आठवणीतून संघ दर्शन

विवेक मराठी    13-Oct-2026   
Total Views |
 
rss
 ‘आठवण व्यक्तींची...साठवण प्रसंगांची’ या पुस्तकात जवळपास सत्तर वर्षांचा संघघडणीचा अनुभव येत राहतो. त्याला कारण उदय तथा तात्या जोगळेकरांनी विकसित केलेली लेखनशैली. शक्य तितक्या अलिप्ततेने तात्यांनी लेखन केले असल्याने ते ‘मी’ न होता ‘आम्ही’चे झाले आहे. छोट्याछोट्या एकसष्ट लेखांतून तात्यांनी ही आठवणींची साठवण शब्दबद्ध केली आहे. या पुस्तकाची देखणी निर्मिती व प्रकाशन तात्यांचे ज्येष्ठ बंधू सुधीर जोगळेकर यांनी केली असून सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
 
 
पुस्तकाचे नाव : आठवण व्यक्तींची...साठवण प्रसंगांची
लेखक : उदय तथा तात्या जोगळेकर
प्रकाशक : सुधीर जोगळेकर
पृष्ठसंख्या : 160
किंमत : 200 रु.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीस शंभर वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने संघ विचारविश्वात एक बदल ठळकपणे जाणवू लागला आहे. तो म्हणजे व्यक्तीवर लिखाण करणे. संघटना आणि विचारविश्व या परिघात मोठ्या प्रमाणात लेखन झाले आहे. याचा अर्थ असा नाही की या आधी व्यक्तिगत जीवनातील संघ अनुभव प्रकाशित झाले नाहीत. वेगवेगळ्या काळात प्रकाशित झालेल्या या व्यक्तिगत आठवणीतून सर्वार्थाने संघ मांडला गेला नाही. संघ शताब्दीच्या निमित्ताने ही उणीव दूर झाली आहे. दीर्घकाळ संघ व्यवहारात कार्यरत असणार्‍या अनेक व्यक्ती आपल्या अनुभवाचे संचित शब्दबद्ध करू लागले आहेत. त्या मधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे उदय तथा तात्या जोगळेकर हे होय. प्रचारक जीवनाचे अर्धशतक पूर्ण केलेल्या तात्या जोगळेकर यांचे तिसरे पुस्तक ‘आठवण व्यक्तींची...साठवण प्रसंगांची’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
 
 
कोरोना आपत्तीच्या काळात ’मुद्याची गोष्ट’ हे पुस्तक प्रकाशित झाले, त्यानंतर ‘पत्थर पायातील’ हा संघ प्रचारकांची लघु चरित्रे सांगणारा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याच मालिकेतील हे पुस्तक असून उदय जोगळेकर यांनी अनुभवलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या आठवणी हा या पुस्तकाच्या गाभ्याचा विषय आहे. असे जरी असले तरी हे पुस्तक संघ समजून सांगते. संघाची कार्यपद्धती म्हणजे काय, संघात स्वयंसेवकाची जडणघडण होते म्हणजे काय होतं, गुणदोषांसकट माणूस स्वीकारायचा आणि आपल्याला पाहिजे तसा घडवायचा म्हणजे नेमके काय, माणसातला अहम् बाजूला काढायचा आणि त्यांच्या अंतर्मनात वयम् जागृत करायचा तो कसा,‘देश हमे देता है सबकुछ, हम भी तो कुछ देना सीखे’ ही भावना त्यांच्या भावविश्वात कशी रूजवायची... यासाठी संघाची स्वतःची अशी सॉफ्ट पॉवर आहे. या सॉफ्ट पॉवरचे जनित्र म्हणजे संघ प्रचारक. या सॉफ्ट पॉवर जनित्राचे इंधन असते प्रेमळ स्वभाव, आत्मीय व्यवहार आणि ‘तू मी नाही वेगळा, केशवकुळाचे वारसदार आपण’ हा भाव. तात्या जोगळेकर दीर्घ काळ प्रचारक आहेत. त्यांनी ही सॉफ्ट पॉवर विकसित केली आणि त्याचा परिणाम दिसून येईल असे असंख्य कार्यकर्ते उभे केले. पन्नासहून अधिक वर्षे माणसांचे काम करणार्‍या तात्यांकडे संघआठवणींचे भांडार आहे. त्यातील निवडक आठवणी व व्यक्तींविषयी या पुस्तकात त्यांनी लेखन केले आहे.
 
 
या पुस्तकाचे साधारणपणे तीन विभाग लक्षात येतात. डोंबिवली, सोलापूर आणि अन्य शहरे (मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे) प्रचारक निघण्याअगोदर तात्या डोंबिवली येथे राहत होते. स्वाभाविकच डोंबिवली शहराचे गावपण, तिथली माणसं, संघ स्वयंसेवक यांच्या असंख्य आठवणींचा खजिना तात्यांकडे आहे. त्यातील निवडक आठवणी या पुस्तकात आहेत. तात्यांच्या प्रचारक जीवनास सुरूवात सोलापुरात झाली. सोलापूर शहर, तालुका आणि जिल्हा अशा तीन पातळीवर त्यांनी अनेक वर्षे काम केले. या काळात अनेक व्यक्ती, संघ स्वयंसेवक तात्या जोगळेकर यांनी अनुभवले. त्यातील निवडक व्यक्तिरेखा या पुस्तकात आहेत. त्याचबरोबर न्यू मंगल नावाचे चहाचे हॉटेल आणि मार्डी नावाचे छोटे गाव हेही तात्यांच्या लेखनाचे विषय झाले आहेत. मार्डीसारख्या छोट्या गावातून अनेक संघ प्रचारक निघाले. त्यामागचा संघभाव या लेखात पाहायला मिळतो.
 
 
तात्या प्रचारक निघाले आणि आणीबाणी जाहीर झाली, तेव्हा काही काळ भूमिगत राहून त्यांनी काम केले. त्यातील रज्जूभय्या आणि हो.वे.शेषाद्री यांच्यासोबतचा प्रसंग तात्यांनी या पुस्तकात लिहिला आहे. तो खूपच रोमहर्षक असून त्या काळी संघ प्रचारकांनी कोणत्या दिव्याचा सामना केला यांची साक्ष पटते. सोलापूर जिल्ह्यातील दीर्घकाळ काम व दीर्घ प्रवास यांचा आलेख या पुस्तकात वाचता येतो.
 
 
तात्या जोगळेकरांनी अनेक गुणवान व्यक्ती शोधल्या आणि त्यांना आवश्यक ती मदत केली. एकच उदाहरण द्यायचे तर विजय जाधव, समतोल फाउंडेशनचे देता येईल. घर सोडून आलेल्या, रेल्वे स्टेशनवर भटकणार्‍या मुलासाठी स्वयंप्रेरणेने काम करणार्‍या विजय जाधव यांना सुरुवातीच्या काळात तात्यांनी सर्वार्थाने आधार दिला होता. अशा अनेक छोट्यामोठ्या संस्था व संघटना यांच्या आठवणी या पुस्तकात वाचता येतात.
 
 
केवळ 160 पानांच्या या पुस्तकात जवळपास सत्तर वर्षांचा संघघडणीचा अनुभव येत राहतो. त्याला कारण तात्यांनी विकसित केलेली लेखन शैली. शक्य तितक्या अलिप्ततेने तात्यांनी लेखन केले असल्याने ते ’मी’ न होता ’आम्ही’चे झाले आहे. छोट्याछोट्या एकसष्ट लेखांतून तात्यांनी ही आठवणींची साठवण शब्दबद्ध केली आहे. या पुस्तकाची देखणी निर्मिती व प्रकाशन तात्यांचे ज्येष्ठ बंधू सुधीर जोगळेकर यांनी केले असून सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
 
 
संघ समजून घेण्यासाठी उपयुक्त असणारे हे पुस्तक भारतीय विचार साधना पुणे येथे 200 रुपयांत उपलब्ध आहे.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 पुस्तक विभाग  संपादक 

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001