गेल्या चार दशकांत बांगलादेशच्या राजकारणावर दोन ‘बेगमांनी’ आपला ठसा उमटविला- एक शेख हसीना व दुसर्या खालिदा झिया. या दोन ‘बेगमां’मधील संघर्षाने बांगलादेशामध्ये कमालीचे राजकीय ध्रुवीकरण घडवून आणले व त्याची झळ बांगलादेशला बसली हे नाकारता येणार नाही. या दोघींपैकी एक- शेख हसीना यांना बांगलादेशातून परागंदा होऊन भारतात आश्रय घ्यावा लागला; तर खालिदा झिया या निवर्तल्या. या दोघींच्या अनुपस्थितीत बांगलादेशाचा राजकीय सारीपाट नव्याने रचला जाईल यात शंका नाही. तथापि शेख हसीना व खालिदा झिया यांच्या सावलीतून बांगलादेशाचे राजकारण सहज बाहेर पडू शकेल असे नाही.
बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली आहे असेच म्हटले पाहिजे. बांगलादेशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याच्या मान त्यांनी पटकावला होता. वास्तविक त्या राजकारणात अपघाताने आल्या; तत्पूर्वी एका माजी लष्करी अधिकार्याची पत्नी एवढीच त्यांची ओळख होती. त्यांचे पती झिया उर रहमान हे बांगलादेश मुक्तिलढ्यात सहभागी होते आणि नंतर त्यांनी बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाची (बीएनपी) स्थापना केली होती. 1977 मध्ये ते बांगलादेशाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनीच त्या देशात बहुपक्षीय लोकशाही व्यवस्थेस चालना दिली. मात्र लष्कराच्या उठावामध्ये त्यांची 1981 मध्ये हत्या करण्यात आली. त्यानंतर बीएनपी पक्ष निर्नायकी व परिणामतः विस्कळीत झाला.
1945 मध्ये जन्मलेल्या खालिदा झिया यांचा वयाच्या पंधराव्या वर्षी रहमान यांच्याशी विवाह झाला होता आणि एका कर्तव्यदक्ष गृहिणीची भूमिका त्या बजावत होत्या. पतीच्या हत्येनंतर बीएनपी पक्षावर अनिश्चिततेचे सावट असताना त्या अचानक पक्षात सक्रिय झाल्या. राजकीय अनुभवाचा त्यांच्यापाशी असणारा अभाव; त्यांच्या क्षमतेविषयी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना असणारा अविश्वास यांमुळे त्या फार काळ पक्षात किंवा राजकारणात टिकाव धरू शकतील याचा संभव नसल्याचे भाकीत अनेकांनी केले होते. परंतु लवकरच त्यांनी पक्षावर आपली मांड पक्की केली आणि बीएनपी पक्षाच्या उपाध्यक्ष व कालांतराने प्रमुख झाल्या.
गेली चार दशके त्या बांगलादेशाच्या राजकारणात केवळ सक्रिय होत्या असे नाही तर अनेकदा त्या तेथील राजकारणाच्या दिशाबदलाच्या शिल्पकार ठरल्या. त्यांच्या कार्यकाळात बीएनपी पक्षाने अनेक चढउतार पाहिले; स्वतः झिया यांनी सत्तेचा अनुभव घेतला तसा करावासाचाही घेतला. 2006 नंतर त्यांचे सत्तेत पुनरागमन झाले नाही आणि तरीही तेथील राजकारणावर त्यांचा ठसा राहिला. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल झाला होता. पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बांगलादेशच्या राजकारणात प्रदीर्घ काळ आपला दबदबा राखलेल्या एका धडाडीच्या पण तितक्याच गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व असणार्या राजकीय नेत्याचा हा अस्त बांगलादेशात पोकळी निर्माण करणारा आहे यात शंका नाही.
आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेण्यावर अवामी लीग पक्षावर निर्बंध आहेत आणि साहजिकच बीएनपी पक्षाला एकहाती सत्ता मिळेल असे भाकीत वर्तविण्यात येत आहे. झिया यांचे पुत्र तारिक रहमान हे नुकतेच सतरा वर्षांच्या विजनवासानंतर स्वदेशी परतले. तेच बांगलादेशाचे पुढील पंतप्रधान असतील असे गृहीत धरण्यात येत आहे. प्रदीर्घ काळानंतर बीएनपी पक्षाला त्या देशात सत्ता मिळू शकते; पण नेमक्या अशाच क्षणी त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्या असणार्या झिया यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्या राजकारणात आल्या तेव्हा त्या वयाच्या चाळीशीत होत्या आणि मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्षांचे होते. या मधल्या चार दशकांत झिया यांनी कधी सत्तेत राहून तर कधी विरोधी पक्षनेत्या म्हणून आपल्या नेतृत्वाची प्रासंगिकता लोप पावू दिली नाही.
झिया उर रहमान यांच्या हत्येनंतर अब्दुस सत्तार हे बांगलादेशाचे अध्यक्ष झाले होते. परंतु रक्तहीन उठावात त्यांची सत्ता उलथवून लावत लष्करी अधिकारी असलेले इर्शाद यांनी सत्ता काबीज केली. त्यांनी आपला जातीय पक्ष नावाचा पक्षही स्थापन केला. मात्र देशात हुकूमशाही राजवट होती आणि इर्शाद यांनी प्रशासनाचे व देशाचे इस्लामीकरण केले. अभ्यासक्रमात अरबी भाषेचा अंतर्भाव करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. इर्शाद यांच्या हुकूमशाही विरोधात ज्या दोन महिला नेत्या धडाडीने उभ्या राहिल्या त्यापैकी एक शेख हसीना व दुसर्या खालिदा झिया. या दोन रणरागिणींनी इर्शाद यांच्याविरोधात लढा उभारला. इर्शाद यांच्याशी कोणत्याही वाटाघाटी करण्यास झिया यांनी नकार दिला आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा ही तत्त्वांशी तडजोड न करणार्या नेत्या अशी झाली व ती कायम राहिली. इर्शाद यांची राजवट नऊ वर्षे सुरूच राहिली; पण अखेरीस त्यांना निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. या सर्व काळात शेख हसीना व खालिदा झिया यांनी इर्शाद यांच्याविरोधात एकत्रित लढा दिला. तो एकदिलपणा पुढे राहिला नाही एवढेच नाही तर हसीना व झिया परस्परांच्या कट्टर विरोधक झाल्या. दरम्यान 1991 मधील निवडणुकीत बीएनपी पक्षाला मिळालेल्या बहुमतामुळे खालिदा झिया त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. कोणत्याही इस्लामिक राष्ट्राच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान पाकिस्तानात बेनझीर भुट्टो यांच्या नावावर जमा होता. त्यानंतर तीन वर्षांतच बांगलादेशात खालिदा झिया यांनी ती कामगिरी करून दाखविली.
बीएनपी पक्ष हा काही उदारमतवादासाठी प्रसिद्ध नव्हे. पण झिया यांनी घेतलेले काही निर्णय पक्षाच्या या प्रतिमेला छेद देणारे होते. लोकशाही राज्यव्यवस्था कायम राखतानाच झिया यांनी अध्यक्षीय पद्धतीचे रूपांतर संसदीय लोकशाही पद्धतीत केले. त्याचा एक हेतू अध्यक्षांकडे असणारे सर्व कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या हातात यावेत असा असू शकतो. पण इर्शादच्या हुकूमशाही राजवटीविरोधात लोकशाहीच्या पुनर्प्रस्थापनेसाठी लढा दिलेल्या खालिदा झिया यांच्या इराद्यांवर या अर्थाने शंका घेता येणार नाही. त्यांच्याच कार्यकाळात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले; ग्रामीण भागांमध्ये मुलींसाठी माध्यमिक शिक्षण मोफत करण्याची तरतूद त्यांच्या कार्यकाळात करण्यात आली. पंतप्रधानपदाच्या दुसर्या कार्यकाळात देखील त्यांनी महिलांसाठी राखीव मतदारसंघांसारखा निर्णय घेऊन देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो याचा संदेश दिला होता. रूढीवादी मानल्या जाणार्या पक्षाच्या महिला पंतप्रधानाने घेतलेले हे धोरणात्मक निर्णय प्रागतिक स्वरूपाचे व बांगलादेशचा सामाजिक पोत बदलणारे होते हे नाकारता येत नाही. परकीय गुंतवणुकीवरील निर्बंध त्यांच्याच कार्यकाळात शिथिल करण्यात आले. सैफुर रहमान हे त्यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते. त्यांच्या मार्गदर्शनात त्या सरकारने मूल्यवर्धित कर रचना (व्हॅट) व्यवस्थेची अंमलबजावणी केली. रहमान हे स्वतः सनदी लेखापाल व अर्थतज्ज्ञ होते हे येथे नमूद करावयास हवे.
निवडणुका या निष्पक्ष व्यवस्थेच्या देखरेखीखालीच व्हायला हव्यात अशा मागणीने जोर धरला तेव्हा झिया यांच्याच कार्यकाळात तेरावी घटना दुरुस्ती करण्यात आली जेणेकरून काळजीवाहू सरकारची व्यवस्था अस्तित्वात आली. 1996 मध्ये अशाच काळजीवाहू सरकारच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुकीत झिया यांच्या पक्षाचा पराभव झाला व शेख हसीना पंतप्रधान झाल्या. त्यानंतर या दोघी जणींमधील दुरावा वाढत गेला व त्याचे रूपांतर कटुतेत झाले. 2001 मध्ये झालेल्या निवडणुकीत झिया यांनी चारपक्षीय आघाडीचे नेतृत्व केले. त्या आघाडीला मिळालेल्या दणदणीत बहुमतामुळे झिया यांचे जरी सत्तेत पुनरागमन झाले तरी त्यांची प्रतिमा मात्र डागाळली होती. याचे कारण धार्मिक कट्टरतावादी पक्षांशी त्यांनी केलेली आघाडी. त्यांच्या याच कार्यकाळात हिंदू अल्पसंख्यांकांवर होणार्या हल्ल्यांत कमालीची वाढ झाली. हिंदुंवर अत्याचार रोखण्याचे आश्वासन भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दूत ब्रजेश मिश्रा यांना खालिदा झिया यांनी दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र त्या स्थितीत बदल झालेला दिसला नाही. उलट अशा हल्ल्यांचे नेतृत्व बीएनपी व जमात-इ-इस्लामी या सारख्या पक्षांचे कार्यकर्ते बिनदिक्कत करीत असत.
एकीकडे प्रागतिक धोरणे राबविणार्या झिया यांनी दुसरीकडे मात्र इस्लामिक कट्टरतावाद्यांशी सत्तासोबत केली. त्याचाच दुसरा भाग म्हणजे भारतविरोधी भावनेस त्यांनी उत्तेजन दिले. 2002 मध्ये त्यांनी चीनशी संरक्षण करार केला होता. आसाममधील फुटीरतावादी उल्फा दहशतवाद्यांचा उल्लेख त्यांनी स्वातंत्र्यसैनिक असा केला होता. बीएनपी पक्ष सत्तेत असताना बांगलादेशाचे भारताशी असणारे संबंध तणावपूर्णच होते. याला झिया यांच्या चीन व पाकिस्तान धार्जिण्या भूमिका कारणीभूत होत्या. किंबहुना 2001 ते 2006 या झिया यांच्या पंतप्रधानपदाचा कार्यकाळ भारताच्या दृष्टीने कठीण होता कारण झिया प्रशासनावर पाकिस्तानचा प्रभाव होता असे काही मुत्सद्दी सांगतात. तरीही खालिदा झिया यांनी राजकीय व्यवहार्यता व चाणाक्षपणा यांना रजा दिली नव्हती. 2006 मध्ये त्यांनी भारताचा दौरा केला व द्विपक्षीय व्यापार करारास अंतिम स्वरूप दिले होते.
2007 मध्ये लष्कराने समर्थन केलेले सरकार सत्तेत आले व खालिदा झिया यांची राजवट संपुष्टात आली. खालिदा झिया व शेख हसीना यांना तुरुंगवास घडला. देशभर हिंसक वातावरण निर्माण झाले होते व लोकशाही व्यवस्था स्थगित झाली होती. 2008 मध्ये निवडणुकांची घोषणा करण्यात आली तेव्हा खालिदा झिया यांनी जमात इ इस्लामीसह चार पक्षांची आघाडी स्थापन केली तर शेख हसीना यांनी मात्र त्याच इर्शाद यांच्या जातीय पक्षाशी आघाडी केली ज्या राजवटीच्या विरोधात काहीच वर्षे अगोदर त्यांनी लोकशाहीच्या पुनर्प्रस्थापनेसाठी लढा दिला होता. तरीही अवामी लीग पक्षाला बहुमत मिळाले व झिया यांना मात्र दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पुढे 2014 व 2024 च्या निवडणुकांवर खालिदा झिया यांच्या नेतृत्वातील बीएनपी पक्षाने बहिष्कारच घातला. खालिदा झिया व शेख हसीना यांच्यातील कटुतेने द्वेषाचे रूप धारण केले होते. झिया यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ठेवण्यात आले व त्या कधी तुरुंगात तर कधी नजरकैदेत होत्या. 2015 मध्ये सरकारविरोधी निदर्शनांचे नेतृत्व खालिदा झिया करणार असे दिसताच शेख हसीना सरकारने झिया यांच्या कार्यालयावर वाळूने भरलेले ट्रक रवाना केले व त्या ट्रकनी कार्यालयास वेढा घातला. त्याच दरम्यान त्यांच्या धाकट्या मुलाचे मलेशियात निधन झाले व ते दुःख त्यांना सोसावे लागले. शेख हसीना त्यांचे सांत्वन करायला आल्या; पण झिया यांच्या कार्यालयाला आतून कडी घालण्यात आली होती व शेख हसीना यांना माघारी फिरावे लागले. झिया यांची प्रकृती ठीक नसल्याने ती भेट होऊ शकली नाही असा पवित्रा बीएनपी पक्षाने घेतला तर अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी मात्र बीएनपीचे ते कृत्य माणुसकीशून्य असल्याचे म्हटले होते. याचा परिणाम इतकाच झाला की एकेकाळी लोकशाहीसाठी खांद्याला खांदा देऊन लढणार्या दोन पक्षांच्या दोन सर्वोच्च नेत्यांमधील वितुष्ट अधिकच वाढले व तेच कार्यकर्त्यांच्या स्तरावर झिरपले.
2018मध्ये झिया यांना भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली व दोनेक वर्षे तरी त्या जुन्या ढाका मध्यवर्ती कारागृहात होत्या. विशेष म्हणजे त्या तुरुंगातील अन्य सर्व कैद्यांना नव्या तुरुंगात पाठविण्यात आले; पण झिया या जुन्या तुरुंगातील एकमेव कैदी राहिल्या. एकांत बंदिवास; कुटुंब-पक्ष यांपासून दूर राहण्याची शिक्षा याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होऊ लागला आणि अखेरीस 2020 मध्ये त्यांची सशर्त सुटका करण्यात आली. मात्र त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेच होते. 2024च्या ऑगस्ट महिन्यात शेख हसीना सरकारच्या विरोधात बांगलादेशात जनउद्रेक झाला व हसीना यांना देशातून परागंदा होण्याची वेळ आली. त्यानंतर त्या देशातील राजकीय समीकरणे बदलली व खालिदा झिया यांना सर्व आरोपांतून सर्वोच्च न्यायालयाने दोषमुक्त केले. पण तोवर त्यांना इतक्या व्याधींनी ग्रासले होते की त्यांना खर्या अर्थाने ते स्वातंत्र्य उपभोगता आले नाही. उलट 2025 च्या सुरुवातीस त्यांना उपचारांसाठी काही काळ लंडन येथे हलविण्यात आले होते. कालांतराने त्या बांगलादेशाला परतल्या; पण त्यांची प्रकृती ढासळतच गेली व अखेरीस 30 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बीएनपीसाठी राजकीय परिस्थिती अनुकूल होत असताना; तारिक रहमान स्वदेशी परतले असताना व पंतप्रधानपदाची माळ त्यांचा गळ्यात पडणार हे गृहीत धरले जात असताना; आपल्या कट्टर विरोधक शेख हसीना देशाबाहेर असताना खालिदा झिया यांना मृत्यू यावा हा नियतीचा विचित्र खेळ म्हटला पाहिजे. बीएनपीच्या सत्ताकाळात बांगलादेश-भारत संबंध मधुर नव्हते हे खरे असले तरी शेजारी बदलता येत नाहीत या जाणीवेतून बीएनपीशी जुळवून घेण्याची तयारी भारताने केली होती व तारिक रहमान यांनीही ‘ना दिल्ली ना पिंडी (रावळपिंडी); बांगलादेश प्रथम’ अशी प्रचाराची घोषणा देऊन पाकिस्तानपासून अंतर राखले होते. झिया हयात असत्या व सक्रिय असत्या तर आताही कदाचित बीएनपीच्या सत्ताकाळात भारताशी संबंध सुरळीत करण्यात त्या हातभार लावू शकल्या असत्या. आगामी निवडणुकीत बीएनपीने जमात इ इस्लामी पक्षाशी आघाडी केलेली नाही हेही कदाचित भारताशी संबंधांबद्दल पुनर्विचाराचे द्योतक असू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच समाजमाध्यमांवरील पोस्टमधून खालिदा झिया यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करतानाच त्यांच्यावरील उपचारांच्या संदर्भात कोणतेही साह्य देण्याची ग्वाही दिली होती. तेव्हा बीएनपी व भारत यांच्यातील संबंधांमध्ये सुधारणा व्हावी अशी दोन्ही बाजूंनी मानसिकता आकार घेत असतानाच खालिदा झिया यांचा मृत्यू ओढवला हे दुर्दैवी म्हटले पाहिजे.
गेल्या चार दशकांत बांगलादेशच्या राजकारणावर दोन ‘बेगमांनी’ आपला ठसा उमटविला- एक शेख हसीना व दुसर्या खालिदा झिया. या दोन ‘बेगमां’मधील संघर्षाने बांगलादेशामध्ये कमालीचे राजकीय ध्रुवीकरण घडवून आणले व त्याची झळ बांगलादेशला बसली हे नाकारता येणार नाही. या दोघींपैकी एक- शेख हसीना यांना बांगलादेशातून परागंदा होऊन भारतात आश्रय घ्यावा लागला; तर खालिदा झिया या निवर्तल्या. या दोघींच्या अनुपस्थितीत बांगलादेशाचा राजकीय सारीपाट नव्याने रचला जाईल यात शंका नाही. तथापि शेख हसीना व खालिदा झिया यांच्या सावलीतून बांगलादेशाचे राजकारण सहज बाहेर पडू शकेल असे नाही.