल्ये, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एकाकी पडलेली मुले, परिक्षाभिमुख उथळ शिक्षण पद्धती, शिक्षणातील प्रचंड स्पर्धा अशा आव्हानात्मक गोष्टींमधीलच एक जटिल समस्या म्हणजे ‘मुलांच्या हातात आलेला मोबाइल’. हा मोबाइल आणि त्या अनुषंगाने येणारा सोशल मीडिया हे सगळ्याच वयोगटांसाठी मोठे आव्हान ठरते आहे.
 
 
संपर्क साधण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या यंत्राने हळूहळू मार्केट, मनोरंजन, बँक, व्यवसाय सगळं काही एका क्लिकवर आणून ठेवलं. नवनवीन पद्धतीने विकसित होणार्‍या या स्मार्ट यंत्राने गरीब-श्रीमंत असा भेद बाळगला नाही. आज प्रत्येक घरात आणि प्रत्येक व्यक्तीकडे मोबाइल आहे आणि त्याच्या आवश्यक तिथे आणि आवश्यक तेवढ्या वापराने अनेक गोष्टी खूप उत्तमरित्या सुकर झाल्या आहेत. आवश्यक तिथे आणि आवश्यक तेवढा हे दोन्ही मुद्दे सर्वच वयोगटांनी विचारात घेणे गरजेचे आहे.
 

social media  
 
वापर करणार्‍याचे वय व कामाचे स्वरूप या दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन मोबाइल कुठला हवा, त्यात कुठले apps हवेत या गोष्टी ठरवल्या गेल्या पाहिजेत. पण असे होत नाही. छोट्या-मोठ्यांपासून सगळ्यांच्या हाती ‘स्मार्टफोनची’ मनोरंजन करणारी, व्यग्र ठेवणारी, भुलवणारी दुनिया आली आहे आणि या आभासी दुनियेने आपल्या मेंदूचा, मनाचा, वैचारिक शक्तीचा, भावभावनांचा ताबा घेतला आहे.
 
 
एकमेकांच्या संपर्कात राहाणे या मूलभूत उद्देशासाठी मुलांकडे मोबाइल असू शकतो पण तो जेव्हा whatsapp, फेसबुक, यूट्यूब, insta, आणि विविध गेम्स यांनी भरला जातो तेव्हा आपण मुलांच्या हाती नेमकं काय देतोय, याचा प्रत्येक पालकाने विचार करणे खूप गरजेचे आहे. माणूस हा ‘सामाजिक प्राणी’ असला तरी त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक गोष्टी पूर्णत: वेगळ्या आहेत. आपल्या खाजगीतल्या गोष्टी आपण समाजापुढे मांडण्याचे काही संकेत आहेत. सोशल मीडिया हा सोशल गोष्टींसाठी असावा, ‘वैयक्तिक’ नाही, याचे भान वयाने, अनुभवाने परिपक्व माणसांना देखील नसते तर ‘मुलांना’ ते कुठून असणार? आपण येथे विचार करतोय तो प्रामुख्याने 8 ते 18 वर्षे वयोगटाचा.
 
 
लक्ष वेधून घेण्याचे व्यसन
 
सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो, व्हिडिओ टाकणे, एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणे, कुठलीतरी छोटीशी achievement  टाकणे आणि मग त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात याकडे लक्ष ठेवून असणे, किंवा insta, facebook स्टोरी टाकणे, स्टेटस टाकणे आणि मग ते कुणी-कुणी पाहिलं हे सातत्याने चेक करत राहाणे हे वरवर कितीही साधे वाटले तरी ‘लक्ष वेधून घेण्याची‘ ही सवय एकेक पायरी चढत कधी व्यसन बनते ते कळत नाही. Attentionने मिळालेल्या आनंदाचे आयुष्य काही क्षणांचे असते आणि मग काहीतरी हॅपनिंग टाकायचे म्हणून हॅपनिंग घडवले जाते आणि मन या आभासी दुनियेत सतत व्यग्र असते. नकार ऐकण्याची सवय नसलेली पिढी हवं तसं घडत नाहीये म्हटल्यावर चिडचिडी होऊ लागते. छोट्या-छोट्या गोष्टींवर भडकणे, पटकन रडू येणे, प्रत्येक छोट्या गोष्टीचा बाऊ करणे, अशी लक्षणांची मग सुरुवात होते.
 

समाजमाध्यमांवर बंदी - ऑस्ट्रेलियन सरकारचा स्वागतार्ह निर्णय

https://www.evivek.com/Encyc/2026/1/1/australias-ban-on-social-media-for-under-16s.html 
 
 
FOMO फोमोचा बागूलबुवा
 
‘सोशल मीडिया वापरणे हा मुलांचा हक्क की हट्ट‘ या विषयावर एकदा पालकांशी बोलताना काही पालकांनी आपलं मूल प्रवाहातून वेगळे पडण्याची भीती दर्शवली. 'Fear of missing out' हा एक coin झालेला नवीन शब्द आणि नवीन प्रकार. खरं तर आपण सगळेच वेगवेगळ्या क्षमतेचे आहोत आणि त्यानुसार वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. सगळेच सगळ्यांना जमते आणि सगळ्यांकडे सगळे असते असे नाही. दुसरे काय करतायंत आणि त्यांच्याकडे काय आहे हे बघताना व त्याचे प्रेशर घेताना ‘आपल्यात काय क्षमता आहेत, आपल्याकडे काय आहे’ हे बघितले जात नाही. अशा पद्धतीने एका ‘मिथ्या भयाखाली’ जगणारी पिढी ‘स्व’त्व हरवून बसलेली असेल.
 

social media  
 
जर तुमच्या मुलाला/मुलीला कुठल्याही बाबतीत फोमो वाटत असेल तर ती एक रश्ररीाळपस ीळसप आहे की ते मूल मानसिक दृष्ट्या ‘खंबीर’ नाही. अशा वेळी त्या गोष्टी त्याला पुरवणे अथवा करू देणे अथवा त्याच्या हातात स्मार्ट फोन देणे यापेक्षा त्याच्याशी ‘साधकबाधक’ चर्चा करून त्याच्यातला ‘न्यूनगंड’ घालवणे हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे. फोमोच्या भीतीपायी आज स्मार्ट फोन हाती दिला तर पुढे कुठल्या कुठल्या बाबतीत तडजोड पालक स्वीकारणार आहेत?
 
कंटेंटचे पोषण
 
अन्नाने जसे शरीराचे पोषण होते तसे उत्तम साहित्याचे सखोल वाचन, तज्ज्ञांशी चर्चा, यातून वैचारिक पोषण होत असते. चांगल्या-वाईट अशा दोन्ही गोष्टींनी सोशल मीडिया भरलेला आहे. चांगला कंटेंट नक्कीच ज्ञानात भर घालतो, पण... काही कंटेंट मुलांनी या वयात घेणे योग्य ठरणार नाही.
 
 
सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी फारसे निर्बंध नाहीत, त्यामुळे विविध विचारधारांची मंडळी त्यांच्या दृष्टीकोनातून गोष्टी मांडत असतात. धर्म, इतिहास, कला, साहित्य, चालू घडामोडी, अशा अनेक बाबतीत लोकांना गोंधळात टाकणारा कंटेंट टाकला जातो व पसरवला जातो. सखोल वाचन करून गोष्टींची शहानिशा करणे हे किती मुलं करतील? सखोल वाचून, चर्चा करून मग एखाद्या बाबतीत आपलं मत बनवणे ही पायरी डावलली जाते. आभासी दुनियेने मांडलेल्या गोष्टी खर्‍या वाटू लागतात.
 
 
या माध्यमातूनच काही गोष्टी वयाच्या आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. ‘सेक्स टॉक’ या उपक्रमात वय वर्षे 11 ते 13 वयोगटांतील मुलांनी flavored कंडोम आणि Sex toysबद्दल जेव्हा मला माहिती विचारली, तेव्हा त्यांना या पडलेल्या प्रश्नांचा सोर्स हा सोशल मिडियावरील रील कंटेंट होता, असे कळले. या विषयी त्यांना कितीही सांभाळून माहिती दिली तरी त्यांची चाळवलेली उत्सुकता त्यांना कुठे घेऊन जाईल, हे सांगता येणार नाही. बरेवाईट पडताळून योग्य ते घेण्याचा ‘विवेक’ असल्याशिवाय हे दुधारी शस्त्र मुलांच्या हाती देणे कितपत योग्य राहील, याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. शिवाय अनेकदा एकामागे एक रील स्क्रोल करत असताना कित्येक अनावश्यक गोष्टींचा कंटेंट नकळत घेतला जातो. ज्यातून आपल्याला कुठलेही मनोरंजन, ज्ञान मिळत नाही फक्त आपली इंद्रिये आणि मन गुंतलेले राहते. मुलांच्या वाढीच्या वयात ज्ञानार्जनासाठी अत्यावश्यक अशी मनाची एकाग्रता यामुळे पणाला लावली जात आहे.
 
 
सोशल मीडिया साक्षरता
 
पालकांशी बोलताना काही पालकांनी ‘मुलांना आतापासून (म्हणजे वय वर्षे 5 ते 6) मोबाइल दिला नाही तर ते मोबाइल टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया कसा हँडल करायचा याबाबतीत ‘निरक्षर’ राहतील. तंत्रज्ञान अवगत असणे ही काळाची गरज आहे, त्यात ते मागे पडता कामा नये’ असा विचार मांडला. खरं तर ते हा मुद्दा सोयीस्कर विसरले की, ’कुठलीही सोशल मीडिया साक्षरता नसलेल्या पिढीनेच या तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे’.
 
 
कुठले ज्ञान कधी घ्यावे याला देखील वय, आकलनक्षमता, सामाजिक परिस्थिती अशा गोष्टींचा विचार आवश्यक आहे. 6 वर्षांच्या मुलाने उद्या पुढील आयुष्यात उत्तम शल्यचिकित्सक व्हावं यासाठी तुम्ही त्याला आताच नाही ना एखाद्या शल्यचिकित्सकाकडे पाठवणार किंवा घरी सर्जिकल शस्त्र आणून त्याच्या हाती देणार? आणि कुठलेही तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी ते जाणून घेण्यासाठी, त्यात निपुण होण्यासाठी आधी ‘आकलनक्षमतेचा पाया’ तयार होणे गरजेचे आहे.
 

social media  
 
मोबाइल - पालकांची सोय
 
लहान मुलाला गोष्टी सांगत सांगत त्याच्यामागे फिरत फिरत आहार भरवावा लागतो. ते फक्त त्याला खाऊ घालणे नसते तर आई, आजी किंवा बाबा यांच्याशी उत्तम बंध तयार होणे असते. त्यातूनच अनेक शब्द, उच्चार, बडबडगीते मूल नकळत शिकते. भाषा उत्तम येणे हे परीक्षेसाठी नाही तर ती रुजणे आपल्या भावनिक जडणघडणीसाठी आवश्यक असते. यासाठी द्यावा लागणारा वेळ अथवा धीर (पेशन्स) पालकांकडे नसला की मग मुलाच्या हाती मोबाइल देऊन काम सोपे केले जाते. तो काय जेवतोय, किती जेवतोय, त्याची चव काय, पोट भरल्याचे कळते आहे की नाही, अशा गोष्टी दुर्लक्षित राहतात. त्या छोट्याशा स्क्रीनवर रंगीबेरंगी आणि भरधाव बदलणारी चित्रे यांचा त्याच्या फक्त इंद्रियावर नाही तर अन्नपचनावर देखील खूप परिणाम होत असतो. जेवताना मुलांनी अन्नाशी, कुटुंबाशी जोडले गेले पाहिजे.
 
 
बर्‍याचदा क्लिनिकला आलेले पालक त्यांचा नंबर येईपर्यंत मुलांच्या हाती मोबाइल देऊन टाकतात. कारण वेटिंग रूममध्ये बसल्यावर त्याला द्याव्या लागणार्‍या वेळात त्याच्याशी बोलणार काय? त्यापेक्षा, हा घे मोबाइल आणि काय हवं ते बघ - हे जास्त सोपं. हा प्रकार फक्त दवाखान्यातच नाही तर कुठेही घडताना दिसतो. मुलाना बिझी ठेवण्यासाठी आणि पालकांना आपला स्वत:चा वेळ मिळण्यासाठी मुलांच्या हाती मोबाइल देणे ही उत्तम सोय असते. ‘वेळ’ देणे म्हणजे उत्तम साहित्य वाचून दाखवणे त्यावर चर्चा करणे, एखाद्या सद्यकाळातील मुद्यावर, तंत्रज्ञानावर चर्चा करणे असावे. यातून शब्दसंपदा तर वाढतेच पण ऐकून घेण्याची क्षमता देखील वाढते, एक चांगला संवाद साधला जातो.
 
 
खेळ मैदानी की आभासी
 
या वयोगटांतील मुलांना ‘ऑनलाइन गेम’ ही गोष्ट विशेष भुलवणारी आहे. अनेक पालकांनी याची भलामण करताना मुद्दा मांडला की - स्ट्रॅटेजी आखणे, कॉम्प्लेक्स थिंकिंग करणे, Problem Solving capacity अशा अनेक गोष्टी मुलं यातून शिकत असतात. यातूनच त्यांना स्वत: एखादा गेम तयार करण्याची प्रेरणा मिळू शकते. पण नाण्याची दुसरी बाजू सोयीस्कररित्या विसरली जातेय जी खरोखर चिंताजनक आहे. ऑनलाइन खेळण्याचे व्यसन लागलेली आणि शरीर व मन:स्वास्थ्यावर परिणाम झालेली अनेक मुलं माझ्या बघण्यात आहेत. त्यातला फास्ट कंटेंट, जास्त वेळ स्क्रीन टाइम हे तर घातक आहेच पण त्यापेक्षाही घातक आहे समोर अनोळखी व्यक्ती असणे. जगभरातून वेगवेगळ्या वयोगटांची, वेगवेगळ्या उद्देशांना घेऊन माणसे बसलेली आहेत आणि त्यांच्यापैकी काही जणांसाठी ‘ऑनलाईन गेम’ हे सायबर क्राइमसाठी उत्तम साधन आहे. लहान मुलं यातून सहजच पीडित होऊ शकतात.
 
 
ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक तर होऊच शकते पण तुमचे अकाऊंट टेक ओवर करून तुमची identity वापरुन तुम्हाला अनेक गुन्ह्यांत अडकवले जाऊ शकते. भारतात 2021 साली झालेल्या संशोधनात 75 टक्के गेमिंग अकाऊंटवर सायबर हल्ला घडल्याचे निष्पन्न झाले होते. गेमिंगच्या ऑनलाइन चॅट हिस्टरीतील माहितीच्या आधारे अनेक गुन्हेगार खंडणी किंवा ब्रेनवॉशिंगसाठी नुकत्याच वयात आलेल्या मुलाना टार्गेट करतात. याची अनेक उदाहरणे घडलेली आहेत. त्यातले एक गाजलेले आणि सामाजिक भान ठेवून शेयर केलेले उदाहरण म्हणजे अभिनेता अक्षय कुमार याच्या मुलीचे. एका ऑनलाईन गेमिंगच्या दरम्यान तिच्याकडून nude photosची मागणी केली गेली होती.
 
 
याव्यतिरिक्त मुलांना अधिकाधिक भुलवण्यासाठी अनेक फ्री ऑप्शन दिले जातात, ज्यावर क्लिक करणे अनेक सायबर प्रकारच्या क्राइमना जन्म देऊ शकते. इतक्या विविध पद्धतीचे धोके स्वीकारून मुलांच्या शरीर व मन:स्वास्थ्याला पणाला लावण्यापेक्षा त्याना मैदानी खेळ खेळायला दिले तर समूहातील संवाद कौशल्य, trategy आखणे, सर्जनशील विचार करणे, Problem Solving Capacity, अशा अनेक गोष्टी साधल्या तर जातीलच, पण अंगाला छान घाम येऊन शरीर व मन उल्हसित ताजेतवाने बनते. मुळात मैदानी/बैठे खेळ आणि आभासी खेळ यांची तुलनाच होऊ शकत नाही.
 
 
सध्या मी ऑनलाईन गेमिंगमुळे व्यसनाधीन झालेल्या दोन मुलांवर काम करत आहे. ती मुले घरी आले की बॅग सरळ फेकून आधी गेमिंगसाठी मोबाइल/लॅपटॉप ऑन करायचे आणि ते लवकर उपलब्ध झाले नाही तर अत्यंत अस्वस्थ व्हायचे. खरं तर या alarming signs होत्या व्यसनाधीनतेच्या. त्यापैकी एकाने रात्री आई झोपल्यानंतर तिचा मोबाइल ताब्यात घेऊन गेम डाऊनलोड करून एका पेमेंट लिंकवर जाऊन पेमेंटदेखील केले आणि यासाठी त्याने आईच्या जीपेचा पासवर्ड माहीत करून घेतला होता. व्यसनाधीनता गुन्हेगारीस असा जन्म देते. आर्थिक फसवणूक त्रासदायक असली तरी पैसा पुन्हा कमवता येतो, पण एखाद्या भयंकर गोष्टीत मूल अडकले तर त्याचे आणि पर्यायाने कुटुंबाचे आयुष्य उद्द्ध्वस्त होऊ शकते.
 
 
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशनचे परिणाम
 
मोबाइलमधून होणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांचा उत्सर्ग कुणासाठीही त्रासदायकच आहे. परंतु विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत त्याच्या सतत संपर्कात राहण्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम जास्त होतात. गेम्सच्या अथवा इतर माध्यमातून डोळ्यांवर सतत विविध frequencyचे रंग आदळतात ते देखील डोळ्यांना त्रासदायक तर असतातच परंतु बेचैनी, निद्रानाश, नैराश्य, उदासीनता, भूक नीट न लागणे असे त्रास देखील यामुळे उद्भवतात. मुलांच्या प्रत्येक बाबतीत काळजी घेणारे पालक मोबाइलची ही घातक बाजू दुर्लक्षित कशी करू शकतात?
 
जागतिक जागृती
 
सायबर क्राइमसाठी सोशल मीडियावरील मुले सॉफ्ट टार्गेट आहेत आणि शिवाय यामुळे त्यांच्यात अगदी लहान वयातच नैराश्य, बेचैनी, नकरात्मकता, धीर धरण्याचा अभाव, व्यसनाधीनता वाढू लागल्याचे लक्षात येता आणि हे हळूहळू किती गंभीर होऊ शकते याची जाणीव झाल्यावर आता सोशल मीडिया वापरण्यासाठी वयाची अट असण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात कायदे करून त्याची अंमलबजावणी होईपर्यंत याचा उपयोग कितपत होईल हे समजून येणार नाही. शिवाय कायदे आले की पळवाटा देखील आल्याच. 18 वर्षे वय होण्याच्या आधीच कार ड्रायव्हिंग करणार्‍या आणि मोठा अपघात घडवणार्‍या तरुण मुलांची उदाहरणे आपल्याला नवीन नाहीत. परंतु कायदा करण्याविषयी मागणी जोर धरते आहे हे ही नसे थोडके.
 
 
हक्क की हट्ट
 
प्रत्येक पिढीमध्ये पालक-मूल यांच्यात कुठल्या ना कुठल्या बाबतीत विसंवाद असतातच. अगदी काही पिढ्यांपर्यंत कितीही वाद झाले तरी कुटुंब महत्त्वाचे असायचे, मूल त्यापासून तुटायचे नाही. पण कुटुंब व्यवस्थेवर घाला घालण्यासाठी मुलांचे ब्रेनवॉश करण्याचे तंत्र वापरणे सुरू झाले असून, त्यात मुलांवर ‘स्वातंत्र्याच्या’ स्वैर संकल्पना लादणे सुरू आहे. अनेक बाबतीत ‘तो तुमचा हक्क आहे आणि त्यासाठी तुम्ही आग्रही रहा’ अशी चिथावणी दिली जात आहे. आपल्याही नकळत आपल्या मुलांच्या हाती असलेल्या आभासी दुनियेने त्यांच्या विचारशक्तीचा ताबा घेतला आहे. त्यामुळे आपल्या हाती मोबाइल असणे, आपण सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असणे हा आपला हक्क आहे असे ते समजू लागले आहेत. सोशल मीडियाचे तंत्रज्ञान हे सायबर क्राइमसाठी जसे उपयुक्त ठरते आहे तसेच ‘सॉफ्ट वॉर’साठी देखील. समाजव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी अगदी प्रभावी माध्यम बनले आहे. माझी बर्‍याच मुलांशी जेव्हा जेव्हा या बद्दल साधकबाधक चर्चा झाली तेव्हा तेव्हा ‘मोबाइल हाती असणे आणि सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणे हा त्यांचा हट्ट आहे, हे वेळोवेळी त्यांनी मान्य केले आहे.
 
 
घरातील वरिष्ठ, नातलग, समाजातील मंडळी याना बघूनच मुलं मोठी होत असतात. सगळ्यांच्या हाती कायम चिकटलेला मोबाइल बघत जर ते मोठे होत असतील तर त्यांना त्याबद्दल आकर्षण असणे अपरिहार्य आहे. घरातल्या वडीलधार्‍या मंडळींनी कामाव्यतिरिक्त मोबाइल वापरला नाही, मुलांदेखत सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळला तरच त्यांना देखील तशी योग्य सवय लागेल. गूगलवर अथवा यूट्यूबवर एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ती पालकांच्या उपस्थितीतच करावी, हा दंडक करणे अत्यावश्यक आहे.
 
 
तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर करणे अपरिहार्य असेल तेव्हा मुलांच्या हाती ते असणारच. पण आता त्यांचे वय मैदानावर खेळण्याचे आहे, बागेत हुंदडण्याचे आहे, रात्री झोपताना मजेशीर गोष्टी ऐकण्याचे आहे, पालकांसोबत हितगुज शेयर करण्याचे आहे, स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा पाया पक्का बनविण्याचे आहे, आपल्या इतिहासाशी, संपन्न संस्कृती आणि कलेशी जोडले जाण्याचे आहे, हे निश्चित.