आशियाई क्रीडास्पर्धेत भारताची पदकसंख्या यंदा कमी झाली असली, काही प्रमाणात समाधानकार आहे. पारंपरिक खेळांबरोबरच सांघिक खेळ, तिरंदाजी आणि महिला खेळाडूंची दमदार कामगिरी केली आहे. या कामगिरीतून भारताला काय मिळालं, काय हुकलं आणि पुढील ऑलिम्पिकसाठी कोणत्या दिशेने वाटचाल करावी लागेल, याचा घेतलेला हा आढावा.
यंदाच्या स्पर्धेचा योगायोग बघा कसा होता! बरोबर पंचाहत्तर वर्षांपूर्वी, 1951 साली, पहिल्यावहिल्या आशियाई क्रीडास्पर्धेचं यजमानपद नवी दिल्लीकडे होतं. त्या ऐतिहासिक स्पर्धेचा अमृतमहोत्सव साजरा करणारी यंदाची स्पर्धा जपानमधील आइची-नागोया इथे पार पडली. मधल्या काळात भारताने आणखी एकदा यजमानपद भूषवलं. तर इतर आशियाई देशांमध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया यांनी सर्वाधिक वेळा ही स्पर्धा भरवली. यातील चीन आणि जपानने तर महानगरांच्या पलीकडे या स्पर्धेचा विस्तार होआंगझाओ, गुआंगझाओ आणि आता जपानच्या आइची-नागोया या दुसर्या स्तरांतील शहरांपर्यंत नेला.
मोठ्या स्पर्धांच्या आयोजनाची ही मजल भारत अजून गाठू शकलेला नाही. पण, आताचा आपला विषय स्पर्धेतील कामगिरीचा आहे आणि तिथे मात्र भारताने भरीव प्रगती केली आहे. या आधीच्या होआंगझाओ आशियाई खेळांत भारताने पदकांचं शतक पूर्ण केलं. आणि यंदा तीच अपेक्षा युवा पथकाकडून होती. आणि मुख्यत्वे 27 सुवर्णपदकांचा विक्रम मागे टाकायचा होता.
15 दिवसांच्या या क्रीडा सोहळ्यात आपण मजल मारली ती 85 पदकांची. 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य. आणि गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं. आकडे सांगतात की ही कामगिरी चांगली आहे. पण, होआंगझाओच्या जवळ जाणारी नाही. एकदा का या आकट्यांपलिकडे आणखी खोल विचार केला तर भारतीय पथकाची एक वेगळीच रोमांचक कहाणी समोर येते. भारताच्या पारंपरिक ताकदीला छेद देऊन उभी राहिलेली नवीन ताकद आणि नव्या सामर्थ्याची ही कहाणी आहे.
19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर अशी पंधरा दिवस ही स्पर्धा रंगली. सुमारे 17 हजार खेळाडू व अधिकारी, 469 सुवर्णपदकांच्या लढती इथे पाहायला मिळाल्या. आता भारतीय पथकाच्या कामगिरीचा आढावा काही मुद्द्यांच्या आधारे घेऊया.
पंधरा दिवसांचा प्रवास
संथ सुरुवात, मधला खड्डा आणि शेवटचा सुवर्ण झंझावात
या कामगिरीचं वर्णन एका वाक्यात करायचं तर, ’आधी रांगत, मग धावत’ असं करावं लागेल. सुरुवातीला अॅथलेटिक्स, भारोत्तोलन, बॅडमिंटन, ज्युदो, मार्शल आर्ट्स असे खेळ होते. पण, खासकरून बॅडमिंटनमध्ये अपेक्षा असूनही भारताला सुवर्ण पदक मिळवता आलं नाही. भारोत्तोलनातही वजन कमी पडलं आणि पहिल्या सुवर्णासाठी तब्बल सात दिवस वाट पाहावी लागली. 22 सप्टेंबरला भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला हरवून पहिलं सुवर्ण मिळवलं. आणि तिथून काही अनपेक्षित धक्क्यांना सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. 25 सप्टेंबरला सुरुची सिंग आणि कमलजीत यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात 484.6 गुणांचा आशियाई विक्रम करत दुसरं सुवर्ण जिंकलं. पहिल्या आठवड्यात भारताच्या पदरी फक्त 19 पदकं होती. आणि यात दोन सुवर्ण होती.
पण, त्यानंतर लगेचच कबड्डीत दोन हुकमी सुवर्ण मिळाली. तरीही पदकतालिकेत भारत अजूनही बाराव्या स्थानावर होता. म्हणावी तशी सुवर्ण चमक दिसत नव्हती. या परिस्थितीला नाट्यमय कालटणी मिळाली ती नीरू धांडाने महिला ट्रॅप प्रकारात 30 पैकी 28 लक्ष्यं भेदून आशियाई विक्रमासह जिंकलेल्या सुवर्णाने. त्याच दिवशी महिलांच्या 4400 मीटर रिलेत भारताला अॅथलेटिक्समधलं एकमेव सुवर्ण मिळालं.
30 सप्टेंबरने या कामगिरीवर कळस चढवला. कारण, कम्पाऊंड तिरंदाजीच्या तीनही प्रकारात भारताला सुवर्ण मिळालं. हा भारताचा ‘सोनियाचा दिन’ ठरला. नीरु धांडाने मिश्र स्पर्धेत पुन्हा एकदा आशियाई विक्रमासह सुवर्ण खेचून आणलं. आणि एका दिवसांत चार सुवर्ण भारताच्या खात्यात जमा झाली.
2 ऑक्टोबरला मुष्टियुद्धाच्या स्पर्धा सुरू झाल्या. आणि इथे तर लवलिना, परवीन चड्ढा आणि अंकुश पनघळ यांनी 6 सुवर्णांची लयलूट केली. कुस्तीत सुजीत कलकलने सुवर्णाला गवसणी घातली. तर महिला हॉकी संघाने चीनला 1-0 ने हरवून हॉकीत सुवर्ण आणलं. हा सिलसिला शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिला. या दिवशी कुमकुम मोहोडचं वैयक्तिक रिकर्व्ह सुवर्ण, प्रणवी उर्सचं गोल्फमधलं सोनं, पुरुष क्रिकेट संघाचं पाकिस्तानवर विजयी सोनं, अमन सेहरावतचं कुस्तीतलं सोनं आणि पुरुष हॉकी संघाचं विजेतेपद, असं करत भारताच्या खात्यात अखेर 21 सुवर्ण जमा झाली. आणि उझबेकिस्तानला मागे टाकून भारताने चौथ्या क्रमांकावर दिमाखात दावा केला.
एकूण पदकसंख्या : वाढली की घटली? काय जाणवलं?
आकड्यांच्या बाबतीत म्हणाल तर उत्तर सरळ आहे - पदकं घटली. होआंगझाओ 2022 (प्रत्यक्षात 2023 मध्ये झालेल्या) स्पर्धेत भारताने 107 पदकं (28 सुवर्ण, 38 रौप्य, 41 कांस्य) जिंकली होती. यंदाची 85 पदकं त्यापेक्षा 22 ने कमी आहेत - सात सुवर्ण, अकरा रौप्य आणि चार कांस्य पदकांची घट. तरीही दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. एक, भारतासाठी हा आजवरचा दुसरा सर्वोत्तम निकाल आहे; 2018 च्या जकार्ता स्पर्धेतल्या 70 पदकांपेक्षा हा बराच वरचा आहे. दोन, पदकतालिकेतलं चौथं स्थान भारताने दोन्ही वेळा राखलं आहे.
या स्पर्धेचं सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे सुवर्णपदकांचा स्रोत बदलला. होआंगझाओमध्ये अॅथलेटिक्स आणि नेमबाजी यांनी मिळून 28 पैकी 13 सुवर्णपदकं दिली होती. यंदा या दोन खेळांनी 21 पैकी फक्त 4 सुवर्णपदकं दिली - अॅथलेटिक्समध्ये एक आणि नेमबाजीत तीन. उलट क्रिकेट, कबड्डी आणि हॉकी या तिन्ही खेळांत पुरुष व महिला अशा दोन्ही संघांनी सुवर्ण जिंकलं. म्हणजे एकूण सहा संघांपैकी सहा संघ विजेते. सांघिक खेळांची ही शंभर टक्के कामगिरी या स्पर्धेचा चेहरा बनली.
दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पदकांचा पाया रुंदावला. भारताने एकूण 20 खेळांत पदकं मिळवली आणि भारोत्तोलन, कुराश, मिश्र मार्शल आर्ट्स (एमएमए) आणि सॉफ्ट टेनिस या चार नव्या प्रकारांत पहिल्यांदाच भारताला पोडियम दिसलं. अॅथलेटिक्सने सर्वाधिक 24 पदकं दिली, पण त्यात सुवर्ण एकच; 9 रौप्य आणि 14 कांस्य. म्हणजे पदकांची संख्या टिकली, पण सोनं निसटलं.
आता प्रश्न येतो तो गुणवत्तेचा.
अॅथलेटिक्समध्ये 24 पदकं असूनही सुवर्ण फक्त एक. नेमबाजीत 15 पदकं असून, सुवर्ण तीन! म्हणजेच पदकांची संख्या चांगली असूनही सुवर्णापर्यंत पोहोचण्यात भारतीय कमी पडले.
म्हणजे भारताचा प्रश्न ‘पदक मिळत नाही’ हा नसून, पदकाचं रूपांतर सुवर्णात होत नाही हा आहे.
आगामी ऑलिम्पिकचा विचार करता ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे. कारण, आशियाई स्तरावर कांस्य जिंकणारे खेळाडू तिथे वाढत्या स्पर्धेत पोडिअमच्या आसपासही नसतील.
कुठे अपेक्षाभंग, कुठे अनपेक्षित यश?
अॅथलेटिक्समध्ये अनेक हुकलेल्या संधींची यादीच करता येईल. या प्रकारात अमेरिका आणि युरोप खंडातील देश आघाडीवर असतात. ते आशियाई स्पर्धेत भाग घेत नसल्यामुळे भारताला इथे चांगली संधी असते आणि आतापर्यंत भारताने ती साधलीही आहे. पण, यावेळी मात्र चीनने आपल्याला मागे टाकलं.
नीरज चोप्रा दुखापतीमुळे स्पर्धेत नव्हता. मुरली श्रीशंकरला लांब उडीत रौप्यावर समाधान मानावं लागलं. गुलवीर सिंगने 10,000 आणि 1,500 मीटर अशा दोन्ही शर्यतींत रौप्य जिंकलं, यशवीर सिंगने भालाफेकीत 85.72 मीटरसह रौप्य मिळवलं. मागच्या वेळची सुवर्णविजेती पारुल चौधरी कांस्यावर थांबली आणि अविनाश साबळे स्टीपलचेसमध्ये चौथा आला. जवळ पोहोचलो, पण पोडियमच्या सर्वोच्च पायरीवर पोहोचलो नाही.
नेमबाजी ही सर्वात मोठी निराशा ठरली. इथे तर आपण ऑलिम्पिकमधील पहिलं वैयक्तिक सुवर्ण जिंकलं आहे. पण, यंदा पदकांची संख्या रोडावली. होआंगझाओमध्ये सात सुवर्णपदकं होती, यंदा तीन आणि आठ रौप्य. मनू भाकर, जिच्याकडून सर्वाधिक अपेक्षा होत्या, एकही पदक मिळालं नाही. एलावेनिल वालारिवनने अखेरच्या नेमवर चूक करून रौप्यावर समाधान मानलं. महिला 25 मीटर पिस्तूल सांघिक विजेतेपद राखण्याच्या प्रयत्नात भारतीय संघ पाचवा आला.
बॅडमिंटनमध्ये फक्त पुरुष सांघिक कांस्य मिळालं आणि 2014 नंतर पहिल्यांदाच एकेरी-दुहेरीत एकही पदक आलं नाही; होआंगझाओचे सुवर्णविजेते सात्त्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पहिल्याच सामन्यात हरले. महिला कुस्तीत ’सर्वोत्तम संघ’ म्हणून गाजावाजा झाला, पण फक्त अंतिम पनघलचं रौप्य मिळालं. रोइंगमध्ये पाचवरून एकावर घसरण झाली आणि टेनिस, बुद्धिबळ, घोडेस्वारी यांतून पदकं आलीच नाहीत.
पण, चित्र पालटलं ते मुष्टियोद्धे, कुस्तीपटू आणि तिरंदाजांनी. होआंगझाओमध्ये बॉक्सिंग, कुस्ती आणि गोल्फ यांच्या खात्यात एकही सुवर्ण नव्हतं. यंदा या तिघांनी मिळून सहा सुवर्णपदकं आणली. बॉक्सिंगचे तीन सुवर्ण, कुस्तीचे दोन आणि गोल्फचं एक. महिला हॉकी संघाने तब्बल 44 वर्षांनी, म्हणजे 1982 नंतर पहिल्यांदा, आशियाई सुवर्ण जिंकलं. रिकर्व्ह तिरंदाजीत, जिथे होआंगझाओमध्ये एकमेव पदक पुरुष सांघिक रौप्य होतं, तिथे यंदा महिला सांघिक आणि वैयक्तिक अशी दोन्ही सुवर्णपदकं भारताच्या नावावर लागली. कम्पाऊंड तिरंदाजीत महिला संघाने चीनला 238-234 असं हरवत जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. पुरुष संघाने चीनवर 238-237 अशा एका गुणाच्या फरकाने मात केली.
पुरुषांच्या तुलनेत महिलांची सरस कामगिरी
या स्पर्धेची खरी ताकद
तिरंदाजी हा त्यातील सर्वात मोठा अध्याय. भारताने नऊ पदकं मिळवली आणि त्यात पाच सुवर्ण होती. विशेष म्हणजे भारताने दक्षिण कोरियाच्या दीर्घकाळच्या वर्चस्वाला मोठं आव्हान दिलं.
ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण आणि तीन कांस्य अशी कामगिरी झाली. एका आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची ही बॉक्सिंगमधली सर्वोत्तम सुवर्ण कामगिरी ठरली. लव्हलिना बोरगोहेनचं सुवर्ण विशेष ठरलं. तिच्या कारकिर्दीत आलेल्या मानसिक आणि कामगिरीतील चढउतारांनंतर हे पुनरागमन होतं.
महिला हॉकीची कथा तर स्वतंत्रपणे लिहावी अशी. 1982नंतर तब्बल 44 वर्षांनी भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. चीनला 1-0 ने हरवून मिळालेल्या या विजयासोबत भारताने लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचं स्थानही निश्चित केलं. पुरुष हॉकी संघाने मलेशियावर 5-1 असा विजय मिळवत आपलं सुवर्ण राखलं. पहिल्यांदाच एकाच आशियाडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांनी सुवर्ण मिळवलं.
गोल्फमध्ये प्रणवी उर्सने भारतीय महिला क्रीडेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. ती आशियाई क्रीडास्पर्धेतील वैयक्तिक सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरली. महिलांच्या सांघिक स्पर्धेतही भारताला रौप्य मिळालं.
वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूचं रौप्य वेगळं महत्त्वाचं. तिच्या पदकाने भारताचा या खेळातील तब्बल 28 वर्षांचा दुष्काळ संपला.
सॉफ्ट टेनिस, मिश्र मार्शल आर्ट्स, सेपकटकरॉ यांसारख्या तुलनेने नव्या किंवा भारतासाठी कमी परिचित क्षेत्रांत पदकं मिळणंही यंदाच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलं. म्हणजे भारतीय खेळाडूंची ‘पदकांची टोपली’ काही पारंपरिक खेळांपुरती मर्यादित राहिलेली नाही.
भारतीय महिलांनी एकूण 85 पैकी 37 पदकं मिळवली. म्हणजे जवळपास 43.5 टक्के पदकं. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे भारताच्या 21 सुवर्णपदकांपैकी तब्बल 11 सुवर्णपदकं महिला खेळाडूंनी मिळवली. म्हणजे भारताच्या सुवर्णकामगिरीत महिलांचा वाटा 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाला.
नीरू धांडा हे त्याचं सर्वात चमकदार उदाहरण. ट्रॅपमध्ये भारताला महिलांच्या वैयक्तिक प्रकारात पहिलं सुवर्ण मिळवून देताना तिने विक्रमही मोडला. त्यानंतर मिश्र सांघिक सुवर्ण आणि आणखी एक रौप्य-अशी तिची तीन पदकांची कमाई झाली. तिच्या खेळात अनुभव, संयम आणि मानसिक ताकद दिसली.
प्रणवी उर्सचं सुवर्ण, लव्हलिना बोरगोहेनचं पुनरागमन, महिला हॉकीचा इतिहास, महिला क्रिकेटचं सुवर्ण, महिला कबड्डीचं सुवर्ण, तिरंदाजीतील तरुण मुलींची कामगिरी, विथ्या रामराजचा विक्रम-ही सगळी उदाहरणं एकत्र केली तर एक चित्र स्पष्ट होतं. तरुण कुमकुम मोहोडने तर ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवून सुवर्ण जिंकलं.
भारतीय महिला क्रीडापटू म्हणजे ‘अतिरिक्त पदकांची शक्यता’ नाही तर क्रीडा व्यवस्थेचा मुख्य आधार बनत आहेत.
आणि मग चीन...
पदकतालिकेत अव्वल स्थानी पुन्हा चीनचा संघ होता. 169 सुवर्ण, 89 रौप्य आणि 83 कांस्य-एकूण 341 पदकं त्यांनी जिंकली. म्हणजे चीनकडे भारताच्या जवळपास चौपट पदकं होती. अधिक धक्कादायक म्हणजे चीनची फक्त सुवर्णपदकांची संख्या 169, तर भारताची एकूण पदकं 85. चीनने सलग बाराव्यांदा आशियाई क्रीडास्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं.
चीनचा हा विजय एखाद्या पिढीने केलेला चमत्कार नाही. त्यामागे ‘जुगुओ तिझी’-म्हणजे ‘संपूर्ण देशाची एकत्रित क्रीडा व्यवस्था’-हे मॉडेल आहे.
स्थानिक पातळीवर प्रतिभाशोध, राज्यनियंत्रित प्रशिक्षण केंद्रं, क्रीडा शाळा, विशेष प्रशिक्षण अकादमी, क्रीडा विज्ञान, पोषण, बायोमेकॅनिक्स आणि दीर्घकालीन सरकारी गुंतवणूक यांची साखळी चीनने उभी केली आहे. प्रतिभाशोध लहान वयात सुरू होतो आणि काही अहवालांनुसार चीनमध्ये हजारो विशेष क्रीडा शाळा आहेत.
याचा परिणाम आइची-नागोयात स्पष्ट दिसला. चीनने जलतरणात 30 सुवर्णपदकं मिळवली; अॅथलेटिक्समध्ये 17 सुवर्ण; नेमबाजीत 28 पैकी 16 सुवर्णपदकं जिंकली. डायव्हिंगमध्ये तर सर्व 10 सुवर्ण चीनने जिंकली.
यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘एक-दोन स्टार’ नव्हे, तर तिथल्या व्यवस्थेत खोली आहे. एक विजेता खेळाडू घडत असतानाच-खाली दुसरा खेळाडू, त्याखाली तिसरा आणि पुढे चौथा असे घडत असतात.
भारताची अडचण इथेच आहे.
भारत एखादा नीरज चोप्रा, मनू भाकेर, मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू किंवा लव्हलिना बोरगोहेन तयार करतो; चीन मात्र त्या एका खेळाडूसाठी चार-पाच संभाव्य पर्यायांची प्रणाली तयार करतो.
चीनची राजकीय आणि सामाजिक व्यवस्था भारतापेक्षा वेगळी आहे. मात्र त्यावर विचार करून आपल्या देशाला अनुकूल असे काही धडे नक्की घेता येतील.
पहिला-लहान वयात प्रतिभाशोध.
दुसरा-शाळा आणि क्रीडाशाळा यांचं एकत्रीकरण.
तिसरा-प्रशिक्षकांची दीर्घकालीन कारकीर्द.
चौथा-क्रीडा विज्ञान ग्रामीण आणि जिल्हा पातळीपर्यंत नेणं.
पाचवा-अॅथलेटिक्स, जलतरण, जिम्नॅस्टिक्स यांसारख्या जास्त पदकसंख्या असलेल्या खेळांवर विशेष भर.
सहावा-खेळाडूंच्या करिअरची आर्थिक सुरक्षितता.
भारताने ‘खेलो इंडिया’ आणि टॉप्ससारख्या योजनांमधून चांगली सुरुवात केली आहे. पण पुढचा टप्पा म्हणजे या योजनांचा फायदा निवडक 50-100 खेळाडूंपुरता न राहता जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विस्तृत प्रतिभावर्गापर्यंत पोहोचवणे हा आहे. आणि त्या दृष्टीने भारताला आता वाटचाल करायची आहे. सध्या आशियाई खेळांनंतर क्रिडाविश्वाचा मोर्चा 2028च्या लॉस एंजलीस ऑलिम्पिककडे वळणार आहे. आणि त्याची पार्श्वभूमी तयार करताना या आशियाई खेळांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे.
हांगझोऊने भारताला दाखवलं होतं की शंभर पदकांचा टप्पा गाठता येतो.
आइची-नागोयाने त्यापुढचा प्रश्न विचारला आहे-
‘शंभर पदकं मिळवणारा भारत आता चीनसारखी शंभर सुवर्णपदकांची स्वप्नं पाहण्याइतकी मोठी क्रीडा व्यवस्था उभी करू शकतो का?’
पुढच्या ऑलिम्पिकपर्यंत वेळ खूपच कमी आहे. पण, आताच्या 85 पदकांच्या बारकाईने केलेल्या विश्लेषणातून त्याची सुरुवात नक्की होत असते.