बंधुता परिषदेतील विचारमंथन

विवेक मराठी    09-Jan-2026
Total Views |
 
ambatkar
 
कराड : 2 जानेवारी 1940 रोजी भारतरत्न पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेस भेट दिली होती. मागील काही वर्षांत संघस्वयंसेवक व संशोधकांच्या अथक प्रयत्नांमधून केसरी या दैनिकातील पुरावा सर्वांसमोर उपलब्ध झाला... तसेच पू. डॉ. आंबेडकरांच्या जनता या पत्रिकेतील पुरावा मागील वर्षात विवेक विचार मंचच्या कार्यकर्त्यांच्या संशोधनातून पुढे आल्यामुळे या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या सर्वांना सप्रमाण उत्तर देखील मिळाले आहे.


संघशाखेस दिलेल्या या ऐतिहासिक भेटीचे स्मरण करून पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एकात्मतेचा संदेश समाजात रुजावा यासाठी त्याच भवानी संघस्थानावर मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी ’बंधुता परिषद 2026’ या वैचारिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन लोककल्याण मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले.

यंदाचा कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पुण्यश्लोक छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे थेट वंशज आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री श्रीमंत छत्रपती मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून भारत सरकारच्या अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना उपस्थित होते. तसेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, दलित महासंघाचे अध्यक्ष आणि विचारवंत प्रा. मच्छिंद्र सकटे यांचीही विशेष उपस्थिती यावेळी मंचावर होती.

कोणत्याही महापुरुषांची जातींच्या आधारावरती विभागणी होणे हे समाजाच्या आरोग्यासाठी योग्य नाही. सर्व महापुरुष हे संपूर्ण समाजाचे आहेत. त्यामुळे जातीयता दूर होऊन बंधुता प्रस्थापित करण्यासाठी या बंधुता परिषदेचा नक्की उपयोग होईल, असा विश्वास छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. तसेच व्यापक हिंदुत्वाच्या माध्यमातून शोषणमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा छत्रपती शिवरायांच्या मार्गावर अखंड कार्यरत आहे. या उद्देशाने कार्यरत असलेल्या रा. स्व. संघाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा विरोध केलेला नाही, असे ठोस प्रतिपादन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केले.
 

ambatkar 
राष्ट्रहित सर्वतोपरी असे सांगणार्‍या डॉ. आंबेडकरांनी भारतातील सर्वच जाती मिटवून हिंदू एक व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. रा. स्व. संघ स्थापनेपासूनच समरस हिंदू समाजासाठी कार्यरत आहे. प्रत्यक्ष व्यवहारातून, कृतीमधून संघस्वयंसेवक समाजात परिवर्तन करतात. संघसंस्कारातून एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या वैचारिकतेमध्ये होणारा हा कृतिशील बदल मी स्वतः अनुभवला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनी केले.

डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी आपल्या भाषणातून, देशाच्या स्वातंत्र्यानंतर डाव्या विचारांच्या तथाकथित विचारवंतांनी दलित व उपेक्षित समाजामध्ये संघाविषयी जाणीवपूर्वक गैरसमज कसे पसरवले, त्यावर परखड भाष्य केले. अभिव्यक्ती व विचारस्वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍या तथाकथित विद्वानांनी संघाच्या व्यासपीठावर जाण्यावर अनेकांना बंदी घातली होती. त्यामुळे या वैचारिक बुद्धिभेदाबाबत दलित समाजातील विचारवंतांनी जागृत होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एकात्म मानवतावादाच्या विचारधारेचा स्वीकार सर्वांनी मोकळ्या मनाने करावा, असे आवाहन मिलिंद कांबळे यांनी केले.

दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी सातार्‍यामध्ये संपन्न होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामधून पू. डॉ. बाबासाहेबांच्या ’जनता’ या पत्रिकेची संकलित प्रत सोबत आणली होती. आपल्या संबोधनामध्ये त्यांनी या जनता पत्रिकेमधील डॉक्टर बाबासाहेबांनी कराडच्या संघस्थानाला दिलेल्या भेटीचा पुरावा सर्वांसमोर मांडला. जर डॉ. आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली असेल, तर मीही त्यांच्या वाटेने का जाऊ नये? समतेच्या चळवळीत आम्ही काम करतो. आम्हाला समतेबरोबरच स्वातंत्र्य, लोकशाहीबरोबरच बंधुताही हवी आहे. संघ जर मोठ्या मनाने बंधुतेचा विचार घेऊन पुढे जात असेल तर मी त्यासोबत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. सकटे यांनी केले.
 
 
या दुसर्‍या बंधुता परिषदेच्या निमित्ताने एक गाव - एक मंदिर, एक पाणवठा, एक स्मशान याविषयीचा एक ठराव देखील मांडण्यात आला. महाराष्ट्रात अंत्यविधी करताना आजही काही ठिकाणी जातीवादातून अनुचित प्रकार घडतात, जे बंधुतेला मारक ठरतात. हिंदू समाजातील सर्व घटकांसाठी खुली असणारी सोयीयुक्त स्मशानभूमी तयार केली जावी, जेणेकरून कोणाच्याही मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये, तसेच जातीवाद करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, असा ठराव परिषदेत आयोजन समितीचे प्रतिनिधी निलेश अलाटे यांनी मांडला. सर्वांनी एकमताने या ठरावास मान्यता दिली.

या बंधुता परिषदेचे प्रास्ताविक लोककल्याण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विजयराव जोशी यांनी केले. यामध्ये त्यांनी या परिषदेच्या आयोजनामागील आपली भूमिका उपस्थितांपुढे थोडक्यात विशद केली. कराड जिल्ह्याचे मा. संघचालक डॉ. मकरंद बर्वे यांनी आभारप्रदर्शन केले तर सूत्रसंचालन जिल्हा कार्यवाह वैभव डुबल यांनी केले. वंदे मातरम् या स्फूर्तिगीताच्या 150 व्या वर्षानिमित्त चैतन्य गायन समूहाद्वारे संपूर्ण वंदे मातरम् गीत सादर होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.
 
कराड व परिसरामधील विविध सामाजिक, धार्मिक, सेवाभावी, शैक्षणिक संस्था संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी, विवेक विचार मंचाचे प्रमुख कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि कराड व पंचक्रोशीमधील नागरिक बंधुभगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

 
एकूणच समाजामध्ये वैचारिक मंथन करून वेगवेगळ्या विचारधारांच्या कार्यकर्त्यांमध्ये आश्वासक संवाद सुरू होण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बंधुता परिषदेस समाजातील विविध मान्यवरांचा व नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला!
 
- वैद्य मिहीर वाचासुंदर