न्यूयॉर्कच्या भाषणात परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मानव एकतेचा विषय मांडलेला आहे. ‘हिंदू संघटन’ हे त्या अर्थाने ‘धार्मिक संघटन’ नाही. म्हणजे एक प्रेषित, एक ग्रंथ, एक पूजापद्धती सांगणार्यांचे संघटन नाही. त्याची व्याप्ती ‘अखिल मानवजात’ आहे. द्विशताब्दीची वाटचाल करीत असताना हे ‘वैश्विक लक्ष्य’ येणारी पिढी नक्कीच पूर्ण करील, या विषयीची शंका बाळगण्याचे कारण नाही.
रूढार्थाने संघ शताब्दी वर्षाची सांगता होत आहे. संघटनेचे शताब्दी वर्ष म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमांची रेलचेल असते. जेवढी संस्था मोठी तेवढे तिचेे कार्यक्रम मोठे असतात. ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ही संस्था फार मोठी असल्यामुळे या, संस्थेचेही असेच भव्य कार्यक्रम होतील, अशी काही जणांची अपेक्षा होती; परंतु संघाने प्रारंभापासून असे ठरवले की, शताब्दी वर्षांत कोणताही भव्य कार्यक्रम करायचा नाही, याचे कारण काय?
याचे कारण असे की, असा कार्यक्रम करून संघाला स्वतःचे नाव मोठे करायचे नाही. शंभर वर्षांत संघाने काय केले याचा डंका पिटायचा नाही. संघ स्थापनेपासून संघाची भूमिका अशी राहिली की, आपल्याला संस्थेचे नाव मोठे करण्यासाठी काम करायचे नाही. तसेच व्यक्तिमाहात्म्ये वाढविण्यासाठी काम करायचे नाही. आपले काम देशाचा गौरव वाढविण्याचे काम आहे. आपल्या पवित्र धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचे काम आहे. कार्याची यशस्विता ही कामे आपण किती चांगल्या प्रकारे केली आहेत, यावरून ठरविली पाहिजे. म्हणून संघाने ’संस्थेचा गौरव करणारे कार्यक्रम करायचे नाहीत,’ असा निर्णय केला.
व्यक्तिनिर्माणाचे काम आपल्याला देशात करावे लागते, याचा अभिमान संघाला नाही. देशातील प्रत्येक व्यक्ती प्रथम देशभक्त असली पाहिजे. आपला देश अतिशय प्राचीन आहे. या देशाचा धर्म आहे. या देशाची संस्कृती आहे. तिचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. ’हा देश ही आपली मातृभूमी आहे, तिची सर्व प्रकारे सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे,’ हा भाव सदैव जागा असला पाहिजे. समाज आत्मनिर्भर असला पाहिजे. आपले सरंक्षण करण्यास समर्थ असला पाहिजे. त्यासाठी तो संघटित असला पाहिजे.
या सर्व गोष्टी शिकवाव्या लागतात, ही चांगली गोष्ट नाही. या सर्व गोष्टी स्वाभाविकपणे भारतात जन्माला येणार्या प्रत्येकाला प्राप्त झाल्या पाहिजेत. प्राप्त करून देण्याची परंपरा खंडीत झाली. असे संस्कार घडविण्याचे काम कुटुंब, प्रार्थनास्थळे, शिक्षणसंस्था यातून घडावे लागते. हे प्रत्येक केंद्र आपले स्वाभाविक कर्तव्ये विसरले आहे. आजकाल कुटुंबात स्वत:पुरते पाहण्याचा संस्कार दिला जातो. आईबाबा सांगतात की, ’तुझ्यापुरता विचार कर, अन्य कुणाच्या भानगडीत पडू नकोस, स्वतःचे करिअर नीट कर.’ अशा कुटुंबात घडलेला मुलगा समाजाची चिंता फारशी करीत नाही. तो स्वतःपुरतेच पाहायला शिकतो. वरच्या मजल्यावरून खाली कचरा टाकण्यातदेखील त्याला काही वावगे वाटत नाही.
मंदिरातून कर्मकांडाचे रक्षण केले जाते. शनिवारी मारुतीला नारळ आणि तेल वाहायचे; चतुर्थीला गणपतीला मोदक द्यायचा हे सर्वांना पाठ असते. अशी कर्मकांडे प्रत्येक देवतांच्या बाबतीत आहेत. या देवता कशाचे प्रतीक आहेत, कोणत्या शक्तीच्या त्या देवता आहेत, त्या शक्ती मी माझ्यामध्ये कशा आणू शकतो, त्यासाठी काय केले पाहिजे, हे कुठल्याही मंदिरातून सांगितले जात नाही. पुजारी सांगतात ती दक्षिणा द्या आणि व्यवस्थापक सांगतात ते दान करा. याला काही सन्माननीय अपवाद देशभरात नक्की आहेत. अशा मंदिरांची दखल ‘विवेक’ने आवर्जून घेतली आहे. अशा मंदिरांची संख्या वाढायला हवी, हीच अपेक्षा आहे.
आपली शिक्षणसंस्था शिक्षणाचा आत्माच हरवून बसलेली आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेतून कोणतेही नैतिक शिक्षण मिळत नाही. आपला धर्म, इतिहास, परंपरा, जीवनमूल्ये, संस्कृती यांचे काहीही संस्कार होत नाहीत. शालेय जीवनात पाढे पाठ करण्याची घोकमपट्टी होते, कविता पाठांतर होते. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात हेही होत नाही. वेगवेगळ्या विषयांंची माहिती भरपूर कोंबली जाते.
विजयादशमीला परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी संघ सुरू केला. स्थापन केला नाही. ’सुरू केला’. याचा अर्थ ’राष्ट्रीय संस्कार देणारी जी परंपरा खंडित झाली, तिचे काळाच्या संदर्भात पुनरुज्जीवन केले.’ एक अभिनव कार्यपद्धती त्यांनी दिली. तिला ’संघशाखांची कार्यपद्धती’ म्हणतात. जे राष्ट्रीय संस्कार वर दिलेल्या तीन घटकांतून व्हायला पाहिजेत, ते होत नसल्यामुळे संघशाखांची पद्धती रूढ करण्यात आली.
राष्ट्रीय संस्कार शिकवण्यासाठी इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया, जपान येथे शाखा लागत नाहीत. केवळ इंग्लंडचे उदाहरण देऊया. आईच्या गर्भात असतानाच इंग्रज मुलावर संस्कार होतो की, ’मी इंग्रज आहे, मी इंग्रज म्हणून लोकशाही मूल्यांना बांधलेला आहे. मी इंग्रज म्हणून राजसत्तेला एकनिष्ठ राहणार आहे. मी इंग्रज म्हणून माझ्या देशाच्या साम्राज्याचे रक्षण करणार आहे. मी जगात कुठेही गेलो तरी देशाच्या हिताशी तीळमात्र तडजोड करणार नाही. मला आफ्रिकेच्या जंगालात जावे लागो किंवा अरबस्थानच्या वाळंवटात फिरावे लागो की, अथांग सागरात महिनो न् महिने अडकून पडावे लागो. माझ्या देशनिष्ठेत तीळमात्र अंतर पडणार नाही.’
इंग्रज माणसाच्या आईला हे सर्व संस्कार शिक्षणपद्धतीतून कुटुंबव्यवस्थेतून आणि चर्चमधून घडत असतात. हे सर्व संस्कार तिच्या गर्भातून उतरतात. दुसर्या देशाला फितूर झालेला इंग्रज माणूस शोधावा लागतो. आपल्या देशात फितुरांची मालिका आहे.
’शताब्दी वर्ष’ हे प्रत्येक स्वयंसेवकासाठी आत्मचिंतनाचे वर्ष ठरले. अजून आपले कार्य त्या अर्थाने पूर्णावस्थेत गेलेले नाही.
कोट्यवधी लोक जोडले गेलेले आहेत, त्याहून अधिक अजूनही असंपर्कित आहेत. ’सर्व समाजाचे संघटन’ हे संघाचे लक्ष्य आहे. समाजांतर्गत संघटन म्हटले, तर खूप प्रचंड काम झाले असे म्हणावे लागेल; पण ते संघाचे लक्ष्य नाही. ’संघाचे लक्ष्य समग्र हिंदू समाजाचे संघटन’ असे आहे आणि संघाच्या ’हिंदू’ परिभाषेत ’भारतातील सर्व उपासना पंथ’ येतात. ख्रिश्चन, मुस्लीम, पारशी असे भारतात न जन्मलेले उपासना पंथदेखील येतात.
आजवर संघाचे कार्य रूढार्थाने जे हिंदू आहेत, त्यांच्यापुरते मर्यादित राहिलेले आहे. कार्याच्या वाटचालीत अनेक मुस्लीम, ख्रिश्चन बांधव संपर्कात आले. त्यातील काही संघकार्यात रमलेदेखील आहेत. त्यांची संख्या फार अल्प आहे. भविष्यकाळाचा विचार करता भारतात राहणार्या समग्र हिंदूचे संघटन अजून बाकी आहे. येणार्या काळात आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे, हा विषय मनात ठेवावा लागेल. न्यूयॉर्कच्या भाषणात परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मानव एकतेचा विषय मांडलेला आहे. ’हिंदू संघटन’ हे त्या अर्थाने ’धार्मिक संघटन’ नाही. म्हणजे एक प्रेषित, एक ग्रंथ, एक पूजापद्धती सांगणार्यांचे संघटन नाही. त्याची व्याप्ती ’अखिल मानवजात’ आहे. द्विशताब्दीची वाटचाल करीत असताना हे ’वैश्विक लक्ष्य’ येणारी पिढी नक्कीच पूर्ण करील, या विषयीची शंका बाळगण्याचे कारण नाही.