प्रचंड खर्च, स्थानविशिष्टता, खोदकामातील अडथळे आणि तांत्रिक आव्हाने अजूनही मोठ्या प्रमाणावर असली तरी भारत, स्वच्छ ऊर्जेसाठी आतापर्यंत विशाल, न वापरलेल्या संसाधनाचा सक्रियपणे सर्वत्र शोध घेत आहे. त्यामध्ये लडाखमधील पुगा हे त्यापैकीच एक महत्त्वाचे भूऔष्णिक ऊर्जा निर्मितीचे ठिकाण आहे. भारताला जागतिक भूऔष्णिक नकाशावर आणणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामुळे लडाखच्या महत्त्वपूर्ण भूऔष्णिक क्षमतेचा, अंदाजे 200 मेगावॅटचा, वापर करून निर्माण होणारी शाश्वत ऊर्जा भविष्यात उपयोगात आणता येईल. असंख्य अडचणींवर मात करून भारताचा पहिला मोठा भूऔष्णिक उपक्रम म्हणून त्याची गणना होईल..
भारतात लडाखमध्ये पहिला भूऔष्णिक (Geothermal) ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. 7 फेब्रुवारी 2021 रोजी, हा भारतातील पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठीचा एक करार जाहीर करण्यात आला होता. या प्रकल्पात लडाखमधील लेहपासून 170 किमी पूर्वेला असलेल्या पुगा येथील नैसर्गिक उष्णोदकाच्या फवार्यांच्या (Geyser) क्षमतेचा वापर करून घेण्यात येईल, असे ठरले.
लडाखच्या भूप्रदेशाखाली दोन भूतबकांची (Tectonic plates) टक्कर होते, ज्यामुळे गरम पाण्याच्या झर्यांसारखी भूऔष्णिक घटनांसाठी पोषक परिस्थिती या भागात तयार होते आणि तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ONGC) ह्याचाच वापर करून त्यातून अक्षय ऊर्जेचा शून्य-कार्बन स्रोत असलेली भूऔष्णिक ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
ऑगस्ट 2025च्या अहवालांवरून असे दिसून येते की स्वदेशी कौशल्याचा वापर करून पहिल्या विहिरीसाठी 4300 मीटर उंचीवर खोदकाम करून केलेले विहिरीचे काम आता पूर्णत्वाच्या जवळ आले आहे.
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खडक आणि द्रवपदार्थात असलेल्या ऊर्जेला भूऔष्णिक ऊर्जा (Geothermal Energy) म्हणतात, जी 100% स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा स्रोत आहे. भूऔष्णिक ऊर्जा ही अशी ऊर्जा आहे जी पृथ्वीवरील खडकांच्या आणि द्रव पदार्थांच्या खाली आढळते. ही ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली, वितळलेल्या लाव्हारसाच्या खोलीपर्यंत, अनेक किलोमीटरपर्यंत पोहोचणार्या उथळ जमिनीत देखील आढळते.
नैसर्गिक स्वरूपात निर्माण होणार्या भूऔष्णिक ऊर्जेपासून वीज मिळविण्यासाठी, भूगर्भातील या ऊर्जेच्या साठ्यांमध्ये दीड किलोमीटर किंवा त्याहून अधिक खोल विहिरी खोदल्या जातात. या विहिरी त्यासाठी झोतयंत्र म्हणजे टर्बाइन चालविण्यासाठी वाफेचा आणि गरम पाण्याचा वापर करतात.
पुगा हे भूऔष्णिक स्थळ लडाखमध्ये असून, सुमारे 4,410 मीटर इतक्या जास्त उंचीवर असलेल्या पुगा याच नावाच्या एका सक्रिय जलऔष्णिक (Hydrothermal) दरीत ते स्थित आहे (33. 22 अंश उत्तर अक्षांश आणि 78. 32 अंश पूर्व रेखांश). ही दरी भारतीय आणि युरेशियन या दोन भूगर्भीय भूतबकांची 4 कोटी वर्षांपूर्वी जिथे टक्कर झाली होती ते भाग जोडणार्या म्हणजे इंडस सूचर झोन (ISZ) या भूसामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या भागाच्या दक्षिणेस दिसून येते. दरीच्या या सक्रिय भूविवर्तनी (Tectonic) स्थानावरूनच या ठिकाणचे अद्वितीय भूगर्भशास्त्रीय आणि भूरूप शास्त्रीय महत्त्व आपल्या लक्षात येते.
पुगा क्षेत्र हा ’त्सो मोरारी कॉम्प्लेक्स’ या घुमटाच्या आकाराच्या भूवळीचा (Fold) उंचावलेला अपनतीचा (Anticline) भाग असून तो फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या भूऔष्णिक प्रदेशातील मूळ खडक उच्च दाबाच्या रूपांतरण प्रक्रियेमुळे बनले असून खोल भूऔष्णिक द्रवपदार्थ आणि ज्वालामुखीजन्य पदार्थ यामुळे ते अद्वितीय असे खनिजसमृद्ध खडक झाले आहेत.
दरीचा तळ अगदी अलीकडच्या काळात निर्माण झालेला हिमनदीचा गाळ, वाळू, चिकणमाती आणि भरड पदार्थ यांनी बनला आहे. हे पदार्थ उथळ भूऔष्णिक ऊर्जा साठे निर्मितीला पोषक आहेत.
पूर्व-पश्चिम जाणारी सुमारे 15 किमी लांब आणि 1 किमी रूंद अशी ही पुगाची अरूंद दरी, खचदरी सदृश रचना असल्याचे दिसते. दरीतील भूऔष्णिक प्रक्रिया मोठ्या प्रमाणात इथल्या सक्रिय भूभेगानी किंवा भूभ्रंशांनी (Faults) नियंत्रित केल्या जातात. मुख्य भेगात पूर्वेकडील वायव्य-आग्नेय दिशेतील ’झिल्डॅट भूभ्रंश’ आणि पश्चिमेकडील उत्तर-उत्तर पूर्व आणि दक्षिण-दक्षिण पश्चिम दिशेतील ’कियागोर त्सो भूभ्रंश’ यांचा समावेश होतो. हे दोन्ही भूभ्रंश मुख्य औष्णिक क्षेत्राला उष्णतेचा पुरवठा करतात.
अलिकडच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या भागातील भूजन्य उष्णता ही दर किमीला 100 ओसें. पेक्षा जास्त असलेला उच्च प्रादेशिक तापमान कल (थर्मल ग्रेडियंट), पृष्ठभागावरील भूभ्रंश निर्मितीमुळे तयार झालेली घर्षण उष्णता आणि खोलवर झालेला ग्रॅनाइट खडकाचा प्रवेश किंवा सुमारे 8 किमी खोलीवर खडकाच्या आंशिक वितळण्यामुळे निर्माण झालेली उष्णता या सगळ्याचा एकत्रित परिणाम असू शकतो.
या प्रदेशातील भूऔष्णिक ऊर्जा असलेल्या भागात दोन मुख्य ऊर्जा साठे असल्याचे भूभौतिकीय सर्वेक्षणाद्वारे लक्षात आले आहे. साधारण 165 ओसें. तापमान असलेला, दरीतील अवसादांचा असंघटित भराव आणि भेगानी विदीर्ण झालेल्या मूळ खडकामध्ये काहीशे मीटर खोलीपर्यंत असलेला एक उथळ साठा आणि अंदाजे 2-5 किमी खोलीवर अत्यंत प्रवाही आणि 250ओसें.पर्यंत उच्च तापमान असलेला, भूऔष्णिक द्रवपदार्थ असण्याची शक्यता असलेला दुसरा खोल ऊर्जा साठा असे हे दोन मोठे ऊर्जा साठे आहेत.
पुगा या ठिकाणी व्यापक भूऔष्णिक हालचाली दिसून येतात ज्यामध्ये 100 हून अधिक 84ओसें. तापमानाचे गरम पाण्याचे झरे, चिखलाचे तलाव आणि सल्फर, बोरॅक्स आणि लिथियम, सीझियम आणि रुबिडियम सारख्या इतर खनिजांचे विस्तृत साठे समाविष्ट आहेत.
पुगा भूऔष्णिक स्थळ हे त्याच्या अशा महत्त्वपूर्ण क्षमतेमुळे ओएनजीसीच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिल्या भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या संशोधन आणि विकासासाठी एक प्रमुख स्थान म्हणून ओळखण्यात आले आहे.
पुगा, लडाख येथील या प्रस्तावित वीज प्रकल्पांतर्गत, ओएनजीसी, उष्णोदकाच्या फवार्यांतून बाहेर पडणार्या वाफेचा आणि गरम सल्फरच्या पाण्याचा वापर करण्यासाठी 500 मीटरपर्यंत खोदकाम करील. यामुळे एक मेगावॅट क्षमतेचा पॉवर प्लांट चालविण्यास मदत होईल. याचबरोबर लडाखचा केंद्रशासित प्रदेश, लडाख स्वायत्त टेकडी विकास परिषद-लेह, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ ऊर्जा केंद्र यांच्याबरोबर सामंजस्य करारही केले जातील.
भारतातील भूऔष्णिक स्थळे हिमालयीन पट्टा, खंबात (गुजरात), सोन-नर्मदा-तापी रेषा (एसएनटी) आणि पश्चिम किनारपट्टी यासारख्या प्रमुख भूगर्भीय वैशिष्ट्य असलेल्या भागात पसरलेली आहेत, ज्यामध्ये पुगा व्हॅली (लडाख), मणिकरण (हिमाचल प्रदेश), तट्टापाणी (छत्तीसगड), बक्रेश्वर (पश्चिम बंगाल), गोदावरी खोरे आणि ईशान्य भारत आणि रत्नागिरी क्षेत्र (महाराष्ट्र) यासारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. हे सगळे क्षेत्र वीजनिर्मितीसाठी भूगर्भातील क्रियाप्रक्रिया आणि गरम पाण्याच्या झर्यांवर अवलंबून आहे.
उथळ शिलारस (Magma) किंवा खोल मूळ खडक असलेले प्रदेश हे भूऔष्णिक उष्णता स्रोत असले आदर्श प्रदेश मानले जातात. भूतबक सीमा असलेले (उदा. हिमालय) किंवा पृष्ठभागाला भेगा किंवा भूभ्रंश असलेले प्रदेशही (उदा. खंबातचे आखात) हे याबाबतीत महत्त्वाचे आहेत. पृथ्वीवरील खोल भेगा अशा गरम द्रवपदार्थांसाठी वाहिन्या म्हणून काम करतात. भूऔष्णिक ऊर्जेतून वीज निर्मितीसाठी 100 ओसें. पेक्षा जास्त तापमान आवश्यक असते.
लडाखमध्ये या प्रकल्पामुळे या प्रदेशात 24 तास वीजपुरवठा होईल. इथल्या भूऔष्णिक झर्यातील गरम पाणी ही जागा गरम करण्यासाठी उपयुक्त ठरेल. पर्यटकांसाठी गरम पाणी असलेल्या जलतरण तलावांची स्थापना करता येईल. या प्रकल्पाची स्थापना स्थानिकांसाठी नवीन रोजगार निर्माण करील.
भूऔष्णिक ऊर्जा ही पृथ्वीच्या गाभ्यातून मिळणारी उष्णता आहे, जी गरम पाणी आणि वाफेच्या भूमिगत साठ्यामधून मिळवता येते. हा ऊर्जेचा एक स्वच्छ, विश्वासार्ह आणि अक्षय पर्याय आहे जो सातत्याने सातत्यपूर्ण वीज प्रदान करू शकतो. अर्थात तो मिळविण्यासाठी त्यात जमीन खोदण्याचा (Drilling) भरपूर खर्च येतो.
बहुतेक वेळा हा ऊर्जा साठा पृथ्वीवरील भूतबकांच्या (Tectonic Plates) सीमांसारख्या भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय भागात केंद्रित असतो. ही उष्णता पृथ्वीच्या निर्मितीकाळापासूनच्या किरणोत्सर्गी क्षयातून निर्माण होते आणि ती पृथ्वीच्या अंतरंगात खोलीनुसार वाढत जाते. भूमिगत खडकांच्या रचनेत अडकलेले गरम पाणी किंवा वाफ, गरम, कोरड्या खडकांमध्ये प्रवेश करते. ही वाफ थेट टर्बाइन फिरवते आणि वीज निर्माण करते.
भूऔष्णिक ऊर्जेसाठी योग्य ठिकाण शोधतांना तिथे भूमिगत पाण्याचा किंवा वाफेचा, उच्च तापमानाचा, कमी खनिजे असलेला साठा आहे का ते पाहिले जाते. पृष्ठभागाजवळील ज्वालामुखी क्षेत्रे तीव्र उष्णता प्रदान करतात. याकरता उच्च तापमान असलेले उष्णता प्रवाह अत्यंत महत्त्वाचे असतात. उष्णता साठण्यासाठी आणि ती वाहून नेण्यासाठी जलयुक्त भग्न खडक किंवा जलधारक सच्छिद्र थर आवश्यक असतात. गरम पाण्याचे झरे, उष्णोदकांचे फवारे, धूममुखे (Fumeroles) किंवा गरम वाफ आणि वायूंची छिद्रे किंवा झरे हे अंतरंगातील उष्णता दर्शवतात. सामान्यपणे यांच्या जवळच भूऔष्णिक ऊर्जेचे साठे असतात.
वर्ष 2022मध्ये पुगा नदीप्रवाहात भूऔष्णिक द्रवपदार्थ शिरल्यानंतर हा प्रकल्प रखडला आणि पर्यावरणीय चिंता निर्माण झाल्या होत्या. परंतु 2024च्या मध्यात अपग्रेड केलेल्या उपकरणांसह आणि आइसलँड येथील तज्ञांच्या मदतीने ड्रिलिंग पुन्हा सुरू झाले.
अतिशय जास्त खर्च, स्थान वशिष्टता, खोदकामातील अडथळे आणि तांत्रिक आव्हाने अजूनही मोठ्या प्रमाणावर असली तरी भारत, स्वच्छ ऊर्जेसाठी या विशाल, न वापरलेल्या संसाधनाचा सक्रियपणे सर्वत्र शोध घेत आहे आणि लडाखमधील पुगा हे त्यापैकीच एक महत्त्वाचे भूऔष्णिक ऊर्जानिर्मितीचे ठिकाण आहे.
भारताला जागतिक भूऔष्णिक नकाशावर आणणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामुळे लडाखच्या महत्त्वपूर्ण भूऔष्णिक क्षमतेचा, अंदाजे 200 मेगावॅटचा, वापर करून निर्माण होणारी शाश्वत ऊर्जा भविष्यात उपयोगात आणता येईल.
हा प्रकल्प आता अतिशय काळजीपूर्वक प्रगती करत आहे आणि तांत्रिक अडचणींवर मात करून भारताचा पहिला मोठा भूऔष्णिक उपक्रम म्हणून त्याची क्षमता दाखवून देत आहे.