आद्य शंकराचार्यांची जिव्हाप्रार्थना

विवेक मराठी    10-Oct-2026
Total Views |
@स्नेहा शिनखेडे

नवरात्रात देवीच्या विविध रूपांची आराधना केली जातेे. देवी स्वरस्वती ही वाग्देवता म्हणजे वाणीची देवता म्हणून ओळखली जाते. व्यक्तीची खरी शक्ती ही त्याच्या वैखरी-स्पष्ट वाणीत आणि जिभेत दडलेली असते. शब्दांमध्ये समाजात स्थान मिळवून देण्याचे किंवा ते गमावण्याचे अफाट सामर्थ्य दडलेले असते. आद्य शंकराचार्यांनी शतकांपूर्वी रचलेल्या ‘जिव्हाप्रार्थने’त मानवी शरीरातील या अत्यंत संवेदनशील अवयवाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जेव्हा जीभ स्वादाची ओळख आणि वाणीचा संयम गमावते, तेव्हा होणारे परिणाम रोखण्याचा संदेश ‘जिव्हाप्रार्थना’ या रचनेतून दिलेला असून तो कालातीत आहे.
 
adi-shankaracharyas 
भारत देशाचे प्रधान वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संस्कृती. तिला जगामध्ये तोड नाही. जगात अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि अस्तास गेल्या. भारतीय संस्कृती वर्धिष्णू होत चिरंतन राहण्याचे एक कारण म्हणजे आद्य शंकराचार्यांचे ज्ञानसूर्यासारखे तेजस्वी कार्य हे आहे. भारतात जेव्हा शिवउपासक आणि विष्णूउपासक यांच्यामध्ये तेढ निर्माण झाली, तेव्हा त्या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली. ते दोघेही एकमेकांचा राग करीत असत. त्यामुळे धर्माचरण लोप पावत चालले. अशा काळात आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या अवतारकार्याला आरंभ केला. भारतभर संचार करून पंचायतन पूजा त्यांनी अस्तित्वात आणली. गणपती, शिव, विष्णू, सूर्य आणि देवी या देवतांची उपासना एकाच परमेश्वराला पोचते याचे प्रतिपादन करून त्यांनी समाजामधला संभ्रम दूर केला. कोणत्याही सण, उत्सवात सांगता होते ती आरतीने. आरतीच्या अखेरीस आचार्यांच्या स्तोत्रातल्या ओळी भारतीय लोक मोठ्या उत्साहाने म्हणतात. त्या म्हणजे,
 
अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि,
 
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्रं भजे॥
 
आद्य शंकराचार्यांनी अनेक शक्तिस्तोत्रे रचली. त्यात एक अपूर्व, दुर्मीळ अशी त्यांची रचना आहे. ती म्हणजे ’जिव्हाप्रार्थना.’ केवळ चार श्लोकांची ही प्रार्थना रोज म्हणावी आणि आचरणात आणावी अशीच आहे. आद्य शंकराचार्यांनी अनेक देवदेवतांवर स्तोत्रे रचली हे आपण जाणतोच. मनुष्यदेहामधल्या एका छोट्याशा इंद्रियावर आद्य शंकराचार्यांनी का बरे प्रकाशझोत टाकावा? मानवी शरीर हे अद्भुत आहे. परमात्म्याची ती अपूर्व निर्मिती आहे. माणसाच्या शरीरामध्ये एकूण बहात्तर हजार नाड्या आहेत. पायाच्या अंगठ्यापासून वर आलेल्या नाड्या आणि डोक्यापासून खाली गेलेल्या नाड्या यांची एक गाठ शरीरात जिथे मारली जाते ती म्हणजे नाभी. या नाभीपासून निघणारी एक नाडी सरळ माणसाच्या जिभेच्या अग्रभागी स्थिरावते. तिला ’सरस्वती’ ही संज्ञा आहे. ही दोन अंगुली जीभ माणसाच्या संपूर्ण जीवनाचे मर्म सांगते, साठवते आणि प्रसारितही करते. जीभ हे साक्षात सरस्वती मातेचे वाहन आहे. जिभेवरती सरस्वती वास करते असे व्यवहारात म्हटले जाते. जीभ शक्तिस्वरूप आहे. असे म्हणतात की, जिभेला हाड नसते; परंतु ती अनेकांची हाडे मोडून टाकू शकते.
 
एक दोहा असा आहे,
’दंत कहे जीभ को, हम बत्तीस तू अकेली’
तेव्हा जीभ म्हणते,
’एक बार तेढी चलू तो बत्तीसही गिर जाय.’
 
जिभेशिवाय वैखरी वाणी संभवत नाही. जिभेची दोन कामे आहेत. बोलणे आणि खाणे. देवाने माणसाला अनेक अवयव दोन दोन दिले. उदाहरणार्थ डोळे, कान, हात, पाय; परंतु जिला महत्त्वाची दोन कामे आहेत, ती जीभ मात्र एकुलती एक आहे. कारण तिचे कार्य अफाट आहे. जीवनाचा सगळा आलेख तिच्यावरच अवलंबून आहे. तिच्यावरून माणसाचा स्वभाव निश्चित होतो. जीभ माणसाला समृद्धीच्या शिखरावर नेते किंवा त्याची अधोगती करते.
 
 
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, “शारदा म्हणजे मूळ माया होय. विश्वाचा कारभार बिनबोभाट चालवणारी शारदाच माणसाच्या शरीरात काम करते. गणेश व शारदा ही जोडी आहे. गणेश ही बुद्धीची देवता. त्यामुळे कलेचा अर्थ समजतो; परंतु तो उत्तमरीत्या प्रकट करण्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती पुरवणारी सरस्वती होय.”
 
 
आद्य शंकराचार्यांनी रचलेली जिव्हाप्रार्थना अतिशय सुंदर आहे. प्रार्थना ही जगातली सर्वात मोठी शक्ती आहे. माणसाच्या जीवनात अनुकूल परिवर्तन घडवत चिंतनप्रक्रियेत बदल घडवते ती प्रार्थना. तिचे पहिले कडवे असे आहे-
 
मत्प्रियसखि मज्जिव्हे मय्यनुकम्पां कुरुष्व नौमि त्वाम्।
अन्यापवादरहिता भज सततमों नम: शिवायेति॥1॥
 
 
आद्य शंकराचार्य म्हणतात,”हे जिव्हे, तू माझी अत्यंत प्रिय सखी आहेस.” ते तिला सखी म्हणतात. कारण ती जन्मापासून मरेपर्यंत माणसाच्या सोबत असते. शरीरातले सर्व अवयव वृद्ध होतात. जिभेला मात्र म्हातारपण नाही. ती चिरयौवना आहे. ते म्हणतात,“मी तुला नमस्कार करतो. तू माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक. तू कुणाचीही निंदा करू नकोस. दया या शब्दात याचना आहे. चुगलीचहाडी न करता ’ॐ नमः शिवाय’ हा गोड मधुर मंत्र तू म्हणत जा.”
जीभ हे नम्रतेचे प्रतीक आहे. बाळ जन्माला आल्यानंतर प्रथम जातकर्म संस्कार करतात तो जिभेवर. मध व तूप सहाणेवर सोन्याच्या अंगठीने उगाळून मंत्र म्हणून ते अर्भकाला चाटवतात. जिभेवर उभे आयुष्य अवलंबून असते ना! आचार्य म्हणतात, ”जिव्हे, तू स्वार्थासाठी कुणाचीही स्तुती करू नकोस. कुणाचे उणे काढू नकोस. सतत त्या निर्गुण, निराकार परमात्म्याचे स्मरण करत रहा.”
 
वाणीगुणानुनिलये त्वां वंदे मा कुरुष्व परनिंदाम्।
 
त्यज सकललोकवार्तां भज सततमों नमः शिवायेति॥2॥
 
आचार्य म्हणतात,”वाणीचे गुण तुझ्याठायी विराजमान आहेत. तू तर ओज, प्रसाद, माधुर्य, सत्यत्व या गुणांची खाण आहेस. त्या गुणांचे तू आश्रयस्थान आहेस. मी तुला नमस्कार करतो. लोक काय म्हणतात, काय बोलतात याकडे तू दुर्लक्ष कर. परनिंदेचा त्याग कर. लोकांचे अवगुण सांगण्यात आयुष्याचा महत्त्वाचा काळ तू वाया घालवू नकोस. त्यापेक्षा तू सदैव ’ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करीत जा.”
 
एक दृष्टांत असा आहे, सीतामातोश्रींच्या शोधासाठी जेव्हा हनुमंत लंकेत गेले, तेव्हा बिभीषणाच्या घरातून श्रीराम जयराम जयजयराम हा जप ऐकू आला. हनुमंताने बिभीषणाला विचारले की, ’रावणाच्या राज्यात आपण श्रीरामांचे भजन कसे काय करता?’ त्यावर बिभीषण म्हणाले,”बत्तीस दातांच्या पहार्‍यात जीभ जशी राहते तसा मी राहतो. दात दादागिरी करतात; पण जीभ दातांना मदत करते. दात हे अहंकाराचे प्रतीक, तर जीभ हे नम्रतेचे प्रतीक आहे.” हनुमंत म्हणाले,“आपण इथे जिभेचे राज्य आणणार आहोत.” याचा अर्थ,“श्रीरामनामाची सत्ता यापुढे येथे नांदेल.”
 
कट्वम्ललवणतिक्त्तस्वादुकषायादिसर्वरसवांच्छाम्
 
जिव्हे विहाय भक्त्या भज सततमों नम: शिवायेति॥3॥
 
तिसर्‍या श्लोकात आचार्य म्हणतात,”रसास्वाद हे तुझे वैशिष्ट्य असले तरी त्याच्या आहारी तू जाऊ नको. जिभेला चव हे वरदान आहे म्हणून ती जन्मभर हट्ट करते. प.प.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी ’श्रीदत्तमहात्म्य’ या ग्रंथामध्ये म्हणतात,”रस हा विषयच असा आहे की, आवडणार्‍या पदार्थांचे नुसते स्मरण जरी केले तरी तोंडाला पाणी सुटते.” पदार्थाचा नुसता वास आला तरी जिभेचे चोचले पुरवायला माणूस सज्ज होतो. शूर ,वीर, योद्धेसुद्धा रसनेपुढे हतबल होतात. नरश्रेष्ठांना ही दोन अंगुली जीभ आवरता येत नाही हे केवढे आश्चर्य? जीभ जिंकली की, सर्व विषयांना जिंकल्यासारखेच आहे. रस हा परमात्मदर्शनानंतरच सुटतो. आचार्य सांगतात की, ”रसने तू तिखट, आंबट, खारट, कडू, गोड आणि तुरट इत्यादी सर्व रसांची इच्छा षड्रस पक्वान्नाची अभिलाषा सोडून दे. हे जिव्हे, अगदी प्रेमाने सदासर्वकाळ तू परमेश्वराची आराधना कर.”
 
रसने रचितोयमंजलिस्ते परनिंदापरुषैरलं वचोभि:।
 
दुरितापहं नमःशिवायेत्यमुमादिप्रणवं भजस्व मंत्रम्॥4॥
 
आचार्यांचा सर्व भर हा परमेश्वराच्या नामस्मरणावर आहे. परनिंदेचे कठोर स्वर जिभेने उच्चारू नयेत म्हणून कळकळीची विनंती केली आहे. आचार्य म्हणतात,”हे जिव्हे, मी तुला नमस्कार करतो. रसने, तुझे कवन रचून स्तवन केले. आता तू कटूवच निंदा सोडून दे. तू ॐ नमः शिवाय हा सर्व पातकांचा निरास करणारा प्रणवमंत्र मुखात असू दे.”
माउली ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये म्हणतात,’जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.’
 
एक सुभाषित असे आहे-
 
‘खलांचे तोंड म्हणजे नागिणीचे बीळ आहे. या बिळातील नागीण म्हणजे खलांची जीभ. ही नागीण एकाच्या कानाला चावते आणि दुसर्‍याचा मृत्यू करवते. व्यवहारामध्ये सदैव निंदा करीत एक दुसर्‍याचे कान भरवून देणारे खल नित्य भेटत असतात. सुसंस्कृत माणसाने लक्षात ठेवले पाहिजे की, आपले कान म्हणजे सापाचे बीळ नव्हे की कुणीही यावे आणि गरळ ओकून जावे. त्यामुळे सारे तनमन विषारी होऊन जाते. याकरिता जीभ ही नामाला वाहिलेली असावी. इष्टदेवतेच्या नाममंत्राचा सतत जप जिभेने करावा अशी तिला प्रार्थना आहे.
 
 
प्राचीन काळामध्ये जात्यावरती दळण दळणार्‍या स्त्रियांनी ओव्या गायल्या आहेत. त्या म्हणतात,
 
राम राम म्हणुनी जपती माझे ओठ
जिव्हेबाई घ्यावा घोट अमृताचा
राम राम म्हणुनी जपती माझ्या दाढा
घेई अमृताचा काढा जिव्हेबाई
 
जीभ हे ऊर्जासाधन, ऊर्जाशक्तिकेंद्र आहे. आचार्यांची ही जिव्हाप्रार्थना आद्य शंकराचार्य ’कृत सुबोध स्तोत्र’ संग्रहात समाविष्ट असून त्याचा मराठी अनुवाद पंडित पांडुरंगशास्त्री गणेशशास्त्री गोस्वामी यांनी केला आहे. ही सरस्वतीची आराधना आहे. प.प.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचा सिद्ध मंत्र असा आहे--
 
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे
वसत्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव्॥
 
हे सरस्वती देवी, तुला माझा नमस्कार. तू मला चांगली बुद्धी दे .तुझा वास माझ्या जिभेवर असो. तू मला सर्व विद्या प्रदान कर.
मनुष्य शरीरातील जीभ हे लहान इंद्रिय मोक्षवाटेकडे नेणारे आणि समाजाचाही उद्धार करणारे आहे. म्हणून आद्य शंकराचार्यांनी जीभ या शक्तिस्तोत्राची रचना केली असावी. ही अमूल्य प्रार्थना सर्वांनी मनन करावी अशीच आहे.
 
लेखिका संतसाहित्याच्या अभ्यासक आणि प्रवचनकार आहेत.