@श्रीराम नानल
9423034050
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद सातार्याने भूषवले आणि सातारा नगरी खर्या अर्थाने साहित्याची राजधानी बनली. संमेलनाने वाचन संस्कृतीला नवी ऊर्जा आणि समाजमनाला वैचारिक दिशा दिली. म्हणूनच सातार्यातील हे साहित्यपर्व मराठी भाषेच्या उज्ज्वल भवितव्याचा घोष ठरले.
सातार्याच्या मातीत ऐतिहासिक पराक्रमाच्या कथा जशा रुजल्या आहेत, तसेच येथील वैचारिक अधिष्ठानही तितकेच प्रगल्भ आहे. 1993च्या स्मृतींना उजाळा देत सातार्याने 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषवले आणि सातारा नगरी खर्या अर्थाने साहित्याची राजधानी बनली. 50 देखण्या चित्ररथांतून निघालेली ग्रंथदिंडी म्हणजे मराठी संस्कृतीचे वैभवशाली दर्शनच होते. दुतर्फा उभ्या सातारकरांनी मराठी ग्रंथांवर जे प्रेम उधळले, त्यातून मराठी अस्मितेचा चालता-बोलता उत्सवच सातार्यात अवतरला.
व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष म्हणून ख्यातनाम लेखक विश्वास पाटील विराजमान होते. त्यांनी आपल्या भाषणात झेंडा कोणाचाही घ्या, पण दांडा मराठीचा हवा असे ठामपणे सांगून मराठीच्या अस्मितेला नव्याने अधोरेखित केले. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांची उपस्थिती आणि त्यांचे मौलिक मार्गदर्शन या सोहळ्याचे वैचारिक तेज वाढवणारे ठरले. स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी छत्रपती शाहू महाराजांविषयी खंडात्मक ग्रंथ निर्माण व्हावा, अशी महत्त्वपूर्ण अपेक्षा व्यक्त केली. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या स्पष्ट आणि विचारप्रवर्तक प्रास्ताविकाने रसिकांची मने जिंकली, तर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या कल्पक नियोजनामुळे हे संपूर्ण ’शिवधनुष्य’ यशस्वीपणे पेलले गेले.
या संमेलनाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते येथील वैविध्यपूर्ण परिसंवाद. मराठी संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच ’भयकथा’ या विषयावर सखोल चर्चा झाली, ज्याने साहित्याची एक नवी दिशा रसिकांसमोर ठेवली. बालवाचक संवाद कार्यक्रमात राजीव तांबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या आकलनक्षमतेवर भाष्य केले, तर मृदुला गर्ग यांनी ’दलित साहित्य’ हा भारतीय साहित्याचा आधारस्तंभ असल्याचे ठामपणे मांडले. ज्येष्ठ साहित्यिक राजा दीक्षित यांनी ’कोशांचे महत्त्व’ विशद करताना ते केवळ माहितीचा साठा नसून क्रांतीला चालना देणारे साधन असल्याचे सांगितले. ’लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांची मुलाखत हा बौद्धिक संवादाचा सुवर्णक्षण ठरला, ज्याने साहित्य, समाज आणि लोकशाही यांमधील अनुबंधावर प्रकाश टाकला.
केवळ चर्चाच नव्हे, तर लोककलेचा जागरही तितकाच प्रभावी होता. भावार्थ देखणे यांनी सादर केलेल्या बहुरूपी भारुडाने संतांच्या परंपरेचे दर्शन घडवले, तर रात्री रंगलेल्या ’फोक आख्यान’ कार्यक्रमाने लोककलेचा वेगळा आयाम रसिकांसमोर मांडला. प्रकाशनाच्या कट्ट्यावर सुमारे 130 पुस्तकांचा झालेला जन्म आणि कविकट्ट्यावर 400 नवोदित कवींनी मांडलेली संवेदना मराठी साहित्याच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देत होती.
या सोहळ्याचे मर्म सातारकरांनी जपलेल्या ’अतिथी देवो भव’ या परंपरेत दडलेले होते. विनोद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि श्रीराम नानल यांच्या समन्वयातून साकारलेली ’विनामूल्य निवास योजना’ माणुसकीची साक्ष देणारी ठरली. 40 हून अधिक कुटुंबांनी आपली घरे पाहुण्यांसाठी खुली केली. संमेलनाला सुमारे आठ लाख रसिकांनी दिलेली हजेरी आणि झालेली पुस्तकांची विक्रमी विक्री हीच खर्या अर्थाने वाचन संस्कृतीला मिळालेली नवी उभारी आहे. सातार्याचे हे संमेलन केवळ साहित्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो मराठी भाषेच्या जिवंतपणाचा आणि वैचारिक समृद्धीचा एक उत्कट हुंकार होता.
या संमेलनातील वातावरण निर्मितीमुळे सुबुद्ध समाज मन तयार होण्यास मदत झाली. तसेच वाचन संस्कृतीचा विस्तार अधिक समर्थपणे होईल अशी आशा निर्माण झाली.
मराठी माणसाचे मराठी नाटके, मराठी लोककला, मराठी हास्य जत्रा यावरचे प्रेम अबाधित आहे ही खात्री पटली. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे संमेलन यशस्वी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीने संमेलनाला राजाश्रय मिळाला पण कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप येथे दिसून आला नाही. सर्वजण साहित्यरसातच रंगून गेले होते.
या संमेलनातून साताराच्या अर्थव्यवस्थेला ही चालना आणि उभारी मिळाली. सातार्यातील 99 वे साहित्य संमेलन म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर मराठी भाषेच्या सामूहिक आत्मविश्वासाचे दर्शन होते. विचार, संवेदना आणि सर्जनशीलतेचा मुक्त संवाद येथे अखंडपणे घडत राहिला. परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम या संमेलनाने अनुभवायला दिला. ग्रंथदिंडीपासून परिसंवादांपर्यंत मराठी मनाची व्यापकता अधोरेखित झाली. नवोदित लेखक-कवींना मिळालेले व्यासपीठ भविष्याचा आशावाद जागवणारे ठरले.
लोककला, नाट्य, कथा, कविता यांमुळे मराठी संस्कृतीची मुळे अधिक घट्ट झाली. सातारकरांच्या अतिथिसत्काराने माणुसकीचा उजवा ठसा उमटवला. राजकीय अलिप्ततेच्या ग्वाहीमुळे साहित्याची स्वायत्तता अधोरेखित झाली. या संमेलनाने वाचन संस्कृतीला नवी ऊर्जा आणि समाजमनाला वैचारिक दिशा दिली. म्हणूनच सातार्यातील हे साहित्यपर्व मराठी भाषेच्या उज्ज्वल भवितव्याचा घोष ठरले.