20 मार्च 1927क्रांतीचे पाऊल पडले

विवेक मराठी    12-Oct-2026
Total Views |
@ काशिनाथ पवार 

chavdar tale
फोटो सौजन्य : google
‘कर्मठ सनातन्यांनी धर्माच्या नावाखाली चालवलेली अमानवी प्रथा आणि जुने बुरसटलेले विचार पुसून काढण्यासाठी आजपासून मी आणि माझा समाज सिद्ध झालो आहोत,’ असा संदेशच बाबासाहेबांनी आचंद्रसूर्य अमर होणार्‍यास आपल्या या कृतीतून जगाला दिला. सर्वांच्याच डोळ्यांत आसवे चमकली. बघता बघता अनेक ओंजळी भरू लागल्या. अनेक कंठ आपली जन्माची तहान भागवायला पुढे सरसावले. या क्षणी या पाण्याला एक वेगळेच मूल्य प्राप्त झाले होते. बाबासाहेबांच्या स्पर्शाने चवदार तळ्याचे पाणी खर्‍या अर्थाने चवदार झाले ते कायमचेच.
दिनांक 19 मार्च 1927 रोजी परिषदेचे काम आटोपता आटोपता संध्याकाळ होऊन गेली होती. सगळेच थकले होते. आता कोणीही काही करण्याच्या मनस्थितीत नव्हते; पण फक्त शरीर थकले होते. मने मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाने पेटून उठलेली होती. ही पेटलेली असंख्य मने, उद्याचा दिवस काय घेऊन उगवेल याचा विचार करतच निद्रेच्या कुशीत सामावून गेली होती. बाबासाहेबांच्या आजच्या भाषणाने परिषदेला आलेल्या प्रत्येक मनात कोलाहल निर्माण केला होता. बाबासाहेबांचे हे भाषण हा बाबासाहेबांच्या मनात सुरू असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारमंथनाचा परिपाक होता. समाजाप्रती त्यांच्या मनात पेरणी होत असलेल्या समाज परिवर्तनाच्या क्रांतिबीजाची ही फक्त एक झलक होती.
 
 
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सत्याग्रहात स्त्रियांना सहभागी करून घेऊन बाबासाहेबांनी एक मोठे सामाजिक परिवर्तन आधीच साधले होते. त्यामुळे हा सत्याग्रह महिला सबलीकरण आणि तत्कालीन समाजाचा विचार करता एकूणच स्त्रियांच्या उत्कर्षाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा होता. समाजाला चुचकारणे आणि त्यांच्या कलाप्रमाणे घेणे हे डॉ.आंबेडकरांच्या क्रांतिप्रवण मनाला कधीच पटले नाही. समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले नाही तर समाज कधीच क्रांतिप्रवण होणार नाही हे बाबासाहेबांनी ओळखले होते. म्हणूनच बाबासाहेबांनी समाजाला त्याचे दोषही लक्षात आणून दिले आणि सोबतच परिवर्तनाची दिशाही दाखवली होती. बाबासाहेबांच्या या क्रांतिकारी भाषणातून केवळ अस्पृश्य समाजालाच जाग आली असे झाले नाही, तर यामुळे संपूर्ण सनातनी धर्मालाच जागे व्हायला भाग पाडले.
 
 
बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून मुळातच सगळ्याच समाजाच्या रूढीप्रिय जगण्यावर हल्ला केला होता. त्यामुळे परिषदेला उपस्थित आणि पुढे ज्या कोणाच्या कानापर्यंत हे भाषण जाणार होते त्या सगळ्यांच्या मनात क्रांतीचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नव्हता. उद्याच्या क्रांतीची सादच जणू बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणातून समाजाला घातली होती. मात्र बाहेर असलेली काही सवर्ण रुढीप्रिय आणि बुरसटलेल्या विचारांची मंडळी मुठी आवळून उभी होती. समाजक्रांतीची ज्योत आता पूर्णपणे पेटलेली त्यांना दिसत होती. पेटलेला क्रांतीचा विचार आता कधी वणव्यात रूपांतरित होईल हे सांगता येत नव्हते. आता पुढे काय काय पेटणार आहे याकडे त्यांचे डोळे लागले होते. त्यांना काळजी होती ती त्यांनी परंपरेने जपलेल्या रूढिप्रिय धर्माची. या धर्माला कुठे तडा जातोय की, काय या विचारात असतानाच 20 मार्च 1927 ही रविवारची सकाळ उजाडली.
 
 
परिषदेचा हा दुसरा दिवस. कालच्याच दिवसाचे गारुड मनामनावर अजूनही तसेच आरूढ होते. काही प्रमुख मंडळी सकाळीच गोविंद निवास या सुरबानानांच्या माडीवर जमली होती. त्यात खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बापूसाहेब सहस्रबुद्धे, बापू टिपणीस उर्फ गंपू मास्तर, शिवतरकर आणि बाबा चित्रे अशी काही प्रमुख मंडळी होती. सर्वांनी आदल्या दिवशी सभेत स्पृश्य वक्त्यांनी केलेल्या भाषणावर चर्चा केली आणि आजची सभा संपल्यावर सर्वांनी चवदार तळ्यावर जाऊन नगरपालिकेचा ठराव अमलात आणायचे ठरवले; पण चवदार तळ्यावर जाण्याची सूचना कुणी करायची, केव्हा करायची, कसे आणि कोणत्या मार्गाने जायचे वगैरे काहीच ठरवण्यात आले नव्हते.
 
 
ठरल्याप्रमाणे सकाळी 9 वाजता अधिवेशनाचे पुढील कामकाज सुरू झाले. विविध ठरावांच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्यात येत होती. अनेकजण मांडल्या गेलेल्या ठरावावर आपले मत व्यक्त करत होते. जवळजवळ 33 ठराव यावेळी मंजूर करण्यात आले. या ठरावांवरील भाषणे संपतासंपताच दुपारचे बारा वाजले. त्यापैकी काही प्रमुख ठराव सांगायचे झाले तर असे, मागील कायदे कौन्सिलमध्ये श्री सी.के. बोले यांनी सार्वजनिक विहिरी व तलाव संबंधाने जो ठराव आणला आहे, त्याची सरकारने अंमलबजावणी करून त्या ठिकाणी पाट्या लावण्याची व्यवस्था करावी आणि जरूर तर क्रि. कोड. 144 अंमलात आणून स्थानिक पुढार्‍यांचे जामीन घेऊन अस्पृश्यांना सदरील हक्क उपभोगण्यास मदत करावी.
 
 
दुसरा ठराव असा होता - बहिष्कृत वर्गातील लोक सार्वजनिक स्थळे आणि पाणवठे यांचा उपयोग करून आपले नागरिकत्वाचे हक्क बजावण्याचा प्रयत्न करत असताना वरिष्ठ वर्गातील लोक त्यांच्याशी सर्व प्रकारचे व्यवहार बंद करून त्यांच्याविरुद्ध हरताळ जाहीर करतात, तसे न करता अशा वेळी वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृत लोकांना सक्रिय साहाय्य द्यावे.
 
 
तसे सगळेच ठराव तत्कालीन परिस्थितीत महत्त्वाचे आणि गरजेचे असेच होते. त्यामुळे अवाजवी मताने सगळेच ठराव मंजूर झाले.
सर्व ठराव एकमताने मंजूर झाल्यावर समारोपादाखल अध्यक्षांनी दोन शब्द मांडले. त्यात प्रास्ताविक भाषणातील महत्त्वाच्या मुद्द्यांना पुन्हा उजाळा देण्यात आला. त्यानंतर शिवराम गोपाळ जाधव यांनी परिषदेत सहभागी झालेल्या मंडळींचे आणि अध्यक्षांचे आभार मानले. त्याला दुजोरा देण्यासाठी म्हणून भाई चित्रे उभे राहिले. यावेळी त्यांनी एक सूचना मांडली. ही सूचना अशी होती-‘आज जी एवढी मोठी महत्त्वाची परिषद इथे भरली आहे, तिने काहीतरी महत्त्वाचे कार्य केल्याखेरीज आपले अधिवेशन संपवू नये, असे मला वाटते. या महाड शहरात अस्पृश्य लोकांची पाणी पिण्याची अत्यंत गैरसोय आहे. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून येथील म्युनिसिपालिटीने येथील तळी सर्व जातींच्या लोकास खुली केली आहेत, असे ठरावाने केव्हाच जाहीर करून टाकले आहे; परंतु त्या तळ्यावर पाणी भरण्याचा प्रघात जर आज या परिषदेने पाडून दिला तर या परिषदेने एक मोठी महत्त्वाची कामगिरी बजावली असे म्हणता येईल. तरी आपण सर्वांनी अध्यक्षांसह महाड येथील चवदार तळ्यात प्रवेश करून पाणी घेऊ या.’
 
 
ही सूचना मांडताना ते म्हणाले, “स्पृश्यास्पृश्य बंधूंनो! आता भर दुपारची वेळ आहे. ग्रीष्म ऋतुतल्या कडक उन्हामुळे आपल्या सर्वांना तहान लागली आहे. चवदार तळे सार्वजनिक असून अस्पृश्यांना मोकळे असण्याचा महाड म्युनिसिपलिटीचा ठराव आहे. ह्या परिषदेसाठी पैशाला हंडाभर पाणी या दराने आपण 40/- रुपयांचे पाणी विकत घेतले; पण आता आपण सर्व स्पृश्यास्पृश्य बंधू आपली मिरवणूक घेऊन तळ्यावर जाऊ आणि आपली तहान शांत करू’, ही वाक्ये आहेत अनंतरावांची. ’आपली तहान शांत करू,’ हे अनंतरावांचे शब्द आहेत आणि तेच महत्त्वाचे आहेत.
 
 
कॉ.आर.बी. मोरे यांचे त्यांनी लिहिलेल्या ‘महाडच्या दोन ऐतिहासिक परिषदा’ या पुस्तकातील अनंतराव चित्र्यांनीच आकस्मिकपणे अध्यक्षांचे नेतृत्वाखाली सर्वांनी चवदार तळ्याचे पाणी पिण्याची कल्पना मांडली. प्रतिनिधी प्रेक्षकांनी ती उचलून धरली हे विधान अतिशय महत्त्वाचे आहे. कारण हे विधान परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या एका संघटकाचे आहे. म्हणजेच यामागे कोणतीही पूर्वनियोजित योजना नव्हती. असती तर कॉ. मोरे आणि इतर सहकार्‍यांना ती निश्चितच माहीत असती. कॉ. मोरे यांचे हे मत ग्राह्य धरता, अनंतरावच या ठिणगीचे प्रेरक होते असे म्हणायला हरकत नाही. तसेच अनंतरावांनी मांडलेल्या सूचनेने व्यासपीठावरील काही मंडळींमध्ये कुजबूज सुरू झाली. त्यांना अनंतरावांची सूचना आधी लक्षातच आली नाही असे दिसते; पण नंतर लक्षात आले की ते या सूचनेशी सहमत नव्हते. तेव्हा त्यांना सांगावे लागले की, ’तुम्हाला मोर्चात सामील व्हायचे नसेल तर तुम्ही येऊ नका.’ याचाही अर्थ असाच होतो की, ही सूचना आकस्मिक आणि सर्वांनाच धक्का देणारी होती.
 
 
बंडखोर आणि काही मोजक्या मंडळींशिवाय आपल्याला तळ्यावर जाऊन सत्याग्रह करायचा आहे, या गोष्टीची कुणालाही कल्पना नव्हती. बाबासाहेबांचा सहवास आणि विश्वास या बळावरच अनंतरावांनी ही कल्पना आत्मविश्वासाने परिषदेच्या व्यासपीठावरून मांडली. भाई चित्रेंकडून आलेली ही आकस्मिक सूचना प्रतिनिधींनी उचलून धरली. सभागृहाने हातात असलेल्या काठ्या हवेत उंचावून सूचनेला पाठिंबा जाहीर केला. अनंतरावांनी मांडलेली कल्पना सर्वांनाच आवडली. त्यामुळे सर्वांकडूनच ती उचलून धरली गेली. अनंतरावांनी आयत्या वेळी मांडलेली ही सूचना त्यांच्यातल्या बंडखोर वृत्तीचे द्योतकच म्हणायला हवे. ही बंडखोर वृत्ती त्यांना त्यांच्या घराण्याकडून परंपरेने मिळालेली होती, त्यात त्यांना बापूसाहेब सहस्रबुद्धे यांची साथ होती आणि त्यात भरीस भर पडली होती ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासाची. त्याचाच परिणाम अनंतरावांनी मांडलेल्या सूचनेत दिसून आला. त्यांच्या याच गुणामुळे बाबासाहेबांनी त्यांची भाषणासाठी वक्ते म्हणून निवड केलेली होती, जी सार्थ ठरली.
 
 
डॉ.आंबेडकरांनी सभा संपल्याचे जाहीर केले आणि ते व्यासपीठावरून खाली उतरले. माणुसकीचा हक्क बजावण्यासाठी परिषदेला उपस्थित प्रत्येक पाऊल त्या ऐतिहासिक क्षणाच्या दिशेने पुढे सरकायला आसुसलेले होते. बाबासाहेबांनी चेतवलेल्या मनाच्या मशाली अधिकाधिक तेजोमय होत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बापूसाहेब सहस्रबुद्धे, अनंतराव चित्रे, शांताराम पोतनीस, शिवतरकर, सुरबानाना, दादासाहेब गायकवाड, भाईशेट वडके, कॉ. आर.बी. मोरे, सुभेदार सावादकर, रघुनाथ मास्तर, चंद्रकांत अधिकारी, अशी सर्व मंडळी पुढे निघाली होती. चार चारच्या रांगेने इतर सर्व कार्यकर्ते त्यांच्या मागून आणि त्यांच्या मागे लाठीधारी सैन्य असा सगळा साधारणत: पंधरा हजारांचा लवाजमा, गाडीतळावरून काणे यांच्या हॉटेलच्या बाजूने गल्लीतून निघून शहराच्या मुख्य बाजारपेठेत आला.
 
 
महाड मोटार-स्टँडजवळील विश्वेश्वराच्या देवळापासून तळ्याच्या दिशेने पुढे निघाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराने सारी बाजारपेठ दणाणून गेली होती. सारीच मने पेटलेली होती; पण वातावरणात मात्र एक गूढ शांतता भरून राहिली होती. पिंपळपाराला वळसा घालून मोर्चा पुढे चालला होता. तांबट आळीतून पुढे जात थोड्याच वेळात तो तळ्याच्या प्रवेशद्वारावर म्हणजे शहाबहिरीच्या घाटावर पोहोचला. मागून येणारे सगळे मोर्चेकरी एका जागी जमा होत होते. तेथे उपस्थित असणार्‍या बघ्यांमध्ये सर्वसामान्य गावकरी तसेच मोर्चाला विरोध असणारी सनातनी मंडळीही होती, सर्वांचेच लक्ष मोर्चाच्या गर्दीकडे वेधले जात होते. काय घडत आहे याचा त्यांना अंदाज कुणालाच येत नव्हता, मात्र काहींच्या कपाळाच्या शिरा मात्र ताणल्या जात होत्या. काहीतरी अगम्य अकल्पित घडणार आहे याची जाणीव दोन्ही बाजूंच्या लोकांना होऊन चुकली होती. मोर्चेकरी शांत होते मात्र, रोष असणार्‍याच कर्मठ सनातनी मंडळींची शरीरे तापत चालली होती. काय घडेल याची कुणालाच शाश्वती नव्हती. जमलेल्या सगळ्या मोर्चेकरांना आणि आकाशातून बघणार्‍या सूर्याला साक्षी ठेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घाटाची एक एक पायरी उतरायला सुरुवात केली आणि एका नव्या क्रांतीच्या दिशेने अस्पृश्य समाजाचे एक एक पाऊल पुढे पडायला सुरुवात झाली.
 
 
ज्या पायरीला पाणी लागलेले होते, तेथे पोहोचल्यावर बाबासाहेबांनी एकदा आपल्या सहकार्‍यांकडे पहिले. डोळ्यांत आणि मनात एक नवी आशा भरून घेत ते पाण्याच्या दिशेने वाकले आणि ओंजळ भरून घेतली. पाण्याचा पहिला घोट घेतांना बाबासाहेबांसह सगळ्याच उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यांत नव्या आशांची स्वप्ने तरळली. ...आणि मग एकामागून एक असे अनेक आकंठ घोट घेत बाबासाहेबांनी शाहबहिरीच्या घाटावर ‘न भूतो न भविष्यती’, असा क्रांतीचा एक नवा जाहीरनामाच लिहून टाकला.
 
 
’कर्मठ सनातन्यांनी धर्माच्या नावाखाली चालवलेली अमानवी प्रथा आणि जुने बुरसटलेले विचार पुसून काढण्यासाठी आजपासून मी आणि माझा समाज सिद्ध झालो आहोत,’ असा संदेशच बाबासाहेबांनी आचंद्रसूर्य अमर होणार्‍यास आपल्या या कृतीतून जगाला दिला. सर्वांच्याच डोळ्यांत आसवे चमकली. बघता बघता अनेक ओंजळी भरू लागल्या. अनेक कंठ आपली जन्माची तहान भागवायला पुढे सरसावले. या क्षणी या पाण्याला एक वेगळेच मूल्य प्राप्त झाले होते. बाबासाहेबांच्या स्पर्शाने चवदार तळ्याचे पाणी खर्‍या अर्थाने चवदार झाले ते कायमचेच.