सर्व संस्कारांत हा उपनयन संस्कार मुख्य मानाला गेला आहे. ज्याचे उपनयन झाले नाही, त्याला शिक्षण मिळत नाही, त्याला देवकार्य आणि पितृकार्य करायचा अधिकार मिळत नाही, श्रौत-स्मार्त-कर्मांचा तसेच विवाह, संध्या, तर्पण आदि कर्मांचा अधिकार मिळत नाही. अशा संस्कारहीन लोकांना ‘व्रात्य’ म्हटले गेले. अशांसाठी ’व्रात्यस्तोम’ प्रायश्चित्त घेऊन उपनयनसंस्कार करण्याची पद्धत होती. अगदी तिसाव्या वर्षी सुद्धा हा संस्कार करता येतो. स्वामी श्रद्धानंदांनी व्रात्य संस्कारासारखा संस्कार करून ज्यांचे धर्मांतर झाले होते, त्यांना पुन्हा हिंदू करून घेण्यास सुरुवात केली होती.
ध्रुव आठ वर्षांचा झाला, तेव्हा त्याचा उपनयन संस्कार करायचे ठरले. रजनीकांत आणि रोहिणी यांनी त्याच्या शाळेला सुट्टी असतानाचा मुहूर्त पाहून दिवस ठरवला. ध्रुवसाठी नवीन रेशमी पिवळे वस्त्र घेतले आणि आईने पांढरी साडी! आठ बटूंना आमंत्रण गेले. मुंजीचा दिवस उजाडला. आज ध्रुवला आधी आईने मांडीवर बसवून खाऊ घातले. यापुढे आई भरवणार नाही आणि यापुढे जे व्रत सांभाळायचे आहे, त्यात स्नानाच्या आधी काही खायचे नाही. तसेच भरविण्याचा हा आजचा शेवटचा दिवस.
शैक्षणिक संस्कारांमध्ये उपनयन हा सर्वांत महत्त्वाचा संस्कार. इतके दिवस - विद्यारंभ संस्काराच्या नंतर चार-पाच वर्षे ध्रुव लिहायला-वाचायला, पाढे म्हणायला, वजाबाकी, गुणाकार आदी गोष्टी शिकला होता. आता पुढील शिक्षण सुरू होणार होते. आठ ते बारा वर्षांच्या दरम्यान उपनयन संस्कार केला जातो. या नंतर मूल गुरुकुलात शिकायला जाते. तो आता गुरूंच्या कुटुंबाचा भाग होतो.
‘उपनयन’ शब्दाचा अर्थ आहे - पित्याने मुलाला गुरूंच्याजवळ विद्याध्ययनासाठी घेऊन जाणे. यालाच ‘यज्ञोपवीत संस्कार’म्हणतात किंवा ‘व्रतबंध’सुद्धा म्हणतात. मौंजीमेखला धारण करत असल्याने या संस्काराला ‘मुंज’ किंवा ‘मौंजीबंधन’पण म्हटले जाते. या संस्कारात बटूच्या गळ्यात यज्ञोपवीत बांधले जाते, हा शब्द ‘यज्ञ’ आणि ‘उपवीत’ पासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ आहे - ’यज्ञाने पवित्र केलेले सूत्र’. त्यालाच ‘ब्रह्मसूत्र’, ‘सवितासूत्र’ तथा ‘यज्ञसूत्र’पण म्हणतात. आणि महत्त्वाचे म्हणजे, बालकाला गायत्री मंत्राचा उपदेश केला जातो.
ज्या गुरुकुलात हा बटू जाणार आहे, त्या गुरुकुलातील आठ विद्यार्थ्यांना मुंजीसाठी बोलावले जाते. म्हणजे नवीन ठिकाणी जाण्याच्या आधी मुलाची ओळख तेथील काही विद्यार्थ्यांशी आधीच झाली असते. ते आठ बटूसुद्धा आता ह्या नवीन विद्यार्थ्यांचे mentor होतात. मुंज म्हणजे थोडक्यात admission process आहे.
मुलाला गुरूंच्याकडे नेले जाते. ते त्याचे मुखावलोकन करून त्याचा हात हातात घेऊन विचारतात, तू कुणाचा शिष्य आहेस? बटू सांगतो, मी तुमचा शिष्य आहे! त्यावर गुरु सांगतात, नाही, तू इंद्र आणि अग्नीचा शिष्य आहेस! इथे लक्षात घेतले पाहिजे की, गुरू सुद्धा स्वत:ला कोणत्याही विद्येचा originator समजत नाहीत. ते सगळे श्रेय मूळ गुरूंना अर्पण करतात.
त्यावर, बटूला गायत्री मंत्राची दीक्षा दिली जाते. गायत्री छंदात असलेला हा खरे तर सावित्री मंत्र आहे. या मध्ये सूर्याला केलेली प्रार्थना अशी आहे - ‘तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो नः प्रचोदयात’- अर्थात सूर्याच्या प्रकाशाने सर्व जग दिसते, तसे बुद्धीच्या प्रकाशात सर्व काही समजते. म्हणून, हे सूर्यदेवा! तू माझ्या बुद्धीला चेतव, तुझ्यासारखी माझी बुद्धी तेजस्वी कर, प्रखर कर, म्हणजे मला विद्या प्राप्त होईल. या पुढे अनेक वर्षे हा बालक अभ्यास करणार आहे. या पूर्ण काळात त्याला उत्तेजन मिळो, अभ्यास करायची शक्ति मिळो! म्हणून ही सूर्याची प्रार्थना. ही प्रार्थना आता बटूने ती रोज करायची आहे.
त्याबरोबरच मुलाने व्रत घ्यायचे आहे ते ब्रह्मचर्याचे, अर्थात -
सर्व इंद्रियांच्या इच्छांवर ताबा मिळवणे,
अति न खाणे, अति न पिणे
अति पिक्चर न पाहणे, बिंज watching न करणे,
कोणत्याही व्यसनापासून दूर राहणे
मऊ मऊ गादीवर न झोपणे
जमिनीवर सतरंजी घालून झोपणे
Branded कपडे, घड्याळे, बूट, दागिने वगैरे न घालणे
साधे कपडे घालणे
लवकर झोपून, लवकर उठणे
शरीराची आणि मनाची स्वच्छता ठेवणे
रोज व्यायाम करणे
गुरूंच्या घरातील कामे करणे
एकाग्रचित्ताने अभ्यास करणे
अशा नियमांनी बांधून घेतल्याने हा व्रतबंध संस्कार होतो. हे नियम पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोड द्यावी लागते. सारांश, ब्रह्मचारी म्हणून स्वतःच्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला जाणीवपूर्वक वळण लावावे लागते.
या नंतर बटू अग्नीला आणि गुरूंना नमस्कार करतो. वडीलधार्यांना नमस्कार करतो. त्यावर बटू नवीन पीत वस्त्र नेसून, गळ्यात झोळी घेऊन हातात दंड घेतो. पहिली भिक्षा तो आपल्या आईकडून मागतो -‘भवति भिक्षां देहि’. त्यावर हा ब्रह्मचारी ’स्वस्ति’ असे म्हणून भिक्षा ग्रहण करतो आणि आपल्या आचार्यांना देतो. या पुढे त्याने भिक्षा मागून उदरनिर्वाह करायचं आहे. शिक्षण मोफत आहे. पण मग खाण्याची व्यवस्था कोण करणार? तर पूर्ण गाव करणार. विद्यार्थ्याने रोज केवळ पाच घरी भिक्षा मागायची आहे. तसेच रोज वेगवेगळ्या घरी जाऊन भिक्षा मागायची आहे. अनेक वर्षे असे केल्याने, विद्यार्थ्यावर समाजाचे उपकार होतात आणि असा विद्यार्थी जेव्हा शिकून बाहेर पडतो, तेव्हा तो आपोआपच समाजासाठी जे हितकारक असेल त्या गोष्टी करतो.
या विद्यार्थ्याच्या हातात दंड दिल जातो तो - स्वसंरक्षणासाठी, चालताना आधार म्हणून आणि वेदांचे रक्षण करण्यासाठी. मुलाने उगीचच बावळट, नेभळट, भित्रट होऊ नये, तेजस्वी, कर्तबगार, आत्मनिर्भर आणि बलवान व्हावे हे तो दंड शिकवतो. त्याचा जो विद्यार्जनाचा प्रवास सुरू झाला आहे, त्या प्रवासात त्याला हा दंड साथ देणार आहे.
मुलींना शिक्षासाठी दोन मार्ग उपलब्ध होते - वैदिक शिक्षण घेऊन - ब्रह्मचारिणी होणे किंवा घर-संसार चालवण्याचे शिक्षण घेऊन - सदयोवधू होणे. दोन्ही प्रकारच्या मुलींना प्राथमिक शिक्षण दिले जात असे.
आता शिकल्याने मुलाचा दुसरा जन्म झाल्यासारखे होते. म्हणून उपनयन झालेल्या व्यक्तीला ‘द्विज’ ही संज्ञा आहे. पूर्वी उपनयनाचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णांना होता. या तीन वर्णांना द्विज म्हटले गेले. वैदिक शिक्षणाचा अधिकार एखाद्या वर्णाला नसणे हे निश्चितच अन्यायकारक होते. मात्र तो काळ वेगळा होता, जेव्हा असामान्य विद्यार्थ्याला वेदाध्ययन करता येत असे. मात्र सामान्य मुलाने, आपल्या कुटुंबात चालू असलेल्या व्यवसायाचे शिक्षण घेऊन तो व्यवसाय पुढे चालवावा असे मानले जात असे. आता अर्थातच काळ बदलला आहे. जो कोणी 12 वर्षे कठोर व्रत पालन करून वेदाध्ययन करू इच्छितो त्याला हे द्वार खुले असावे, ही गोष्ट समाज स्वीकारत आहे.
पुढील काळात विविध शाखांच्या शिक्षणासाठी विविध व्रतबंध संस्कार केले जाऊ लागले. जे चारही वर्णाच्या मुलांना उपलब्ध होते. जसे - धनुर्वेद, आयुर्वेद, शिल्पी, शल्यचिकित्सा आदि शाखांचे वेगवेगळे उपनयन संस्कार आणि वेगवेगळे स्नातक संस्कार आणि वेगवेगळ्या शपथा होत्या.
सर्व संस्कारांत हा उपनयन संस्कार मुख्य मानाला गेला आहे. ज्याचे उपनयन झाले नाही, त्याला शिक्षण मिळत नाही, त्याला देवकार्य आणि पितृकार्य करायचा अधिकार मिळत नाही, श्रौत-स्मार्त-कर्मांचा तसेच विवाह, संध्या, तर्पण आदि कर्मांचा अधिकार मिळत नाही. अशा संस्कारहीन लोकांना ‘व्रात्य’ म्हटले गेले. अशांसाठी ’व्रात्यस्तोम’ प्रायश्चित्त घेऊन उपनयनसंस्कार करण्याची पद्धत होती. अगदी तिसाव्या वर्षी सुद्धा हा संस्कार करता येतो. स्वामी श्रद्धानंदांनी व्रात्य संस्कारासारखा संस्कार करून ज्यांचे धर्मांतर झाले होते, त्यांना पुन्हा हिंदू करून घेण्यास सुरुवात केली होती.
शिक्षण पूर्ण झाल्यावर एक संस्कार केला जातो - तो म्हणजे स्नातक संस्कार. आजच्या भाषेत ज्याला convocation! म्हणू शकतो. गुरू आपल्या विद्यार्थ्याला विद्वानांच्या सभेमध्ये सादर करून सांगतात की, हा आता पूर्ण शिक्षित झाला आहे. हे विद्वान नवीन मुलाला पारखून आपली अनुमती देतात. मुलाची हत्तीवरून वरात काढली जाते! ही पद्धत आजही गायन, वादन आणि नृत्य घराण्यांमध्ये चालू आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरू मुलाला तैत्तरीय उपनिषदामधील उपदेश देतात -
सत्यं वद धर्मं चर । मातृ देवो भव ।
पितृ देवो भव । आचार्य देवो भव ।
सत्याने वाग आणि धर्माचे पालन कर. इथे जे शिकला आहेस (वेद) त्याचा नित्य अभ्यास कर. माता देव आहे - देवासमान नाही, तर देवच आहे. पिता देव आहेत आणि आचार्य देव आहेत. एकदा का मूल शाळेत गेले की ते गुरुच्या घरचे झाले. घरी कामे करतो तशी तिथे कामे करायची. आई-वडिलांची आज्ञापालन करतो तसे गुरूंच्या आज्ञेचे पालन करायचे. आई-वडील जशी मुलाची काळजी घेतात तशी काळजी गुरू आणि गुरुपत्नी घेतात. म्हणून, माता- पित्याप्रमाणे साहजिकच ते सुद्धा देव आहेत.
आजही स्टाफ रूममध्ये शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या बद्दल आपसात बोलणे ऐकले तर असेच असते - माझी मुले!,my children!, मेरे बच्चे! कितीही मोठे असले, कॉलेजमधले असले तरीही असेच बोलले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रति मातृवत/पितृवत भाव असतो. खरोखर आपल्या शिक्षण संस्थेमधील वातावरण पूर्वीसारखे प्रेमाचे आणि आदराचे राहिले नसले आणि मुले जरी शिक्षकांना मान देत नसले, एकेरी संबोधन करत असले तरी सुद्धा बहुतांश शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक विद्यार्थ्यांना आपली ‘मुले’च समजतात. म्हणून शाळेत जाण्याच्या आधीपासून मुलांवर - मातृ देवो भव । पितृ देवो भव । आचार्य देवो भव । हा संस्कार घरातून होणे आवश्यक आहे.
या नंतर विविध शाखांमध्ये वेगवेगळ्या शपथा दिल्या जातात. उदाहरण म्हणून इथे चरक संहितेत शिकून बाहेर जाणार्या विद्यार्थ्याला / वैद्याला दिलेला उपदेश पाहू -
*(शिक्षण मोफत झाले होते म्हणून) यापुढे विद्यार्थ्याने गुरुदक्षिणा देण्याचा मनापासून प्रयत्न करावा.
*सर्व सजीवांच्या कल्याणासाठी कार्य करावे.
*दररोज मनापासून रुग्णांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करावेत.
*स्वतःचा जीव धोक्यात असला तरी रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये.
*पती/पालकांची उपस्थिती नसल्यास स्त्रियांवर उपचार करू नयेत. तसेच स्त्रियांकडून शुल्क घेऊ नये.
*पाप करणार्याला मदत करू नये.
*रुग्णाच्या मृत्यूची शक्यता असल्यास ती माहिती धक्का बसेल अशा वेळी सांगू नये.
*बरे न होणार्या किंवा मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णांना औषध देऊ नये.
*रुग्ण व कुटुंबाची माहिती पूर्णतः गोपनीय ठेवावी.
*इतरांच्या संपत्ती किंवा पत्नीविषयी वाईट विचार करू नयेत.
*पोशाख साधा, सभ्य असावा आणि भपकेबाज न वाटणारा असावा
*त्याने मद्यपान करू नये.
*बोलणे सौम्य, सत्य, सभ्य आणि मुद्देसूद असावे.
*आपल्या ज्ञानाची अवास्तव स्तुती करू नये. कारण कुणालाही संपूर्ण वैद्यकीय ज्ञान मिळू शकत नाही. इतरांकडे सुद्धा उत्तम वैद्यकीय ज्ञान असू शकते.
*अहंकार टाळून सतत नवीन शिकत राहावे.
*ज्ञान व वैद्यकीय साधने सतत वाढवत राहावीत.
*शत्रूकडून मिळालेलं उपयुक्त ज्ञानही स्वीकारावे.
चार वेद, चार उपवेद, सहा वेदांगे, दहा ग्रंथ, चौदा विद्या, अठरा शिल्पविद्या आणि चौसष्ट कला - इतके विशाल आणि बहुआयामी ज्ञान टिकवून ठेवणे, त्याला योग्य रीतीने कंठस्थ करणे (साठवणे /storage) त्याचा अभ्यास व उपयोग करणे, त्यात भर घालत राहणे, आणि ते ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत अखंड पोहोचवणे- हे केवळ ग्रंथांवर अवलंबून नव्हते. तर एक मौखिक परंपरेवर अवलंबून होती. या ज्ञानपरंपरेची जबाबदारी मुख्यतः दोन अत्यंत महत्त्वाच्या संस्कारांवर सोपवली गेली होती -उपनयन आणि समावर्तन.
संदर्भ -
1. Education In Ancient India by ltekar, A. S.; published 1944; Publisher: Nand Kishore and Bros.