वचननामा म्हणजे फक्त औपचारिकता होती. त्यात कोणतेही व्हिजन नव्हते. आजपर्यंत मुंबई पालिका म्हणजे आपले संस्थान असल्यासारखा कारभार केलेल्या उबाठा प्रमुखांना माहीत आहे की आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याशिवाय मुंबईचा विकास करू शकत नाही. पण तरीसुद्धा ’आम्ही हे करू, ते करू’ अशी आरोळी आता मीडियाच्या मदतीने ठोकली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा त्यात रंग भरू लागला आहे. सध्यातरी उमेदवारांचे प्रचार सुरू आहेत. भाजपाने छोट्या छोट्या जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ वाढवला आहे, तर मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या उबाठा आणि मनसे यांना अजूनही प्रचारात सूर गवसलेला दिसत नाही. पण दोन दिवसांपूर्वी दोन भावांनी पत्रकार परिषद घेऊन वचननामा जाहीर करून महानगरपालिकेत सत्ता आल्यास मुंबईकरांसाठी काय करू, याची मांडणी केली. दोन्ही ठाकरे पहिल्यांदाच वेगळे वेगळे पक्ष म्हणून निवडणुकांना एकत्र समोरे जात असल्याने नव्याची नवलाई मीडियालाही अधिकच आहे. काल शिवसेना भवनात राज ठाकरे 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच पोहोचल्याने समस्त मराठी चॅनल्सच्या पत्रकारांसाठी ऐतिहासिक दिन होता. त्यामुळे त्यांनी बातम्या चालवून राज ठाकरे यांना वारेमाप प्रसिद्धी दिली. पत्रकार परिषदेत ’वचननामा’ या गोंडस नावाखाली उद्धव ठाकरे यांचे टोमणे आणि अपमानास्पद शब्दांची बरसातच जास्त ऐकायला मिळाली. आपला वचननामा किती अभ्यासपूर्ण आहे, आपण काय काय करणार आहोत ते मुद्देसूद सांगण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती वाईट आहेत हे आपल्या शेलक्या भाषेतून सांगण्यावरच त्यांनी जास्त भर दिला. त्यामुळे त्या वचननामाच्या बातम्या होण्याऐवजी उद्धव ठाकरे यांच्या टोमण्यांच्या आणि उपरोधात्मक टीकेच्याच बातम्या झाल्या.
वचननामा काय आहे..
नागरी सुविधा, मुबलक आणि स्वच्छ पाणी, खड्डेमुक्त रस्ते, मोकळी मैदाने, नाट्यगृहे, नवी वैद्यकीय महाविद्यालये, पूरमुक्त मुंबई, भूमिपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण, महिलांचे व बेरोजगारांचे स्वावलंबन आणि मुंबईच्या विकासाचा रोड मॅप शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी युतीच्या जाहीरनाम्यातून जाहीर करण्यात आला. सर्वसामान्य नागरिक, युवक, गरजू, बेरोजगार, महिला आणि सर्व गटांतील मुंबईकरांना डोळ्यांसमोर ठेवून हा वचननामा जाहीर करण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी ’शिवशक्तीचा वचननामा’ अशी सुंदर टॅगलाइन करण्यात आली. यावर शिवसनेनेच्या राहुल शेवाळे यांनी हा 2017चाच वचननामा आहे, त्यालाच पुन्हा सादर केला आशी पोल खोल केली.. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा वचननामा नसून तो ‘वाचननामा’ आहे अशी टीका केली.
वचननाम्यात ‘राज’ नव्हते का?
वचननामा बनवताना राज ठाकरे यांना सोबत घेतले होते की नाही? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. कारण राज ठाकरे शहरीकरण, शहरांचे सौंदर्य, नियोजन याबाबत आपणच जाणकार असल्याचा दावा सातत्याने करत आले आहेत. पण या संयुक्त वचननाम्यात शहरी नियोजनाबाबत ठोस, नोंद घेता येईल असा एकही मुद्दा दिसला नाही.
यांचे एक मुंबईबाबत एक व्हिजन आहे. 2014च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी आपली विकासाची ब्लू प्रिंट मांडली होती. या ब्लू प्रिंटची चर्चा जरी झाली नसली, तरी त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने ती मांडली होती, असे अनेक जाणकरांचे मत होते. पण वचननाम्यात कुठे अशी व्हिजन दिसली नाही. त्यामुळे ही फक्त उबाठाने बनवून राज ठाकरे यांना फक्त मम म्हणण्यास भाग पाडले, अशी चर्चा रंगू लागली आहे.
टोमण्यांचा वाचननामा
उद्धव ठाकरे यांनी या वेळी केंद्र सरकारवर आणि भाजपावर अनाठायी टीका केली. आमच्या कामाचे श्रेय घेण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी कैलास पर्वत बांधला आणि गंगा नदी आणली, याचे श्रेयही भाजपानेच घ्यावे असा उपहासात्मक टोमणा त्यांनी मारला. या वचननाम्यात महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्राबाहेरील अनेक घोषणा करण्यात आल्याचे दिसते. यातील काही विषय हे केंद्र, तसेच राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात - म्हणजेच पुन्हा ही आश्वासने केंद्र आणि राज्य सरकारमुळे पूर्ण करता आली नाहीत, असा कांगावा करायला हे दोन्ही ठाकरे मोकळे. बाकी 2017 साली ’करून दाखवलं’ या शीर्षकाखाली त्यांनी जे केले, तेच पुन्हा सांगितले. यात वेगळे काही नव्हते, असेच दिसून आले.
या वचननाम्यात ‘शब्द ठाकरें‘ असा शब्द प्रयोग करण्यात आला आहे.. तरी त्या शब्दांमध्ये मुंबईकरांचा आवाज कुठेच नव्हता. मराठी, मराठीचा जप करत असले, तरी वचननाम्यात ‘मुंबईकर ‘ शब्द प्रयोग करून सर्वांच साद घातली आहे, असे दिसते.
त्याअगोदर ठाकरे घरातील दोन पुत्रांनी आपली व्हिजन मांडली. खरे तर प्रश्न पडतो.. उद्धव ठाकरे व राज ठाकरे वचननामा जाहीर करणार होते, तर आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांच्या व्हिजनची काय आवश्यकता होती? त्यांचे व्हिजन कॉलेजच्या प्रोजेक्ट सादरीकरणासारखे वाटत होते. ठाकरे म्हणजे ठाकरी शैलीतील दमदार भाषण.. पण बाळासाहेबांच्या नातवांची अवस्था म्हणजे एकाच्या कंठातून आवज येत नव्हता, तर दुसर्याला शब्द सुचत नव्हते. त्यामुळे ते सादरीकरण म्हणजे दोघांचा एक सरावच होता, पोरखेळ होता असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही.
एकंदरीत काय, वचननामा म्हणजे फक्त औपचारिकता होती. त्यात कोणतेही व्हिजन नव्हते. आजपर्यंत मुंबई पालिका म्हणजे आपले संस्थान असल्यासारखा कारभार केलेल्या उबाठा प्रमुखांना माहीत आहे की आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याशिवाय मुंबईचा विकास करू शकत नाही. पण तरीसुद्धा ’आम्ही हे करू, ते करू’ अशी आरोळी आता मीडियाच्या मदतीने मारली आहे. घोडामैदान जवळच आहे, त्यामुळे पुढील भाष्य 16 तारखेनंतर केलेले बरे..