मध्ययुगीन भक्तीकाळातील मराठी भाषेमध्ये संतकवयित्रींच्या काव्याचे योगदान अपूर्व आहे. त्यामध्ये संतकवयित्री कान्होपात्राचे करुणार्द्र काव्य खरोखर एक सुंदर अक्षरलेणी आहे.
चौदाव्या शतकामध्ये मंगळवेढा येथील एका गणिकेची कन्या ‘कान्होपात्रा’ हिची जीवनकहाणी अद्भूत आहे. तिच्या नावावर केवळ 45 अभंग उपलब्ध आहेत; पण ते अभंग तिच्या उपजत कवित्वाचे उत्कट, करुण, आर्त शब्ददर्शन आहे. तिचे अभंग मनाचा ठाव घेणारे आहेत. त्यातून तिची विठ्ठलभक्ती, निष्ठाभाव आणि समर्पण वृत्तीचे जे दर्शन घडते, ते थक्क करणारे आहे. संतकवयित्री म्हणून मराठी साहित्यात तिचे स्थान ध्रुवतार्यासारखे अढळ आहे. गणिकेची कन्या ते संतकवयित्री हा तिचा जीवनप्रवास स्त्री व्यक्ती विकासाचे असाधारण उदाहरण आहे. स्त्री वर्गात स्वत्व व आत्मविश्वासाचे जागरण करणारे आहे. संतकवयित्री कान्होपात्रेच्या नावावर संख्येने फारच थोडी अभंगरचना उपलब्ध आहे; पण त्या अभंगाची गुणवत्ता, आशय मनाचा ठाव घेणारा आहे.
‘नको देवराया अंत आता पाहू।’
हा तिचा अभंग पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आर्त सुरात गायलेला असून हृदय पिळवटून टाकणारे ते शब्द ऐकून श्रोता सद्गतीत होतो. तसेच कान्होपात्रेचा एक अभंग संगीतसम्राट बालगंधर्व यांनी गाऊन अजरामर केलेला आहे.
‘अगा पंढरीच्या राया।’
बालगंधर्वांनी गायलेल्या या अभंगाने अवघ्या मराठी मनाचे लक्ष कान्होपात्रेकडे वेधले गेले. अशी आशयघन सामर्थ्यशाली अभंगरचना करणारी कान्होपात्रा ही मंगळवेढा (जि.सोलापूर) येथे देवदासी शामा गणिकेच्या पोटी जन्माला आलेली होती.
मंगळवेढा येथे जन्म
मंगळवेढा हे गाव श्रीक्षेत्र पंढरपूरच्या जवळ असून एकेकाळी ते गाव बिज्जल राजाची राजधानी होते. महात्मा बसवेश्वर राजा बिज्जलाचे मंत्री होते. तसेच संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत दामाजी अशा संतांची भूमी म्हणूनही मंगळवेढा एक प्रसिद्ध गाव आहे. अशा ऐतिहासिक, भक्तिपेठ असलेल्या गावी कान्होपात्राचा जन्म झाला. तिच्या जन्माची तिथी व साल अधिकृत पुराव्यानिशी उपलब्ध नाही. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी शके 1390 (इ.स.1468) साली कान्होपात्राचा जन्म झाला, असे म्हटले आहे.तो अधिक योग्य वाटतो. काहींनी कान्होपात्रेचा संत ज्ञानेश्वर भेटीचा अभंग वाचून, ती ज्ञानेश्वर-नामदेव कालीन होती, असे मत मांडलेले आहे; पण ते योग्य वाटत नाही. ज्ञानदेव काळी महाराष्ट्रात यादवांचे राज्य होते. कान्होपात्रा बिदरच्या बादशहाच्या काळातील आहे. तो काळ चौदाव्या शतकाचा उत्तरार्ध बरोबर ठरतो.
जीवन कहाणी
कान्होपात्रा तिच्या आई शामासारखीच देखणी, सुंदर होती. नृत्य गान कलेत निपुण होती. गाणे आणि नृत्य तिच्या घरातच होते. तिची आई देवदासी होती की गणिका होती, याविषयी वाद आहे. तिचे गाणे ऐकण्यास व नृत्य पाहण्यास अनेक दरबारी मानकर्यांची व तालेवार श्रीमंतांची तिच्या घरी ऊठ-बस होती. शामा श्रीमंत होती; तशीच धर्मपरायण होती. तिचे गाणे व नृत्य ही तिची नित्य उपासनाच होती. आपली मुलगी कान्होपात्रा, आपल्याकडे येणार्या कामांध शौकिनांच्या दृष्टीपासून दूर रहावी असा तिचा प्रयत्न होता. आईच्या धर्मपरायण संस्कारामुळे कान्होपात्राला लहानपणापासून देवपूजा, भजन यांचा नाद होता. मंगळवेढ्याहून पंढरीला जाणार्या वारकरी महिलांसमवेत कान्होपात्राही पंढरीची वारी करीत होती. पंढरीच्या प्रथम भेटीतच वाळवंटातील भजने, कीर्तने, संतांच्या भेटी आणि विठ्ठलाचे दर्शन घेऊन कान्होपात्रा भावविभोर होऊन गेली. विठ्ठलाच्या प्रेमभक्तीने वेडी झाली. आईविना कोणीच आप्त नसलेल्या अश्राप अशा कान्होपात्राला पंढरी ‘माहेर’ आणि विठ्ठल ‘मायबाप’ वाटू लागला. तिच्या मनीचे भाव उस्फूर्तपणे कवितेचे शब्दरूप घेऊन प्रगट होऊ लागले.
* माझ्या जीवीचे जीवन।
तो हा विठ्ठल निधान॥
* जन्माचे सुकृत फळासी आले।
चरण देखिले विठ्ठलाचे॥
चाफा लपविला तरी त्याचा सुगंध लपत नसतो, तसे आई शामाने कान्होपात्रा सत्ताधीश, श्रीमंतांच्या दुष्ट नजरेपासून दूर रहावी असे प्रयत्न केले तरी, कन्होपात्राचे सौंदर्य, लावण्य, गाणे आणि नृत्य याची वार्ता तत्कालीन बादशहाच्या कानी गेलीच. त्या काळी मंगळवेढा परिसर बिदरच्या बादशहाच्या राज्याचा भाग होता. बादशहाने शामाला मुलीसह बिदर दरबारी बोलवले; पण शामा एकटीच गेली. बादशहाने कान्होपात्राची चौकशी केली, तेव्हाच शामाला पुढे काय घडणार याची कल्पना आली. बादशहाने कान्होपात्राला घेऊन येण्यास खास रक्षकदल पाठवले. आता बादशहाच्या फर्मानापुढे झुकण्याशिवाय पर्यायच नव्हता.
कान्होपात्राने आपल्या इष्ट देव-विठ्ठलाचा धावा केला ‘नको देवराया अंत आता पाहू’ या अभंगातील पुढील ओळी नुसत्या वाचल्या तरी कान्होपात्रावरील बिकट प्रसंग चित्रासारखा डोळ्यांपुढे उभा राहतो.
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले।
मजलागी जाहले तैसे देवा॥
तुजवीण ठाव न दिसे त्रिभुवनी।
धावे हो जननी विठाबाई॥
अखेर बादशहाच्या रक्षकांनी कान्होपात्रास ताब्यात घेतले, तेव्हा कान्होपात्रेने त्यांना विनवणी केली की, ‘बिदरला जाण्यापूर्वी मला पंढरपूरला विठोबाचे दर्शन घेऊ द्या.’ रक्षकांनी त्याप्रमाणे तिला पंढरीस नेले. मुस्लीम रक्षक मंदिराबाहेर थांबले आणि कान्होपात्रा विठ्ठलाकडे धावत गेली. विठुमाउलीचे दर्शन घेऊन तिने तिथेच प्राण सोडला.
शरण कान्होपात्रा चरणी निमाली।
धावोनिया भेटली विठाबाई॥
आजही विठ्ठल मंदिराच्या दक्षिण प्रांगणात तरटी दरवाजाजवळ संत कान्होपात्राचे समाधी मंदिर आहे. त्या मंदिरावर ‘तरटी’ नावाचा वृक्ष उगवला. हा तरटीवृक्ष कान्होपात्रेचे प्रतिक, स्मृतिप्रसादचिन्ह मानला जातो. ईश्वरनिष्ठा, भक्ती आणि समर्पण यांचे अभंग दर्शन कान्होपात्रेच्या या जीवन कहाणीतून घडते.
अभंगातील भावविश्व
कान्होपात्राचे आयुष्य केवळ 17-18 वर्षांचे आणि अभंग केवळ 45; पण त्यांच्या काव्याची जातकुळी, पोत, शब्दकळा संत मुक्ताई, संत जनाबाई, संत सोयराबाई यांच्यापेक्षा खूप वेगळी व अनोखी आहे. खरे तर या संतकवयित्रीचा विषय विठ्ठलभक्ती, पंढरी-पुंडलिक माहात्म्य, संतांचा वास, नामभक्ती असा एकसारखा असला तरी प्रत्येकाची शब्दकळा, शैली वेगवेगळी आहे.
कान्होपात्राचे अभंग सर्वाधिक करुण व आर्त आहेत. अभंगातून तिने केलेला विठ्ठल धावा, आणि तिने टाहो फोडून केलेला भावनांचा उद्रेक हृदयविदारक आहे. तिच्या प्रासादिक करुणार्द्र अभंगवाणीची दखल थोरमोठ्या सार्या मराठी समीक्षक सारस्वतांनी घेतलेली आहे. वि.ल.भावे, (महाराष्ट्र सारस्वत) डॉ.तुळपुळे, डॉ.अ.ना.देशपांडे, डॉ.गोसावी, डॉ.विलास खोले, डॉ.इनामदार, डॉ.सदानंद मोरे, डॉ.सुहासिनी इर्लेकर... नावे तर कितीजणांची घ्यावी. या सर्वांनीच संतकवयित्री कान्होपात्राच्या अभंगकाव्यातील बलस्थानांची दखल घेतलेली आहे. जिज्ञासूंनी या लेखकसमीक्षकांचे कान्होपात्राविषयीचे आलेख जरूर पाहावेत.
पंढरीच्या वाळवंटातील संतांची कीर्तने-प्रवचने ऐकून कान्होपात्रा बहुश्रुत झालेली होती. अनेक पौराणिक कथा तिला ज्ञात होत्या.ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई, चोखामेळा या संतांचे अभंग तिच्या परिचयाचे होते असे तिच्या विविध अभंगातील विविध उल्लेख वाचून वाटते. विठ्ठल हा तिचा प्राणसखा मायबाप आहे. तेव्हढाच संत ज्ञानदेव-निवृत्तीनाथ या भावंडांबद्दल अपार श्रद्धाभाव तिच्या अभंगातून व्यक्त होताना दिसतो.
शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही।
सोपान तो ब्रह्मा, मूळ माया मुक्ताबाई॥
असे ज्ञानदेव भावंडांचे कान्होपात्रा वर्णन करते. हे वर्णन नामदेव-जनाबाईंच्या अभंगातील अभंगानुरूप आहे. कान्होपात्राने पंढरीबरोबरच आळंदीचीही वारी केलेली होती, असे तिच्या अभंगातून दिसते.
‘अलंकापुरी पुण्यठाव। तेथे समाधी ज्ञानदेव॥’
म्हणत कान्होपात्राने अलंकापुरीचे आध्यात्मिक माहात्म्यच कथन केलेले आहे. आळंदीत (स्वप्नदृष्टांतात) ज्ञानदेवांची भेट झालेली आहे, असे सांगून ज्ञानदेव भेटीने मी धन्य धन्य झाले अशी जीवन साफल्याची कृतार्थ भावना ती व्यक्त करते.
धन्य धन्य कान्होपात्रा। आजी झाली भाग्याची।
भेट झाली ज्ञानदेवांची म्हणूनिया॥
नामभक्तीचे श्रेष्ठत्व
विठ्ठलभक्ती पंथातील ‘नामभक्ती’चे अनन्य महत्त्व कान्होपात्रा जाणत होती. नामभक्तीच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन तिने अभंगातून नेमकेपणाने केलेले आहे.
* नामे दोष जाती। पापी उद्धरती॥
* ऐसी नामाची थोरी। उद्धरिले दुराचारी॥
’विठ्ठल भेट, संतांचा सत्संग, नामभक्तीचा सोहळा हे मला या जन्मी लाभले ही माझी पूर्वजन्म पुण्याईच असावी,’ असा भाव कान्होपात्रा काही अभंगांतून व्यक्त करते.
‘धन्य चरण माझे या पंथी चालले।’
वारकरी झाल्यामुळेच मला पंढरीसारखे माहेर मिळाले आणि विठोबासारखा मायबाप भेटला. पंढरीतील भक्तिरंगाने माझी तहान-भूक हरपली; पण चित्ताला अपूर्व समाधान-शांती मिळाली. ही सारी वर्णने आपण मूळ अभंगातून वाचावीत.
हरली भूक, तहान निमाली।
संतांची देखिली चरणांबुजे।
कीर्तनाचे रंगी आनंदे नाचता।
कान्होपात्रा, चित्ता समाधान॥
पंढरी व पांडुरंगाच्या ओढीने ती वेडी झाली होती.
‘परिमलाची धाव भ्रमर ओढी ।
तैसी तुझी गोडी लागो मज॥’
अशा ललित शैलीत ती आपली ओढ-इच्छा व्यक्त करते..
एक-दोन अभंगात ‘मी तो यातीहीन’ पतित आहे म्हणते व स्त्री-उपेक्षितांची दुःखे व्यक्त करते. विषयासक्त पुरुषांना तिने आई शामाकडे जवळून पाहिलेले असते. त्यांचा निषेध करते. इंद्र, चंद्र आणि रावण या विषयासक्तांच्या दुराचाराच्या पौराणिक कथेचा संदर्भ देते. अशा प्रकारे संख्येने फारच थोड्या असलेल्या तिच्या काव्यातून ती विविधतेने भावुकतेने प्रकट होते. हेच कान्होपात्रांच्या अभंगांचे वैशिष्ट्य आहे.
मध्ययुगीन भक्तीकाळातील मराठी भाषेमध्ये संतकवयित्रींच्या काव्याचे योगदान अपूर्व आहे. त्यामध्ये संतकवयित्री कान्होपात्राचे करुणार्द्र काव्य खरोखर एक सुंदर अक्षरलेणी आहे.
लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व उपासक तसेच ’साईलीला’ आणि ’एकता’ या मासिकाचे माजी संपादक आहेत.