प्रभावातून परिवर्तन - समितिची 90 वर्षांची यात्रा

विवेक मराठी    18-Oct-2026
Total Views |
@सुहासिनी कुलकर्णी
विजयादशमीच्या मुहूर्तावर, वर्धा इथं 25 ऑक्टोबर 1936 रोजी ‘राष्ट्र सेविका समिति’ची स्थापना झाली. त्या घटनेला 90 वर्षं पूर्ण झाली आहेत. आजच्या घडीला ‘राष्ट्र सेविका समिति’ही संघाचा अविभाज्य भाग बनली आहे. समितिने केवळ महिलांना संघटीत करण्याचं काम केलं नाही, तर त्यांचं आत्मभान जागृत केलं. समितिची स्थापना ते तिची वाढ या कालखंडावर टाकलेला प्रकाश.
 
rss
 
 
परिवर्तनाचा विचार करत असताना आपण नेहमी तुलनात्मक परिस्थितीचा विचार करत असतो. त्यामुळेच समितिची स्थापना जेव्हा आणि ज्या परिस्थितीत झाली, त्याबद्दल प्रथम थोडा विचार करूया.
 
समितिच्या स्थापनेची पार्श्वभूमी
 
वंदनीय मावशींचा जन्म 5 जुलै 1905 रोजी झाला. तो काळ वंगभंग विरोधी चळवळीचा काळ होता. त्यागाची भावना समाजात अत्यंत प्रबळ होती. तेजस्विता, स्पष्ट विचार, सुधारणा करण्याची तळमळ, त्यासाठी लागणारे धैर्य, सेवाभाव, वाचन करून एखादा विषय खोलात जाऊन समजून घेण्याची इच्छा अशा अनेक गोष्टी त्यांच्या स्वभावात होत्या, ज्याचं प्रतिबिंब पुढे संघटनेच्या कामात दिसलं.
 
समाज राजकीय सुधारणांबद्दल जरी जागृत होत असला तरी स्त्रीविषयक सामाजिक दृष्टीकोन उदासीनतेचा होता. आजूबाजूला घडणार्‍या घटनांमधून स्त्रीची समाजात असणारी दुर्बल स्थिती त्यांना चांगलीच जाणवत होती.
 
 
त्यातच 1925 साली रा.स्व.संघाची स्थापना डॉ. हेडगेवार यांनी नागपूर इथे केली. 1936मध्ये वं.मावशींची मुलं संघकार्यात उत्साहानं भाग घेऊ लागली होती. त्यांच्या घराच्या अंगणातच मित्र जमवून ते निरनिराळी प्रात्यक्षिकं करतं. त्याचं वं.मावशी बारकाईनं निरीक्षण करीत असत. मुलांमधला बदल त्यांना भावला. तसंच संघात दिलं जाणारं शिक्षण स्त्रियांनाही दिलं जावं, असं त्यांना वाटू लागलं. त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात वं.मावशींनी परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची प्रथमच भेट वर्धा इथं घेतली. वं.मावशींचं जे विचारमंथन हिंदू स्त्रीसंघटना बांधणीबद्दल सुरू होतं, त्याला बळकटी मिळाली. सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अजून दोन-तीन भेटींअंती स्पष्ट स्वरूपाचा निर्णय झाला. ’राष्ट्र सेविका समिति’ची स्थापना 25 ऑक्टोबर 1936 रोजी, विजयादशमीच्या मुहूर्तावर, वर्धा इथं झाली.
 
rss 
 
वं.सरस्वतीताई आपटे यांनीही असाच विचार त्याच काळात केला. हा एक लोकविलक्षण योगायोग म्हणावा लागेल. वं.ताईंचे वडील गंगाधरपंत ह्यांचे लोकमान्य टिळक हे मामा. त्या नात्यानं वं.ताई लोकमान्य टिळकांची नात. टिळक मंडालेहून सुटून आल्यावर त्यांना पाहण्याचं, ऐकण्याचं भाग्य त्यांना लाभलं. लग्न ज्यांच्याशी झालं ते विनायकराव संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्या कार्याचे आणि विचारांचे संस्कार हळूहळू झिरपू लागले.
 
 
...आणि त्यांनाही हिंदू स्त्री संघटन बांधणीची आवश्यकता जाणवू लागली.
 
त्यामुळेच 1935 साली त्यांनी पुण्यात वं.मावशींप्रमाणेच हिंदू महिलांना संघटीत करण्याचं कार्य हाती घेतलं. मूळचा सोशिक स्वभाव, निष्ठेनं हाती घेतलेलं काम कितीही अडचणी आल्या तरी पूर्ण करणं, कामाचं योग्य नियोजन, हा समाज आपला आहे, ही भावना, ह्या सर्वांना वाव मिळू लागला. त्यांच व्यक्तिमत्त्वही काळाच्या पुढे विचार करणारं, सेवाभावी होतं.
 
अशाच प्रकारचं कार्य याच सुमारास नानीबाई कोलते यांनी भंडारा इथे तसंच उषाताई मोकाशी यांनी सातारा इथे सुरू केलं होतं.
या सर्व पुण्यधारा एकत्र झाल्या आणि राष्ट्र सेविका समितिचा गंगौघ वाहू लागला.
 
समितिची स्थापना ही समाजातील अर्धी शक्ती, स्त्री शक्ती जी कुटुंबाचा कणा आहे, तिला राष्ट्रकार्यासाठी तत्पर करणं, ह्या स्त्रीशक्तीचा प्रभाव निर्माण करणं यासाठीच झाली.
 
 
व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण
 
’व्यक्तिनिर्माण’ या संकल्पनेत जे अनेक सद्गुण व्यक्तिमत्त्वामध्ये जागवायचे असतात, त्यातील अनेक स्त्रीच्या ठाई जात्याच असल्यामुळे, त्या शक्तीला योग्य मार्गानं प्रवाहित करणं हे काम समिति मुख्यतः करते. त्या धारेची शक्ती त्यामुळे कैकपटीनं वाढते. त्या शक्तीचा उपयोग अगदी सूक्ष्म किंवा व्यापक, दोन्ही पद्धतीनं करता येऊ शकतो.
 
वं.मावशी आणि वं.ताई यांच्याठायी हा द्रष्टेपणा होता. योग्य संकल्प करून, कार्यशक्तीचा वापर करून, सातत्यपूर्ण सामूहिक प्रयत्नांच्या साहाय्यानं परिवर्तन आणणं, असा त्यांचा उद्देश होता. हा उद्देश त्या दोघींच्याही दृष्टीसमोर स्पष्ट होता आणि त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांच्याही! उद्दिष्ट तरी अवघड वाटत असलं तरी कार्यशैली मात्र अत्यंत सोपी निवडलेली होती.
 
शाखा हे एकक
 
कार्याचं एकक हे शाखा आहे. एक प्रभावी शाखा तिथे येणार्‍या प्रत्येक सेविकेमध्ये परिवर्तन घडवून आणू शकते. शाखेमध्ये घेतल्या जाणार्‍या छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून सामूहिकतेचा विकास होतो, व्यक्तीमध्ये शिस्त बाणते, नेतृत्व गुण विकसित होतो, देशभक्ती जी मनात असतेच ती जागृत होते आणि हिंदू जीवनमूल्यांचा प्रभाव जाणवायला लागतो.
 
1936साली समितीच्या शाखेचा प्रारंभ झाला. आज संपूर्ण भारतामध्ये 591 दैनिक शाखा आणि 4295 साप्ताहिक शाखा अशा एकंदरीत 4886 शाखा सुरू आहेत. अखिल भारतीय क्षेत्र 12, प्रांत 40, जिल्हे 853 त्यातील 852 शाखायुक्त, 453 सेवाकार्य युक्त आहेत.
 
एक अवघड काम आयुष्यात एकदा करणं, कदाचित सोपं ंअसेल; परंतु अनेक छोटी छोटी काम सातत्यानं करत राहणं यासाठी मनाचा पक्का निर्धार असावा लागतो आणि तशी सवयही लावून घ्यावी लागते.
 
rss 
 
संघटन
वंदनीय मावशी आणि वंदनीय ताई यांना समिति कार्याचा प्रभाव समाजात निर्माण करून त्यातून परिवर्तन साधायचे होते.
प्रभाव म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट विचाराचा, परिस्थितीचा, व्यक्तीचा अथवा घटनेचा मनावर होणारा खोल परिणाम. हा परिणाम परिवर्तन घडवतो. हे परिवर्तन व्यक्तीच्या दृष्टीकोनामध्ये, विचारांमध्ये, वर्तनामध्ये, सवयींमध्ये आणि भावनांमध्ये सुद्धा घडलेलं दिसून येतं.
 
अनेक व्यक्तींचं व्यक्तित्व अत्यंत प्रभावी असतं. त्यांच्या निकट सहवासानं असा प्रभाव पडलेला दिसून येतो; पण मानवी जीवन हे क्षणभंगुर आहे. त्यामुळे ती व्यक्ती जेव्हा या जगात नसेल तेव्हा व्यक्तिगत प्रभावाखाली असलेल्या संघटनांचा र्‍हास होतो, हळूहळू प्रभाव क्षीण झाल्यामुळे.
 
कार्यकर्त्यांमधील काम करण्याची प्रेरणा, नवीन काही करण्याची क्रियाशीलता टिकवून ठेवायची असेल, प्रभावातून येणारा परिणाम दीर्घकाल टिकवायचा असेल तर व्यक्तीच्या प्रभावापेक्षा सुदृढ संघटन बांधणीचा प्रभाव जास्त काळ, सातत्यपूर्ण परिणाम घडवून आणू शकतो. व्यक्तीच्या पश्चातही संघटन उत्तरोत्तर वाढू शकते, विकसित होऊ शकते आणि काळाशी पावलं जुळवून घेऊन नव्या काळात अर्थपूर्ण आणि समाजाच्या हिताचं, राष्ट्राच्या हिताचं असं उद्दिष्ट साध्य करू शकते.
 
समितिकार्याचा प्रभाव संघटनेतील व्यक्तींवर पडून त्या व्यक्तीत परिवर्तन घडलेलं आणि परिवर्तित झालेल्या व्यक्तींनी समाजात परिवर्तन घडवलेलं आपल्याला दिसेल. ’शाखा’ हे एकक कार्यकर्ते निर्माण करण्याचं ठिकाण आहे. हेच कार्यकर्ते पुढे अनेक इतर संघटनांमधे काम करतात; परंतु समितिविचार कोणतंही काम करताना जागृत असतो.
 
 
कार्याची सुरुवात व्यक्तींच्या द्रष्टेपणातून झाली; पण रचना मात्र व्यक्तिकेंद्रित नाही, हे या संघटनेचं वैशिष्ट्य आणि कार्यातलं सौंदर्य स्थळ आहे.
 
कार्यकर्ता कसा घडतो?
 
समितिमध्ये आपण उत्सव आणि दिन साजरे करतो आणि इतर अनेक उपक्रम राबवतो. हे करत असताना इतरांची मदत घेऊन, त्यांना सांभाळून घेऊन, त्यांच्यातले गुण ओळखून, त्यांना योग्य ते काम देणं, हे प्रशिक्षण मिळत. समितिच्या उत्सवांचं पूर्ण नियोजन आणि पूर्व नियोजन, वेळ पाळण्याची शिस्त, व्यक्तिगत अडीअडचणी बाजूला ठेवणं आणि आपण ठरवलेलं ध्येय पूर्ण करण्याला प्राधान्य देणं, हे प्रत्येक सेविका शिकते. हे करत असतानाच अनेक नवीन गोष्टी तिला शिकायला मिळतात.
 
समितिच्या प्रशिक्षण वर्गांमध्ये सुद्धा व्यक्तीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. इथे घडणार्‍या दैनंदिन चर्चा, बौद्धिक, प्रात्यक्षिक, शारीरिक प्रशिक्षण अशा अनेक गोष्टी!
 
 
प्रशिक्षण वर्ग अथवा समितिच्या बैठका यांना जाऊन आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा वाढते; त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून त्यांची सक्रियता वाढते आणि मिळालेल्या प्रशिक्षणामुळे कामाच्या गुणवत्तेत वाढ होते. वंदनीय मावशींनी वर्ध्यामध्ये 1936 साली शाखा सुरू केली. याचा उल्लेख आपण मागेच केलेला आहे; परंतु समितिचं कार्य हे हळूहळू देशव्यापी होत गेलं. संघटनेचा कार्य विस्तार होत असताना संपूर्ण भारतभरातील सेविका त्यात सामावल्या गेल्या. 1958साली सिंधुताई फाटक यांनी समितिच्या पहिल्या प्रचारिका म्हणून कार्य केलं. 1980 नंतर 200 जणींनी प्रचारिका म्हणून कार्य केलेलं आहे. सध्या 50 प्रचारिका कार्यरत आहेत.
 
rss 
 
1952मध्ये वं.मावशींनी रामायण कथा सांगायला सुरुवात केली. हे त्याचं 75वं वर्ष आणि वं.मावशींचं 50वं स्मृतिवर्ष यावर्षीच आहे.
 
 
कार्याची उदाहरणं
 
समितिनं देशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सर्व घटनांमध्ये आपला अर्थपूर्ण सहभाग नोंदविलेला आहे. विविध प्रकारची जागरण आंदोलन समितीने राबवलेली आहेत. वं. मावशींचं चित्र प्रदर्शन घेऊन वंदनीय प्रमिलाताईंनी देशभरात 108 स्थानांवर प्रवास केलेला आहे. 2012 साली स्वामी विवेकानंद सार्ध शतीनिमित्त 1500 व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आणि दीडशे प्रबुद्ध महिला संगोष्ठी कार्यक्रम झालेले आहेत. 2012 या वर्षीच शंभर जणींनी विस्तारिका म्हणून काम केलेलं आहे. 2016 साली समितिला 80 वर्षं पूर्ण झाली, त्यानिमित्त एक प्रेरणा शिबिर घेण्यात आलं. ’पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी’निमित्त 2024-25साली अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. संघशताब्दीनिमित्त 2025साली शंभर गीतांचा कार्यक्रम करण्यात आला. अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये समितिने आपल्याकडून शक्य ते सर्व योगदान दिलेले आहे. कोविड काळात समुपदेशनाचं अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य सेविकांनी केलेलं आहे. गृहिणी शाखांची संख्या जरी जास्त असली तरी युवतींना समितिकार्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यासाठी करण्यासाठी तरुणी शाखांची वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. युवती संसदेच्या माध्यमातून समिति युवतींपर्यंत प्रभावीपणाने जाऊन पोचते आहे.
 
आत्ता नुकताच शाळांमध्ये जाऊन ’संपूर्ण वंदेमातरम्’ शिकवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.
 
हस्तलिखिताच्या माध्यमातूनही मोठा संपर्क होत असतो. प्रत्येक हस्तलिखित 40 ते 50 जणींना कार्यात सहभागी करून घेते. पुढील कार्यासाठीही योजना आकार घेतच आहेत.
 
लेखिका ’राष्ट्र सेविका समिति’च्या पुणे जिल्हा
सह बौद्धिक प्रमुख आहेत.